संपादने
Marathi

मुंबईकरांचं आवडतं थिओब्रोमा!

7th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

डाव्या बाजूला दिमाखात उभं असलेलं हॉटेल ताज आणि गेटवे ऑफ इंडिया, बाजारहाटाची गल्ली म्हणून ओळख असणारी कृत्रिम अलंकाराची छोटी-छोटी दुकानं, उजव्या बाजूला मुंबईची प्राचीन ओळख जपणारी दुकानं, कुलाबा कॉजवे हा भाग मुंबईकरांना आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलायला भाग पाडतो. याच ठिकाणी रस्त्याच्या अगदी शेवटी १९९३ साली एक छोटेखानी कॅफे उघडलं. तेव्हा हे या सुंदर विभागाच्या सुरेख चित्रात चपखल सामावून गेलं. आजूबाजूला असणाऱ्या अन्य शेजाऱ्यांसारखंच या भागाची ओळख बनून गेलं. १२ वर्षे झाली थिओब्रोमा सुरु होऊन आज मुंबईत विविध ठिकाणी त्याच्या शाखा आहेत आणि घरोघरी हे नाव परिचित आहे. थिओब्रोमानं मुंबईतल्या अनेक खवैय्यांच्या हृदयात स्थान मिळवलंय. आता अधिक वेळ न घालवता ओळख करून घेऊया, या पिढीतल्या अत्यंत हुशार अश्या पेस्ट्री शेफशी, ज्याचं नाव आहे कैनाझ मेस्मान.

image


आनंदी राहण्याचा मार्ग म्हणजे तृप्त असणारं पोट अशा विचारसरणीतली ती! खवैय्यांच्या घरात वाढलेली ती, खाण्यातून आनंद वाटण्याची परंपराच त्यांच्या घरात होती. " मी एका गोड सुगंध दरवळत असणाऱ्या घरात वाढले. माझं कुटुंब खाण्याचं शौकीन आहे. आमचं आयुष्यच मुळी आम्ही काय बनवतो आणि काय खातो या भोवती घुटमळत असतं. बेकिंगची आवड ही त्या पदार्थ बनवण्याच्या ओढीतूनच मला निर्माण झाली." कैनाझ आपल्या लहानपणीच्या आठवणीत रमल्या होत्या.

त्यांची आई घरातूनच केक्स आणि गोड पदार्थ बनवून पुरवत असे. सर्वाना ते खूप आवडायचे , " थिओब्रोमा हे त्या घरगुती व्यवसायाचं पुढचं स्वरूप आहे. " कैनाझ सांगत होत्या. पण हा केटरिंगचा व्यवसाय, आणि त्याचं व्यावहारीक जगात सर्वोत्तम स्थान मिळवणं. ही मात्र अनेक गोष्टींच वर्गीकरण करवून मेहनतीनं मिळवलेली गोष्ट आहे.

शिक्षण म्हणून कायद्याचं ज्ञान घ्यायचं हे त्यांनी ठरवलं होतं, पण फ्रांसमधल्या एका उन्हाळ्यात मनानं त्यांच्या आवडीला कौल दिला. " वयाच्या १६व्या वर्षी मी रोटरीच्या युथ एक्स्चेंज कार्यक्रमांतर्गत फ्रांसला गेले. या वर्षानं माझं आयुष्य आणि भवितव्य बदलून टाकलं. मी तिथल्या साध्या, पारंपारिक आणि दिखाऊ नसणाऱ्या पेस्ट्रीजच्या प्रेमात पडले. परत आल्यावर मी फ्रेंच साहित्याकडे वळले. मी शेफच बनणार हे मी ठरवलं होतं . "

image


आय.एच.एम. मुंबईमधून या संदर्भातलं व्यावसायिक प्रशिक्षण कैनाझनं घेतलं. आणि त्यानंतर त्या दिल्लीच्या ओ.सी.एल.डी.मध्ये गेल्या. त्यांना तिथे त्वरित ऑबेराय ग्रुपच्या उदयविलास या हॉटेलमध्ये उदयपूर इथे नोकरी मिळाली. तिथे त्यांना खूप संधी मिळत गेल्या. यश आणि प्रगतीचं शिखर उंचावत होतं. अशातच पाठीला झालेल्या दुखापतीनं त्यांचं संपूर्ण करियर संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली. कारण त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना बजावलं, की फार काळ उभं राहणं आता त्यांच्यासाठी अशक्य आहे, कारण त्याने पाठीला गंभीर दुखापत होऊ शकेल. कैनाझचं नवं स्वप्न स्वत:चं केक शॉप असणं, हे त्याचवेळी त्यांच्या मनात रुंजी घालू लागलं होतं.

त्यांच्या हिमतीनं त्यांना वाट दाखवली आणि २००३ मध्ये कैनाझ यांनी स्वत:चं दुकान सुरु करायचा धाडसी निर्णय घेतला. धाडसी यासाठी की अशा स्वयंपाकाच्या व्यवसायाचा त्यांना काहीच अनुभव नव्हता. " मला केक बेक करण्याचं कसब फक्त येत होतं, मी एकतर थेट पंचतारांकित हॉटेलातल्या आरामदायी वातावरणात एखादी वस्तू बनवण्याच्या अनुभवातून आले होते. किरकोळ बाजारपेठेचा मला अंदाज नव्हता किंवा आव्हानं कोणती असू शकतील हेही ठाऊक नव्हतं. काहीही चुकलं , किंवा कुणाचीही चूक असली, तरी त्याचा फटका मलाच बसणार होता. मला हे सर्व योग्य घडीत बसवायचं होतं. भारतात तुमचा व्यवसाय सुरु करणं म्हणजे , परवानग्या, होकार मिळवणे , लाच आणि बाबुगिरीला खतपाणी घालणं."

आणि खरंच कैनाझ यांना त्यांना हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी अतिशय हेलपाटे घालावे लागले." खाद्य आणि पेय हा उदयम व्यवसाय पुरुष प्रधान आहे. भारतात काय किंवा बाहेरील देशात काय? स्त्रिया या अनेक क्षेत्रात अजून मागेच आहेत, कारण हे काम म्हणजे शरीर थकवणारं, वेळा अनियमित. डोळ्यांसमोर या व्यवसायात कोणत्याही आदर्शवत महिलेचं चित्र नाही. बरं बाहेरच जग म्हणजे सरकारी लोक, जमीन मालक, माल पुरवणारे आणि तुमचा कर्मचारी वर्ग सुद्धा तुलनेन अधिक असणारा पुरुष वर्ग. त्यामुळे अडथळे खूप, जे सांस्कृतिक विचारसरणीचे अडथळे आहेत."

या व्यवस्थेच्या परिस्थितीपुढे त्यांनी आपली स्वप्न भंगू दिली नाहीत तर, त्या अधिक जोमाने कामाला लागल्या. सुरुवातीला निव्वळ आपल्या परिसरातले खवैय्ये येतील, असा कॅफे सुरु करण्याचा मानस ठरवला होता. पण त्यानंतर मग येणाऱ्या सर्व आव्हानांना कैनाझ सामोऱ्या गेल्या आणि आज त्या अभिमानाने सांगतात की, "तुम्ही या शहरात कुठेही असा, तुम्हाला माझ्या खास गरमागरम ब्राउनीज खायला फार लांब जावं लागणार नाही." हे कसं शक्य आहे, तर त्यांच्या मुंबईभरातल्या प्रसिद्ध ९ शाखा तुम्हाला अगदी कुठेही सापडतील. प्रत्येक शाखेत, जे चाखाल, त्याची चव तुमच्या जिभेवर चिरंतन काळ टिकणारी आहे आणि काहीतरी छान मिळाल्यावर आयुष्य कसं प्रफ्फुल्लीत वाटू लागतं, तसंच काहीसं या पदार्थांची चव चाखल्यावर वाटू लागतं.!

image


" आम्ही जेंव्हा सुरुवात केली, तेंव्हा नेमकं आम्हाला काय हवंय, हेच आम्हाला माहित नव्हतं. आम्हाला हेही ठाऊक नव्हतं की आम्ही या व्यवसायात लावलेले पैसे परत मिळतील की नाही, आम्ही जी चार टेबल्स इथं लावालीयत, ती भरतील की नाही? आम्हाला जे खायला आवडत होतं, ते आम्ही बनवत होतो, आम्हाला आशा होती की आम्ही व्यवस्थित व्यवसाय करू पण हे घवघवीत यश मिळेल याची खरोखरच खात्री नव्हती. आम्हाला एवढं प्रोत्साहन मिळालं, भरभरून आशीर्वाद मिळाले, आणि लोकांचं अलोट प्रेम. त्यामुळे आम्हाला बरंच काही मिळाल्यासारखं आहे.” कैनाझ उत्साहात सांगत होत्या .

कैनाझ यांच्या या उपहारगृहात मिळणारे पदार्थ हे मुळात जगातील विविध खाद्यपदार्थांपासून प्रेरित आहेत, त्यामुळे त्यांचं यश आणि त्यांच्या खाद्यपदार्थांची लोकप्रियता ही आपल्या खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयींचा भाग आहे. चांगलं खाण्याची सवय आणि आपल्या खाण्याबाबत असलेला चोखंदळपणा! " मुंबईतल्या लोकांच्या खाण्यापिण्यात एका दशकापासून बदल झालाय. आजचा जो ग्राहकवर्ग आहे त्याला या पदार्थांचं ज्ञान आहे, त्यानं प्रवास केलेला आहे, त्यांची अभिरुची चांगल्या तऱ्हेने विकसित झाली आहे. अनेकजण आपल्या नाश्त्याला चॉकलेट केक खातात तर रात्रीच्या जेवणानंतर आवर्जून गोड खातात. मला या बदललेल्या उत्क्रांतीचा आपण एक भाग आहोत त्याचाही खूप आनंद होतो."

आयुष्यात असे चांगले योगायोग घडत गेले आणि कैनाझ यांनी आपल्या निश्चयापासून स्वत:ला दूर जावू दिलं नाही. तो म्हणजे लोकांना उत्तमोत्तम पदार्थ खाऊ घालणं आणि आता आणखीन नव्या हॉट चॉकलेटनं खवय्यांना भुरळ पडण्याचं त्यांनी ठरवलंय." आम्ही आता आमच्या शाखा विस्तारणार आहोत , आता सध्या आमच्या ९ शाखा आहेत. आणि लवकरच नवीन सुरु होणार आहेत. दिल्ली आमच्या नजरेत आहे, मुंबईनंतरच आमची सर्वात मोठी बाजारपेठ तिथे आहे. आम्ही आमची उत्पादन दिल्लीला नेहमी पाठवत असतो. आम्हाला तिथे शाखा उघडायला आवडेल, पण अर्थकारण जुळून आलं तरच ते शक्य आहे. त्याचबरोबर गुणवत्ता जपणे आणि सगळ्या शाखांना व्यवस्थित सांभाळणे हे सुद्धा करता यायला हवं. म्हणजे मी कधी सुरु करीन हे काही नक्की नाही, पण माझ्या डोक्यात हा विचार आहे हे निश्चित!" कैनाझ आपल्या व्यवसायचं गणित मांडत होत्या .

कैनाझसुद्धा त्या हॉट चॉकलेटसारख्या तुम्हाला त्यांच्या स्मितानं भुलवतात. तुम्ही जेंव्हा तुमच्या या आवडत्या कॅफेत बसलेले असता आणि कैनाझ त्यांच्या प्रसन्न चेहऱ्याने तुम्हाला वाढतात, तेव्हा नक्कीच प्रत्येकजण म्हणतो की आजच दिवस खास गेला. पण त्याचवेळी तुमच्या मनात आजच्या युगातली एक सक्षम स्त्री म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर ही दुणावतो .

" रियाझ अमलानी, भारतीय राष्ट्रीय उपहारगृह संघाचे अध्यक्ष एकदा म्हणाले होते, की भारतातल्या शहरांमध्ये स्त्रिया शेफ असणाऱ्या उपहारगृहांची संख्या आता वाढणार आहे . मला वाटतं हे विधान खूप खरं आहे , कारण , महिला शेफची संख्या निश्चित वाढतेय. महिला शेफना प्राधान्य दिलं जात नव्हतं, पण हळूहळू या क्षेत्रातही हा समतोल साधला जात आहे. " कैनाझ यांनी आजच्या महिलांसमोर आशावादी चित्र निर्माण करत समारोप घेतला.


मुळ लेखिका – बिंजल शाह

अनुवाद : प्रेरणा भराडे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags