संपादने
Marathi

विकलांगांसाठी देशातील पहिले ड्रायव्हिंग स्कूल ‘ऍबिलिटी ऑन व्हिल्स’

Anudnya Nikam
27th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

२०१२ साली हरिश कुमार यांनी आपल्या नोकरीमध्ये थोडा ब्रेक घेण्याचे ठरविले. आयआयटी रूरकीमधून एम.एससी आणि आयआयटी दिल्लीमधून एम.टेक पूर्ण केल्यानंतर २०१२ पर्यंत जवळपास दोन दशके त्यांनी टेलिकॉम इण्डस्ट्रीमध्ये काम केले होते. जवळपास २० वर्षे नोकरी केल्यानंतर आता त्यांनी वर्षभराचा ब्रेक घेऊन या कालावधीत ड्रायव्हिंग करायचे ठरविले, ज्याचे त्यांना प्रचंड वेड आहे. त्यांनी ड्रायव्हिंग करत भारतभ्रमण करण्याची मोहिम सुरु केली आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये एका नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली. “आतापर्यंत असा प्रवास एकट्याने कोणीच केला नव्हता. अशा प्रकारच्या मोहिमांचे आव्हान नेहमीच सांघिकरित्या घेतले गेले होते. अशा प्रकारच्या मोहिमेसाठी एकट्याने अर्ज करणारा मी पहिलाच होतो आणि तोही विकलांग,” हरिश सांगतात.

image


राष्ट्रीय विक्रम केल्यामुळे हरिश यांच्याकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले गेले. मग कधी मुलाखत, कधी लेख तर कधी रेडिओच्या माध्यमातून एका विकलांग व्यक्तीने कशाप्रकारे सर्व अडथळे पार करत धडधाकट व्यक्तींपेक्षाही सरस कामगिरी केली याची कथा लोकांपर्यंत पोहचली.

image


त्यानंतर अनेक विकलांग व्यक्ती हरिशना भेटायला येऊ लागले आणि आरटीओकडून वाहन चालविण्याचा परवाना मिळविणेसुद्धा त्यांच्यासाठी कसे कठीण आहे आणि कुठलेच ड्रायव्हिंग स्कूल आपल्याला शिकविण्यास तयार होत नसल्याबद्दल व्यथा मांडू लागले. “१९९९ मध्ये मला ड्रायव्हिंग लायसन्स काढताना खूप त्रास झाला होता. मला कित्येक लोकांना पटवून द्यावं लागलं होतं. मला माहिती आहे हे किती कठिण होतं आणि यापुढेही असेल. विकलांगांना प्रवास करण्यामध्ये अनेक अडथळे येतात. व्हिल चेअर नेण्याची सोय असणारे कुठलेही वाहन उपलब्ध नाही आणि सार्वजनिक वाहतूकही त्यांना सहज वापरता येण्याजोगी नाही. मी स्वतः या समस्यांचा अनुभव घेतला असल्यामुळे मी यासाठी काम करायचे ठरविले.” आणि यामधूनच हरिश यांना अहमदाबादमध्ये विकलांगांसाठीचे ड्रायव्हिंग स्कूल सुरु करण्याची प्रेरणा मिळाली.

“मी अहमदाबादच्या बाहेर केवळ विकलांगांसाठीचे ड्रायव्हिंग स्कूल आहे का याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आले की मोठमोठ्या शहरातसुद्धा अशा प्रकारचे ड्रायव्हिंग स्कूल नाही." २०१३ मध्ये हरिश यांनी विकलांगांसाठी ड्रायव्हिंग स्कूल सुरु करण्यासाठी काय करावे लागेल याविषयीची माहिती मिळवायला सुरुवात केली. अनेक मंजुऱ्या, दस्तावेज आणि आवश्यक संशोधनाअंती त्यांनी सुरुवातीला एक स्वयंसेवी संस्था सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व गोष्टींची जुळवाजुळव होईपर्यंत पुन्हा कामावर जायला सुरुवात केली.

२०१४ मध्ये त्यांनी अखेर नोकरीचा राजीनामा दिला आणि जानेवारी २०१५ मध्ये त्यांनी त्यांचा ड्रायव्हिंग स्कूलचा प्रस्ताव अहमदाबादच्या वाहतूक आयुक्तांना सादर केला. “अशाप्रकारची शाळा त्यापूर्वी अस्तित्वात नसल्यामुळे, मी पुढे जाण्यासाठी परवानगी मिळविण्याकरिता प्रस्ताव सादर केला. गाडी खरेदी करण्यापूर्वी, गुंतवणूक करण्यापूर्वी मला मंजूरीची आवश्यकता होती.”

image


एकदा मंजूरी मिळाल्यानंतर ‘ऍबिलिटी ऑन व्हिल्स’ने विकलांगांना अनुकुल अशा गाड्यांसह देशातील सर्वात पहिले विकलांगांसाठी असलेले ड्रायव्हिंग स्कूल अहमदाबादमध्ये सुरु केले.

हरिश सांगतात की, विकलांगांना प्रथम एक कार खरेदी करावी लागते, स्वतःच्या गरजेनुसार त्यामध्ये बदल करुन घ्यावे लागतात, आरटीओकडून मंजूरी घ्यावी लागते आणि त्यानंतरच त्यांना शिकाऊ परवाना दिला जातो. यामध्ये त्यांना प्रथम गाडी चालवायला शिकवून नंतर गाडी खरेदी करण्याचा हक्क हिरावून घेतला जातो. त्याचबरोबर आतापर्यंत त्यांच्यासाठी खास असे ड्रायव्हिंग स्कूल नसल्याने त्यांना स्वतःच गाडी चालवायला शिकावे लागायचे. या मोठ्या अडथळ्यांमुळे अनेक शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती कार खरेदी करण्याबाबत संकोच बाळगतात आणि यामुळे ते कधीच स्वतंत्ररित्या फिरु शकत नाहीत. आता ‘ऍबिलिटी ऑन व्हिल्स’ने विकलांगांची ही समस्या दूर केली आहे.

image


‘ऍबिलिटी ऑन व्हिल्स ड्रायव्हिंग स्कूल’मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना ड्रायव्हिंग शिकविण्यासाठी त्यांच्या गरजेनुसार अनेक बदल घडविलेल्या सुधारित गाड्या आहेत.

हरिश यांना आणखी एक ध्येय गाठायचे आहे ते म्हणजे रोजगार निर्मितीचे. त्यांना वंचित समाजातील विकलांग व्यक्तींना ड्रायव्हिंग शिकवायचे आहे, जेणेकरुन ते या कौशल्याचा उपयोग करुन आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतील.

image


या ड्रायव्हिंग स्कूलला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल हरिशना विचारले असता, त्यांनी सविता मोदी या त्यांच्या सर्वात पहिल्या विद्यार्थिनीची कथा सांगितली. “ती दोन्ही पायांनी अपंग होती. ती सपोर्ट व्हिलच्या सहाय्याने दुचाकी चालवायची. ती तिच्या वडिलांना नेहमी सांगायची की तिला कार चालवायची आहे. मात्र ती कार चालवू शकेल का याबाबत तिच्या वडिलांना साशंकता होती.” ऍबिलिटी ऑन व्हिल्सचा शोध लागल्यानंतर सविताचा हा प्रश्न सुटला. आता सविता ऐटीत ड्रायव्हिंग करते.

कौतुकपर पत्र

कौतुकपर पत्र


हरिश यांना देशभर अशा प्रकारचे ड्रायव्हिंग स्कूल्स सुरु करायचे आहेत. देशभरात जवळपास ६० दशलक्ष विकलांग व्यक्ती आहेत ज्यांना प्रवास करण्यामध्ये अडथळे येतात आणि दरवर्षी १ लाख लोकांची यामध्ये भर पडते. हरिश सांगतात, “ऍबिलिटी ऑन व्हिल्स हा विकलांगांना प्रवासाची सुविधा, वाहनांमध्ये प्रवेश आणि समस्यांवरील समाधान पुरवून, सामान्य आयुष्य जगण्याच्या दिशेने झेप घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा एक प्रयत्न आहे.”

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags