आयुर्वेदाला समृध्द करण्यासाठी धडपडणारी समृध्दी
त्यांची इच्छा खरंतरं आयुर्वेदातील डॉक्टर बनवण्याची. मात्र काही कारणामुळे ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. पण त्यांनी हार न मानता या क्षेत्रात संशोधन करून स्वतःची आयुर्वेदिक औषधं बनविण्याची कंपनी सुरू केली. अर्थातच हा प्रवास सोपा नव्हता, मात्र जिद्द आणि मेहनत याच्या बळावर आज आयुर्वेदिक औषधं बनविणाऱ्या यशस्वी उद्योजिका आहे मुंबई च्या सायन उपनगरात राहणा-या समृद्धी पालेकर.
आयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.
समृध्दीताई मूळच्या मुंबईच्याच. मुबंईतच शिक्षण झालं. शाळेत असल्यापासूनच आयुर्वेदाची आवड होती. त्यामुळे याच क्षेत्रात करियर करायचं असं ठरलही होते. मात्र शिक्षण घेत असताना आलेल्या काही अडचणींमुळे हा अभ्यासक्रम अर्धवट सोडवा लागला. त्याच दरम्यान लग्न झालं. मुळातच असलेली आयुर्वेदाची आवड यामुळे घरात काही न करता शांत बसणं शक्य नव्हतं. आयुर्वेद हे प्राचीनतम शास्त्र असूनही आजच्या युगातही या शास्त्राच्या सिद्धान्तांवर आधारित चिकित्सा उपयुक्त व यशस्वी ठरते. त्यामुळे वेगवेगळ्या पध्दतींना अभ्यास करून समृध्दीताईंनी काही औषधे बनविली. घरच्या घरीच मिक्सरच्या साथीने हे प्रयोग सुरू होते. ओळखीच्यांमध्ये कौतुकाने घरीच बनवलेली चूर्ण, मुखवास प्रायोगिक तत्वावर दिली. त्यांचा प्रतिसाद सकात्मक आला. सुरूवातीला प्रयोग म्हणून केलेले चूर्ण लोकांना आवडू लागले. मग मित्र परिवारामधून याबाबत विचारणा होऊ लागली. मागणीनुसार समृध्दीताईंनी ग्राहकांना या चूर्ण आणि मुखवासांचा पुरवठा केला. त्याचदरम्यान आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. मात्र आलेल्या संकटाने खचून न जाता समृध्दीताईंनी आतापर्यंतची मेहनत आणि इच्छा यांची सांगड घालायचं ठरवलं. आतापर्यंत ज्या आयुर्वेदिक औषधांचे घरगुती स्वरूपात विक्री करत होत्या त्यांची विक्री आता खुल्या बाजारपेठेत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वात आधी औषधांना शासनाकडे रजिस्टर करून औषधे बनविण्याचा आणि विक्री करण्याचा कायदेशीर परवाना मिळवला. यामुळे बाजारपेठेतील ग्राहकांचा विश्वास संपादित करणे शक्य झाले. दोन हजार एक सालापासून समृध्दीताई श्री भानुसमर्थआयुर्वेदिक प्रॉ, या नावाने त्यांची औषधे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
नवीन उद्योग सुरू केल्यावरही अडचणींचा सामना करावाच लागला. आपल्या वस्तूंच्या मार्केटिंगसाठी त्यांनी दोन मार्केटिंग कंपन्यांना याचे अधिकार दिले, मात्र या कंपन्यांकडून समृध्दीताईंची फसवणूक झाली. मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला. अडचणींचा काळ होता. एकीकडे आर्थिक संकट आणि दुसरीकडे यामुळे झालेला मानसिक त्रास अशा संकटात समृध्दीताई होत्या, या काळात कुटुंबाने दिलेली साथ आणि काही हितचिंतकांनी सावरलेली बाजू यामुळे यातून बाहेर प़डणं शक्य झाल्याचे समृध्दीताई सांगतात. आता गोवंडी येथे श्री भानु समर्थ आयुर्वेदिक प्रॉ. कंपनीची औषधे बनविली जातात. यातील असिडीटी आणि पचन सुधारण्यासाठी बलवर्धक, पोट साफ होण्यासाठी विरेचन, तारूण्यपिटीका घालविण्यासाठी कांचनप्रभा, केशाचे सौंदर्य वाढविणे आणि केसातील कोंडा दूर करण्यासाठी पंचम केशलेप यांसारखी औषधे येथे बनविली जातात. ही औषधे मुंबई आणि उपनगरातील सर्व आयुर्वेधिक औषधालयांमध्ये उपलब्ध आहेत.
आयुर्वेदिक औषधांना चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी समृद्धीताई प्रयत्नशील आहेत. तसेच समृध्दीताईंच्या कारखान्यात बनविण्यात आलेल्या औषधांचे मार्केटिंग योग्य प्रकारे व्हावे यासाठी चांगल्या डीलर्सची त्यांना अपेक्षा आहे.