संपादने
Marathi

बाळाच्या गरजांच्या एक पाऊल पुढे रहाण्यास पालकांना मदत करणारे बेबीबेरी....

19th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

बाळाचा जन्म ही निश्चितच एक आनंदाची बाब... पण त्याचबरोबर येते ती एक मोठी जबाबदारीही.... त्यातच अशा वेळी नेमका कोणता सल्ला ऐकायचा – ऑनलाईन उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे वागायचे की पिढयांपिढ्या चालत आलेल्या पारंपरिक शहाणपणाला महत्व द्यायचे – याबाबत या नवीन पालकांचा नक्कीच गोंधळ उडतो. प्रचलित असलेले समज आणि खऱ्या अर्थाने सर्वोत्तम काय आहे, यामधील फरक ओळखणे हे खरोखरच कठीण आणि तणावपूर्ण असते. रात्रभर बाळाचे रडणे किंवा काही न खाणे किंवा तापाने फणफणने, यांसारखे प्रसंग तर या गोंधळात भरच घालतात. म्हणजे एकूणच काय, तर खऱ्या अर्थाने हा पालकत्वाचा आनंद उपभोगण्यापेक्षा त्यातून खूप सारा तणावच निर्माण होतो आणि नेमके अशा वेळीच बेबीबेरी (BabyBerry) अतिशय मदतगार ठरु शकते.

काय आहे बेबीबेरी?

पालकांना त्यांच्या बाळाच्या प्रगतीची आणि विकासाची संपूर्ण माहिती ठेवण्यास बेबीबेरी मदत तर करतेच पण त्याचबरोबर एक परिपूर्ण अनुभवही देते. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो, जसे की, लसीकरण तक्ता, बाळाच्या वाढीतील मैलाचे दगड, इतर माहिती, आयुष्याला आकार देणारी साधने आणि त्याशिवाय चांगली आणि शिफारस केली गेलेली उत्पादने आणि सेवा विकत घेण्यास पालकांना सक्षम बनवतील अशी इतर सोयीची वैशिष्ट्ये...

image


बाळाच्या शारिरीक, भावनिक आणि मानसिक वाढीबाबतच्या सर्व नोंदी ठेवण्याचा या ऍपचा प्रयत्न असतो. तसेच ते व्यक्तिगतरित्या माहिती देऊ करतात आणि बाळाचे वय, लिंग, वैशिष्ट्ये, छंद, कौशल्ये आणि पालकांची जीवनशैली या गोष्टी लक्षात घेऊन, त्यांच्या एमब्रायो (mBryo) या रेकमेंडेशन इंजिनच्या द्वारे संबंधित माहिती पालकांपर्यंत पोहचवली जाते. त्याचबरोबर लसीकरणाच्या वेळा आणि त्यांनंतरची संभाव्य लक्षणे किंवा परिणाम याबाबतही पालकांना वेळोवेळी इशारे दिले जातात. पालक आपल्या पाल्याची प्रगती डब्ल्यूएचओच्या मानकांशी पडताळून पाहू शकतात आणि वेळोवेळी बालसंगोपनाशी संबंधित आणि व्यक्तिगत माहिती मिळत असल्याने ते अप-टू-डेट रहातात.

आजपर्यंतची कथा

बेबीबेरीची पालक कंपनी असलेली सेरेब्राह्म इनोव्हेशनची (CereBrahm Innovations) स्थापना केली ती बाला वेंकटचलम आणि सुभाषिनी सुब्रमनियम यांनी... सुभाषिनी या नेहमीच स्वतःला ‘सुपर पेरेंट’ समजत असत आणि आपल्या पाल्याच्या आरोग्य आणि कल्याणावर आपले संपूर्ण नियंत्रण असल्याचा त्यांचा समज होता. पण एक दिवस त्यांची मुलगी कांजिण्यांनी आजारी पडली. जेंव्हा त्या आपल्या मुलीला घेऊन डॉक्टरकडे गेल्या, तेंव्हा त्यांना समजले की त्यांच्या मुलीला कांजिण्यांची लस देण्याचे राहून गेले होते आणि वर्गातील कोणामुळे तरी तिला हा आजार झाला होता. अर्थातच हा असाच आणखी एक विद्यार्थी होता, ज्यालादेखील ही लस मिळाली नव्हती आणि याचे कारण म्हणजे या लसीचा समावेश सरकारच्या अनिवार्य लसींच्या यादीत नव्हता.

त्यावेळी संस्थापकांना काही गोष्टींची जाणीव प्रकर्षाने झाली. सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य ती माहिती, जागरुकता आणि वेळोवेळी योग्य ती माहिती मिळण्याचा अभाव... अर्थातच या गोष्टीकडे तातडीने लक्ष देणे त्यांना गरजेचे वाटले. त्यावेळी वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी सर्वात आधी संपर्क साधला तो बालरोगतज्ज्ञांशी.. त्याबाबत बोलताना बेबीबेरीचे सीएमओ देव वीज सांगतात, “ आमच्या समजांना बालरोगतज्ज्ञांनीही दुजोरा दिला. त्यांच्या मते अनेक पालक लहानसहान गोष्टींसाठीही डॉक्टरांकडे धाव घेतात आणि विनाकारण काळजी करतात. तर दुसऱ्या बाजूला अनेक पालक अगदी क्वचितच डॉक्टरकडे जातात आणि काही वेळा महत्वाच्या तपासण्याही चुकवतात. त्यामुळे पालकांना व्यक्तिगत आणि अचूक माहिती पुरविण्याची गरज असल्याचे स्पष्टच होते, जेणेकरुन ते सर्वोत्तम निर्णय घेऊ शकतील.”

image


सुरुवातीच्या आवश्यक चाचण्यांनंतर बेबीबेरीला ऑक्टोबर २०१४ मध्ये एक ऍप-ओन्ली उत्पादन म्हणून सुरुवात झाली. “ आम्हाला आमचे हे उत्पादन एक प्रोऍक्टीव्ह चॅनेल म्हणून बनवायचे होते, ना की केवळ रिऍक्टीव्ह चॅनेल म्हणून आणि म्हणूनच ऍप हाच सर्वाधिक योग्य पर्याय असल्याचा निर्णय आम्ही घेतला.”

त्यांची कोअर टीम ही सहा कर्मचाऱ्यांच्या मदतीने काम करते, जे प्रामुख्याने तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी असलेले आहेत. तर दुसरे दोन कर्मचारी ऑपरेशन्स आणि लॉजिस्टीक्सची जबाबदारी सांभाळतात. मुख्य कार्यकारी अधिकारी बाला यांना प्रॉडक्ट इंजिनियरींगमध्ये वीस वर्षांहून अधिक अनुभव आहे तर सीओओ सुभाषिनी यांना आरोग्यसेवा आणि ईकॉमर्स उत्पादने उभारण्याच्या कामाचा सतरा वर्षांहून अधिक अनुभव आहे. देव हेदेखील कोअर टीमचेच सदस्य असून त्यांनीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोबाईल क्षेत्रात सेल्स आणि मार्केटींगमध्ये अकरा वर्षांहून अधिक काळ काम केलेले आहे.

सध्या महानगरातील आणि त्यापाठोपाठ देशभरातील लहानलहान शहरांमधील नविन पालकांचे लक्ष वेधून घेण्याचा बेबीबेरीचा प्रयत्न आहे. सध्या आपले ग्राहक वाढविण्यासाठी ते ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्हीचा एकत्रित वापर करत आहेत.

कार्यपद्धती

पालकांना आधी या ऍपवर साईन अप करावे लागेल आणि बाळाबाबतची सर्व सविस्तर माहिती भरावी लागते, ज्यामध्ये बाळाची जन्मतारीख, जन्माच्या वेळचे वजन, उंची, लिंग, रक्तगट आणि गर्भावस्था कालावधी यांचा समावेश असतो, ज्यामुळे ऍपला संबंधित माहिती आणि लसीकरणाचे वेळापत्रक पुरवण्यासाठी मदत मिळू शकते. वेळोवेळी अद्ययावत केलेल्या या माहितीच्या आधारे, हे ऍप बाळांशी संबंधित उत्पादने आणि सेवा पुरवठादारांना संभाव्य आणि संबंधित ग्राहकांशी जोडून देऊ शकते. त्याचबरोबर हे ऍप पालकांना डॉक्टर्स, न्युट्रीशनिस्ट आणि इतर तज्ज्ञांकडून आलेली माहितीही उपलब्ध करुन देते.

image


बेबीबेरीकडे महसूल मिळविण्याचे विविध मार्ग आहेत. बेरीकार्ट, हे इन-ऍप ईकॉमर्स स्टोअर पालकांना बाळासाठी आवश्यक वस्तू, खेळणी आणि इतर वस्तू पुरवते. पालकांना त्यांच्या परिसरातील डॉक्टर्स आणि दवाखान्यांची माहिती मिळू शकते आणि त्यांची नियोजित भेटही यामाध्यमातून घेता येऊ शकते. त्याशिवाय आई आणि मुलांसाठी व्हॅल्यू ऍडेड सर्विसेस, बालसंगोपन ब्रॅंडस् बरोबर बीटूबी टाय अप्स, मोठ्या डेटा सेवा आणि इतर आरोग्य-संबंधित सेवा यांसारख्या इतरही मार्गांचा कंपनीकडून शोध सुरु आहे.

भविष्यातील योजना

देव यांच्या अंदाजानुसार भारतात सध्या बालसंगोपन आणि संबंधित उत्पादने आणि सेवांच्या बाजारपेठेत सुमारे पन्नास दशलक्ष वापरकर्ते असून, ते सुमारे १८ बिलियन डॉलर्सचा व्यवहार करत आहेत. मध्यमवर्गातील वाढती विभक्त कुटुंब आणि शहरी जोडप्यांचे अतिशय धकाधकीचे जीवन, यामुळे लहान बाळांचे पालक हे नेहमीच आयुष्य सोपे करणाऱ्या उपायांच्या शोधात असतात. त्यामुळे सहाजिकच गेल्या पाच वर्षांत या क्षेत्राची स्टार्टअप्सने केलेली निवड आणि त्यामध्ये होत असलेली वाढ मुळीच आश्चर्यकारक नाही. या क्षेत्रातील महत्वाच्या खेळाडूंमध्ये समावेश आहे तो फर्स्टक्रायडॉटकॉमचा ( Firstcry.com) - एक ऑनलाईन आणि ऑफलाईन एंटरप्राईज- जे बालसंगोपन उत्पादने विकते, तसेच महिंद्राचे बेबीओये (BabyOye – पूर्वीचे मॉमऍन्डमी) ज्यांचे प्रमुख लक्ष आहे ते प्रसुती पोषाख आणि बालसंगोपन उत्पादनांकडे, तर बेबीचक्रा (Babychakra) हे सध्या नव्या पालकांसाठीचे डेस्कटॉप-बेस्ड सोशल नेटवर्क असून लवकरच ते मोबाईल ऍपच्या स्वरुपात आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. तर बेबीसेंटर हे एक वर्षापर्यंतच्या मुलांसाठी कंटेंट आणि कोलॅब्रेशन सर्विसेस देऊ करते. त्याशिवाय मायसिट4कीडस् (Mycity4kids) हे एक वेब आणि मोबाईल ऍप असून ते मुलांसाठीच्या उपक्रमांची सूची पुरवते.

अधिकाधिक वैशिष्टयपूर्ण गोष्टींचा समावेश करुन स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्याचे बेबीबेरीचे लक्ष्य आहे. सध्या ते बाळाच्या जन्मापासून ते ते सात वर्षांचे होईपर्यंत देखरेख सेवा देऊ करत आहेत. तर आगामी काळात गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व सेवा देऊ करण्याची त्यांची योजना आहे. त्याचबरोबर पालकांसाठी सोशल मिडीया सुरु करण्याचाही त्यांचा मानस आहे, जेणेकरुन एकाच वयोगटातील बालकांचे आईवडील एकमेकांशी संपर्क करु शकतील आणि आपापल्या अनुभवांची देवाण करु शकतील.

युवरस्टोरीचे मत

बेबीबेरी हे एक विचारपूर्वक तयार केलेले ऍप असून पालकांचे आयुष्य अधिक सहज आणि कमी तणावाचे करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. तर त्यांच्या माहितीपत्रक विभागात पालकत्व आणि त्याच्याशी संबंधित विषयांवरील लेख आहेत, मात्र सध्या या ऍपमध्ये सोशल मिडीयाचा समावेश नसल्याने वापरकर्त्यांना बेबीबेरीच्या बाहेर या लेखांची देवाणघेवाण करता येत नाही. मात्र या वैशिष्ट्याचा समावेश झाल्यास हे ऍप आणखी लोकांपर्यंत वेगाने पोहचण्यास निश्चितच मदत होईल. सध्या तरी दोन्ही पालकांपैकी केवळ एक जणच बाळाचे खाते सुरु करु आणि वापरु शकतो, कुटुंबातील इतरांना ही माहिती मिळू शकत नाही – मात्र यावर उपाय म्हणजे एकाच युजरनेम आणि पासवर्डच्या सहाय्याने विविध साधनांच्या माध्यमातून ही माहिती पहाता येऊ शकते.

image


या ऍपची साईन-अप प्रक्रिया अगदी सोपी आहे. तर सर्वाधिक उपयुक्त वैशिष्ट्य आहेत, प्रगती तक्ते आणि आरोग्यविषयक माहिती, जी एकत्रितपणे पालकांना आपल्या मुलाच्या प्रगतीबाबत अद्ययावत तर ठेवतेच पण त्याचबरोबर त्याच्या वाढीतील महत्वाच्या टप्प्यांवरही लक्ष ठेवते. त्यामध्ये काही त्रुटी असल्यास, अधिक तपासणीसाठी डॉक्टरकडे जाण्याचा दक्षता इशाराही दिला जातो.

प्रोडक्ट इंजिनियरींग, आरोग्य सेवा, ई कॉमर्स आणि सेल्समध्ये अनुभव असलेली कोअर टीम असल्याने, बेबीबेरी भविष्यात त्यांच्या ऍपमध्ये काय सुधारणा करते आणि आणखी कोणत्या वैशिष्ट्यांचा समावेश करते, ते पहाणे औत्सुक्याचे आहे.

लेखक – हर्षित मल्ल्या

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags