संपादने
Marathi

अमेरिकेतील अॅपल-गुगल युद्धात ‘भोपाली’ चैतन्य!

Chandrakant Yadav
28th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

अमेरिकेत टेलिव्हिजन संचांवर ताबा मिळवण्याच्या स्पर्धेला कधी नव्हे एवढा वेग सध्या आलेला आहे. सर्व बाजूंनी जिंकण्याची जिद्द अशा थराला गेलेली आहे, की स्पर्धा म्हणण्यापेक्षा युद्धच म्हटलेले अधिक योग्य. एकीकडे ‘नेटफ्लिक्स’ आपले शो तयार करून अख्ख्या हंगामासाठी रिलिज करण्यात कंबर कसलेली. दुसरीकडे अत्याधुनिक तंत्रात बाप मानल्या जाणाऱ्या ‘ॲपल’ (ॲपल टीव्ही) आणि ‘गुगल’ (गुगल टीव्ही) सारख्या कंपन्या टेलिव्हिजन बघण्यासाठी सॉफ्टवेअर उपलब्ध करण्याच्या लगबगीत… आणि या सगळ्या दिग्गजांसमोर आव्हान उभे केलेय एका भारतीय जिगरबाजाने… एकेकाळच्या ‘भोपाली बाबू’ने… चैतन्य ‘चेत कनोजिया’ यांच्या ‘ॲरियो’ कंपनीने अगदी हळुवारपणे एक साधासुधा पर्याय उभा केला… आणि चैतन्य ‘चेत कनोजिया’ यांच्या या पर्यायाने अमेरिकेतील टेलिव्हिजन इंडस्ट्री अक्षरश: हादरून गेली!

image


असे करते काम…

ॲरियो आपल्या प्रत्येक ग्राहकाला एक इवलासा अँटिना उपलब्ध करून देते. अँटिना इतका लहान, की करंगळीतही फिट्ट बसतो. हा अँटिना वातावरणातील ब्रॉडकास्ट सिग्नल्स कॅच करतो आणि नंतर मग एरियो सर्व्हरवर युजरने ठरवलेल्या कार्यक्रमाला अथवा कंटेंटला रेकॉर्ड करू लागतो. युजर मग नंतर कुठल्याही डिव्हाइसवर हा रेकॉर्ड कार्यक्रम वा कंटेंट बघू शकतो. हा विंडोज़वर, डेस्कटॉपवर, लॅपटॉपसाठी मॅकवर आणि मोबाईलसाठी iOS आणि अँड्रॉईड वर चालतो. दर महिन्याला फक्त ८ डॉलर मोजून युजर २० तासांपर्यंत आणि १२ डॉलर दरमहा मोजून ६० तासांपर्यंत कार्यक्रम रेकॉर्ड करू शकतो. हेच काय कुणाला वाटले तर एकाच वेळी दोन कार्यक्रमही रेकॉर्ड केले जाऊ शकतात.

मग समस्या काय आहे?

आपले उत्पादन बाजारात आणण्याच्या काही महिन्यांपूर्वी कनोजिया आणि त्यांच्या टिमने कितीतरी बड्या ब्रॉडकॉस्टिंग नेटवर्कच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यांच्यासमवेत मिळून काम करण्याच्या संदर्भात चर्चा केली. तथापि, या चर्चांतून काही निष्पन्न झाले नाही. त्यात ॲरियोच्या बिटा लाँचिंगला दोन आठवडे उरलेले असतानाच ब्रॉडकॉस्टिंग कंपन्यांच्या एका संघटनेने ॲरियोविरुद्ध खटला दाखल केला. हे प्रकरण गुंतागुंतीचे तर होतेच, त्याचबरोबर अशाप्रकारचे हे पहिलेच प्रकरण होते. दोन्ही बाजूंनी युक्तिवादाच्या फैरी झडल्या. युक्तिवाद कशाप्रकारचे होते ते बघा :

टीव्ही शोचे ट्रान्समिशन सिग्नल्स ही ब्रॉडकॉस्ट नेटवर्क्सची संपत्ती आहे. ॲरियो या सिग्नल्सची एकप्रकारे चोरी करते आहे. कॉपीराइट अँक्टचे ते उल्लंघन आहे, असा ब्रॉडकॉस्ट नेटवर्क्स संघटनेचा युक्तिवाद.

…तर ॲरियोचे म्हणणे होते, की ते उपलब्ध करून देत असलेली सेवा ही खासगी भाडोत्री अँटिना अशा स्वरूपाची आहे, याशिवाय जास्त काहीही नाही. जे सिग्नल्स कॅच केले जात आहेत, ते वैयक्तिक वापरासाठी आहेत. त्यांचे सार्वजनिक प्रदर्शन घडत नाही. कायद्याच्या कक्षेतच सगळे चाललेले आहे. आणि ॲरियो आपल्या रिमोट डाटा केंद्राच्या सर्व्हरवर सिग्नल साठवतेय, हे जर बेकायदा असेल तर क्लाउड डाटा स्टोअरेज सेवा देणाऱ्या ‘आयक्लाउड’ आणि ‘ड्रॉपबॉक्स’सेवाही बेकायदाच ठरतील. त्यांना वेगळा नियम आणि आम्हाला वेगळा हे नैसर्गिक न्यायतत्वाला धरून होणार नाही.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद बेतोड दिसतात. उत्पन्नावर होणारा विपरित परिणाम ही ‘ब्रॉडकॉस्ट नेटवर्क्स’ची चिंता आहेच, त्यासह कॉपीराइट या विषयाबद्दलही ते चिंतित आहेत. लोकल केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स रि-ट्रांसमिशन शुल्क म्हणून ‘ब्रॉडकॉस्ट नेटवर्क्स’ना वार्षिक ३ ते ४ कोटी डॉलर अदा करतात. अशा परिस्थितीत लोकांसमोर आलेला ‘ॲरियो’सारखा पर्याय म्हणजे या उद्योगाच्या उत्पन्नावर घालाच आहे. कारण मग लोकही चॅनेल्ससाठी एवढा जास्त खर्च करण्यापेक्षा ‘ॲरियो’ पसंत करतील. एकतर बरेचसे चॅनेल्स असेही अनेकांसाठी मतलबाचे नसतात.

imageचैतन्य लहानचे मोठे भोपाळमध्ये झाले. इथेच शिकले. वडिलांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते दहा वर्षांचे होते. कुटुंबाची आर्थिक स्थितीही या कारणाने खालावलेली होती. चैतन्य म्हणतात, की कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी एकापेक्षा अधिक मार्ग निवडण्याचा धडा या हलाखीतूनच मला मिळाला. अभियांत्रिकीतून पदवी मिळवल्यावर चैतन्य अमेरिकेला गेले. तेथे ‘नॉर्थइस्टर्न युनिव्हर्सिटी’तून ‘कॉम्प्युटर सिस्टिम्स इंजिनिअरिंग’मध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले.

‘मध्यपूर्वे’तील नोकरी आणि कर्मचाऱ्यांसमवेत दहा महिने तंबूत घालवल्यानंतर चैतन्य पुन्हा अमेरिकेला परतले. तिथे कितीतरी नोकऱ्या केल्या आणि बदलल्या. एका सहकाऱ्यासमवेत पुढे ‘नॅव्हिक सिस्टिम’ला सुरवात केली.

नॅव्हिक सिस्टिम्सने एक असे सॉफ्टवेअर विकसित केले होते, जे सेट टॉप बॉक्सच्या वर ठेवले, की केबल कंपन्यांना ग्राहकांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देई. आपले हे संशोधन विकायला चैतन्य यांना जवळपास दोन वर्षे मेहनत घ्यावी लागली. अखेर यश मिळाले. ‘मायक्रोसॉफ्ट’ने २००८ मध्ये ‘नॅव्हिक सिस्टिम’ २०० रग २५० दशलक्ष डॉलर एवढ्या मोबदल्यात आपल्या ताब्यात घेतली. चैतन्यसाठी ही रक्कम घसघशित होती. चैतन्य यांचे कष्ट फळाला आले होते.

चैतन्य आता नवे काही करण्याच्या तयारीला लागले. अनुभवाचे पाठबळ होतेच. जोडीला पैसाही होता. टेलिव्हिजन पाहण्यातील प्रेक्षकांची आवडनिवड हीच चैतन्य यांच्या नव्या मोहिमेचा केंद्रबिंदू होती. त्यांनी उत्तम अभियंत्यांची एक टिम तयार केली आणि १८ महिन्यांत अंमलबजावणीचे उद्दिष्ट ठरवून कामाला सुरवात केली. विविध गुंतवणूकदारांकडून जवळपास १०० दशलक्ष डॉलर गोळा करण्यातही त्यांनी यश मिळवले. गुंतवणूकदारांमध्ये सुविख्यात बॅरी डिल्लॅर यांचाही समावेश होता, हे विशेष! ‘ॲक्सपॅडिया’ आणि ‘इंटरॲक्टिवकॉर्प’चे हे चेअरमन. शिवाय ‘फॉक्स ब्रॉडकॉस्टिंग’ कंपनी आणि ‘यूएसए ब्रॉडकॉस्टिंग’ कंपनीचे एकेकाळचे प्रमुखही. हे सगळे जाऊच द्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अगदी सुरवातीलाच लाखांहून अधिक ग्राहकही ‘ॲरियो’ला मिळालेले होते.

इथपर्यंत आले प्रकरण

‘ॲरियो’ अजून फक्त न्युयॉर्क आणि बॉस्टन परिसरातूनच लाँच झालेली होती. पुढे २०१४ मध्ये अन्य बाजारपेठांतून दमदार पाउल टाकण्याचे ठरत होते. अर्थात हे सगळे न्यायालयीन लढाईवर अवलंबून होते. दोन वर्षे या लढाईला उलटलेली होती. कनिष्ठ न्यायालयाने ‘ॲरियो’च्या बाजूने आपला निर्णय दिलेला होता. पण हा किरकोळ दिलासा होता. कारण यातून हे स्पष्ट झालेले होते, की ॲरियोला जेथे म्हणून ते व्यवसाय सुरू करतील, त्या अमेरिकेतील प्रत्येक प्रांतात कायद्याच्या लढ्याला सामोरे जावे लागणार होते.

अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाच्या सुनावणीला मंजुरी देऊन टाकलेली होती. एका झटक्यात आता निवाडा लागेल आणि प्रकरण एकदाचे संपेल म्हणून ॲरियोचा जीव भांड्यात पडलेला होता, पण झाले उलटेच. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने २५ जून रोजी कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल फेटाळून लावला व ॲरियोविरुद्ध निर्णय दिला.

image


आता पुढे काय?

‘ॲरियो’च्या होम पेजवर आता चैतन्य कनोजिया यांनी ग्राहकांना उद्देशून केलेले एक आवाहन तेवढे आढळते. या आवाहनात त्यांनी म्हटले आहे...

‘‘न्यायालयीन कारणांमुळे ‘ॲरियो’ची सेवा तूर्त बंद आहे. पुनर्विलोकन याचिकेबाबत सल्लामसलत सुरू आहे, पण आता ग्राहकांनीच आपल्या हक्कांबाबत जागरूक व्हावे. ब्रॉडकॉस्टर्स आपले कार्यक्रम ज्या स्पेक्ट्रमच्या माध्यमातून प्रसारित करतात, ते स्पेक्ट्रम म्हणजे अमेरिकन जनतेची सार्वजनिक संपत्ती आहे. अँटिना घराच्या गच्चीवर लावला काय आणि टीव्ही सेटवर लावला काय. त्याने काहीही फरक पडत नाही.’’

कंपनीने ProtectMyAntenna.org शीर्षकांतर्गत एक चळवळही सुरू केलेली आहे. लोकांना या चळवळीत सहभागी करून घेतले जात आहे. चैतन्य कनोजिया यांच्या मताशी सहमत असलेले लोक या चळवळीला प्रतिसादही देत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ॲरियोचे अस्तित्व आता संपलेले आहे, तो एक इतिहास झालेला आहे, असा एक कयास बांधला जातोय. दुसरीकडे असेही मानले जातेय, की ॲरियो प्रसारण शुल्क ब्रॉडकॉस्टर्सना अदा करून आपली सेवा पूर्ववत सुरू करेल. शुल्क म्हणून जी रक्कम ब्रॉडकॉस्टर्सना द्यावी लागेल त्याचा बोजा अर्थातच ग्राहकांवर पडणार आहे. अँटिनाची किंमत मग चैतन्य कनोजियांना वाढवावी लागेल. अर्थात अद्याप चैतन्य कनोजिया यांचे पुढले पाउल अजून पडलेले नाही. टेलिव्हिजन प्रसारण उद्योगातील अनेक नजरा ते केव्हा व कसे पडते, त्याच्याच प्रतीक्षेत आहेत. कायद्याच्या कक्षेत काहीतरी मार्ग कनोजिया यांनी काढावा, अशी अपेक्षा सामान्य लोकांना आहे. कनोजिया तज्ज्ञ आहेत, ते एखादी जादूही करू शकतील... ॲरियोचे ग्राहक तर अशाच कुठल्यातरी जादूची वाट बघताहेत.

चैतन्य कनोजिया यांच्या या संशोधनाबद्दल आणि अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात दिलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते… तुम्ही विचार करा… ठरवा आणि कळवा…

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags