वयाच्या सेकंड इनिंगमध्ये सुरु केलेली ‘मल्बेरी लाईफस्टाईल’ कंपनी !

वयाच्या सेकंड इनिंगमध्ये सुरु केलेली ‘मल्बेरी लाईफस्टाईल’ कंपनी !

Sunday October 25, 2015,

4 min Read

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार 'कॅप्टन कूल' एम एस ढोणी यांचे गृहनगर असलेले रांची हे शहर ‘मेक इंडिया’ कार्यक्रमात सहभागी होणारे सर्वात अलिकडील शहर आहे. याचे कारण म्हणजे इथे देशातील आकर्षक आणि सर्वोत्तम दर्जाची नेहरू जॅकेट्स बनवली जातात आणि देशाच्या कानाकोप-यात त्यांची विक्री केली जाते. या विस्तारणा-या व्यवसायाच्या मागे ज्या व्यक्तीचा हात आहे त्या व्यक्तीचे नाव आहे आरती पोद्दार. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आरती पोद्दार यांनी आपण उद्योजिका बनायचे हे वयाच्या ६० व्या वर्षी ठरवले.

image


हा उद्योग सुरू करण्याचे धाडस आरती यांना त्यांच्या पतीच्या वारशातून मिळाले. त्यांच्या पतींनी त्यांच्या वयाच्या ७२ व्या वर्षी आपली स्टार्टअप कंपनी सुरू केली. त्यामुळे त्या अतिशय प्रभावित झाल्या होत्या असे आरती सांगतात. म्हणूनच आपणही आपल्या पतीप्रमाणे काहीतरी नवे करावे असे त्यांना वाटत होते. आरती या ‘मल्बेरी लाईफस्टाईल’ च्या मालक आहेत. ही कंपनी रांचीमधून काम करते. ही कंपनी केवळ नेहरू जॅकेट बनवण्याचेच काम करत नाही, तर आपल्या ब्रँडवर त्यांची विक्री सुद्धा करते.

वेगवेगळ्या टीव्हीवरच्या मालिका पाहून आरती यांना नेहरू जॅकेट्स बनवण्याची कल्पना सुचली. जेव्हा जेव्हा आपण टीव्ही समोर बसतो तेव्हा बहुतेक कलाकार हे नेहरू जॅकेट परिधान केलेलेच आढळतात असे त्यांचे म्हणणे आहे. टीव्हीवरील याच मालिका पाहून आरतींना या कामाचे आकर्षण जाणवले. त्यांचे नेहरू जॅकेट हे पूर्णत: एक स्वदेशी उत्पादन आहे. त्यांचा नेहरू जॅकेट निर्मितीचा विचार योग्य होता असे त्यांचे म्हणणे आहे. याचे कारण म्हणजे आज त्यांना देशभरातून जॅकेट बनवण्याच्या ऑर्डर्स येत आहेत.

एक उद्योजिका या नात्याने त्यांनी सुरू केलेल्या प्रवासादरम्यान त्यांना आपल्या व्यवसायाला एक चेहरा प्राप्त होईल असे काहीतरी वेगळे करून दाखवायचे होते. आरती यांनी पटणा महिला कॉलेजमधून इतिहासाची पदवी घेतली होती. यानंतर रांचीमधील एका व्यावसायिकासोबत त्यांचा विवाह झाला. आरती यांचा विवाह संयुक्त कुटुंबात झाला होता. हळूहळू त्यांनी आपल्या पतीच्या स्टीलच्या व्यवसायात मदत करणे सुरू केले. दरम्यानच्या काळात त्यांचा मुलगाही मोठा झाला. त्यांच्या मुलाने खाद्या प्रक्रियेचे युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलाच्या या निर्णयामुळे आपणही काही करावे असा विचार आरती यांच्या मनात उसळ्या मारु लागला. आरती यांच्या मते खरे तर त्यांच्या मुलानेच त्यांना काहीतरी करण्यासाठी प्रेरित केले होते. त्यानंतर एक दिवस रात्रीचे जेवण करत असताना आपल्या कुटुंबियांसमोर त्यांनी एक स्टार्टअप कंपनी सुरू करण्याचा आपला विचार जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या आनंदाने मंजुरी देऊन टाकली. वास्तवात आज त्यांचा छोटा मुलगाच त्यांच्या मार्केटिंगची सगळी जबाबदारी सांभाळतो आहे.

रांचीमध्ये आपला व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांनी खूपच कमी कालावधी घेतला असे आरती यांचे म्हणणे आहे. कारण इथे सुरूवाती पासूनच अशा प्रकारचा उद्योग नव्हताच. त्यांनी आपल्या या उदयोगाची सुरूवात मागील सप्टेंबर महिन्यात केली होती. आणि ऑनलाईन विक्रीचे काम त्यांनी डिसेंबर पासून सुरू केले. या नंतर त्यांना खूपच चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. लोक एकमेकांकडून माहिती घेऊन नेहरू जॅकेट्स खरेदी करू लागले आहेत, इतकी आरती यांच्या या उत्पादनातील पत वाढलेली आहे.

image


आरती आपल्या उत्पादनासाठी बहुतेक सामान दिल्लीहून आणतात. या व्यतिरिक्त लीनिन आणि कापसाच्या कामाशी संबधित असलेल्या मोठ्या कंपन्यांकडूनच त्या कच्चा माल खरेदी करतात. तर सिल्क उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या भागलपूरहूनच त्या सिल्क मागवतात. ‘मल्बेरी लाईफस्टाईल’ या कंपनीत कारागीर मोठ्या संख्येने काम करतात आणि सध्या त्यांचे उत्पादन ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता आरती आपल्या कामाच्या विस्तारासाठी काही किरकोळ स्टोअर्स शोधत आहेत. या व्यतिरिक्त त्या महिला आणि मुलांसाठी नेहरू जॅकेट तयार करण्याचे मार्ग शोधत आहेत. परंतु सध्या तरी त्यांचे लक्ष पुरुषांसाठी नेहरू जॅकेट तयार करण्यावरच केंद्रीत झालेले आहे.

पाच तासांनंतर होणा-या शपथविधी समारंभासाठी नेहरू जॅकेटची आवश्यकता आहे असा फोन मुख्यमंत्री कार्यालयातून जेव्हा आला तेव्हाचा क्षण आरती यांच्यासाठी अभिमानाचा क्षण होता. खरे तर हे फारच आव्हानात्मक असे काम होते. परंतु आपण बनवलेले नेहरू जॅकेट घालून मुख्यमंत्री शपथ घेत आहेत हे जेव्हा त्यांनी पाहिले तो दिवस त्यांच्यासाठी खूपच अभिमानाचा होता. इतकेच नाही, तर आरती यांच्या कुटुंबियांना देखील हा शपथविधी समारंभ पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते असे आरती सांगतात. आरती यांनी मुख्यमंत्र्यांसाठी लाल रंगाचे जॅकेट निवडले होते. हे जॅकेट केवळ आकर्षकच होते असे नाही, तर सकारात्मक देखील होते. आरती यांना आपल्या या कामात कुटुंबियांची पूर्ण साथ मिळाली आहे. जेव्हा गरज भासते तेव्हा एक व्यावसायिक असलेले त्यांचे पती त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतात. पतीं व्यतिरिक्त त्यांची दोन मुले सुद्धा त्यांना त्यांच्या या कामात पुष्कळ मदत करतात. त्यांचा मोठा मुलगा दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा वकील आहे. तर छोट्या मुलाने रांचीमध्येच खाद्य प्रक्रिया युनिट सुरू केले आहे. आरती आपल्या या उत्पादनामध्ये डिझाईनची विशेष काळजी घेतात आणि जेव्हा त्या मोठ्या मेट्रो शहरांमध्ये जातात, तेव्हा त्या कपड्यांच्या वेगवेगळ्या शोरूम्सना जरूर भेटी देतात. यातून लोकांच्या आवडी-निवडी काय आहेत यांची माहिती मिळावी हा त्यांचा उद्देश असल्याचे आरती सांगतात. आरती यांचे आता केवळ एकच स्वप्न आहे आणि ते म्हणजे ‘मल्बेरी लाईफस्टाईल’चे नाव संपूर्ण देशात चमकावे. कुणीही जेव्हा नेहरू जॅकेटबाबत विचार करेल तेव्हा त्याच्या डोक्यात सर्वात पहिले ‘मल्बेरी लाईफस्टाईल’चेच नाव यावे असे आरती यांना वाटते.