संपादने
Marathi

राज्यातील पाच देवस्थानाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी

Team YS Marathi
15th Mar 2017
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

राज्यातील अमरावती जिल्ह्यातील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळ आणि भक्तिधाम, श्री क्षेत्र रिद्धपूर, कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा तिर्थक्षेत्र देवस्थान आणि वाशिम जिल्ह्यातील श्रीसंत सखाराम महाराज तीर्थक्षेत्र या पाच देवस्थानाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजुरी दिली. यावेळी तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करताना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, बसस्थानक, जलपुनर्भरण आदी गोष्टींचा समावेश करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिल्या.


image


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा बनविताना इतर पायाभूत सुविधांबरोबरच सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, बस डेपो, पोलीस चौकी यांचाही प्राधान्याने समावेश करावा. तसेच भक्तनिवास, शौचालय आदींच्या देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी सोपविण्यात यावी. जेणेकरून पुढील काळातही तीर्थक्षेत्रे स्वच्छ व सुंदर राहतील. यावेळी अर्थमंत्री मुनगंटीवर म्हणाले की, विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना त्यांच्या कामाचे नियोजन, दर्जा याकडेही विशेष लक्ष द्यावे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची तरतूदही या आराखड्यात करण्यात यावी.

श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळ विकास आराखडा

अमरावती जिल्ह्यातील लोणी (ता. नांदगाव) येथील श्रीसंत गुलाबराव महाराज जन्मस्थळाच्या सोयीसुविधा व पायाभूत विकासासाठी तयार करण्यात आलेल्या 6 कोटी 69 लाख रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. या आराखड्यात भक्तनिवास संकुल, स्वच्छतागृह, बहुउद्देशीय सभागृह/सत्संग भवन, श्री संत गुलाबराव महाराज यांचे जन्म मंदिर व श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराची सुधारणा व सुशोभिकरण, वाचनालय इमारत, पालखी मार्गाचे क्रॉक्रिटीकरण आदींचा समावेश आहे.

श्रीसंत गुलाबराव महाराज भक्तीधाम विकास आराखडा

श्रीसंत गुलाबराव महाराज यांचे कर्मभूमी असलेल्या चांदूरबाजार तालुक्यातील प्रल्हादपूर येथील भक्तीधाम परिसराच्या विकासासाठी 24.99 कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये मुख्य मंदिर परिसराचे सुशोभिकरण, सांस्कृतिक भवन उभारणी, सायन्स सेंटर बांधणे, आर्ट गॅलरी, विश्रामगृह, जंतरमंतरच्या धर्तीवर बाग तसेच १६ हजार गायींसाठी गौशाळा यांचा समावेश आहे.

श्री क्षेत्र रिद्धपूर विकास आराखडा

अमरावतील जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र रिद्धपूर हे महानुभव पंथांची काशी म्हणून ओळखली जाते. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 25 कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये सिमेंटचे रस्ते व नाले, स्वच्छता गृह, थिम पार्क आदींचा समावेश आहे. प्रस्तावित थिम पार्कमध्ये सभागृह, बाग, पार्किंगची सोय, डायनिंग हॉल, बोटींगची सोय, बाजारतळ आदींचा समावेश राहणार आहे.

श्रीसंत सखाराम महाराज संस्थान तीर्थक्षेत्र

वाशिम जिल्ह्यातील लोणी (ता. रिसोड) येथील श्रीसंत सखाराम महाराज संस्थान तीर्थक्षेत्र विकासासाठी वीस कोटींच्या आराखड्यास आज शिखर समितीने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात १० कोटी 15 लाखांची कामे करण्यात येणार आहेत. या आराखड्यानुसार मंदिराकडे जाणारे रस्ते, पालखी मार्ग यांची कामे, रस्त्याच्या कडील गावातील गटारींचे बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन, मंदिर परिसर व रस्त्यावर वीजेची सोय, भक्त निवास, प्रसाद साहित्य विक्रीसाठी दुकानांची उभारणी आदी कामे तसेच गावातील इतर रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांसाठी शौचालयाचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सुशोभित महाद्वार बांधण्यात येणार आहे. मंदिरासमोरच्या जागेत बस स्टॅड व पार्किंग व्यवस्था ही उभारण्यात येणार आहे.तसेच परिसरात वन उद्यानही उभारण्यात येणार आहे.

श्री क्षेत्र जोतीबा विकास आराखडा

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील श्री क्षेत्र जोतीबा देवस्थान विकास आराखड्याच्या 25 कोटी रुपयांच्या कामानाही यावेळी शिखर समितीने मंजुरी दिली आहे. या आराखड्यानुसार सेंट्रल प्लाझा परिसराचा नुतनीकरण करण्यात येणार आहे. परिसरातील विद्युत पुरवठा भूमिगत करणे, यात्रेकरुसाठी भक्तनिवास बांधणे, दर्शन मंडप उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन व पर्जन्य जल पुनर्भरण आदी कामांचा समावेश आहे. भक्त निवासामध्ये कुटुंबांसाठी २२ खोल्या व ३ मोठे हॉल बांधण्यात येणार आहेत. आठ ते दहा हजार क्षमतेचे दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. सेंट्रल प्लाझा येथे ॲम्पिथिएटर प्रमाणेच व्यवस्था करण्यात येणार असून तेथे साहित्य विक्री दुकानेही असणार आहेत.

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags