संपादने
Marathi

सर्व काही स्वच्छ-सुंदर तुळजापूरसाठी

Anudnya Nikam
21st Oct 2015
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

तुळजापूर... महाराष्ट्राची कुलदेवता भवानी मातेचे वास्तव्य असलेले पवित्र तिर्थस्थान. मात्र काही वर्षांपूर्वी या मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. आता बऱ्याच प्रमाणात परिस्थिती सुधारली आहे ती भवानी मातेच्या निस्सिम भक्त भारतबाई देवकर यांच्या अविरत प्रयत्नांतून. मंदीरामध्ये शुचिर्भूत होऊन जाणाऱ्या, देवासमोर सर्व सोवळं पाळणाऱ्या आणि मंदीराबाहेर येऊन इतस्ततः कचरा फेकणाऱ्या, परिसरात अस्वच्छता पसरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या भक्तांच्या तुलनेत भारतबाईंची भक्ती आणि साधना निश्चितच वेगळी आणि म्हणूनच दखल घेण्याजोगी.

image


वैयक्तिक आयुष्यात नशिबाने दिलेले चटके सहन करुन तुळजापुरात भवानीच्या चरणी येऊन स्थिरावलेली ही एक अशिक्षित महिला. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी भारतबाईंचा विवाह झाला. मात्र संसारसुख फार काळ त्यांच्या नशिबी आले नाही. नवरा नेहमी जाच करायचा. अशातच एक मुल झाले आणि एक दिवस नवऱ्याने त्यांच्या डोक्यात वार करुन त्यांना घराबाहेर काढले. डोक्याला दहा टाके पडलेल्या भारतबाई जवळपास दीड महिना रुग्णालयात मृत्युशी झुंज देत होत्या. सुदैवाने त्या त्यातून वाचल्या आणि पदरी असलेल्या सहा महिन्यांच्या मुलाला घेऊन माहेरी परतल्या. मात्र इथेही दुर्देवं आडवे आले. संसार टाकून कायमची माहेरी परतलेल्या नणंदेशी भावजयीने भांडण काढले. अखेर भारतबाईंनी आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन तुळजापूर गाठले. सुरुवातीला खडी फोडण्याचे काम करुन त्या आपला आणि आपल्या मुलाचा उदरनिर्वाह करु लागल्या. आपल्यासारखा आपला मुलगा अशिक्षित राहू नये, त्याने शिकावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्यासाठी अपार कष्ट करण्याची त्यांची तयारी होती. मात्र खडी फोडून मिळणाऱ्या तुटपूंज्या पैशात ते शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लोकांच्या घरची धुणी-भांडी करायला सुरुवात केली. या दरम्यान त्यांना बचतगटासंदर्भात माहिती समजली. आपल्यावर आली तशी वेळ इतर कुठल्या महिलेवर येऊ नये या विचारातून त्यांनी आसपासच्या सर्व महिलांना बचतगटाचे महत्त्व समजावायला सुरुवात केली आणि एका अर्थी महिला सबलीकरणाचा वसा घेत सुरुवातीला पाच बचतगट स्थापन केले. याकरिता आवश्यक ते सर्व व्यवहार त्यांनी स्वतः पार पाडले. हे सर्व करण्याची ताकद, हे धाडस हा तुळजाभवानीचाच आशीर्वाद असल्याचे त्या मानतात. त्यामुळेच इथे येणारा भाविक या पवित्र भूमीवर पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे तुळजापूरवर नाखूष होऊन परतत असल्याचे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी बचत गटाच्या महिलांना सोबत घेऊन तुळजापूर स्वच्छ व सुंदर बनविण्याचा चंग बांधला.

image


आठ वर्षांपूर्वी यात्रेच्या मुहूर्तावर त्यांनी स्वच्छ व सुंदर तुळजापूर बनविण्याच्या मोहिमेला सुरुवात केली. सुरुवातीला मंदीराबाहेरच्या कार पार्किंगच्या जागेत साचलेला गुडघाभर कचरा, मैला महिलांनी स्वतः साफ केला. त्याचबरोबर संपूर्ण तुळजापूरात झाडू मारणे, गटारे साफ करणे ही कामे ३० महिलांनी मिळून तीन महिने कोणताही मोबदला न घेता केली. त्यानंतर नगरपालिकेने दखल घेतल्याने यातल्या काही महिलांना सफाईकामगार म्हणून रोजगारही प्राप्त झाला. भारतबाईंनी कचरा गोळा करण्यासाठी नगरपालिकेकडून पाच तीन चाकी घंटागाड्याही मिळविल्या. तुळजापूर स्वच्छ आणि सुंदर होईपर्यंत अनवाणी फिरण्याचा त्यांनी पण केला आहे. आजही त्या आपल्या या निश्चयावर ठाम आहेत. “आता बाराणे गेले आणि चाराणे राहिले” असे म्हणत लवकरच तुळजापूर स्वच्छ आणि सुंदर दिसेल असा विश्वास त्या व्यक्त करतात.

त्यांनी स्थापन केलेल्या बचतगटांची संख्या आता पाच वरुन ५०० झाली आहे. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. नगरपालिका आणि पंचायत समितीच्या घालाव्या लागलेल्या खेटा, अधिकाऱ्यांकडून मिळणारी उलटसुलट उत्तरे आणि सावकारांकडून दिला जाणारा त्रास या सर्वांचा सामना त्यांना करावा लागला. एकदा घरकाम करुन परतत असताना एका मोकळ्या मैदानात सावकारांच्या १५ जणांच्या टोळीने त्यांना घेरले आणि बचतगट वगैरे काढायच्या भानगडीत पडू नको अशी धमकी देऊ लागले. तीन दिवस हा सिलसिला चालला आणि अखेर तिसऱ्या दिवशी भारतबाईंनी दुर्गावतार धारण केला. “देवाकडे पण तीन गुन्हे माफ असतात, चौथ्याला माफी नाही” या एका वाक्यात सावकारांचे संकट कायमचे दूर केले, मात्र त्यानंतरही अनेक दिवस मसाल्याची बुक्की बरोबर घेऊन फिरत असल्याची आठवण त्या सांगतात.

image


भारतबाईंनी स्थापन केलेल्या बचतगटांच्या माध्यमातून शिवणकाम, ब्युटी पार्लर, यात्रेला येणाऱ्या भाविकांना पिण्याचे आणि आंघोळीसाठी पाणी पुरविणे अशी कामे महिला करतात. नुकतेच तीन शाळांचे खिचडी बनविण्याचे कंत्राट मिळविण्यातही त्यांना यश आले आहे. परिसरातून गोळा केलेल्या कचऱ्यातून ओला कचरा बाजूला करुन तो तुळजापुरपासून १५ किमी अंतरावर भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी असलेल्या शाळेला बायोगॅस बनविण्यासाठी पुरविण्यात येतो. बचतगटांच्या माध्यमातून भारतबाईंनी सामुहिक विवाह सोहळे आयोजित करुन आजपर्यंत ३४ जोडप्यांची लग्न लावून दिली आहेत. या सर्व उलाढालींचा हिशेब त्यांच्या तोंडपाठ असतो. मात्र वहीत नोंद करुन ठेवायच्या गोष्टींसाठी आपल्या मुलाची नेहमीच खूप मदत झाली असे त्या अभिमानाने सांगतात.

बचतगटाचे काम आणि स्वच्छता मोहिम यासह लेक वाचवा व दारुबंदी यासाठीही भारतबाई प्रयत्नशील आहेत. दारुबंदी संदर्भात जनजागृती करण्यासाठी त्यांनी स्वतः काही गाणी रचली आहेत. या सामाजिक कार्यासाठी त्यांना ‘जिजाई पुरस्कार’, ‘गुणगौरव पुरस्कार’ यासह चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आजवर करत असलेले काम यापुढेही असेच सुरु ठेवणार असल्याचे त्या सांगतात.

image


तुळजापूर मंदीर परिसरात दररोज दोन ट्रॅक्टर भरुन आणि उत्सवांच्या दिवसात १० ट्रॅक्टर भरुन नारळाचा काथा जमा होतो. भविष्यात या काथ्यापासून दोरखंड बनविण्याची त्यांची योजना आहे. त्यापासून कमीत कमी ४० लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे त्या सांगतात. तसेच काथ्याचा भुगा पाणी टंचाई असलेल्या भागातील शेतकऱ्यांना पुरविण्याचा त्यांचा विचार आहे. जेणेकरुन या शेतकऱ्यांना कमी पाण्यात जमिनीचा ओलावा कायम राखता येईल. एका अशिक्षित बाईच्या या कल्पना आणि व्यवहारचातुर्य थक्क करणारे आहे आणि त्याहून भारावून टाकणारी आहे ती त्यांची सामाजिक बांधिलकीची जाण आणि कामाप्रतीचे समर्पण.. त्यांना भक्ती आणि साधनेचा खरा अर्थ समजला आहे असे म्हटल्यास वावगं ठरु नये.

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags