संपादने
Marathi

निर्मला केवलानीः स्वप्न बघण्याची प्रेरणा देणारी लढवय्यी

Team YS Marathi
5th Mar 2016
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

तुम्हाला कधी अचानक पैशाची गरज लागली, तर तुम्ही काय करता? तुम्ही म्हणाल, आजकाल तर हे अगदी सोप्पं झालंय, एटीएममध्ये जायचे आणि पैसे काढायचे...त्यासाठी फक्त तुम्हाला जवळच्या एटीएमपर्यंत जावे लागते, पासवर्ड टाकवा लागतो आणि काम फत्ते.....सोप्पं आणि सुटसुटीत.. पण आता कल्पना करा, की जर तुम्ही व्हिलचेअरवर आहात आणि तुम्हाला एटीएममधून पैसे काढायचे आहेत...तर? मग मात्र इतरवेळी सहज वाटणारे हेच काम कितीतरी कठीण होऊन जाते. कारण एटीएममध्ये जाण्यासाठी बहुतेकवेळा पायऱ्यांचाच वापर करावा लागतो आणि याला पर्याय म्हणून रॅंपची सोयही उपलब्ध नसते... त्यातही जरी कोणी तुम्हाला उचलून एटीएम मशीनपर्यंत नेले, तरीदेखील एटीएम मशीन बसविण्याची पद्धत आणि डिजाईनच असे असते की व्हिलचेअरवरील कोणालाही किपॅड हाताळणे कठीणच वाटू शकते. आणि हे केवळ एक उदाहरण आहे.. शारीरिकदृष्ट्या विकलांग असणाऱ्या आपल्या समाजातील एका मोठ्या समुदायाला अशाच प्रकारच्या अगणित समस्यांना सामोरे जावे लागते.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा बहुतेक सर्व सार्वजनिक ठिकाणीही हीच परिस्थिती असते. खरं म्हणजे, पर्सन विथ डिसॅबिलीटी ऍक्ट(PDA) या कायद्यानुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपंगाच्या दृष्टीने अनुकल करणे बंधनकारक आहे. पण याची अंमलबजावणी होताना दिसत नव्हती. ही परिस्थिती बदलण्यासाठी अखेर निर्मला केवलानी यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यांनी मुंबईतील बेस्ट (BEST-Brihanmumbai Electricity Supply & Transport)च्या विरुद्ध पीआयएल अर्थात जनहित याचिका करण्याचा निर्णय घेतला आणि या लढ्याचा परिणाम म्हणजे आज मुंबईच्या रस्त्यांवर अंपगांसाठी म्हणून तीस बस धावत आहेत.

image


निर्मला केवलानी... खरं म्हणजे त्यांना निनू याच नावाने हाक मारलेले मनापासून आवडते.. जातीवंत लढवय्या असलेल्या नीनू यांनी आपल्या व्हिलचेअरला कधीच आपल्या ध्येयाच्या आड येऊ दिले नाही आणि जे जे मनापासून करावेसे वाटले, ते सर्व काही केले – लेखन, सार्वजनिक ठिकाणी भाषणं देणे, मॅरेथॉन धावणे, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणे, प्रवास किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींच्या हक्काची लढाई.... अगदी रॅंम्प उतरणेसुद्धा.... त्यांनी सर्व काही केले...

रम्य बालपण

नऊ महिन्यांची असताना, दिलेल्या पोलिओ डोसचा त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम झाला आणि त्यांचे हातपाय काम करेनासे झाले. पुढील दोनेक वर्षांतच त्यांचे स्नायू अशक्त झाल्यामुळे त्यांना स्कोलिओसिस किंवा मणक्यात वक्रता निर्माण झाली. ज्याचा परिणाम त्यांच्या शरीराच्या ठेवणीवर आणि फफ्फुसांच्या क्षमतेवर झाला आणि त्यातूनच पुढे त्यांचे श्वसनाचे स्नायूही कमकुवत झाले.

खरं तर आयुष्य खूपच कठीण होते, पण नीनू अशा एका एकत्र कुटुंबात रहात होत्या, जे केवळ आकारानेच मोठे नव्हते तर नीनू यांचा आधारस्तंभ होते. हे संपूर्ण कुटुंब सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहीले. त्यावेळी त्यांचे घर चौथ्या मजल्यावर असल्यामुळे, त्यांचे वडील त्यांना उचलून घरापर्यंत घेऊन जात असत.

जेंव्हा शाळेत जाण्याची वेळ आली, तेंव्हा एका नामवंत कॉन्व्हेंटने त्यांना कोणतेही सहकार्य करणे नाकारले. लिफ्ट ही केवळ कर्मचाऱ्यांसाठीच आहे, असे सांगत त्यांना वर्गात जाण्यासाठी लिफ्टचा वापर करण्याची सुविधाही नाकारण्यात आली. या संपूर्ण प्रकाराने वैतागलेल्या त्यांच्या वडिलांनी काहीशा अनिच्छेनेच त्यांना जवळच्याच सरस्वती मंदीर या शाळेत घातले. पण नीनू यांच्यासाठी ही जागा म्हणजे जणू स्वर्गच ठरली. सर्व शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि वर्गमित्र त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहिले, ज्याची त्यांना नितांत गरज होती. हे सगळे मित्र आजही त्यांच्याबरोबर आहेत. “ येथे मला कधीची वेगळे असल्याची जाणीव करुन दिली गेली नाही किवा मला बाजूलाही टाकले गेले नाही,” त्या सांगतात.

image


त्यांना खेळ, नृत्य, नाटक यांसारख्या स्पर्धात सहभागी होता येत नसे किंवा सहलींना जाता येत नसे, पण गायन आणि चित्रकला, वाचन यांसारख्या इतर उपक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांना शिक्षकांकडून नेहमीच प्रोत्साहन मिळाले. “ मी खूप बैठे खेळ खेळले आणि वाचनाचीही मला प्रचंड आवड होती. माझ्या आवडीची सर्व कॉमिक्स माझे वडील माझ्यासाठी मागवित असत.” शाळेत मित्रमैत्रिणी आणि घरी चुलत भावडांच्या गराड्यातील त्यांचे बालपण अतिशय सुंदर होते. त्यांच्या पालकांनीही कधीच त्यांच्या हालचालींवर बंधने घातली नाहीत. ते त्यांना सिनेमाला घेऊन जात, त्यासाठी त्यांना उचलून न्यावे लागे आणि त्याकाळी बहुतेक चित्रपटगृहांमध्ये लिफ्टची सोयही नसल्यामुळे तिथेही त्यांना उचलून वर खाली न्यावे लागे.

स्वावलंबन

मात्र जसजसे वय वाढत गेले, तसतसे नीनू यांच्यासाठी परिस्थिती आणखी कठीण बनत गेली. “ मी १५-१६ वर्षांची झाल्यावर महाविद्यालयात जाणे अशक्य बनले होते. कारण मला उचलून नेणे, आता शक्य नव्हते. त्यामुळे मग मी घरी राहून डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून माझे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र, दरवेळी परीक्षा देण्यासाठी म्हणून विद्यापीठाने दिलेल्या केंद्रापर्यंत जाणे, हेदेखील एक आव्हानच होते,” त्या सांगतात.

image


महाविद्यालयात असताना त्या शिकवण्या घेत आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांच्या कोश्च्युम ज्वेलरीच्या एक्सपोर्ट फर्मसाठीही अर्धवेळ काम करत असत. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वतःची एक्सपोर्ट फर्म सुरु केली आणि मोठ्या ब्रँडच्या दुकानांना दागिने पुरविण्यास सुरुवात केली. पण चालू ट्रेंड आणि फॅशनच्या बरोबरीने पुढे जात रहाण्यासाठी म्हणून त्यांना प्रवास करण्याची आणि प्रदर्शने भरविण्याचीही गरज पडते. पण हे सर्व सोपे नसल्यामुळे त्यांना दुकान बंद करावे लागले. किशोरवयीन असताना बऱ्याचदा त्यांना या नैराश्य येत असे आणि या परीस्थितीचा रागही येत असे. “ काळानुरुप मी शांत रहाण्यास आणि परिस्थितीकडे वेगळ्या नजरेतून पहायला शिकले. सुदैवाने मला खूपच चांगले मित्र आणि मार्गदर्शक भेटले, ज्यांनी मला या पडत्या काळातून वेगाने बाहेर काढण्यासाठी मदत केली. मी सिनेमा पाहते, नाटकांना, संगीत मैफीलींना हजेरी लावते, त्यात नुकतीच मी इन्प्रोव्हची पहिली पायरीही पार केली. तो माझ्यासाठी अगदी वेगळा अनुभव होता. त्याचबरोबर मी सार्वजनिक चर्चांमध्येही सहभागी होते.”

पहिला उपक्रम बंद झाल्यानंतर, त्यांनी टेलिमार्केटींगमध्ये तीन वर्षे काम करण्याचा प्रयत्न केला, व्हॉईस ओव्हरमधील एक लहान अभ्यासक्रम पूर्ण केला आणि कामासाठी निर्माता संस्थांचे दरवाजे ठोठावले. “ लोकांचा अपंगांकडे बघण्याचा दृष्टीकोनच त्यांना अपंग व्यक्तींना काम देण्यापासून रोखतो. त्यांनी माझी व्हिलचेअर पाहिली, पण आवाज देण्याची माझी क्षमता पाहिली नाही. १९९९ मध्ये एडीएपीटी (एबल डिसएबल्ड ऑल पीपल टुगेदर) मध्ये जाणे, हे माझ्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरले,” त्या सांगतात.

२००० सालापासून त्यांनी अपंगांच्या हक्कांसाठी कळकळीने काम करण्यास सुरुवात केली. एडीएपीटीच्या माध्यमातून भारतातील एका आघाडीच्या सल्लागार कंपनीमध्ये त्यांना नोकरी मिळाली, जेथे त्यांनी एचआर विभागात चार वर्षे काम केले.

“ कॉर्पोरेट जगतात स्वतःची जागा निर्माण करणे खूपच आव्हानात्मक होते. मी कच्ची होते. घरी आणि एडीएपीटीमध्ये मला आजूबाजूला भरपूर सहाय्य आणि पाठबळ मिळण्याची सवय झाली होती, मात्र कॉर्पोरेट क्षेत्र यापेक्षा अगदी वेगळे होते, तिथे संपूर्ण स्वावलंबी असणे गरजेचे होते. मात्र सुदैवाने मला अतिशय चांगली टीम मिळाली. माझे वरीष्ठ खूपच समजूतदार होते. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मला कठोर मेहनत घ्यावी लागली आणि मला देण्यात आलेल्या काही जबाबदाऱ्या मी उत्तमपणे पूर्ण केल्या. देशभरात माझ्या कंपनीत व्हिलचेअरवरील मी एकमेव कर्मचारी होती. मला समान संधी आणि आदर देण्यात आला. मी चार वर्षे काम केले, ज्यातून मी आणखी उजळून बाहेर आले आणि मला शिस्त शिकवली. या संपूर्ण अनुभवाने माझे व्यक्तिमत्वच बदलून टाकले आणि मला खूप आत्मविश्वास दिला,” त्या सांगतात.

२००८ मध्ये त्यांनी ऑफसेट प्रिटींग प्रेस या त्यांच्या कुटुंबाच्या व्यवसायासाठीच काम सुरु केले आणि त्या प्रशासन, अकाऊंटस्, बँकींग आणि कुटुंबाची गुंतवणूक, इत्यादी विविध कामांमध्ये मदत करतात. पण त्याचवेळी त्यांचे एडीएपीटीसाठीचे कामही सुरु आहे.

मृत्यूशी झुंज

“ मनशक्ती आणि लढाऊ वृत्तीने परिस्थिती कशी बदलता येते, हे मी शिकले आहे.”

२०१२ मध्ये जेंव्हा नीनू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यावेळी त्यांना आयुष्यभरासाठी ऑक्सिजनवर रहावे लागणार असल्याचे आणि बायपाप यंत्राचीही गरज भासणार असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. “ मी आणि माझ्या पालकांसाठी हा सर्वाधिक भीतीदायक क्षण होता. स्वतःबरोबर सगळीकडे हे ऑक्सिजन मशीन घेऊन फिरण्याची तर मी कल्पनाच करु शकत नव्हते,” त्या सांगतात.

पण त्यांनी हार मानली नाही. “ माझ्या बुद्धीजम प्रॅक्टीस ग्रुपमधील गुरु दररोज रुग्णालयात पठण करत असत. त्यांनीच मला या परिस्थितीशी लढण्याची आणि डॉक्टरांच्या निदानाला आव्हान देण्याची ताकद दिली. माझ्या फिजिओनेही माझ्या फुफ्फुसांवर प्रचंड काम केले. दररोज आम्ही रात्रंदिवस काम करत होतो. माझ्यात एक वेगळाच उत्साह संचारला होता. मी दररोज विश्वासाने पठण करत होते. याचाच परिणाम म्हणजे मला आयुष्यभरासाठी ज्या गोष्टी वापरण्यास सांगितले गेले होते, त्यापासून माझी अवघ्या महिनाभरातच सुटका झाली,” त्या सांगतात.

याहूनही आश्चर्य म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून नीनू मुंबई मॅरेथॉनमध्येही सहभागी होत आहेत.

image


 जनजागृती

“ समाजाने आपला दृष्टीकोन बदलण्याची, अपंगांना सारख्याच पद्धतीने स्विकारण्याची आणि त्यांचा आदर करण्याची गरज आहे. शारिरीक अपंगत्व असलेले लोकही या समाजाचाच एक भाग आहेत. त्यांची कीव करु नका, कारण त्यांना खरी गरज आहे ती समान संधी आणि त्यांच्या विचारांना आदर मिळण्याची... त्यांच्यावर विश्वास दाखवा. स्वतःला सिद्ध करण्याची त्यांना संधी द्या. त्यांना स्विकारा. त्यांना आयुष्याच्या मुख्य प्रवाहात सामावून घ्या,” त्या कळकळीने सांगतात.

नीनू या नीना फाऊंडेशेन, ऍक्सेस फॉर ऑल सोशल फाऊंडेशन आणि सुकृती फाऊंडेशन (चैनई) च्या सदस्य आहेत. एक डबिंग कलाकार म्हणून त्यांनी आपला आवाज सीडी प्रेझेंटेशन्स आणि माहितीपटांना दिलेला आहे. गेल्या बारा वर्षांपासून त्यांना अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळालेले आहेत. त्याचबरोबर एचपीसीएल आणि इंडीय ऑईलकडून त्यांच्या भारतभरातील मुख्य महामार्गांवरील नवीन प्रकल्पांमध्ये, एकतरी अंपगांसाठी अनुकुल शौचालय बांधण्यास मान्यता मिळविण्यातही त्यांना यश आले आहे.

त्या पुढे सांगतात, “ एस्सेल ग्रुप, द हिरानंदानी, एव्हरशाईन बिल्डर्स, इंडीयन असोशिएन ऑफ एम्युझमेंट पार्क्स ऍन्ड इंडस्ट्रीज यांना एखाद्या वास्तूचा वापर करण्याच्या किंवा तिथे पोहचण्याच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे महत्व मी पटवून दिले आहे, ज्यामुळे आज त्यांनी त्यांच्या आगामी प्रकल्पात या वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे आणि भविष्यातील सर्व प्रकल्पांमध्येही याचा समावेश करण्याचे कबूल केले आहे.” त्या सांगतात.

image


त्यांच्या मते अंपगांच्या गरजांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे. “ सर्व सार्वजनिक ठिकाणे आणि वाहतूक ही सर्वांना वापरता आली पाहिजे. कायद्याचे कठोरपणे पालन केले गेले पाहिजे आणि ते मोडणाऱ्यांना शिक्षा दिली पाहिजे. सरकारने धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली पाहिजे. तसेच नवीन प्रकल्प उभारणारे वास्तुविशारद, बांधकाम व्यावसायिक आणि इतर विकासकांवर दबाव टाकला पाहिजे. नागरिकांनीही त्यांच्या भवताली जागरुकता निर्माण केली पाहिजे आणि अपंगांसाठी अनुकूल अशा पद्धतीने इमारतींमध्ये बदल करण्यासाठी अधिकाऱ्यांना सांगितले पाहिजे,” त्या सांगतात.

असामान्य महिला

२०१३ मध्ये नीनू यांनी पहिल्यावहिल्या मिस व्हिलचेअर इंडीया ब्युटी स्पर्धेत भाग घेतला होता. सुरुवातीला याबाबत साशंक असलेल्या नीनूने त्यांच्या मित्रांच्या पाठींब्यामुळेच शेवटी आपला सहभाग नोंदवला. “ आपण जे आरशात पहातो, ते जर आपल्याला आवडले, तर ते सगळ्या जगालाही नक्कीच आवडेल. आपली ताकद आणि विश्वास हे आपल्या व्यक्तिमत्वातून प्रतिबिंबित होत असते.”

image


त्यांनी केवळ ती स्पर्धाच जिंकली नाही, तर विविध राज्य आणि शहरांतून आलेल्या स्पर्धकांना भेटण्याचा समृद्ध अनुभवही त्यांना मिळाला. “ ही स्पर्धा जिंकल्यामुळे, आता समाजातील अपंग महिलांबाबतचा समाजाचा समज बदलणे ही माझी जबाबदारी आहे,” त्या सांगतात.

खास क्षण

बियाँड बॅरीयर्स- इन्क्रेडीबल इंडीया टुर प्रकल्पांतर्गत अपंगांसाठी पर्यटनाचा प्रसार करण्यासाठी म्हणून ८४ दिवसांत १९,००० किलोमीटरचा केलेला प्रवास म्हणजे नीनूच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा आहे.

स्वप्न

“ जेंव्हा तुमच्याकडे मनापासून इच्छा आणि खात्री असते, तेंव्हा तुम्हाला यश मिळविण्यापासून काहीही रोखू शकत नाही,” त्या सांगतात.

अशाच परिस्थितीचा सामना करणाऱ्यांना त्यांचा संदेश आहे, “ अशाच परिस्थितीत जगणाऱ्या माझ्या मित्रांना माझा सल्ला आहे की स्वतःची कीव कधीच करु नका, आपल्याला हे आयुष्य एका उद्देशाने मिळालेले आहे, आपले अंपगत्व आपण उमदेपणाने स्विकारले पाहिजे, खूप श्रद्धा ठेवा, कुठलीही गोष्ट सहजपणे सोडून देऊ नका, प्रयत्न करत रहा, चिकाटी ठेवा. निग्रही बना आणि तुमची स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर मेहनत करा.”

हे सांगताना त्या जेडी ह्युस्टनच्या एका वाक्याचा आधार घेतात – ‘ जर तुमच्याकडे कधीच नसलेली एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल, तर तुम्हाला असे काही तरी करावे लागेल, जे तुम्ही पूर्वी कधीच केले नसले,’

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

अपंग असलो म्हणून काय झाले...?

क्षयरोगामुळे २२ किलो वजन आणि अंशतः बहिरेपणा आलेल्या नंदिताला नृत्याने दिली संजिवनी

पोलिओग्रस्त युवकाची ‘तेजस्वी’ कहाणी, योगाने जिंकले हरणारे आयुष्य!

लेखक – तन्वी दुबे

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन  

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags