संपादने
Marathi

पीडित हत्तींचे मधुर संगीताने मनोरंजन करणारा अवलीया संगीतकार

27th Oct 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

थायलंड या देशात मिळणारे सागाचे लाकूड संपूर्ण जगात एक उत्कृष्ट लाकूड समजले जाते. आणि केवळ याच कारणामुळे पूर्वी ६१ टक्के इतके असलेले थायलंडचे वनक्षेत्र कमी होऊन ते २० व्या शतकात ३४ टक्क्यांपर्यंत घसरले आहे हे या बाबतीतले एक कटू सत्य आहे. १९७५ ते १९८६ या दहा वर्षांच्या कालखंडातच थायलंड या देशाने आपल्या वाचलेल्या वनक्षेत्रातील २८ टक्के भाग सुद्धा गमावला. ही भयानक आकडेवारी समोर आल्यानंतर मग सरकारचे डोळे खाड्कन उघडले आणि १९८९ मध्ये थायलंड सरकारने व्यावसायिक कारणासाठी करण्यात येणा-या लाकूडतोडीवर प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले.

वनक्षेत्राच्या या सामुहिक कत्तलींचे सर्वात मोठे शिकार झाला तो जंगलांमध्ये शतकानुशतके शांतपणे आपले जीवन जगणारा प्राणी हत्ती. लाकूडतोडीच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून हत्तींचे स्वातंत्र्य हिसकावून घेत तोडलेली लाकडे भर जंगलातून वाहून आणण्याच्या कामाला त्यांना जुंपण्यात आले आणि त्यांच्यासोबत कधीही न संपणारे अमानुष वर्तन करणे सुरू झाले. लाकडांना आपल्या सोंडेत पकडून घेऊन जात असताना झाड्यांच्या फांद्या आणि झावळ्या लागून या हत्तींच्या डोळ्यांना गंभीर जखमा होत होत्या. अनेकदा तर त्यांचे संपूर्ण शरीर रक्ताने माखून जात होते. अशा वेळी या हत्तींना काय यातना सहन कराव्या लागत असतील त्यांची कल्पना न केलेली बरी.

लाकूडतोडीवर सरकारने बंदी आणली खरी, परंतु ‘रोजंदारी’च्या दिवसांमध्ये लाकडे वाहून नेताना डोळ्यांना झालेल्या दुखापतींमुळे हे हत्ती अंध झाले होते. हे हत्ती आता ‘बेरोजगार’ झालेले होते. आता जिवंत कसे रहावे हे या हत्तींना काही कळत नव्हते. कारण सुरुवातीपासून आपल्या भोजनासाठी हे हत्ती आपल्या मालकावर अवलंबून राहिलेले होते.

image


अतिशय वाईट अवस्थेत राहणा-या या हत्तींना आपल्या विहारासाठी शांत आणि चांगले ठिकाण मिळावे या उद्देशाने क्वई नदीच्या काठी ‘अभयारण्याचा स्वर्ग’ अशी ओळख असलेल्या ‘एलिफंट्स वर्ल्ड’ची स्थापना करण्यात आली. हे अभयारण्य मिळणारी वर्गणी आणि दानातून चालवले जाते. सुप्रसिद्ध पियानोवादक पॉल बॉर्टन हे १९९६ मध्ये थरारक अनुभव घेण्यासाठी थायलंडला आले. परंतु या उलट त्यांना इथे प्रेम आणि जीवनाचा एक नवीन मार्गच मिळाला. ते आणि त्यांची पत्नी गेल्या दोन दशकांपासून या हत्तींच्या पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. बॉर्टन यांनी नुकतेच आपल्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने या दृष्टीहीन हत्तींसाठी आपले संगीत सादर करण्याचे वर्षांपासूनचे स्वप्न साकार करण्याचा निर्णय घेतला. आपले हे आगळे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना आपले पियानो हे वाद्य जिथे हत्ती गोळा होतात त्या पहाडावरील जागेवर घेऊन जावे लागले. खरे तर या मागे दान गोळा करणे हा त्यांचा उद्देश होता. परंतु या व्यतिरिक्त अतिशय प्रेरणादायी आणि मनाचा ठाव घेणारा असा त्यांचा व्यक्तीगत उद्देश सुद्धा या मागे होता.


संगीताच्या दुनियेत पदार्पण

पॉल बॉर्टन हे व्यवसायाने एक कलाकार आहेत. ते आपल्या वयाच्या १२ व्या वर्षी पियानो हे वाद्य वाजवणे शिकले. त्या नंतर त्यांनी त्यांच्या वडिलांसोबत उत्तर इंग्लंड शहरात संगीताचे कार्यक्रम करणे सुरू केले आणि पुढे संगीत हेच त्यांचे जीवन बनले.

एक पियानोवादक संगीतकार असण्या व्यतिरिक्त पॉल एक चांगले चित्रकार सुद्धा आहेत. त्यांचे वडिलही एक चांगले चित्रकार होते आणि त्यांनीच पॉल यांना चित्रकारीतेचे बारकावे शिकवले. पॉल हे १६ वर्षांचे असताना लंडनच्या प्रतिष्ठित समजल्या जाणा-या ‘रॉयल अकॅडमी ऑफ आर्ट’ या संस्थेत चित्रकारी शिकण्यासाठी दाखल झाले.

image


जीवनाचा उद्देश सापडला

१९९६ या वर्षी पॉल हे ‘थाय पियानो स्कूल’मध्ये पियानो वादनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी थायलंडला आले. थायलंडमध्ये आपण तीन महिन्यांच्या कालावधित पियानो वादन शिकावे आणि मग आपल्या देशात परतावे असे पॉल यांनी ठरवले होते. परंतु दरम्यानच्या काळात त्यांची भेट त्यांच्या होणा-य़ा पत्नीसोबत झाली आणि पॉल हे थायलंडवासी होऊन गेले. आता त्यांच्या लग्नाला १८ वर्षे होऊन गेली आहेत. त्यांच्या पत्नी सुरूवातीपासूनच पशु संरक्षणाच्या बाबतीत जागरूक आणि सक्रीय राहिलेल्या आहेत. त्यांच्यामुळेच पॉल यांना प्राणीमात्रांच्या दुनियेत रूची निर्माण झाली.

image


पॉल म्हणतात, “ थायलंडमध्ये वृक्षतोडीवर पूर्णपणे बंदी आणल्याबाबत थायलंड सरकारचे धन्यवाद दिले पाहिजेत. पण सरकारच्या या निर्णयाचा एक विपरित परिणाम देखील झाला. आणि तो म्हणजे या जंगलात काम करणारे हत्ती आणि त्यांचे माहुत पूर्णपणे बेरोजगार झाले आणि एक मोठी समस्याच उभी राहिली. अशा अवस्थेत हत्तीसाठी कंचनाबोरीमध्ये निर्माण झालेल्या ‘एलिफंट्स वर्ल्ड’ सारखी नवी अभयारण्ये उभारण्यात आली. इथे मुख्यत: घायाळ आणि अपंग झालेल्या असहाय्य हत्तींची देखभाल केली जाते. या अभयारण्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे काम करण्याची आवश्यकता पडू नये या उद्देशाने क्वई नदीच्या किना-यावर फिरण्याची मोकळीक मिळते.”

प्लारा नावाची एक हत्तीण जंगलात लाकडे वाहून नेताना डोळ्यांना झाडांच्या फांद्या लागून अंध झाली होती. तिचे राहण्याचे नैसर्गिक ठिकाण असलेल्या जंगलाचा लाकूडतोड्यांनी पूर्णपणे सफाया करून टाकला होता. आणि ही हत्तीण अंध झाल्यामुळे आता आपल्या काहीएक कामाची राहिली नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी तिला एकटे सोडून दिले होते.

पॉल यांनी पुर्वेकडेसुद्धा अंध मुलांसोबत दोन वर्षांसाठी काम केले होते. पॉल म्हणतात, “ त्या अंध मुलांवर संगीताचा कशा प्रकारचा प्रभाव पडतो हे मी अनुभवले होते. म्हणूनच संगीताच्या या पारखलेल्या सिद्धांताचा प्रयोग मी या अंध हत्तींवर करू इच्छित होतो. विशेषत: ही प्लारा हत्तीण खूपच बुद्धीमान होती. तिला माझे संगीत नक्कीच आवडेल याची मला पूर्णपणे खात्री होती. या हत्तींना कोणत्या प्रकारचे संगीत ऐकवावे यावर मी खूप विचार केला. आणि त्यांना ‘बीथोवन’ हे संगीत ऐकवावे असे मी विचाराअंती ठरवले. संगीत ऐकवल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय आश्चर्यकारक होत्या. इथूनच मग या प्रकल्पाची सुरूवात झाली.

हत्तींनाही समजते संगीत

हत्तीचा खुराक खूप मोठा असतो. आपण विचारही करू शकणार नाही इतका. अशा परिस्थितीत अनेक हत्तीच्या पोटभर भोजनाची व्यवस्था करणे हे महाकठीण काम असते. जेव्हा एखादा हत्ती आपले भोजन करतो त्यावेळी तो कुत्र्यासारखा तुटून पडतो. कुत्रा आपले भोजन घाईघाईत पोटात ढकल्याचा प्रयत्न करत असतो. कारण आपल्याला पुन्हा कधी जेवायला मिळेल हे कुत्र्याला माहित नसते. हत्तींची प्रवृत्तीसुद्धा जवळजवळ अशीच असते. एकदा का रसाळ पाने त्यांच्या हाती लागली की मग जगातील कोणतीही शक्ती त्यांना खाण्यापासून परावृत्त करू शकत नाही.

image


त्या दिवशी तांबडे फुटण्याच्या आधीच पॉल यांनी आपला पियानो अभयारण्य़ात नेला. प्लाराला बांबूंच्या स्वादिष्ट रसाळ पानांमध्ये सोडण्यात आले आणि ती सर्व काही विसरून ती रसाळ पाने फस्त करण्यात गुंग झाली. परंतु जसे पॉल यांनी आपल्या पियोनोवर ‘बीथोवल’ संगीत वाजवणे सुरू केले, तसे प्लाराने चक्क खाणे थांबवले. तिच्या सोंडेत एक अर्धीच खाल्लेली बांबूची काठी अडकली होती आणि ती विचित्र नजरेने पॉल यांच्याकडे टक लावून पाहू लागली. पॉल म्हणतात, “ एक हत्तीँण संगीताचे सूर कानावर पडताच आपले भोजन थांबवते ही गोष्ट अद्भूत आहे. एखाद्या प्राण्याने संगीताला दिलेली अशी प्रतिक्रिया मी पहिल्यांदाच अनुभवत होतो.”

image


सर्व प्राण्यांना संगीत अतिशय आवडते, मग तो कुत्रा असो, मांजर असो किंवा इतर प्राणी. परंतु बुद्धीमत्तेच्या बाबतीत हत्ती हा प्राणी मानवाच्या सर्वाधिक जवळचा आहे. याचे कारण म्हणजे हत्ती आणि मानवाच्या मेंदूमधील चेतापेशी सारख्याच असतात. या व्यतिरिक्त हत्ती अतिशय स्मृतीवान देखील असतात. आपल्या लहानपणी जो कोणी आपल्यासोबत दुर्व्यवहार करतो, अशा व्यक्तीला आपण आयुष्यभर आठवणीत ठेवतो. हत्तींच्या बाबतीतही असेच काहीसे असते. मानवाप्रमाणेच हत्तींच्या मेंदूमध्ये सुद्धा जुन्या आठवणी शाबूत ठेवणारा एक विशेष भाग असतो. आपल्या आयुष्यात घडलेले वाईट प्रसंग, वाईट वर्तन आणि वाईट गोष्टी हत्ती कधीच विसरत नाहीत.

image


पूर्वजांनी केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त

पॉल सांगतात, “ माणूस शतकांपासून ऐकत आला आहे असे शाश्वत, शांतीची अनुभूती देणारे, मनाचा ठाव घेणारे शास्त्रीय संगीत तुम्ही एखाद्या अंध हत्तीला ऐकवा. हे संगीत ऐकताना मिळणारी प्रतिक्रिया बहुमोल अशी असेल. माणूस आणि हत्तीमध्ये एक विशेष नाते असते. आपण त्यांच्यासोबत एका विशिष्ट भाषेत संवाद साधत असतो. एक अशी भाषा, जी ना आपली असते, ना त्यांची असते. ‘बीथोवन’च्या एका तुकड्यात अतिसूक्ष्म असे काहीतरी अद्भूत आहे ज्या द्वारे मी त्या हत्तीसोबत जोडला जातो, आणि तो अनुभव एका वेगळ्याच दुनियेचा अनुभव असतो.”

सेवा हाच उद्देश

हत्ती हा प्राणी हजारो वर्षांपासून माणसासोबत काम करत आला आहे. हत्तींचा उपयोग युद्धांमध्ये देखील केला गेला आहे. शिवाय त्यांची आपली स्वत:ची घरे नष्ट करण्यासाठी देखील त्या हत्तींचाच वापर केला गेला आहे. माणसाने हत्ती या प्राण्यासोबत शतकानुशतके केलेला दुर्व्यवहार आठवून संगीतकार पॉल म्हणतात, “ मला वाटते की अशा प्रकारे हत्तींची सेवा करून मी माझ्या मानवजातीद्वारे हत्तींसोबत केलेल्या वाईट वर्तनाबाबत प्रायश्चित्त घेत आहे. यासाठी पियानोसारखी वजनदार वस्तू पहाडावर चढवावी लागली तरी बेहत्तर. माझ्या संगीत वाजवण्याने जर हत्ती आपल्या भोजनाचा आनंद घेत असतील तर मी त्यांच्यासाठी संगीत वाजवू इच्छितो.”

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा