संपादने
Marathi

“ परतु सिनेमा हा माझ्या अभिनय कारकिर्दीतला महत्वाचा टप्पा” - अभिनेत्री गायत्री सोहम

Bhagyashree Vanjari
18th Dec 2015
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

अवंतिका या मालिकेतनं ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आणि आता नुकतंच तिने सिनेमाच्या रुपरी पडद्यावरही दणक्यात पदार्पण केलेय. ती म्हणजे अभिनेत्री गायत्री सोहम नुकत्याच प्रदर्शित झालेल्या परतु या सिनेमात महत्वाची भूमिका साकारताना दिसली. गायत्रीचा हा पदार्पणातला सिनेमा आहे. अभिनेता सौरभ गोखलेसोबत तिने या सिनेमात महत्वाची भूमिका साकारली. आता पदार्पणातला सिनेमा त्यातही परदेशातले एक नामांकीत प्रॉडक्शन हाऊस या सिनेमाचे निर्माते आणि सोबत इंडस्ट्रीतल्या मातब्बर कलाकारांची फौज...परतुच्या या अनुभवाने गायत्री अजूनही तेवढीच मंत्रमुग्ध असल्याचे तिच्याशी बोलल्यावर जाणवते.

image


“ प्रेक्षकांनी आत्तापर्यंत छोट्या पडद्यावर मी साकारलेल्या भूमिकांना भरभरुन प्रतिसाद दिलाय पण परतु या सिनेमा मध्ये प्रेक्षकांना मी एका वेगळ्या रुपात पहायला मिळाली, यात मी शोभा नावाच्या एका साध्या सरळ ग्रामीण मुलीची भुमिका साकारतेय. सिनेमाचा नायक पृथ्वी सिंग आणि शोभाचे लग्न होते यानंतर या दोघांची प्रेमकथा या सिनेमात पहायला मिळते. पण ही नेहमीची सरधोपट अशी प्रेमकथा नाहीये. त्यांचे लग्न घरच्यांच्या मर्जीने होते, यानंतर त्यांच्यात उमलणारे प्रेमाचे बंध, आणि पुढे आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टींमुळे त्यांच्या नात्यातले उतारचढाव या सगळ्या गोष्टीतनं ही प्रेमकथा पडद्यावर उलगडत जाते.”

हॉलीवूडच्या इस्टवेस्ट फिल्मसची परतु ही पहिली मराठी निर्मिती आहे, ज्याचा एक कलाकार म्हणून आपण एक भाग बनू शकलो याचा अभिमान गायत्रीला आहे, “ परतु हा सिनेमा एक सत्यकथा आहे, जी राजस्थानच्या पार्श्वभूमीवर घडते, शिवाय यात१९६८ चा काळ दाखवला गेलाय पण हा कुठलाही पिरिऑडिक सिनेमा नाही, यातल्या व्यक्तिरेखांशी आजचा प्रेक्षक सहजरित्या जोडला जातो” असे मत गायत्री व्यक्त करते.

image


नुकत्याच सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या अमेरिकन फिल्म फेस्टीवलमध्ये या सिनेमाला प्रेक्षक पसंतीचा सन्मान दिला गेला, शिवाय अभिनेता किशोर कदम यांना या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ज्युरी अवॉर्डही मिळाला.

परतुच्या निमित्ताने गायत्रीने तिच्या पदार्पणातच किसिंग सीन दिलाय, ज्याबद्दल ती कॉन्फिडन्ट आहे. “किसिंग सीन ही पटकथेची आवश्यकता होती, हा सीन सिनेमात अत्यंत ओघाओघाने येतो त्यामुळे तो उगाच बळजबरी टाकलेला वाटत नाही हे महत्वाचे आहे. माझ्या आणि सौरभवर या सिनेमात एक प्रेमगीतही चित्रित करण्यात आलेय. ज्याला आत्तापासूनच सोशल नेटवर्किंग साईटवर चांगला प्रतिसाद मिळतोय. नृत्यदिग्दर्शिका दिपाली विचारेने या गाण्याचे दिग्दर्शन केलेय. शिवाय सौरभनेही मला यात खूप मदत केली.”

image


गायत्री सांगते, “संपुर्ण सिनेमाचे शुट हे ठरलेल्या वेळेत पार पडले, सिनेमाचे शुट सुरु होण्यापुर्वीच नितीन आणि टीमचे पेपरवर्क तयार होते, आम्हाला आमचे संवाद, सीन्स आधीपासून माहीत होते त्यामुळे फायनल शॉट आधी आम्हाला सहकलाकारासोबत सीन्सची नीट तालीम करता येत होती ”.

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags