संपादने
Marathi

संस्थापक वि संस्थापकः लोकशाही हा उपाय नव्हे!

Team YS Marathi
18th Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

२०१४ मध्ये सीबी इनसाईटस् ने उद्योजकांनीच लिहिलेल्या निबंधांचे सविस्तर विश्लेषण केले होते. स्टार्ट अप्सच्या अपयशामागील कारणांबाबत उद्योजकांनीच यामधून विस्ताराने आपली मते मांडली होती. स्टार्ट अप्सच्या अपयशासाठी सर्वाधिक कारणीभूत ठरणाऱ्या आणि या उद्योजकांनी स्वतःच नमूद केलेल्या या कारणांपैकी दुसरे सर्वाधिक महत्वाचे कारण होते, ते म्हणजे संस्थापक/टीम-संबंधित समस्या....

संस्थापकांशी संबंधित समस्यांची मोठी जंत्रीच आहे, ज्यामध्ये त्या मार्गावर टिकून रहाण्यात किंवा चांगली कामगिरी करण्यात असलेली असमर्थता येथपासून ते धादांत अप्रामाणिकपणापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होऊ शकतो. तर शुद्ध फसवणूक किंवा चोरी यांसारख्या समस्या जेंव्हा उद्भवतात तेंव्हा त्यांचा सामना करणे सोपे असते, पण योगदान आणि टीम डायनॅमिक्सची संबंधित समस्यांना तोंड देणे हे खूपच कठीण असते.

image


आम्ही निधी उपलब्ध करुन दिलेल्या कंपन्यांपैकी मी अतिशय जवळून संबंधित असलेल्या एका कंपनीतील तीनपैकी दोन संस्थापकांनी निधी मिळाल्यानंतर महिन्याभरातच आमच्याशी संपर्क साधला आणि कंपनी सोडून जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी आपला हा निर्णय बदलावा आणि कंपनी उभारण्यासाठी येथे थांबावे, यासाठी त्या दोघांना राजी करण्यात आम्ही कसेबसे यशस्वी ठरलो. पण पुढील तीन वर्षांच्या काळात हीच परिस्थिती आणखी काही वेळाही उद्भवली आणि त्यांच्यापैकी एका संस्थांपकाने पुन्हा एकदा सोडून जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या या इच्छेमागील कारण स्पष्ट करताना त्यांनी सांगितले, की संस्थापक या नात्याने त्यांच्या स्थानायोग्य भूमिकाच या कंपनीत नसल्याची त्यांची भावना होती आणि ते स्वतः सहसंस्थापक असलेल्या या स्टार्टअपमधून ते जे काही शिकले, त्यापेक्षा कितीतरी अधिक ते या तीन वर्षांच्या काळात एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीतून शिकू शकले असते. सुदैवाने तेंव्हा कंपनीच्या कामकाजावर किंवा नेतृत्वाच्या मनोधैर्यावर कोणताही विपरित परिणाम होऊ न देता, अनुकूल अटींसह वाटाघाटी यशस्वी करण्यात आम्हाला यश तर आलेच, पण पुढे जाऊन या कंपनीने सर्व भागधारकांसाठी उत्तम मूल्य निर्मितीही केली.

जर तुम्ही तुमच्या स्टार्ट अपचा विचार करत असाल आणि सहसंस्थापकांचा शोध घेत असाल, तर भविष्यातील सर्व संभव शक्यतांचा विचार करुन, त्याची काळजी घेण्यायोग्य करार करणे हे अतिशय आवश्यक आहे. अशा कराराचा मसुदा तयार करताना पुढील घटकांचा विचार केला आहे, याची जरुर खात्री करुन घ्या.

१. भूमिका आणि जबाबदारी

संस्थापकांमध्ये अशा प्रकारचा करार करताना प्रत्येत संस्थापकाची भूमिका आणि जबाबदारी निश्चित करावी. संस्थापकांच्या अनुभवावर हे आधारीत असू शकते आणि जर त्यांच्या गाठीशी मोठा अनुभव नसेल तर ते या संस्थापकांच्या आवडीवर आधारीत असू शकते. ( जर त्या सह संस्थापकाला विशिष्ट क्षेत्राची आवड असेल, तर तो किंवा ती त्यासाठी आवश्यक ती कौशल्ये विकसित करेल, ही गोष्ट यामागे गृहीत धरलेली आहे.) तसेच भूमिका आणि जबाबदारीत बदल करण्याची तरतूदही या अहवालात असावी, जेणेकरुन सह संस्थापक कामगिरी फारशी चांगली न झाल्यास किंवा कंपनीने नवीन मॉडेल स्वीकारल्यास, त्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करणे शक्य होईल.

२. निर्णय प्रक्रिया

अंतिम निर्णय हा केवळ एकाच व्यक्तीच्या हातात असावा आणि प्रत्येक सह संस्थापक हा मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सह मुख्य कार्यकारी अधिकारी असू शकत नाही किंवा तसा तो असण्याची गरजही नसते. कोणत्याही स्टार्टअपसाठी समिती किंवा बहुमताच्या आधारावर निर्णय घेण्याची प्रक्रिया ही खूपच वेळखाऊ ठरते आणि कदाचित ती कंपनीसाठी मृत्यूघंटा ठरु शकते किंवा परिणामी काही चुकीचे निर्णयही घेतले जाऊ शकतात. अंतिम आणि एकमेव निर्णयकर्ता हा सर्व भागधारकांना सुस्पष्टता देऊ शकतो आणि त्यामुळेच कंपनीमधील असे एकमेव नेतृत्व ओळखणे आवश्यक असते. नेतृत्वामधील बदल हा कधीच रोटेशनने अर्थात आळीपाळीने न होता केवळ कामगिरीवर आधारीतच असायला हवा. अर्थातच अतिशय महत्वाचे निर्णय हे सर्व सहसंस्थापकांशी चर्चा केल्यानंतरच घेतले जावेत (जसे की व्यवसाय क्षेत्रातील बदल, गुंतवणूकदार, मूल्यांकन, इत्यादी संदर्भातील निर्णय) पण याचा अर्थ असा नाही की सर्वच निर्णय हे सहमतीने घेण्याची गरज आहे. सहयोग आणि चर्चांमधून लोकशाही चालू शकते, निर्णय प्रक्रिया नाही...

३. इक्विटी विभाजन आणि व्हेस्टींग

स्टार्ट अप्सबाबत झालेले एक सर्वेक्षण असे दाखविते, की बहुतेक वेळा संस्थापकांमध्ये इक्विटीचे समान विभाजन होते. संस्थापकांचा अनुभव आणि पार्श्वभूमी सारखीच असल्यास हे विशेष करुन खरे ठरते. स्टार्टअप मधील इक्विटी ही भविष्यातील मूल्य निर्मिती करण्यासाठी असते आणि टीममधील सर्वस सदस्यांनी सारख्याच प्रकारे योगदान देणे किंवा सारखीच कामगिरी करणे हे खूपच असंभवनीय असते. आणि जर त्यांचा अनुभव आणि पार्श्वभूमी समान नसेल तर सह संस्थापकांना समान वाटा मिळणेही गरजेचे नसते. अशा वेळी आघाडीचा सहसंस्थापक / मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला इतर सहसंस्थापकांपेक्षा उच्च इक्विटी मिळेल. ही संभाषणे आता अप्रिय किंवा कटू वाटू शकतात पण भविष्यातील कटूता टाळण्यासाठी याची थेट चर्चा आत्ताच होणे गरजेचे आहे. सहसंस्थापकांमधील बेबनाव किंवा कटूता यामुळे कंपनीच्या कामगिरीचा दर्जा घसरु शकतो. इक्विटी विभाजनाशिवाय व्हेस्टींग हा देखील अतिशय गंभीर घटक आहे आणि संस्थापकांनी बाजारावर आधारीत व्हेस्टींग शेड्युलचे अनुसरण करावे आणि ते त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून जशी अपेक्षा करतात, त्याच्याशी काहीसे समान असे हे असावे. जर एखादा सह संस्थापक मध्येच सोडून गेला, तर पर्याय शोधताना या अनव्हेस्टेड शेअर्सचा वापर करता येऊ शकतो.

संस्थापक/टीम यांचे नाते एखाद्या लग्नासारखे असते – जे कायम टीकेल किंवा त्यामधून कोणीतरी बाहेर पडेपर्यंत ते कायम राहील, अशी आपल्याला आशा असते, पण वास्तविक लग्नांप्रमाणेच त्यामध्ये अनेक आश्चर्यकारक घटना घडू शकतात आणि त्यामुळेच लग्न-पूर्व करार नसल्याबद्दल नंतर पश्चाताप करण्यापेक्षा तो आधीच करणे केंव्हाही चांगले.

लेखक – भारती जेकब

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags