संपादने
Marathi

‘एका बायोकेमिकल्स प्रायवेट लिमिटेड’: प्रवास केरळमधील संपूर्णपणे महिलांच्या मालकीच्या पहिल्यावहिल्या बायोटेक आणि बायोकेमिकल स्टार्टअपचा

Team YS Marathi
6th Apr 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

‘एका’ (Aeka) च्या कथेचा जन्म झाला तो सात वर्षांपूर्वी.... श्री चित्र थिरुनल कॉलेज ऑफ इंजिनियरींगच्या विद्यार्थिनी असलेल्या आर्द्रा चंद्रा मौली आणि गायत्री थांकाची व्ही यांनी नुकतेच आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्यावेळी या दोघी जणी, त्यांचे वर्गमित्र आणि एकूणच बायोटेक्नॉलॉजी आणि बायोकेमिकल इंजिनियरींग, एससीटीसीई बॅचचेच स्वप्न होते ते म्हणजे ‘एका बायोकेमिकल्स प्रायवेट लिमिटेड’... संपूर्णपणे महिलांच्याच मालकीची अशी, केरळमधील त्रिवेंद्रम स्थित पहिली बायोटेक आणि बायोकेमिकल स्टार्टअप...

ही कंपनी बायोटेक्नॉलॉजिकल (जैवतंत्रज्ञान), बायोकेमिकल (जीवरासायनिक), एन्झायमॅटीक उत्पादने, रासायनिक उत्पादने आणि जैविक मूळ अर्कांचे उत्पादन करते. सर्जनशीलता, टीमवर्क, नाविन्य आणि एकता वाढीस लागण्याच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी वातावरण निर्मिती करण्याचा त्यांच्या टीमचा कळकळीचा प्रयत्न असल्याचे आर्द्रा सांगतात. “ यातूनच सामान्य माणसाला लक्ष्य ठेवून आणि त्याला उपयुक्त ठरतील अशी उत्पादने निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना मदत मिळते,” त्या पुढे म्हणतात.

image


कोअर टीम

आर्द्रा आणि गायत्री यांनी त्रिवेंद्रमच्या एससीटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून जैवतंत्रज्ञान आणि जैवरसायन अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर आर्द्रा यांनी त्यांचे व्यवस्थापनामधील पदव्युत्तर शिक्षण संपूर्ण शिष्यवृत्तीसह युकेच्या वारविक बिझनेस स्कूलमधून पूर्ण केले. आर्द्रा यांना उत्पादन व्यवस्थापन आणि विपणनामध्ये तर गायत्री यांना बायाटेक आणि बायोमेडीकल मार्केटींगमध्ये कामाचा अनुभव आहे.

एकाच्या वैज्ञानिक टीमच्या प्रमुखपदी निधिन श्रीकुमार हे आहेत. एनआयटी, कालिकत येथून सध्या ते पीएचडीचे शिक्षण पूर्ण करत असून, एनआयआयएसटी-सीएसआयआर येथे ते सिनियर रिसर्च फेलो आहेत. तर जयराम के हे एकाचे लॅब प्रमुख आहेत. एससीटीसीई येथून जैवतंत्रज्ञान आणि जैवरसायन अभियांत्रिकीमध्ये बी.टेक पूर्ण केल्यानंतर त्यांनी मणिपाल विद्यापीठातून इंडस्ट्रीयल बायोटेक्नॉलॉजी या विषयात एम.टेक पूर्ण केले आहे. “ आमचे मार्गदर्शक आणि वैज्ञानिक सल्लागार व्ही. पी. पोट्टी यांना संशोधनाच्या क्षेत्रात ४२ वर्षांचा अनुभव असून आजपर्यंत त्यांच्या नावावर शंभरहून जास्त रिसर्च पेपर्स जमा आहेत,”आर्द्रा सांगतात.

image


आव्हाने

मात्र केरळमध्ये, जेथे अगदी कमी बायोटेक स्टार्टअप्स आहेत, एक बायोटेक कंपनी उभी करण्यामध्ये अनेक आव्हाने होती. नेहमीच भेडसावणारी लाल फीतीची समस्या ही त्यापैकीच एक असल्याचे आर्द्रा सांगतात. एका सारख्या कंपनीला विविध प्रकारच्या परवान्यांची आवश्यकता होती. तसेच या कंपनीबाबतच्या कायदेशीर आणि इतर नियामक प्रक्रिया पार पाडणेदेखील गरजेचे होते. मात्र यासाठी व्यापक अशा एकाच माहिती स्त्रोताचा अभाव ही त्यांच्यासमोरील सर्वात गंभीर समस्या होती. “ मात्र, मार्गदर्शक आणि स्थानिक अधिकाऱ्यांचा मोठा पाठींबा आम्हाला यावेळी मिळाला आणि त्याचबरोबर अनुभवी लोकांनी दिलेल्या योग्य सल्ल्यामुळेच सुरुवातीचे अडथळे पार करण्यात आम्हाला मोठी मदत झाली,” आर्द्रा सांगतात.

अधिकारी, ग्राहक आणि सर्वसाधारण लोकांबरोबर झालेल्या बहुतेक संवादादरम्यान आपल्याला सभ्य आणि विवेकी वर्तनच पहायाला मिळाल्याचे आर्द्रा आवर्जून सांगतात आणि त्यासाठी त्या स्वतःला नशीबवानही मानतात. मात्र असे असले तरी मोठ्या प्रमाणात पितृप्रधान समाजाबरोबर निभावून घेताना, काही समस्यांनाही त्यांना तोंड द्यावे लागलेच.

आर्द्रा सांगतात, “ हा संपूर्ण प्रवास अगदी सुरळीत किंवा ओघवताच होता, असे म्हणणे कठीण आहे. काही वेळा आम्हाला अशाही व्यक्तींना तोंड द्यावे लागले जे आम्हाला विचारत, ‘ तुमच्या मागे नक्की कोण आहे? दोन मुलींची एखादा उद्योग चालवण्याची ‘इच्छा असू शकते’ किंवा ते कसे करायचे हे त्यांना ‘माहित असते’, यावर आमचा विश्वासच नाही’. अर्थात अशी उदाहरणे फारशी नसली, तरी जे अनुभव आले त्यातून चांगलेच रंजक किस्से मिळू शकतात,”त्या सांगतात.

प्रकल्प आणि उत्पादनांची बांधणी

३ ऑक्टोबर, २०१४ ला एकाने आपल्या कामाला सुरुवात केली आणि नोव्हेंबरमध्येच केरळा स्टेट आंत्रप्रुनर डेवलपमेंट मिशन या योजनेसाठी एकाची निवड झाली. केरळ सरकार आणि केरळा फायनान्शियल कॉर्पोरेशन (केएफसी)च्या संयुक्त विद्यमाने ही योजना सुरु करण्यात आली होती. आर्द्रा यांच्या मते हा एक महत्वाचा मैलाचा दगड होता, कारण सुरुवात झाल्यापासून कंपनीला पहिल्यांदाच बाहेरुन मिळालेल्या निधीचे हे प्रतिनिधित्व होते. जानेवारी महिन्यात टीमने त्रिवेंद्रममधील वाझुथाकॉड येथील त्यांच्या प्रयोगशाळेच्या आणि लहान प्रमाणात उत्पादन प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात केली. एकाच्या वाझुथाकॉड येथील प्रकल्पामध्ये संपूर्णपणे तयार अशा वेट लॅबरोटरी, बेसिक ऍनॅलिटीकल लॅबरोटरी आणि पायलट-स्केल बायोकेमिकल प्रॉडक्शन युनिटचा समावेश आहे.

image


फेब्रुवारीमध्ये त्यांनी एका लॅब्ज या त्यांच्या विपणन शाखेला सुरुवात केली, जी विपणन उपक्रम आणि बाजारपेठ संशोधनाचे काम हाताळते. एका लॅब्जचे कार्यालय हे जगाथी येथे आहे आणि त्यांच्याकडेच बायोप्रॉडक्टस् च्या मार्केट प्रमोशनचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

१ जुन, २०१५ मध्ये कंपनीच्या नव्यानेच स्थापन झालेल्या प्रयोगशाळेतील वैज्ञानिक कामाची सुरुवात झाली ती त्यांचे मार्गदर्शक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. व्हि पी पोट्टी यांच्या हस्ते... “ शहराच्या अगदी मधोमध असलेला एकाचा वाझुथाकॉड येथील या प्रकल्पाची उभारणी ही अशा पद्धतीने करण्यात आली आहे, जेणे करुन हा जास्तीत जास्त पर्यावरण अनुकूल, प्रदुषण मुक्त आणि ग्रीन, झीरो एफ्लुएंट झोन ठरेल. प्रयोगशाळा आणि उत्पादन युनिट हे मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, क्वालिटी कंट्रोल आणि केमिकल (वेट लॅब) कामासाठी सुसज्ज आहे,” आर्द्रा सांगतात. जुलै महिन्यात त्यांनी लॅब स्केल उत्पादन आणि चाचणीच्या कामाला सुरुवात केली, ज्यातून सास्या ही उत्पादन रेंज जन्माला आली.

तर नव्यानेच सुधारणा करण्यात आलेले त्यांचे संकेतस्थळही सप्टेंबरपासून कार्यरत आहे. ज्यामुळे त्यांचे ऑनलाईन आणि सोशल मिडियावरील अस्तित्व अधिक मजबूतीने स्थापित करण्यात मदत झाली आहे. एकाने त्यांची पहिली उत्पादन रेंज ऑक्टोबर, ९, २०१५ ला बाजारात आणली, द सास्या सिरीज ऑफ मायक्रोबियल प्लांट ग्रोथ प्रमोटर्स – सुरक्षित आणि रसायन-मुक्त शेतीसाठी...

यामध्ये पुढील उत्पादनांचा समावेश असून, प्रत्येकाची निर्मिती आणि चाचणी ही विशिष्ट प्रकारचे पिक आणि वापरण्याची पद्धत लक्षात ठेवून करण्यात आलेली आहेः

 सास्या सूत्र – रोपवाटीका आणि बगीचासाठी, बियाणे आणि मुळांच्या उपचाराद्वारे

 सास्या मित्र – किचन गार्डन, टेरेस गार्डन किंवा घरगुती बगीचे आणि लहान शेतांसाठी – फॉलियर ऍप्लिकेशन द्वारे

 सास्या रक्षा – बाग आणि शेतांसाठी, फॉलियर ऍप्लिकेशन द्वारे

 सास्या पोषक – मोठ्या शेतांसाठी, बियाणे, मुळे आणि फॉलियर ऍप्लिकेशन द्वारे

 सास्या पोषक+ - लागवडीसाठी, बियाणे, मुळे आणि फॉलियर ऍप्लिकेशन द्वारे

टीम आणि त्यांचे लक्ष्य

एक टीम म्हणून, पर्यावरणाला प्राधान्य देण्यावर एकाचा संपूर्ण विश्वास आहे. त्यापाठोपाठ दुसरा क्रमांक आहे तो स्थानिक समुदायांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देण्याकडे आणि त्यानंतर अधिक व्यापक अर्थाने एका येथे विकसित केलेली उत्पादने आणि उपाय स्वीकारले जातील, या दृष्टीने लक्ष विस्तारीत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

त्या सांगतात की, एकाचे रोजचे उद्दीष्ट असते, ते समाज आणि पर्यावरणाच्या गरजांचे पूर्ण समाधान करु शकतील अशा उपायांची निर्मिती करण्याचे. “ लहान प्रमाणात सुरुवात करण्याचा आणि त्याचबरोबर आमच्या प्रकल्पाच्या ठिकाणी संपूर्ण ताकदीनिशी कमीतकमी कचरा आणि कमीतकमी उर्जेचा नाश करण्याचा आमचा हा निर्णय आम्ही अतिशय विचारपूर्वक घेतलेला आहे. प्रदूषण टाळत, समाजासाठी कमाल योगदान देणे हाच आमच्या प्रयत्नांचा पाया आहे,” आर्द्रा सांगतात.

महसुल मॉडेल आणि भविष्य

या टीमने उत्पादन मॉडेलचा स्वीकार केला असून, ज्याद्वारे कंपनी उत्पादन करते आणि ग्राहकांना विक्री करते आणि त्यातून महसूल गोळा केला जातो. एकाने आपल्या पहिल्या वर्षात सर्व लक्ष केंद्रीत केले होते ते यशस्वीपणे प्रकल्पाची उभारणी करण्यावर आणि त्यांची एमबी-पीजीपी रेंज विकसित करण्यावर...

आता इन हाऊस टीमच्या मदतीने आणि त्यांच्या तज्ज्ञ सल्लागारांच्या प्रचंड अनुभवाच्या जोरावर २०१५-२०१७ साठी संशोधन आणि विकासासाठी त्यांच्या योजना तयार आहे. त्यामध्ये लहान प्रमाणात वेस्ट वॉटर रिसायकलिंगसाठी नाविन्यपूर्ण आणि इको-फ्रेंडली पद्धतीचा विकास करण्यात येणार आहे, जो बायोकेमिकल आणि मायक्रोबियल पद्धतीवर आधारीत असेल आणि ज्यामध्ये देशी साहित्याचा समावेश असेल.

एकाचे लक्ष्य आहे ते अशी कंपनी बनण्याचे जी सध्याच्या गरजांवर काम करेल, ज्या स्थानिक आणि जागतिक ग्राहकांशी संबंधित असतील.

या सारख्या आणखी काही यशस्वी महिला उद्यमिंच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

"तुम्हाला काही करण्याची उर्मी आहे, मग थांबू नका तुमची आवडच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल"

लहानपणीचं स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं, ‘कनाबीज’ फूटवेअर निर्मितीची रंजक कहाणी

'द फ्लोर वर्क'च्या मिता माखीजा यांची खुसखुशीत वाटचाल

लेखक – सिंधू कश्यप

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन 

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags