संपादने
Marathi

'एम-इंडिकेटर'द्वारे मुंबईकरांच्या घरोघरी पोहोचलेले सचिन टेके

Ranjita Parab
2nd Feb 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते ती रेल्वे. या रेल्वेतून दिवसाला लाखो लोक प्रवास करत असतात. कामाच्या वेळेस ठराविक लोकल पकडणे, हा जवळपास प्रत्येक मुंबईकराच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो आणि त्यात जर काही कारणास्तव लोकलचा खोळंबा झाला तर रेल्वे वेळापत्रकाप्रमाणे मुंबईकराची दिनचर्यादेखील कोलमडून जाते. मुंबईकरांच्या याच अहोरात्र चालणाऱ्या जीवनशैलीचा सचिन टेके एक भाग होते. कामानिमित्त नेरुळ ते अंधेरी असा प्रवास करावा लागणाऱ्या सचिन यांना सुरुवातीच्या काळात लोकलच्या अशा अनेक त्रासांना सामोरे जावे लागले. लोकलची वेळ ठाऊक नसणे, लोकलमधील गर्दीची कल्पना नसणे, कोणत्या स्थानकावरुन लोकल आली आहे तसेच कोणती लोकल स्थानकावर येणार आहे, अशा नानाविध प्रश्नांनी सचिन यांना पछाडले होते. 'गरज ही शोधाची जननी आहे', या उक्तीप्रमाणे सचिन यांच्या लोकलच्या वेळापत्रकाच्या गरजेतूनच 'एम-इंडिकेटर' या एप्लिकेशनचा शोध लागला, ज्याद्वारे सचिन आज कोट्यवधी मुंबईकरांच्या घरी पोहोचले आहेत. सचिन टेके हे 'मोबॉण्ड्स सॉफ्टवेयर कन्सल्टंसी सर्व्हिसेस' कंपनीचे संस्थापक असून, तेथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी 'एम-इंडिकेटर' हे एप्लिकेशन अद्ययावत करण्याचे काम करत असतात. सध्या 'एम-इंडिकेटर'चे कोट्यवधी वापरकर्ते असल्याचे सचिन अभिमानाने सांगतात.


image


महाविद्यालयीन काळात तसेच नोकरी करण्यासाठी सचिन यांना नेरुळ ते अंधेरी असा द्राविडीप्राणायम पद्धतीचा प्रवास करावा लागत असे. लोकल, बस, रिक्षा यांच्या साथीने सचिन यांचा हा प्रवास सुरू होता. मात्र या प्रवासात त्यांचा अडीच ते तीन तासांपेक्षा अधिक कालावधी जात असे. त्यापैकी बहुतांशी वेळ हा गाड्यांच्या वेळापत्रकाची कल्पना नसल्याने त्यांची वाट पाहण्यात जात असे. तेव्हा सचिन यांनी वाहतुकींच्या या विविध मार्गांचा अभ्यास करुन 'एम-इंडिकेटर' हे एप्लिकेशन सुरू केले. सुरुवातीच्या काळात सचिन यांनी हे एप्लिकेशन जावा बेसवर सुरू केले. मात्र कालांतराने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे जवळपास प्रत्येक मुंबईकरांच्या हाती स्मार्टफोन्स आले आणि त्या स्मार्टफोन्समध्ये मुंबईतील वाहतूक साधनांची इत्यंभूत माहिती देणारे स्मार्ट एप ते म्हणजे 'एम-इंडिकेटर'. जावा व्हर्जननंतर सचिन यांनी एण्ड्रॉईड बेस या सॉफ्टवेयरची निर्मिती केली.


image


शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सचिन यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. यामुळेच त्यांना या अभिनव कल्पनेला मूर्त स्वरुप देण्याची प्रेरणा मिळाली. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे संपर्कमाध्यमात झालेल्या क्रांतीचा फायदा उचलत सचिन यांनी अशा एप्लिकेशनची निर्मिती केली, ज्याच्या एका क्लिकवर मुंबईतील वाहतुकीची इत्यंभूत माहिती मोबाईलवर उपलब्ध होऊ लागली. काही वर्षांपूर्वी केवळ अशक्य वाटणारी एक संकल्पना सचिन यांनी दोन वर्षांची मेहनत करुन सत्यात उतरवली. एम-इंडिकेटरची निर्मिती करत असताना सचिन हे नोकिया येथे नोकरी करत होते. सकाळी नोकरी, त्यानंतर एमबीएचे कॉलेज अशा भरगच्च दिनक्रमानंतर रात्री तीन वाजेपर्यंत सचिन एम-इंडिकेटरच्या निर्मितीवर काम करत होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी आपल्या घरातल्यांना त्यांच्या या संशोधनाचा थांगपत्ताही लागू दिला नव्हता. मात्र जेव्हा त्यांना ही दगदग सहन होईनाशी झाली, तेव्हा त्यांनी घरातल्यांशी चर्चा करुन आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःला पूर्णवेळ या एप्लिकेशन निर्मितीकरिता वाहून घेतले. २००९ ते २०११ या काळात अथक मेहनत घेऊन सचिन यांनी अखेरीस 'एम-इंडिकेटर' बाजारात लॉंच केले. हे एप्लिकेशन पहिल्या दिवसापासून लोकलशी आपुलकीचे नाते असलेल्या मुंबईकराच्या गळ्यातील ताईत बनले. त्याकाळी लोकलच्या वेळेची माहिती देणारी पुस्तिका बाजारात उपलब्ध होती, मात्र गर्दीच्या वेळेस ती काढून वाचणे तसेच त्यातील माहिती पाहणे जवळपास अशक्य होते. त्यामुळे त्या परिस्थितीत 'एम-इंडिकेटर' हाच सर्वोत्तम पर्याय होता.

सुरुवातीला सचिन यांनी या एप्लिकेशनमध्ये फक्त रेल्वे वेळापत्रकाचा समावेश केला. मात्र त्यांच्या स्पर्धेत अजून एक कंपनी असून, तीदेखील असेच काम करत असल्याचे सचिन यांच्या लक्षात आले. तेव्हा आपण ग्राहकांना तसेच वापरकर्त्यांना या एप्लिकेशनमध्ये अजून काय देऊ शकतो, याचा विचार सचिन करू लागले. त्यानंतर सचिन यांनी जीवाचे रान करुन आपल्या या एप्लिकेशनमध्ये रिक्षा, टॅक्सी यांचे दर, मेगाब्लॉक आणि इतर माहिती प्रकाशित केली. या एप्लिकेशनची जाहिरात तसेच विपणनाकरिता सचिन यांनी वेगळीच कल्पना राबवली. हे एप्लिकेशन तयार झाल्यानंतर सचिन यांनी एका संकेतस्थळावर त्याची लिंक प्रकाशित केली आणि विशेष म्हणजे अल्पावधीतच या एप्लिकेशनला लोकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. मुंबईप्रमाणेच पुणे आणि इतर शहरांमध्ये एम-इंडिकेटर हे एप्लिकेशन सुरू करण्याचा सचिन यांचा मानस आहे. त्याबाबतीत बोलताना सचिन सांगतात की, 'प्रत्येक शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणी या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. स्थानिकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे जोपर्य़ंत तुम्ही स्वतः अनुभवत नाही, तोपर्यंत कदाचित तुम्हाला त्या गोष्टींची जाणीवदेखील होणार नाही. जेव्हा मला एखाद्या शहराच्या वाहतूक व्यवस्थेबाबत एप्लिकेशन तयार करायचे असते, तेव्हा मी स्वतः त्या शहराला भेट देतो. तेथील वाहनांमधुन प्रवास करतो, त्यांचा अभ्यास करतो तसेच माझ्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करतो. विविध शहरांना भेट देऊन आम्ही स्वतः या एप्लिकेशनकरिता डाटा गोळा करत असतो.', असे सचिन सांगतात.

image


सचिन यांनी निर्मिती केलेल्या 'एम-इंडिकेटर'मध्ये सध्या रेल्वे, बस, लांब पल्ल्याच्या गाड्या, मेट्रो, मोनो, टॅक्सी, रिक्षा आणि फेरी या वाहतुकीच्या साधनांची माहिती दिली जाते. याशिवाय आता गर्दी नसलेल्या गाड्यांचीदेखील माहिती या एप्लिकेशनमध्ये दाखवण्यात येणार आहे. या एप्लिकेशनमध्ये 'ट्रेन चॅट' नावाचा एक पर्याय उपलब्ध असून, लोकलबद्दल प्रवासी तेथे माहिती देऊ शकतात. मात्र या सर्वांवरदेखील सचिन यांचे नियंत्रण आहे. या एप्लिकेशनमध्ये कोणताही आक्षेपार्ह शब्द टाकता येत नाही. शिवाय या एप्लिकेशनमध्ये पिकनिक स्थळांची माहिती, मनोरंजनाकरिता नाटक, सिनेमा यांची माहिती तसेच अत्यावश्यक असलेले संपर्क क्रमांक, स्थावर संपत्ती यांसारखी विविधांगी माहिती पुरवण्यात आली आहे. 'एम-इंडिकेटर' सुरू केल्यानंतर सचिन यांनी तरुणांना रोजगार पुरवण्यासाठी जॉब-इंडिकेटरची देखील सुरुवात केली होती. याशिवाय महिला सुरक्षेकरिता 'एम-इंडिकेटर'मध्ये एक सिक्युरीटीचा पर्यायदेखील आहे.


image


भारतातील सार्वजनिक वाहतुकीच्या भविष्याबद्दल सचिन सांगतात की, 'भारताच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत झपाट्याने प्रगती होत आहे. सरकारने 'स्मार्ट सिटी' प्रकल्पांची घोषणा केली असून, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुधारल्याशिवाय हे प्रकल्प यशस्वी होणे शक्य नाही. मोबाईल तिकिटींग, बसेसचे जीपीएस ट्रॅकिंग, वाहनतळ आरक्षण यांसारखी नवी तंत्रज्ञाने ही भारतीय प्रवाशांच्या आधुनिक जीवनशैलीचा एक भाग आहेत. दिल्ली सरकारच्या सम-विषम फॉर्म्युल्यामुळे खासगी वाहनांचा वापरदेखील कमी होत असून, सार्वजनिक वाहनांचा वापर वाढत आहे. भारतातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे भविष्य वर्तवण्यासाठी हे एक उदाहरण पुरेसे आहे.' मोबाईलमध्ये सार्वजनिक वाहतुकीची माहिती देण्याचा सचिन यांचा 'एम-इंडिकेटर्स'चा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. याबाबत सचिन अधिक सांगतात की, 'सार्वजनिक वाहतुक व्यवस्था हा बराच क्लिष्ट विषय आहे. बऱ्याचदा काही कारणास्तव या वाहनांची वेळदेखील बदलत असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सर्वच साधने किंवा सुविधा स्वतंत्र असल्याने, त्यांना एकत्रित जोडून ठेवणाऱ्या दुव्याची किंवा समन्वयकाची गरज आहे. हा समन्वयकच या सर्व वाहतूक साधनांची माहिती गोळा करेल आणि सहजसोप्या पद्धतीने वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल. मग आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात या कामाकरिता मोबाईल एप्लिकेशनपेक्षा सर्वोत्तम पर्याय कोणता वेगळा असू शकतो का?'

'सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची लोकांना नेहमीच गरज असते. त्यामुळे जर एकाच एप्लिकेशनमध्ये वापरकर्त्यांना टॅक्सी आरक्षित करता येत असेल, जेवणाची ऑर्डर देता येत असेल किंवा पुस्तके, कार्यक्रमाची तिकिटे खरेदी करता येत असतील तसेच विविध सामानाची खरेदी करता येत असेल आणि त्याच एप्लिकेशनमध्ये जर त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची इत्यंभूत माहिती मिळत असेल तर? आम्ही या सर्व सोयी सुविधांच्या समूहाचे समूहक आहोत. याशिवाय आम्ही आमच्या वैयक्तिक उत्पादनांची सेवादेखील वापरकर्त्यांना पुरवतो.', असे आपल्या व्यवसायाबद्दल सचिन अभिमानाने सांगतात. 'एम-इंडिकेटर' हे इतर सार्वजनिक वाहतूक एप्लिकेशनपेक्षा वेगळे असल्याचे सांगताना सचिन म्हणतात की, 'भारतात २०१० सालापासून या क्षेत्रात सुरू झालेल्या संशोधनाच्या क्षेत्रातील आम्ही आद्यसंशोधक आहोत. इतरांपेक्षा आम्ही वापरकर्त्यांच्या आणि या क्षेत्राच्या गरजा अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतो. इतर लोक हे आमचे अनुकरण करतात, याचाच अर्थ असा होतो की आम्ही यशस्वी झालो आहोत. आम्ही सतत नवनव्या आणि अभिनव फिचर्ससोबत बाजारात दाखल होत असतो. यामुळेच गेल्या सहा वर्षांपासून आमचे वेगळेपण सिद्ध होते आणि आम्ही कायमच या स्पर्धेमध्ये अव्वल राहणार.' भविष्यातील आपल्या योजनांबद्दल सचिन सांगतात की, 'आमची स्वप्ने, ध्येय फार मोठी आणि भव्य आहेत. आम्हाला 'एम-इंडिकेटर' हे प्रवास किंवा दळण-वळण याला समानार्थी शब्दाप्रमाणे विकसित करायचे आहे.' आजच्या युवा पिढीला सल्ला देताना सचिन सांगतात की, 'स्वप्ने पहा आणि ती सत्यात उतरवण्यासाठी मेहनत करा. समाजाला ज्या गोष्टींची गरज आहे, त्या विषयावर काम करा.'

image


Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags