संपादने
Marathi

एवढ्या जगात माय मानतो मराठी. . . ! संगितकार कौशल इनामदार यांचा युअर स्टोरीच्या भाषा मेळ्यात सुसंवाद!

kishor apte
12th Mar 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

अनेकतेमधून एकता हेच ज्या देशाच्या मातीचे सार राहिले आहे त्या देशात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या भाषा बोलणा-या माणसांच्या मनातील देशप्रेमाची भाषा मात्र एकच आहे आणि याचे प्रत्यंतर येते ते आमच्या राष्ट्रगीतामधून! “ पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग” असे आसेतू हिमाचल आम्हाला जोडणारी देशभावना कोणत्याही भाषेत असली तरी आमचा सूर एकच असतो आणि ते म्हणजे देशप्रेम!

या देशात जर इथल्या जनतेच्या मनातील हूंकार जाणून घ्यायचे असतील तर भारतीय भाषांना कोणताही पर्याय असू शकत नाही. हीच गोष्ट ओळखून युअर स्टोरीच्या संस्थापिका संपादिका श्रध्दा शर्मा यांनी देशातील विविध प्रांतात बोलण्यात येणा-या भाषांमध्ये प्रेरणादायी, अभिनव आणि जगावेगळ्या कामगिरी करणा-यांच्या गौरवकथा देण्याचा स्तुत्य प्रयत्न युअर स्टोरी डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून सुरु केला. आणि त्याला आज मिळणा-या यशाने हेच सिध्द केले आहे की कोणत्याही भाषेत संवाद केला तरी या भाषा आम्हाला जोडतात कारण - - - ‘आम्ही सारे भारतीय आहोत’. या सा-या भाषा वेगळ्या असल्या तरी त्याचा सूर त्यांची दिशा एक आहे हेच नवीदिल्ली येथे झालेल्या ‘युअर स्टोरी’ च्या पहिल्या वहिल्या डिजीटल भाषा मेळ्यातून प्रत्ययास आले.

गायक -संगीतकार कौशल इनामदार

गायक -संगीतकार कौशल इनामदार


या कार्यक्रमात देशाच्या विविध भाषिक नामवंतानी हजेरी लावली होती. त्यात महाराष्ट्रातून उपस्थित होते प्रसिध्द संगीतकार आणि ‘मराठी गीता'चे कर्तेधर्ते गायक संगीतकार प्रेरक कौशल इनामदार! यावेळी युअर स्टोरीच्या मंचावरुन आपली आपल्या भाषेच्या गौरवाची स्टोरी सांगताना ते म्हणाले की, “युअर स्टोरीच्या या मंचावर मी आज माझी स्टोरी सांगण्यासाठी आलो आहे, मी कुणी भाषावादी नाही किंवा रुढार्थाने भाषाभिमानी नाही. माझे शिक्षण इंग्रजी माध्यामातूनच झाले. माझी पिढी भाषा या विषयाच्या बाबतीत आग्रही नसली तरी मराठी भाषिक असूनही मला मराठी भाषेच्या विकासातील अडचणी इत्यादी काही विषय माहिती नव्हते. पण २००८मध्ये एका खाजगी रेडिओ केंद्रासाठी गाणे तयार करण्याच्या कामी गेलो असताना सहज संवादातून मला जाणवले की मराठीच्या मुलूखातच ती परकी झाली आहे. मराठी भाषेतील कार्यक्रम महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत करायचे नाही असेच धोरण घेऊन काही लोक जर रेडिओ केंद्र सुरू करत असतील आणि मराठीत कार्यक्रम करणे अप्रतिष्ठेचे मानत असतील तर माझ्या मायबोलीसाठी तिच्या गौरवासाठी मला काहीतरी करावे लागेल असा मी विचार केला” कौशल म्हणाले.

image


त्यांनी सांगितले की त्यावेळी सहकारी मित्रांच्या संवादातून मला जाणवले की, बंगळूरूमध्ये बहुभाषिक समाज आहे पण तेथील स्थानिक भाषा म्हणून कानडीला कुणी कमी लेखत नाही, किंवा कोलकात्यामध्ये बंगालीला कमी लेखले जात नाही मग महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीची उपेक्षा का? असा माझा प्रश्न होता. मनात विचार आले पण मी नेहमीच्या पध्दतीने धरणे, आंदोलने या मार्गाने भांडण करावे या मताचा नव्हतो. मनात वादळ मात्र होते की माझी मराठी का नाही ? युनेस्कोच्या एका भाषा विषयक पाहणीचा निष्कर्ष आहे की जगात सर्वात जास्त बोलल्या जाणा-या ज्या भाषा आहेत त्यात पंधराव्या क्रमांकावर मराठी भाषेचा क्रमांक लागतो. दहा कोटी पेक्षा जास्त लोक ही भाषा बोलतात. आणि जगातल्या सर्वाधिक लोकांपर्यत पोहोचणा-या रेडिओसारख्या माध्यमाचे धोरण मराठी भाषा नको हे कसे काय असू शकेल? हे आम्ही बदलायला लावू हा निर्धार करुन कौशल यांनी काम सुरू केले. एक विचारवंत संगीतकार शांतपणे चुकीच्या-अन्यायाच्या मुद्द्यावर कोणातही आकांत तांडव न करता कसा नेमका मार्ग शोधून काढू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.

image


कौशल म्हणाले की, एका संगीतकाराची ओळख म्हणजे काय तर त्याचे गाणे, ‘नाम गुम जायेगा चेहरा तो बदल जायेगा मेरी आवाज ही पहेचान है’ - पण गुलजार साहेबांनी शेवटचा शब्द मार्मिक सांगितला आहे . . . गर याद रहे’ असे कौशल म्हणाले त्याला उपस्थितांनी टाळ्या देऊन दाद दिली. व्होडाफोनसारखी जगातील मोठे नेटवर्क असलेली कंपनी मराठी लोकांना त्यांचे मोबाईल सिम विकते मात्र त्यांचे धोरण असे का असू शकते की हिंदीत किंवा इंग्रजीत बोला मराठीत बोलता येणार नाही ? कौशल म्हणाले की, “महाराष्ट्रात स्थानिक भाषा म्हणून मराठीचा सन्मान झालाच पाहिजे यावर कुणाला वाईट का वाटावे?” त्यातूनच या मायबोलीचा सन्मान वाढावा यासाठी जगातील सर्वात मोठे गाणे मराठीत करण्याच्या संकल्पनेचा जन्म झाला असे ते म्हणाले. आणि ‘मराठी भाषेसाठी एक दिवस द्या’ असे आवाहन केले कारण जास्तीत जास्त गायकांच्या आवाजात हे गाणे ध्वनिमुद्रीत करायचे होते. कौशल म्हणाले की, ३५६ लोकांनी त्यासाठी वेळ दिला आणि पहिल्याच ज्या गायिका आल्या त्यांचे नाव होते मिना मुखर्जी! त्यांना मी विचारले की, तुमचे पती बंगाली असावेत आणि तुम्ही मराठी आहात ना? त्या नाही म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, “मी जन्मले आणि वाढले महाराष्ट्रात माझे आई वडिल पती सारे बंगालीच आहेत. पण माझी बंगाली इतकीच मराठी भाषासुध्दा मला आपलीशी वाटते”. इनामदार म्हणाले की, “असेच अनेक जण भेटले जे सिंधी आहेत, मारवाडी गुजराती आहेत, पंजाबी आहेत पण त्यांना त्यांची भाषा म्हणुन मराठीभाषा जवळची वाटते” मुंबई जवळच्या ठाणे येथे आम्ही जगातील सर्वात मोठे गाणे मराठीत मुद्रित केले त्यावेळी आठ हजार भाषा प्रेमी हजर होते. आणि आम्ही त्या रेडिओ केंद्राला विचारणा केली की, ‘जगातील सर्वात मोठे गाणे आपण प्रसारीत करणार का? त्यांचे उत्तर आले की ‘का नाही?’ पण ते मराठीत आहे असे आम्ही सांगितले तर त्यांना त्यांचे धोरण बदलून त्या गाण्याचे प्रसारण करावे लागले. २७ फेब्रुवारी २०१० रोजी मराठी भाषेला तिचा सन्मान आम्ही मुंबईतच मिळवून दिला असे कौशल यांनी अभिमानाने सांगितले. ते म्हणाले की रेडिओ मिरची आता दरवर्षी मराठी गाण्यांसाठी पुरस्कार देते आणि त्यांच्या रेडिओवरुन मराठी कार्यक्रम देखील होतात. कौशल म्हणाले की विविध भाषांमध्ये प्रेरणा देणारा संदेश आपण युअर स्टोरीमधून देता तसाच आम्ही तो मराठी गाण्यातून दिला आहे. तुमच्यात शक्ती असेलतर एखादे काम तुम्ही करु शकालच असे नाही पण तुमच्याकडे तुमची भाषा असेल तर तुम्ही तेच काम नक्कीच करू शकता हेच आम्ही जगाला दाखवून दिले आहे.

यावेळी कौशल यांनी जगप्रसिध्द सर्वात मोठ्या मराठी गीताच्या काही पंक्तिनी आपल्या संवादाचा समारोप केला.

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म पंथ जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी. . . . . . !”

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

    Latest Stories

    आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा