संपादने
Marathi

तुमच्या जुन्या कपड्यांनी क्रांती घडू शकते..खरंच !

गूंज...ग्रामीण भारताचा बदलता चेहरा

Pravin M.
15th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

सध्या जमाना फॅशनचा आहे. आजची फॅशन उद्यापर्यंत जुनी झालेली असते. आणि मोठ्या शहरांमध्ये तर आपल्याला फार लवकर कपड्यांचा कंटाळा येतो. आणि याला कारण आहे ते म्हणजे सध्या प्रचलित असलेली दिखाऊ संस्कृती. अशावेळी लोकं त्यांचे जुने कपडे बिनकामाचे समजून फेकून देतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की तुम्ही जुने, बिनकामाचे म्हणून जे कपडे फेकून देता, ते काही गरजूंच्या कामी येऊ शकतात? किंवा तुम्हाला हे माहिती आहे का की तुमचे हे कपडे गरिबांसाठी प्रगतीचं साधन बनू शकतात? विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. ‘गूंज’ने ही अविश्वसनीय गोष्ट खरी करून दाखवली आहे. आणि त्यांनी फक्त जुने कपडे गरीब गरजूंपर्यंत पोहोचवलेच नाहीत, तर त्यातून ग्रामीण भारतात विकासाचं एक नवं मॉडेलच सादर केलं. ‘गूंज’च्या याच प्रयत्नांमुळे भारतातल्या अनेक गावांमध्ये सकारात्मक बदल पहायला मिळाले आहेत. आणि याचं सर्व श्रेय जातं ते म्हणजे ‘गूंज’चे संस्थापक अंशु गुप्ता यांना.

अंजू गुप्ता..'गूंज'चे उद्गाते !

अंजू गुप्ता..'गूंज'चे उद्गाते !


अंशु गुप्ता यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. दहावीची परीक्षा दिल्यानंतर इंजिनिअर बनण्यासाठी त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि अभ्यास सुरु केला. पण बारावीच्या परीक्षेदरम्यान त्यांना अपघात झाला. ज्यामुळे त्यांना बरेच दिवस घरात पूर्णपणे आराम करावा लागला. आणि हाच काळ त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला. या दिवसांमध्ये केलेल्या चिंतनातून त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांना पत्रकारितेची आवड आहे. मग त्यांनी स्थानिक साप्ताहिकं आणि वर्तमानपत्रांमध्ये लिहिणं सुरु केलं. डेहराडूनमध्ये ग्रॅज्युएशन अर्थात पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मास कम्युनिकेशनमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यानंतर त्यांनी एक कॉपी रायटर म्हणून एका जाहिरात कंपनीमध्ये काम सुरु केलं. त्यानंतर दोन वर्ष ‘पॉवर गेट’ या कंपनीमध्येही नोकरी केली. आता अंशुंना नोकरी करण्याचा कंटाळा आला होता. आणि त्यांना नवीन काहीतरी करायचं होतं. असं काहीतरी, ज्यामुळे समाजाचा फायदा होईल. आणि याच इच्छेमधून जन्म झाला ‘गूंज’चा.

‘गूंज’चा हेतू होता गरजूंपर्यंत जुने कपडे पोहोचवणं. आणि ‘चॅरिटी बिगिन्स अॅट होम’ या इंग्रजी म्हणीप्रमाणे त्यांनी याची सुरुवात स्वत:च्या घरापासून केली. त्यांनी स्वत:च्या घरातल्या जुन्या ६७ कपड्यांपासून या कामाचा शुभारंभ केला. त्यांनी रूग्णालयांच्या बाहेर आणि झोपडपट्टीमध्ये राहणा-या लोकांना कपडे वाटायला सुरुवात केली. यानंतर इतरही अनेक लोक ‘गूंज’सोबत या कामात सहभागी झाले. १९९९ मध्ये चमोलीमध्ये आलेल्या भूकंपानंतर ‘गूंज’ने ‘रेड क्रॉस’च्या मदतीने गरजू भूकंपग्रस्तांना भरपूर कपडे आणि बूट पाठवले होते.

जुन्या कपड्यांमधून क्रांती घडू शकते..नक्कीच !

जुन्या कपड्यांमधून क्रांती घडू शकते..नक्कीच !


‘गूंज’चा सर्वच क्षेत्रामध्ये विस्तार व्हावा यासाठी अंशू प्रयत्नशील होते. त्यांनी तर त्यांच्या प्रोव्हिडंट फंडचेही पैसे ‘गूंज’च्या कामात लावून टाकले. पण तरीही पैशांची चणचण मात्र कमी होत नव्हती. ओडिशामध्ये जेव्हा चक्रीवादळ आलं, तेव्हा अंशूंकडे इतकेही पैसे नव्हते की ते स्वत: जाऊन पीडितांना मदत करू शकतील. सामान तर त्यांच्याकडे खूप सारं होतं जे त्यांना वेळेवर गरजूंपर्यंत पोहोचवायचं होतं. त्यासाठी मग त्यांनी ‘रेड क्रॉस’ची मदत घेतली. १९९९ मध्ये ‘गूंज’ एक नोंदणीकृत सामाजिक संस्था अर्थात एनजीओ बनली, पण समस्या कमी व्हायचं नाव घेत नव्हत्या. कोणतीच आर्थिक संस्था त्यांना आर्थिक मदत द्यायला तयार नव्हती. आणि आर्थिक पाठबळाशिवाय काम करणं अवघड झालं होतं. संस्था चालवण्यासाठीही खूप खर्च येत होता. मग अंशू गुप्ता यांनी तामिळनाडू सरकारसोबत एक करार केला. या करारामुळे जे कपडे गरजूंपर्यंत पोहोचले नव्हते, ते पोहोचवणं त्यांच्यासाठी शक्य झालं.

‘गूंज’चा आवाका असाच उत्तरोत्तर विस्तारत गेला. पुढे फक्त कपडेच नाही तर बूट, खेळणी, स्टेशनरी, लहान फर्निचर, पुस्तकं असं सामानही ते एकत्र करून गरजूंमध्ये वाटायला लागले. याशिवाय शेकडो स्वयंसेवकही ‘गूंज’ला जोडले गेले. गावागावांमध्ये ‘गूंज’चं नाव झालं. ‘गूंज’चं काम प्रामुख्याने ग्रामीण भारतात सुरु होतं. ‘गूंज’चा ‘क्लॉथ फॉर वर्क’ प्रकल्प म्हणजे तर एक आदर्शच आहे. या कार्यक्रमांतर्गत अनेक गावांमध्ये नदीवरचे छोटे पूल बांधले गेले, तर काही गावांमध्ये विहिरी खोदल्या गेल्या. काही ठिकाणी जलसंधारणाचं काम झालं, तर काही ठिकाणी स्वच्छता. यातली विशेष बाब म्हणजे, ‘गूंज’च्या या कामांमध्ये जे गावकरी काम करायचे, त्यांना कामाचा मोबदला म्हणून कपडे किंवा त्यांच्या गरजेनुसार इतर सामान दिलं जायचं.

यशाचा हा टप्पा गाठण्यासाठी सर्वात महत्वाची असते ती म्हणजे शिस्त. ‘गूंज’मध्ये प्रत्येक काम मोठ्या शिस्तीत केलं जातं. इथे कपड्यांचे वेगवेगळे गठ्ठे तयार केले जातात, आणि गरजेनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवले जातात. म्हणजे थंड प्रदेशांमध्ये ऊबदार कपडे तर उकाडा असणा-या प्रदेशात साधे कपडे. विशेष म्हणजे ‘गूंज’च्या या सगळ्या पसा-याची मुख्य जबाबदारी ही महिलांच्या हाती आहे. इथे अनेक प्रकारच्या वस्तूही बनवल्या जातात.

ग्रामीण भारताचा कायापालट

ग्रामीण भारताचा कायापालट


आज ‘गूंज’चे वार्षिक अर्थव्यवहार तब्बल तीन कोटींपर्यंत पोहोचलेत. पण पैसा हा मुळी ‘गूंज’चा हेतू नव्हताच. ‘गूंज’चा खरा हेतू हा सामाजिक आहे. हा हेतू पूर्णपणे लाखो गरजूंशी जोडलेला आहे. ‘गूंज’च्या मिळकतीचा मोठा हिस्सा हा काही खाजगी दानशूर व्यक्तींकडून येतो, तर काही हिस्सा हा ‘गूंज’नेच बनवलेल्या वस्तूंपासून येतो. अंशूंनी तर त्यांच्या कामामध्ये स्वत:ला इतकं झोकून दिलंय, की त्यांना वेळोवेळी मिळणा-या पुरस्कारांची रक्कमही ते ‘गूंज’च्याच कामी वापरतात.

‘गूंज’ ६७ कपड्यांपासून सुरु झालेला हा निश्चय आज प्रत्येक महिन्याला ऐंशी ते शंभर टन कपड्यांपर्यंत पोहोचलाय. आज ‘गूंज’ची भारतातल्या तब्बल २१ राज्यांमध्ये संकलन केंद्रं आहेत. दहा कार्यालयं आणि दीडशेहून अधिक सहकारी कर्मचारी एवढा हा विस्तार मोठा झालाय. खरंच..काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं काम करण्यासाठी अंशू गुप्ता यांनी नोकरी सोडली होती. ते त्यांनी करून दाखवलंय. एक असं काम, जे अवघड होतं, खडतर होतं. पण अशक्य..मुळीच नव्हतं.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags