संपादने
Marathi

प्रेम जैन; ८६३ दशलक्षी डॉलरच्या Insieme Networks मागचा खंदा हात!

Team YS Marathi
4th Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

एप्रिल २०१२ मध्ये ‘सिस्को’ने आपल्याच अभियंत्यांच्या ‘स्टार्टअप’मध्ये १०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी Insieme Networks ही कंपनी सुरू करण्यात आली. लगेचच दणदणित ८६३ दशलक्ष डॉलरच्या मोबदल्यात ती अधिग्रहित करण्यात आली. ‘सॉफ्टवेअर डिफाइन्ड नेटवर्किंग’च्या संवर्धनासाठी ‘सिस्को’ने हे पाउल उचलले, असे या घटनेकडे पाहिले गेले. पण खरंतर हे यश म्हणजे Insieme Networks चे सहसंस्थापक प्रेम जैन, मारिओ मॅझोला आणि लुका कॅफेरो यांच्या पोक्त अनुभवांचेच पडसाद होते. या सगळ्यांचे याआधीचे ‘नुओव्हा सिस्टिम्स’ हे ‘डाटा सेंटर स्टार्टअप’देखील ‘सिस्को’कडून अधिग्रहित करण्यात आलेले होते. २००८ मध्ये हे घडले होते. Insieme Networks च्या तीनपैकी एक असलेल्या सहसंस्थापक प्रेम जैन यांच्याशी आम्ही नुकताच संवाद साधला. प्रेम जैन हे BITS Pilani च्या १९९३ च्या बॅचचे विद्यार्थी. जैन यांची ‘सिस्को’तील कारकीर्द अभियांत्रिकी निदेशक म्हणून सुरू झाली. याच काळात सिस्कोने Crescendo Communications अधिग्रहित केलेले होते. सिस्कोतून ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवृत्त झाल्यानंतर प्रेम जैन यांनी सिस्कोचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चेंबर यांचे सल्लागार म्हणून नवी इनिंग सुरू केली. प्रेम मोजकेच बोलतात. तरुण उद्यमी-व्यावसायिकांसाठी त्यांचा एकेक शब्द म्हणजे दीपस्तंभच!

image


वडिलांकडून नम्रतेचे धडे

प्रेम जैन यांची कारकीर्द आभाळभर आहे. काही शब्दांत ती तशी पेलता यायची नाही. प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि नम्रतेचे धडे त्यांना वडिलांकडूनच मिळाले. त्यांना आपल्या जमेच्या आणि वजा बाजू चांगल्याच ठाऊक आहेत. बिटस्‌ पिलानीतील फुलपंखी महाविद्यालयीन दिवसांतच ते बाह्यजगताला ज्ञात झालेले होते आणि ते दिवस त्यांना बरेच काही शिकवून जाणारे ठरले. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या लोकांशी समायोजन साधने, संघभावना नेमकी काय असते, ती कशी विकसित होते, याबद्दलचे तारतम्यही त्यांच्या ठायी याच दिवसांत विकसित झालेले होते. शिक्षणाबरोबरच नेतृत्वाचे, उद्यमशिलतेचे गुण तर त्यांच्यात अक्षरश: उसळायला लागलेले होते. डॉ. मित्रा, डॉ. हांडा आणि डॉ. नागरथ यांच्यासारख्या प्राध्यापकांना प्रेम जैन त्याचे श्रेय देतात. इथं प्रेम यांनी कितीतरी मित्र मिळवले. विविध गुणदर्शनाच्या कितीतरी कार्यकलापांमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवला. या सगळ्या कार्यकलापांमध्ये सर्वाधिक परिणामकारक आणि प्रेम यांच्या एकुणातील व्यक्तिमत्वावर ठसा उमटवणारी ठरली ती युरोपची सहल. कहर म्हणजे आपल्या पाच वर्षांच्या महाविद्यालयीन जीवनात या सहलीचा आनंदानुभव त्यांनी तब्बल चारवेळा लुटला. विविध संस्कृतींशी याद्वारे ओळख झाली. खिशात पावाणा नसताना दिवस कसे लोटायचे असतात, त्याचे धडेही या सहलींदरम्यान प्रेम यांनी गिरवले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या सहलींनी त्यांच्यात याआधी कधीही न केलेली धाडसे मार्गी लावण्याचे धैर्य निर्माण केले. कौशल्य निर्माण केले.

जीवनाचे धडे गिरवल्यानंतर…

प्रेम पुढे अमेरिकेत गेले आणि ‘यू. सी. डेव्हीस’मधून पदव्युत्तर पदवी संपादन केली. ‘डेव्हिड सिस्टिम्स’साठी ‘बीएनआर’मध्ये वैज्ञानिक चमूत अभियांत्रिकी निदेशक म्हणून त्यांनी कार्य सुरू केले. ते ‘क्रिसँडो’मध्ये असताना ‘सिस्को’ने ही कंपनी अधिग्रहित केली. तंत्रज्ञानात बलाढ्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिस्कोशी अशाप्रकारे त्यांचा संपर्क आला आणि इथूनच त्यांचा फलदायक प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.

आपल्या व्यावसायिक कारकीर्दीतून जे काही त्यांनी अनुभवले, त्यातून काढलेल्या काही मार्गदर्शक तत्वांचे हे सार…

१) तुम्ही जे काही कराल, त्याचा संबंधित उद्योगावर विशिष्ट पडसाद उमटणार आहेत काय, परिणाम होणार आहे काय, हे आधी लक्षात घ्यायला हवे.

२) चुका कबुल करा. दुरुस्त करा आणि पुढे चला. हे वर्तुळ शक्य तितक्या त्वरेने पूर्ण करा.

३) जमिनीशी नाळ काय ठेवा. ‘स्टार’ बनण्याचा प्रयत्न करू नका. आभाळ इतकंही ठेंगणं नाही, हे लक्षात ठेवा. असे केल्याने आलेल्या संधी तुम्ही हातच्या घालवाल.

काय करावे काय करू नये?

आपण आपली व्यावसायिक कारकीर्द सुरू करण्यात जरा उशीरच केला, असे सिंहावलोकन करताना, मागे वळून पाहताना प्रेम यांना हमखास जाणवते. श्रीगणेशा आपण जरा लवकर करू शकलो असतो, असेही राहून राहून वाटते. लाल फितींतून आणि नियमांच्या चाकोरीतून मुक्त असे वातावरण प्रेम यांना त्यासाठी हवे होते. जिथे नावीन्यपूर्ण कल्पनांकडे तुसडेपणाने पाहिले जात नाही, अशी परिस्थिती त्यांना अपेक्षित होती. तरीही पहिल्यांदाच उद्यम-व्यवसायात पाउल टाकत आहे, अशा नवोदितांसाठी काय करावे आणि काय करू नये, याबाबत दोन चांगल्या गोष्टी सांगताना त्यांना आज आनंदच होतो आहे…

१) तुमच्याकडे जर एखादी कल्पना असेल तर परिणाम काय होईल, त्याबद्दल फार निष्कर्ष काढत बसू नका, किस काढत बसू नका. कल्पनेवर काम सुरू करा बास…

२) बाजारातील सर्व प्रकारच्या घडामोडींबद्दल सजग रहा.

३) ‘आता मीही’ या प्रमाणे ट्रेंडची वा एखाद्याची नक्कल म्हणून व्यवसाय सुरू करू नका.

४) जर अपयशी ठरलात तर वाइट वाटून घेऊ नका. आमच्या पहिल्या व्यवसायात आम्ही त्या क्षणापर्यंतचे तंत्रदृष्ट्या सर्वोत्कृष्ट उत्पादन बाजारात उतरवले होते, पण विक्रीची अपेक्षित पातळी आम्ही गाठू शकलो नाही. मोठे अपयश हा त्याचा परिणाम होता, पण आम्ही वाइट वाटून घेतले नाही. त्याचा उपयोग नाही. नव्याने कामाला लागलो. हेच उत्तम असते!

५) प्रामाणिक असा. ज्या क्षणी तुम्हाला तुमची चुक जाणवेल, त्या क्षणी ती दुरुस्त करा.

६) टीममधल्या सदस्यांत परस्पर विश्वासाची भावना वृद्धिंगत करा. आपापले अहंकार एका कोपऱ्यात ठेवून एकमेकांच्या चांगल्या कामाबद्दल एकमेकांचे अभिनंदन करा. एकच लक्षात ठेवा. टीममधला प्रत्येक जण एकाच ध्येयाने काम करतोय. ते म्हणजे आपल्या प्रकल्पाचे यश.

भारतातील ‘स्टार्टअप्स’च्या उणिवा

भारतातील ‘स्टार्टअप्स’मध्ये काही उणिवा आहेत. आणि स्टार्टअपच्या अपयशामध्ये या उणिवाच कळीचा मुद्दा ठरतात.

१) सामंजस्य – आपण जी समस्या सोडवत आहोत, तिला नेमके समजून घ्या. ग्राहकाला समजून घ्या. इथे तुम्हाला महत्त्वाकांक्षी असण्यापेक्षा वास्तववादीच असायला हवं.

२) लाटेच्या अग्रभागी रहा – लाटेवर स्वार होण्यापेक्षा तिच्या अग्रभागी रहा. तुम्ही तुमच्या उत्पादनाबाबत आणि उपक्रमाबाबत कृतीशील आणि ग्रहनशील असायला हवे. भविष्यातील ट्रेंडस्‌चा वेध घेत रहा आणि ट्रेंडस्‌सेटर (पायंडा पाडणारे) म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात पायंड्यावरून चालण्यापेक्षा पायंडे पाडा.

३) चांगले सल्लागार मिळवा – चांगल्या सल्लागारांच्या शोधात रहा आणि त्यांचे सल्ले नियमितपणे ऐका. पण या संवादातून तुमच्यातल्या बरोबर आणि चुक ओळखण्यातल्या उपजत वृत्तीवर परिणाम होता कामा नये. बरोबर वाटते तेच करा आणि त्याचे जे काय होतील, त्या परिणामांना सामोरे जा.

४) या क्षेत्राचा आदर करा – व्यवसाय अगर उद्यमशिलता ही मुख्यत: आपली छाप सोडण्यासाठी असते. वेगाने पैशांची निर्मिती करण्याचा मार्ग कदापि नाही.

अंतिम शब्द

उद्यमी भारतातील उदयोन्मुख नवोन्मेषाला उद्देशून प्रेम यांना सांगायचेय…...की, जे काही तुम्ही करता आहात, त्यात तुमचे हृदय, आत्मा आणि मन संपूर्णपणे ओवाळून टाका. एकदा श्रीगणेशा केल्यानंतर मागे वळून बघत बसू नका. तुम्हाला यश मिळालेले आहे आणि यशश्री तुमच्या दिशेने माळ घेऊन निघालेली आहे, असे खुशाल समजा आणि मगच ध्येयसिद्धीच्या यज्ञात आपल्या कर्माच्या समिधा अर्पण करायला प्रारंभ करा.

व्यावसायिक, उद्यमी व्हायचे तर खरं पाहता कधीही उशीर झालेला नसतो. कुठलेही ‘स्टार्टअप’ सुद्धा तसेच घाई घाई होत नसते.

लेखक : अलोक सोनी

अनुवाद : चंद्रकांत यादव

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags