संपादने
Marathi

टेलिमेडिसिन गावागावात पोहोचवणा-या डॉ. इंदू सिंग; कथा जी. व्ही. मेडिटेकची

आपल्या देशात आरोग्याच्या समस्येनं उग्र रूप धारणं केलेलं आहे. देशात मोठमोठी, महागडी पंचतारांकित रुग्णालयं उभी रहात आहेत. सार्वजनिक सरकारी रुग्णालयांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत रोडावत चालली आहे. गरीब आणि सर्वसामान्यांसाठी वैद्यकीय सेवा अधिकाधिक दूर जात आहेत. एकूणच काय तर धंदेवाईकपणा आलेल्या आजच्या वैद्यकीय सेवेमुळं सर्वसामान्यांच्या हक्कावर गदा आणली आहे. ही स्थिती शहरातली आहे. मग ग्रामीण भाग आणि खेड्यातल्या वैद्यकीय सोईसुविधेबाबत न बोललेलच बरं. अशा स्थितीत उत्तरप्रदेश,बिहार आणि झारखंडसारख्या मागासलेल्या राज्यांमध्ये डॉ. इंदू सिंग यांनी वैद्यकीय सेवेचं व्रत अंगीकारलय. उच्च तंत्रज्ञानाच्य़ा मदतीनं अतिशय उत्तमदर्जाची वैदकीय सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न आश्चर्यानं आवाक् करणाराही आहे आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना प्रेरणा देणाराही. रूग्णांची काळजी वाहणा-या करूणाह्रदयी डॉ. इंदू सिंग यांच्या टेलिमेडिसिनचा हा वृत्तांत.

sunil tambe
27th Aug 2015
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

स्वप्न उतरलं सत्यात

ग्रामीण रुग्णांची सेवा करताना डॉ. इंदू सिंग

ग्रामीण रुग्णांची सेवा करताना डॉ. इंदू सिंग


शहरांच्या आजुबाजुला, विशेषतःबनारस शहराच्या आसपास असलेल्या गावांमध्ये होणारं शहरीकरण आणि स्थलांतर या गोष्टी आता अगदी सामान्य बनल्या आहेत. रोजगाराच्या शोधात अधिकाधिक तरूण आपली गावं सोडून शहरांक़डं जाताना दिसत आहेत. या परिस्थितीमुळं गावांमध्ये आता स्त्रिया, लहान मुलं आणि म्हातारी माणसंच आढळतात. यांपैकी कधी कोणाला गंभीर स्वरूपाचा आजार झाला तर, त्याला इलाजासाठी शहरात हलवणंही मुश्कील होऊन गेलंय.

गाझीपूरजवळ एका खेड्यात राहणा-या मीना शर्मा या महिलेत आपल्या गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात जीवघेण्या स्वरूपाची गुंतागुंत निर्माण झाली. गाझीपुरात असलेल्या टेलिमेडिसिन सेवेला धन्यवाद द्यावेत तितके कमीच आहेत, कारण टेलिमेडिसिनमुळंच त्यांच्या जलदगतीनं तपासण्या होऊ शकल्या आणि त्यामुळं नेमकी समस्या काय आहे हे कळू शकलं. बनारसहून केवळ दोन तासात डॉक्टर्स गाझीपुरात दाखल झाले. योग्य रक्तदाताही अगदी वेळेत मिळवता आला आणि त्यामुळं अकाली जन्माला आलेलं बाळ आणि बाळंतीण, अशा दोघांचेही प्राण वाचू शकले.


दरी भरून काढणारा जी. व्ही. मेडिटेक


बनारस जवळ गाझीपुरात राहणारे, स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसुती शास्त्रातल्या तज्ञ असलेल्या डॉ. इंदू सिंग यांना जगभर प्रवास करत प्रसिद्ध डॉक्टरांसोबत काम करण्याच्या अनेक संधी चालून आल्या होत्या. त्यांनी मिळवलेल्या अनुभवामुळं त्या राहत असलेल्या भागातल्या गरजू लोकांना त्यांना चांगल्या वैद्यकीय सोईसुविधा पुरवता आल्या. शिवाय त्यांच्या व्यवसायाला मजबूत बनवता आलं. डॉ. इंदू सिंग यांनी १९९२ ला बनारसमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय़ सोईसुविधांनी युक्त असलेलं जी. व्ही. मेडिटेक नावाचं प्रसुती आणि बालकांसाठी छोटं रूग्णालय उभं केलं. 

आपल्या आधुनिक वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या प्रयत्नांबद्दल डॉ. इंदू सिंग सांगतात, “ माझे पती आणि मी, आम्ही दोघेही गाझीपूर आणि मिर्झापूरच्या लोकांशी जोडले गेलो आहोत. कारण आम्ही दोघेही याच परिसरातले आहोत. इलाजासाठी लोकांना इकडे तिकडे धावाधाव करायला लागू नये म्हणून आम्ही गाझीपूर आणि मिर्जापूर अशा दोन ठिकाणी उपग्रह केंद्रं सुरू केली आहेत. आता गावांमध्ये केवळ वयस्कर, स्त्रिया आणि मुलच तेवढी राहतात, तरूण नोकरीसाठी शहरांमध्ये स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळं आजारी माणसांना बनारसला आणण्यासाठी या गावांमध्ये कुणीच नाही. ”


ICT आणि टेलिमेडिसीन सोईसुविधा


संपूर्ण डेटा संगणकीकरण करण्याव्यतिरिक्त जी. व्ही. मेडिटेक पुरवत असलेल्या टेलिमेडिसिन या वैद्यकीय सेवेची ICT हा कणा आहे.

ड़ॉ. इंदू सिंग यांच्या वैद्यकीय केंद्रात सतत गर्दी असते

ड़ॉ. इंदू सिंग यांच्या वैद्यकीय केंद्रात सतत गर्दी असते


रुग्णांना अगदी थेट टेलिमेडिसिनचे उपाय करण्यासाठी विशिष्टपणे तयार केलेली उपकरणं ही एकदा का गाझीपुरातल्या रुग्णांना ब्लड प्रेशर मोजणे, ईसीजी काढणे अशासाठी जोडली गेली की बनारसमध्ये बसलेले डॉक्टर सुद्धा ही उपकरणं हाताळू शकतात. आणि समजा एखाद्या रूग्णाची काही गंभीर स्वरूपाची तक्रार असेल, तर तो रूग्ण थेट आपल्या मोबाईल फोनला जोडल्या गेलेल्या टेलिमेडिसिन सुविधेद्वारे बनारसच्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकतो. उपग्रह केंद्रांव्यतिरिक्त जी. व्ही. मेडिटेकनं गेल्या १० वर्षांच्य़ा काळात १५० शिबिरं आयोजित केली आहेत. डॉ. इंदू याबाबत माहिती देताना सांगतात, “ आम्ही रूग्णांना व्यक्तिगत स्वरूपात भेटून बोलू शकलो. यापुढच्या काळात देखील रुग्णांना आम्ही अधिक सहजपणे भेटू अशी परिस्थिती आमच्या वैद्यकीय शिबिरांनी निर्माण केली आहे. हाच आमच्या शिबिरांचा उत्कृष्ट भाग आणि परिणाम आहे.” गावक-यांनी विनंती केल्यानंतर जी. व्ही. मेडिटेक अशी वैद्यकीय शिबिरं आयोजित करतं. गावातली कुटुंबं शिबिरं आयोजित करणा-या डॉक्टरांच्या जेवणाची सोय करून त्यांच्या कार्यात आपला मदतीचा हात देतात. या शिबिरांमध्ये गावातल्या शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षक स्वयंसेवक म्हणून काम करतात. प्रत्येक शिबिरात हे डॉक्टर्स ३००० ते ४००० रूग्णांना तपासतात आणि त्यांना मोफत औषधं देखील पुरवतात. 

जी.व्ही. मेडिटेकनं लाईफलाईन एक्सप्रेस/जीवनरेखा एक्सप्रेस ही मोबाईल हॉस्पीटल ट्रेन बनारसमध्ये तीन दिवसांसाठी आणली होती. गाझीपूरमध्ये ही ट्रेन तीन आठवडे सेवा देत होती. शिबिरांमध्ये २८,००० लोकांवर इलाज केले गेले. यात ४५० डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आणि ५० दुभंगलेल्या ओठांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.


आव्हानं आणि मार्ग


दुर्दैवानं, निधी अभावी गरजू रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी तिष्ठत रहावं लागतं. डॉ. इंदू म्हणतात,“ डॉक्टरांना प्रेरित करणं आणि निधी गोळा करणं ही सर्वात मोठी आव्हानं आहेत. अल्पपतपुरवठा करणा-या संस्थांना मदत करायला लोक तयार असतात, पण आरोग्यासाठी ते पुढं येत नाहीत. या क्षेत्रात संयमी गुंतवणूकदारांची गरज आहे. कारण परतावा मिळण्यासाठी निदान तीन वर्षं तरी लागतातच.” जी. व्ही. मेडिटेक लिमिटेडकडं ६५ डॉक्टर्स आहेत. बनारसच्या आसपास असणा-या १५ जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, पश्चिम बिहार आणि झारखंडातल्या जवळजवळ ७१ लाख लोकांना हे ६५ डॉक्टर्स गेली २० वर्षांपासून आपली वैद्यकीय सेवा पुरवताहेत. एका वर्षाच्या कालावधीत हे डॉक्टर्स दहा लाख रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात तपासतात, २५,५५२ मुलांना जन्म देतात, ३२,४५२ शस्त्रक्रिया पार पाडतात तर ६४,००० रुग्णांना औषधं लिहून देतात.

डॉ. इंदू सांगतात, “ गाझीपूरच्या आसपासच्या परिसरातल्या लोकांना वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मी आणखी ४ केंद्रं स्थापन करण्याचा विचार करते आहे. ही केंद्र सूक्ष्म चिकित्सालयं असतील. प्रत्येक केंद्रामध्ये वैद्यकीय जागृती करणारी, शिक्षण देणारी आणि रक्त तपासणी करणारी तज्ञ असलेली पॅरामेडिक व्यक्ती असेल. वैद्यकीय सेवा मिळाली नाही, किंवा दूर्लक्ष झालं अशा कारणांमुळं कुणीही दगावू नये हे आमचं अंतीम धेय्य आहे.” या सगळ्या व्यवस्थेला मदत व्हावी या उद्देशानं तरुण, तरूणींना शिक्षण देऊन, प्रशिक्षण देऊन या सूक्ष्म चिकित्सालयात त्यांना नोकरी द्यायची असा ही त्यांचा प्रयत्न आहे.

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा