संपादने
Marathi

निवडीच्या स्वातंत्र्यासाठी लढताना

7th Mar 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

“ आयुष्यातील निवडीच्या हक्काचा विषय येतो आणि त्यासाठी तरुणांकडे असलेल्या पर्यायांचा विचार जेंव्हा मी करते, तेंव्हा आज वयाच्या तिसाव्या वर्षीही मी अस्वस्थ होते,” मेघा भगत सांगतात.

सीएसआर सल्लागार असलेल्या मेघा गेल्या वर्षभरापासून समाजात बदल घडविणाऱ्या तरुणांबरोबर, ज्यामध्ये मोठ्या संख्येने महिलांचा समावेश आहे, त्यासाठी काम करत आहेत. या तरुणांना समाजावर प्रभाव पाडण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्याचे काम त्या करत आहेत. मात्र त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून आणि कामातून त्या एक महत्वाची गोष्ट शिकल्या आहेत. ती म्हणजे, आजही तरुण महिलांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेचा उपयोग करुन घेण्यासाठी अगदी मर्यादीत अंतराळ उपलब्ध आहे.

स्वतःच्या निवडीवर ठाम राहून, आपला मार्ग तयार करणाऱ्या स्त्रियांपैकीच मेघा या स्वतःदेखील एक आहेत. त्यांच्या अनुभवाने त्यांना खूप काही शिकविले आहे. त्यामध्येच त्या आज करत असलेल्या कामाची बिजे आहेत. एकूणच त्यांचा अनुभव आणि त्या करत असलेल्या कामाबद्दल जाणून घेण्याचा हर स्टोरीचा हा प्रयत्न...

image


निवडीचे स्वातंत्र्यः सुरुवात शिक्षणापासूनच....

आर्मीची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या मेघा लहानपणी अगदी खोडसाळ होत्या. देशातील आठपेक्षा जास्त शाळांमधून त्यांचे शालेय शिक्षण झाले. पण या अनुभवाने त्यांना खूप काही शिकविले. यानिमित्ताने नवनवीन लोकांना भेटण्याची संधी तर मिळालीच, पण त्याचबरोबर नवीन गोष्टी आत्मसात करण्याची, वेगवेगळ्या वातावरणाशी जुळवून घेण्याची संधीही मिळाली आणि एकूणच आयुष्य बदलवून टाकणारा अनुभव दिला.

त्या नववीत होत्या जेंव्हा कारगिलचे युद्ध झाले. “ त्यावेळी माध्यमांनी केलेले वृत्तांकन मला युद्धाच्या जवळ घेऊन गेले आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय करार आणि द्विराष्ट्रीय संबंधांबाबत वाचण्याची प्रेरणाही मिळाली. त्याचवेळी मी पत्रकारिता किंवा कायद्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला,” मेघा सांगतात.

पण हे बोलणे खूपच सोपे होते. कारण अकरावी-बारावीत असताना त्यांचा दोन पातळ्यांवर संघर्ष सुरु होता – किशोरवयात स्वतःची ओळख शोधण्याचा संघर्ष एका पातळीवर सुरु होताच, पण त्याचवेळी सैन्यात असलेल्या आपल्या वडिलांना त्यांच्या आज्ञांपलीकडे पहाण्यासाठी राजी करण्यासाठीही संघर्ष सुरु होता.

पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या आणि पुढील पाच वर्षांसाठी त्यांनी आर्मी इन्स्टीट्यूट ऑफ लॉमधून त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. भविष्यात सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या त्यांनी घेतलेल्या निर्णयाची बीजंही या पाच वर्षांतच रोवली गेली होती. याच काळात ह्युमन राईटस् लॉ नेटवर्क बरोबर वकील असलेल्या पारुल शर्मा यांच्या हाताखाली काम करण्याच्या अनुभवानेही त्यांच्यावर मोठा प्रभाव पाडला.. “ त्यांच्याबरोबर काही महिने केलेल्या कामा दरम्यान मी विविध मानवी हक्कांच्या प्रश्नांवर काम केले आणि माझ्या लक्षात आले की खऱ्या आयुष्यातील प्रश्न सोडविण्यातच मला सर्वाधिक आनंद मिळत आहे. जेंव्हा विद्यापीठाने मला मानवी हक्क कायदा या विषयात स्पेशलायझेशन करण्याची परवानगी नाकारली, तो माझ्या आयुष्यातील निर्णायक क्षण होता. पण इतर कोणी हा महत्वाचा कायदा शिकण्यास उत्सुक नाही, या एकाच कारणासाठी मी माझा विचार बदलण्यास मुळीच तयार झाले नाही,”त्या सांगतात.

अचानकपणे त्यांना कोणीच मार्गदर्शकच उरला नाही. त्यावेळी त्यांना अशा एका व्यवस्थेशी लढावे लागले, जी त्यांना कोणतीही मदत करत नव्हती आणि त्यांना पूर्णपणे एकटेच सोडण्यात आले होते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी हे एक आव्हान होते. त्यांचा ठामपणा पाहून अखेर त्यांना समजाविण्यासाठी म्हणून विद्यापीठाने त्यांच्या वडिलांनाच चंदीगढ येथे बोलावून घेतले होते.

“ ती अशी वेळ होती, जेंव्हा मी माझ्या आयुष्याचे लगाम काही प्रमाणात तरी स्वतःच्या हाती घेण्यास सुरुवात केली होती. मी जगात काहीतरी बदल घडवून आणू शकेन, असा विश्वास मला मनापासून वाटत होता आणि नेमक्या अशाच वेळी तुम्ही अगदी एकटे आहात, हे ऐकणे काही फारसे चांगले नसते,” त्या सांगतात.

त्यामुळे मग त्यांनी पुढील दोन वर्षे एक अशी विद्यार्थिनी म्हणून घालविली जी विद्यापीठाच्या हजेरीपटावर नव्हती. या काळात त्यांनी उत्तरेकडील प्रदेशात प्रवास केला. लेखक, समाजिक कार्यकर्ते, छायाचित्रकारांच्या भेटी घेतल्या आणि स्वतःच स्वतःला मानवी हक्क कायदा शिकविला. “ स्वतंत्रपणे घालविलेल्या त्या दोन वर्षांत माझ्या जाणीवा रुंदावल्या. विशेष करुन, तरुण महिलांना चांगल्या प्रभावाची असलेली आवश्यकता माझ्या लक्षात आली. त्याचबरोबर त्यांना इतरांबरोबर बोलण्यासाठी सुरक्षित जागांची आणि स्वातंत्र्यांची भावनेची गरजही मला प्रकर्षाने जाणवली,” त्या सांगतात.

या काळात त्यांना खरा आधार मिळाला तो त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींकडून आणि त्या दिवसांत भेटलेल्या काही अतिशय चांगल्या लोकांकडून.... पुढे मेघा यांनी बंगळुरु येथील एनएलएसआययु मधून मानवी हक्क या विषयातील आपले पदव्युत्तर शिक्षण (एलएलएम) पूर्ण केले. तर त्यानंतरची दोन वर्षे त्यांनी खर्ची केली ती आयुष्याबरोबर आपल्याला काय करायचे नाही, यावर विचार करण्यासाठी...

आयुष्यातील पर्याय

“ माझ्या व्यक्तित्वासह मी माझा स्वतःचा अंतराळही शोधत होते. उदाहरणच द्यायचे झाले तर गोंदवून घेणे ही इतरांसाठी मोठी गोष्ट होती,  माझ्यासाठी मात्र ही माझ्या आयुष्यातील पर्यायांवर भाष्य करणारी एक महत्वपूर्ण गोष्ट राहिली आहे,” त्या सांगतात. 

मात्र आजही त्यांनी निवडलेल्या मार्गाबाबत कुटुंबियांना पूर्णपणे राजी करण्यात त्यांना यश आलेले नाही. “ मला वाटत नाही की मी घरचा हा प्रश्न कधीच सोडवू शकेन आणि जरी त्यांना माझ्या यशाचा अभिमान वाटत असला, तरी ते नेहमीच मी चालत असलेल्या मार्गाबाबत कुंपणावरच रहातील. हीच बाब खरं तर मी जेंव्हा तरुण लोकांबरोबर त्यांच्या आयुष्यातील निवडींबाबत बोलते तेंव्हा माझी बाजू मजबूत करते,”त्या सांगतात.

सामाजिक बदलांसाठी मेघाचे असलेले प्रेम आणि त्यातील रस हा मात्र त्यांच्या कुटुंबाकडूनच त्यांना मिळालेली देन आहे. कामानिमित्त राहिलेल्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे दोन्ही पालक तेथील कल्याणकारी उपक्रमांमध्ये नेहमीच सहभागी असत. “ मला आठवते की माझे वाढदिवस हे मित्रमैत्रिणींबरोबर साजरे न होता, वीरपत्नींबरोबर किंवा आर्मीने चालविलेल्या अंपंग मुलांसाठीच्या आशा शाळांमध्येच साजरे केले जात,” त्या सांगतात.

व्यवसायाची निवड

२०१० मध्ये त्यांनी नॅसकॉम फाऊंडेशनमध्ये पूर्णवेळ कामाला सुरुवात केली आणि पुढील साडे तीन वर्षे तेथे काम केले आणि विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यानंतर फाऊंडेशनचे काम बंगळुरुमध्ये सुरु करण्यासाठी म्हणून त्या बंगळुरुला गेल्या आणि दक्षिणेकडील प्रदेशाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. “ माझ्या कंफर्ट झोनमधून मी बाहेर पडले. संस्थासाठी नातेसंबंध प्रस्थापित करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे धोरणात्मक कामाला सुरुवात करण्याचे काम मी केले.” त्या सांगतात. ब्रेट सेजविक यांच्या मार्गदर्शनाखाली कामाचा आनंद घेण्यास आणि त्याचबरोबर स्वतःच्या क्षमतांवर संशय न घेता जबाबदाऱ्या स्वीकारण्याची कला त्या शिकल्या.

image


२०१३ मध्ये त्या रॉकफेलर फाऊंडेशन सोशल इनोव्हेशन फेलोशीपमध्ये सहभागी झाल्या आणि वर्षभर त्यांनी जगभरातील सतरा सोशल इनोव्हेटर्सबरोबर प्रवास केला. या त्यांच्या प्रवासातून त्यांचा विश्वास आणखी बुलंद केला की, “ सामाजिक परिणाम साधणाऱ्या कामासाठी अधिकाधिक तरुणांनी चळवळीत येण्याची आणि त्याचबरोबर जग बदलण्यासाठी व्यवस्थेतच रहाण्याची गरज आहे.”

हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना जाणविले की त्यांना विविध संस्थांबरोबर काम करायची इच्छा होती आणि त्यामुळे त्यांनी फ्रीलान्स कन्सल्टींगला सुरुवात केली. “ तंत्रज्ञानाच्या साधनांमुळे तरुण महिलांचा सामाजिक समस्यांकडे पहाण्याचा दृष्टीकोन कसा बदलला आहे, ते मी पाहिले आहे,” त्या सांगतात.

प्रेरणा

“ माझ्या कामातून साधला जाणारा परिणाम हा माझ्यासाठी सर्वाधिक प्रेरणा देणारा घटक आहे. एखाद्या तरुण आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम हे माझ्या हृदयाच्या सर्वाधिक जवळ आहे. जर मी माझ्या आसपासच्या एका तरुण स्त्रीला जरी प्रेरणा देऊ शकले, तरी मी मला स्वतःलाही प्रेरणा देणारे काम करत आहे, हे निश्चित आणि त्यातूनच मला माझे हे काम सुरुच ठेवण्याची ताकद मिळते,” त्या सांगतात.

मेघा यांच्या मते, भारतीय स्त्रियांना त्यांचे स्वतःचे अवकाश मिळण्यासाठी आवश्यकता आहे ते तीन मोठे बदल होण्याची. “ पहिला म्हणजे, स्त्रीच्या आयुष्यातील सामाजिक निर्णयः आपल्या समाजात आजही मोठ्या संख्येने अशा स्त्रिया आहेत, ज्यांना शिक्षण, कारकिर्द, नोकरी किंवा लग्न यांसारख्या विषयावर स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र नाही. दुसरे म्हणजे, योग्य पर्यायांची माहितीच नसणेः आज जग जरी खूपच जवळ आले असले आणि एकमेकांशी जोडले गेलेले असले, तरी भारतातील शहरे आणि ग्रामीण भागातील तरुण मुलींसाठी फारसे काहीच बदलले नाही. तरुण मुलींना त्यांच्या आयुष्यात असलेल्या विविध पर्यायांची माहिती मिळणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर विविध पर्यायांवर लहान वयातच काम करण्याचा अनुभवही मिळाला हवा आणि आपण आज जरी हे म्हणत असलो की, शहरांतील मुलींना अधिक पर्याय उपलब्ध आहेत, तरी आजही हे खूपच मर्यादीत आहेत,” त्या सांगतात.

तर मेघा यांच्या मते तिसरी आणि सर्वात मोठी गोष्टी म्हणजे आदर्शांबरोबर भेटीची संधी, “ तरुण मुलींना योग्य वयात उच्च गुणवत्तेच्या आदर्शांबरोबर भेट मिळू शकत नाही ज्यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळू शकते आणि योग्य ती निवड करता येऊ शकते,” त्या सांगतात.

त्याचबरोबर समाजातील इतर घटकही त्यांच्या मते महत्वाची भूमिका करु शकतात. “ मुलींसाठी खास शिष्यवृत्ती योजना सुरु करणे, शाळांमध्ये लॅब्सची उभारणी करणे आणि मार्गदर्शक म्हणून सहाय्य देणे, यांसारख्या मार्गांनी तरुण महिला उद्योजिकांना इतर उद्योजक मदत करु शकतात,” त्या सांगतात.

त्या पुढे हेदेखील सांगतात की जेंव्हा स्त्रिया बाहेर पडतील आणि सार्वजनिक क्षेत्रात स्थान निर्माण करतील, शहरातील इतर तरुण स्त्रियांबरोबर जोडल्या जातील आणि आसपासच्या तरुण स्त्रियांना एकजूटीचा एक मजबूत संदेश आणि सतत पाठींबा देतील, तेंव्हा सुरक्षा आणि पावित्र्य यांसारख्या मुद्द्यांना आपोआप उत्तर मिळेल.

पुढे जात, त्या म्हणतात की तरुण मुलींना सातत्याने मार्गदर्शन आणि आदर्श व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. “ प्रत्येक यशस्वी महिला इतर तरुण स्त्रियांच्या आयुष्यावर प्रभाव पाडू शकली आणि त्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन देऊ शकली, तर त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलू शकते,” त्या सांगतात.

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

एकट्यानेच सुरुवात करून शिक्षणाचे सखोल ज्ञान वाटण्याच्या प्रयत्नात ‘विद्या’!

अफगाणिस्तानात युद्धग्रस्त क्षेत्रातल्या युवकांना सोशल मीडिया व इंटरनेटद्वारे जोडणारी ‘इलिन ग्युओ’

अपयशानं खचलो नाही तर नवीन यशस्वी मार्ग शोधला – दीपक सिंग बोनल

लेखक – तन्वी दुबे

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags