संपादने
Marathi

जीवन-मरणाच्या अनुभवातही रुग्णालयाच्या तळघरात चालतो मानवतेच्या सेवेसाठी ‘संयोग ट्रस्ट’चा ‘सावली विश्रामधाम’ उपक्रम!

kishor apte
4th Feb 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

मुंबईच्या परळ भागातील केईएम रुग्णालयाच्या परिसरात नेहमीच गजबज पहायला मिळते. या रुग्णालयाच्या परिसरात टाटा कर्करोग रुग्णालय, वाडीया रुग्णालय देखील आहे. येथे दिवसाच्या चोवीस तासात केंव्हाही अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना आणले जाते आणि त्यांच्या उपचारांसाठी प्रयत्न केले जातात. या रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक देखील असतात आणि मुख्यत: ते सारेच कनिष्ठ आर्थिक उत्पन्न गटातील नागरीक असतात किंवा मध्यमवर्गीय असतात. त्यांना महागडे उपचार परवडत नाहीत, त्यामुळे ते येथे येतात. अशा रुग्णाईतांच्यासाठी आलेल्या नातेवाईकांना केवळ तीस रुपये प्रतिदिन शुल्क आकारून केईएम रुग्णालयाच्या तळघरात राहण्याची सोय करणारी संयोग ट्रस्ट संचालित सावली विश्रामधाम ही सुविधा गेली अनेक वर्ष उपलब्ध आहे. अनेक दानशूर दाते आणि संस्थांच्या मदतीने माजी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निवारा देण्याचे काम केले जाते.

image


परळचे केईएम रुग्णालय म्हणजे ‘किंग एडवर्ड स्मृती रुग्णालय’ असे याचे नांव पण या परिसरात चाळीस वर्षापूर्वी ‘अरुणा शानभाग प्रकरण’ घडले आणि हे रुग्णालय गेली अनेक वर्षेपर्यंत तिच्या यातनामय स्मृती घेऊन आजही एक नकारात्मक ओळख घेऊन सुरू आहे. ज्या परिसरात अरुणावर हल्ला झाला त्या रुग्णालयाच्या तळघरात माणुसकीच्या ओलाव्याचा परिचय देणारा काही उपक्रम सुरू असेल याची आपणाला कल्पनाही येणार नाही. पण डॉ रवी बापट आणि अश्याच असंख्यांच्या सह्रदयतेने या नव्या उपक्रमाचा लाभ अक्षरश: हजारो रुग्णाईतांच्या नातेवाईकांना होत आहे, ते ही ‘सारे जहा से अच्छा’ असलेल्या देशभरातील सर्वजाती समुदायांच्या लोकांना, हे विशेष!

image


इतकेच नाहीतर संयोग ट्रस्ट च्या विद्यमाने रुग्णालयात गणवेश, फाईल्सचे वाटप. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बाग-बगीच्यांना मदत, परिचारिकांच्या सुविधेसाठी व्यवस्था, रुग्णांच्या सेवेसाठी स्ट्रेचर्स उपकरणे दान, महागड्या औषधांचे रास्त दरात वितरण अश्या लोकोपयोगी कार्याचे नियमितपणाने संचालन केले जाते. रुग्णालयाच्या सीवीटिसी इमारतीच्या तळघरात माणूसकीची नवी ओळख देणा-या या परिसरात कधी अरुणा सारख्या भयावह जीवन कहाणीचा अंत झाला असेल असे लक्षात येणार नाही असे हे कार्य आहे.

या परिसरातील दुर्धर आजाराचे रुग्ण म्हणजे हा परिसर नेहमीच चिंता काळजी आणि जीवन-मरणातील अंतराचा खेळ अनुभवणारा आहे. किती लाखो जीवांनी इथे अखेरचा श्वास सोडला असेल तरी कित्येकांना नव्या जीवनाचा मार्गही इथेच गवसला आहे. त्यासाठी महापालिकेच्या या रुग्णालयातील डॉक्टर्स-परिचारीकांचा सदैव आटापिटा सुरू असतो. संयोग ट्रस्टच्या या कार्याबाबतची माहिती ट्रस्टच्या कार्यालयातून देणा-या कर्मचा-यांना यात आपण काही वेगळे विशेष करतो आहोत याचा सुतराम गंधही नसल्याचे जाणवते. काहीतरी काम करावे तश्या प्रकारचे काम सुरु असल्याचा त्यांचा दृष्टीकोन पहायला मिळतो.

‘युवर स्टोरी’ने या परिसरात जाऊन माहिती घेतली असता तेथील कर्मचा-यांनी सांगितले की, दोन पाळ्यांमध्ये सहा कर्मचारी हा विश्रामगृहाचा कारभार पाहतात. त्यावर ट्रस्टींची देखभाल असते. पाचशे रुपये अनामत भरल्यानंतर रुग्णांना झोपण्यासाठी एक पलंग, गादी, चादर, उशी दिली जाते. मौल्यवान वस्तूसाठी लॉकरची सुविधा असते. अंघोळीची व्यवस्था केली जाते. जितके दिवस रुग्णांचा मुक्काम असेल तितके दिवस नातेवाईंकांना राहता येते मात्र त्यासाठी रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून एक अर्ज भरुन आणायला सांगितले जाते. त्यानंतर माणशी तीस रुपये प्रतिदिन घेउन ही सेवा दिली जाते. महिलांसाठी मंगलाबाई भागवत दालनात वेगळी व्यवस्था केली जाते. रुग्णांच्या नातेवाईकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शन संच, मासिके, ध्वनीफिती सार्वजनिक दूरध्वनी सेवा देखील उपलब्ध केल्या जातात. या ठिकाणी मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात मधून मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होतात तरी देशाच्या कानाकोप-यातून येणा-या दुखणाईतांच्या नातेवाईंकासाठी ‘सावली’ म्हणजे घराबाहेरचे दुसरे घर आणि ते ही कठीण प्रसंगात आसरा देणारे ठरले आहे.

image


२२डिसेंबर १९९२ रोजी हा उपक्रम सुरू झाला. एकावेळी ७५ रुग्णांच्या नातेवाईकंच्या राहण्याची सोय येथे होऊ शकते.सुरुवातीला २५ नातेवाईकांची सोय करण्यापासून हे कार्य आता शंभरच्या आसपास रुग्णांना निवारा देण्यापर्यंत पोहोचले आहे. अगदी शेजारील देश पाकिस्तान-बांगलादेशातील रुग्णांच्या नातेवाईकांना या ‘सावली’ मध्ये आश्रय मिळाला आहे. 

विशेष म्हणजे रुग्णालयाच्या आवारातील संयोग गणेश मंदिरात ठेवण्यात आलेल्या दान पेटीतील रकमेचाही या सेवेसाठी उपयोग केला जातो. सर्व्धार्मियांच्या या उपक्रमात हा आणखी एक आगळेपणा पहायला मिळतो. संस्थेच्या लोकोपयोगी कामासाठी अनेक दाते सढळ हाताने नेहमीच मदत करत असतात त्यासाठी देणग्यांना आयकरातून सुट देणा-या ८०जी या कलमाचा आधार घेतला जातो.


image


गेल्या २५-३० वर्षांच्या या उपक्रमात अनेक लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक डॉक्टरांचा मोलाचा सहभाग आहे. सध्या याच सावली केंद्रात आठवड्यातून एक दिवस रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना योगाचे मोफत प्रशिक्षण डॉ पाठक यांच्या मार्फत दिले जाते. ज्यातून मानवतेची निरलस सेवा केली जाईल आणि जन्म मरणाच्या या फे-यातून जाणा-यांना काही क्षण का होईना घराबाहेर असतानाही आपलेपणा आणि जीवनातील माणूसपणाचा परिचय होईल असाच हा लोकोपयोगी उपक्रम आहे. गरजूंना ट्रस्टच्या कार्यालयात २४१८२१७४ आणि २४१८९३७४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येतो.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा