संपादने
Marathi

कॉर्पोरेट कारकीर्द सोडून शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवण्यास झटणारा अभियंता 'मधूकर बानुरी'

Team YS Marathi
23rd Feb 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on


“२०६० पर्यंत देशातल्या प्रत्येक मुलाला उत्तम शिक्षण मिळेल असा भारत घडवण्याचं माझं ध्येय आहे. दिवसाचा प्रत्येक प्रहर, माझे विचार, माझ्या कृती मुलांच्या सर्वांगीण विकास आणि शिक्षणाकरताच झटत आहेत. प्रत्येक मुलाला सर्वोत्तम शिक्षण मिळण्याचा एक समान अधिकार आहे. या प्रक्रियेकरता शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमता विकसित करणं गरजेचं आहे. संस्थाचालकांनी आपल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने पावलं उचलली पाहिजेत. या सर्व प्रक्रियेत पालकांचा सहभागही खूप महत्त्वाचा आहे. उत्तम शिक्षण आणि मूल्यसंस्कार अभ्यासक्रम राबवून सुदृढ नागरिक बनवण्याकरता सरकारकडून अतिशय पारदर्शी गुंतवणूक या क्षेत्रात झाली पाहिजे.”

मधूकर बानुरी आपलं ध्येय आणि स्वप्न इतक्या रोखठोकपणे व्यक्त करतात.


image


गेली सात वर्ष ते याच स्वप्नांसाठी आणि ध्येयाकरता झटत आहेत. २९ वर्षीय मधुकर यांनी बिट्स पिलानीमधून आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. एल अँड टी मध्ये नोकरी करत असताना अचानक त्यांना टिच फॉर इंडिया (टीएफआय) या संस्थेबद्दल माहिती मिळाली. त्यांना या संस्थेच्या कामात रस निर्माण झाला. टीएफआयला फेलोजची आवश्यकता असल्याची जाहिरात बघितल्यावर त्यांनी नोकरीला सरळ रामराम ठोकला. आणि आपला तंबू टीएफआयमध्ये ठोकला. फेलोशीप झाल्यावर ते तिथेच प्रोग्राम मॅनेजर म्हणून रुजू झाले. सध्या ते पुणे सिटी कनेक्ट (पीसीसी)चं कार्यक्रम प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. कोणत्याही यंत्रणेत बदल घडवण्याकरता एक-एकटं काम न करता सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन काम केल्यास त्याचा प्रभाव आणि परिणाम चांगला होतो. या विचाराने मधुकर यांनी पीसीसीमध्ये सर्व भागधारकांना एकत्रित आणून काम सुरू केलं आहे.

परिवर्तनाच्या दिशेने

मधूकर बानुरी

मधूकर बानुरी२००९ मध्ये मधुकर एल अँड टीच्या मुंबई ऑफिसमध्ये नोकरीस होते. या दरम्यान एका जाहिरातीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्या जाहिरातीत तरूण भारतीयांना देश घडवण्याच्या कामात सामील होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. जाहिरात पाहून मधुकर झपाटून गेले. त्यांनी आपला विचार पक्का केला आणि सरळ या मोहिमेत सामील झाले.

आयुष्य आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं. विमानांचं हवेतलं अंतर, विक्री, नफ्याचं गुणोत्तर या सगळ्यातून बाहेर पडून ते आता विद्यार्थ्यांना विमानाच्या जडणघडणाची माहिती देऊ लागले, भूमिती, बीजगणित शिकवू लागले. विद्यार्थ्यांच्या गोष्टी ऐकू लागले. त्यांच्या शंका सोडवू लागले. या प्रवासात त्यांच्यातही अनेक बदल होत होते. स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातही बदल होऊ लागले.

या सर्व गोष्टी करताना स्वतःला या साच्यात बसवणं सोपं नक्कीच नव्हतं. या सगळ्या बदलांना समजून घेऊन त्याप्रमाणे स्वतःला तयार करताना, त्यांना कौटुंबिक पातळीवर एका वेगळ्या गोष्टीला तोंड द्यावं लागत होतं. हातातली चांगली नोकरी, करिअर सोडून प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याच्या त्यांच्या निर्णयाला कुटुंबाकडून प्रखर विरोध होत होता. त्यांना त्यांच्या मनातल्या गोष्टींबद्दल समजवताना खूप कसरत करावी लागली.

पण मधुकरना आपल्या निर्णयाचा अजिबात पश्चाताप होत नाही. आपल्या काही आठवणी ते सांगतात,

“सुप्रिया आत्मविश्वासाने दोन वाक्य बोलते हे बघताना खूप समाधान मिळतं. झुबैरने आपली तंबाखू चघळण्याची सवय सोडलीय, दर आठवड्याच्या चाचणीत शशांक सतत ९० टक्के गुण मिळवतोय, आपले वडिल वारल्यावर चौथ्या दिवशीच शिवानी स्कॉलरशीपच्या सराव वर्गांना आली. या सर्व घटना माझ्याकरता खूप मौलिक आहेत. ह्या मुलांकडून मला खूप प्रेरणा मिळते”. शिक्षणक्षेत्राबाबत आणखी खोलात जाऊन माहिती घेण्याकरता त्यांनी टिएफआयमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान त्यांनी शिक्षक, विद्यार्थी संघ आणि पुणे पालिकेसोबत काम केलं.

वर्तमानकाळ

टिएफआय नंतर मधुकर शिक्षणक्षेत्रात सांखिकी काम करणाऱ्या एका संस्थेत रुजू झाले. पण या कामामुळे आपल्याला सद्यस्थितीमध्ये काही सुधारणा करता येणार नाही हे लक्षात आलं. मग त्यांनी आपला मोर्चा परत पुण्याकडे वळवला. पूर्वी पुणे एक्शन टास्क फोर्स नावानं ओळखल्या जाणाऱ्या पीसीसीचं काम करायला त्यांनी सुरूवात केली. शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संस्थांची मोट बांधून एक मजबूत संघटन उभारलं.

पीसीसी टीम

पीसीसी टीममधुकर पीसीसीमध्ये कॉर्पोरेटस् सोबत काम करतात. कॉर्पोरेट कंपन्यांना सीएसआरद्वारे (कॉर्पोरेट सोशल रिसबॉन्सिबिलिटी) वेगवेगळ्या सामाजिक कार्यावर काही रक्कम खर्च करणे बंधनकारक आहे. त्यामुळे बरेचसे कॉर्पोरेटस् सार्वजनिक शिक्षणक्षेत्राच्या विकासाकरता वेळ, पैसा आणि मनुष्यबळ खर्च करताना दिसतात. अशा कॉर्पोरेटस्ची माहिती काढणं, त्यांना संस्थेची माहिती देणं, त्यांच्याशी नातं प्रस्थापित करणं, सरकारी हितसंबंध जपणं, सरकारी शाळांमधील क्षमता वाढवण्याकरता सामाजिक संस्थांना पुढाकार घ्यायला लावणं, पुण्यातल्या पालिका शाळांचा दर्जा वाढवणं अशा सर्व कामांची जबाबदारी सध्या मधुकर यांच्यावर आहे.

गेले वर्षभर एक्युमनसोबत सुरू असणाऱ्या फेलोशीपमुळे त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीत चांगली भर पडत आहे. ते म्हणतात, “मी ज्या विविध गटांसोबत, संस्थांसोबत काम केलं, करत आहे त्यांनी माझ्यातल्या नेतृत्वगुणांना वाव दिला. सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करणं हे तितकंसं सोप नाही. वेगवेगळ्या सभासदांसोबत काम करताना रोज नवीन आव्हांनाना तोंड द्याव लागतं”.

सरकारचे प्रयत्न पुरेसे आहेत का?

सरकारच्या भूमिकेबाबत मधुकर म्हणतात, "सरकार नक्कीच आणखी जास्त गोष्टी करू शकतं. सर्व मुलांना शिक्षण मिळण्याकरता जबरदस्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. राज्यातलं राजकीय नेतृत्व आणि शिक्षण यंत्रणांमध्ये तणाव असल्याचं मला नेहमी जाणवतं. नेतृत्वात बदल झाल्यावर मात्र तळागाळातल्या व्यवस्थेत थोडाफार सकारात्मक बदल झाल्याचं दिसून येतं आहे. वरिष्ठ नेत्यांनी ठोस धोरण आखली पाहिजेत आणि ती पूर्ण करायला खात्रीशीर टीम असणे गरजेचे आहे.

image


मधुकर सांगतात, महाराष्ट्रातल्या १० महिन्याच्या वास्तव्याचा, कामाचा, अनुभवाचा देशाच्या इतर भागात काम करताना खूप फायदा होणार आहे. इथल्या शिकवण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल घडवण्यात राज्याच्या शिक्षण खात्यासोबत अधिकारी वर्गाने खूप आटोकाट प्रयत्न केले आहेत. राज्यातल्या बहुतांश शिक्षण योजना या केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने राष्ट्रीय स्तरावर धोरण निर्मितीकरता प्रयत्न करणं आवश्यक आहे. ही धोरणं बनवताना, राबवताना त्यांच्यावर राजकीय, धार्मिक किंवा आर्थिक प्रभाव असता कामा नये.

आव्हानं-

शिक्षणक्षेत्रातल्या अनेक संस्था या अंदाधुंद काम करतात. मधुकर सांगतात, “पुण्यात शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या ४-५ संस्था आहेत. एका अल्प उत्पन्न गटाच्या खाजगी शाळेमध्ये यातल्या तीन संस्था काम करतात आणि त्यांचे चार कार्यक्रम व्यवस्थापकही. या तिन्ही संस्था किंवा या व्यवस्थापकांमध्ये काडीचाही समन्वय अथवा संबंध नाहीये. याचा वाईट परिणाम मात्र शाळेच्या विकासावर होत आहे. कारण नेमकं काय धोरण राबवायचं, कोणाचं ऐकायचं, याबाबत साहजिकच शाळेचा गोंधळ उडतोय. यामुळे या तिन्ही संस्थांचे मनुष्यबळ, श्रम, पैसा आणि वेळ या सगळ्या गोष्टी वाया जात आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कणभरही फायदा होत नाहीये”.

सर्व मुलं शाळेत जाणं आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळणं ही सध्या सर्वात मोठी आव्हानं आहेत. प्राथमिक वर्गापासून ते दहावीपर्यंत मुलांनी शाळेत गेलंच पाहिजे याकडे कटाक्ष असला पाहिजे. मधुकर यांच्या मते, “देशातल्या बऱ्याचशा राज्यात सार्वजनिक शिक्षण पद्धत अतिशय वाईट आहे. राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रित प्रयत्न करून या परिस्थितीत सुधारणा आणणं गरजेच आहे”.


image


खाजगी आणि सार्वजनिक शाळांमध्ये खूप फरक असल्याचं ते सांगतात. दोन्ही वर्गातल्या मुलांना सामावून घेण्याकरता या शाळांची गरज आहेच. पण सरकारने या शाळांमध्ये समान शैक्षणिक धोरण राबवण्याकरता कंबर कसण्याची आवश्यकता आहे. तसंच सरकारने केवळ नैतिक गोष्टींकडे न पाहता शाळेच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे. गेल्या दोन दशकात देशातलं साक्षरतेचं प्रमाण वाढवण्यामध्ये खाजगी शाळांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे विकासाच्या धोरणांत तेही भागीदार असायला हवेत.

image


त्यांच्या स्वप्नातला भारत खरच साकारेल का?

मधुकर म्हणतात, “मी माझा ट्रॅक बदलून आता सात वर्ष झालीत. पण अजूनही माझ्या ध्येयपूर्तीकरता कोणती भूमिका घ्यावी, याबाबत चाचपडत आहे. एक मात्र नक्की माझ्या ध्येयाकरता मी अथक परिश्रम करत राहणार”.

पण या ध्येय-धोरणांचं ओझं पेलणं बऱ्याचदा खूप कठीण जातं. ते सांगतात, “जेव्हा ही वाट अवघड होते. माझे कुटुंब माझे वाटाडे बनून साथ देतात. माझी पत्नी माझी सर्वात मोठी शक्ती आणि प्रेरणा आहे. माझे बाबा तर माझे हिरो आहेत. आयुष्यात कधीतरी मी त्यांच्यासारखं निर्वाज्य प्रेम नक्की करेन”.

मधुकर यांची स्वप्न आकाशाला गवसणी घालणारी आहेत. पण त्यांची ही स्वप्न नक्की पूर्ण होवोत, अशी सदिच्छा आपण व्यक्त करुयात. जेणेकरून भारतातली शिक्षणव्यवस्था मजबूत होईल. पर्यायाने सुदृढ पिढ्या भारताचं नेतृत्व करतील. भारत विकासाचा डोंगर सर करेल.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

पारंपारिक शिक्षण पध्दतीला रामराम

विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेणारे शिक्षकच चांगले विद्यार्थी घडवू शकतात : 'आयटीच'

मॅथ्यूसरांच्या ‘मॅजिक बस’मधून झोपडपट्टीतील मुले ‘कॉर्पोरेट’लालेखिका – स्निग्धा सिन्हा

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags