संपादने
Marathi

बेंगळुरूतलं ‘कल्ट’ भारतातलं फिटनेस विश्व बदलण्याच्या प्रयत्नात

1st Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

पारंपरिक व्यायामशाळा ह्या आता इतिहास जमा होत आहेत. जानेवारी महिना उजाडला की, स्थानिक व्यायामशाळेत वार्षिक शुल्क भरण्याकरता आता आपण पूर्वी इतकं तत्पर नाही, कारण आपल्याला माहित असतं की दररोज व्यायामशाळेत जायचा आपला संकल्प फार दिवस टिकणारा नाही. याच विचाराने दीपक पोडुवाल आणि ऋषभ तेलंग यांनी गेल्या वर्षी कल्ट-वर्कआऊट स्टेशन (Cult- the Workout Station) उभारलं. बेंगळुरूमध्ये कल्ट फिटनेस स्टार्टअपची नुकतीच सुरूवात झालीय. याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणत्याही मशिन किंवा साधनांशिवाय प्रशिक्षण दिलं जातं.

कल्टची टीम

कल्टची टीम


कल्टमध्ये मार्शल आर्टस्, योगा आणि बाहेरील व्यायामप्रकारांचा योग्य समतोल साधून तंदुरुस्त राहण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. त्यांच्याकडे ट्रेडमिल्स नाहीत, की फॅन्सी ऑल इन वन फिटनेस मशिन्स नाहीत. पण त्यांच्याकडे बॉक्सिंग रिंग, बॉक्सिंग बॅग्ज, जंप रोपस्, टायर्स, स्पीड शूटस्, रेझिस्टन्स बँडस् आणि पॉलिमेट्रीक बॉक्सेस आहेत.

ऋषभ म्हणतात,

व्यायाम करताना होणाऱ्या दुखापती टाळण्याकरता योग्य तंत्र आणि लकबीवर (पोस्चर) कल्टचा भर आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचे सप्लीमेंटस्, पावडर किंवा गोळ्या खायला कधीच सांगत नाही. आम्ही आमच्या सदस्यांना नेहमी ताजं, पौष्टीक अन्न खायला आणि सरळ राहणीमान ठेवायला सांगतो. आम्ही कुठलंही कडक पथ्य करायला सांगत नाही. सदस्यांना बाहेर धावायला, सायकलिंग, पोहायला नेण्याकडे किंवा मैदानी खेळ खेळायला लावण्याकडे आमचा नेहमी कटाक्ष असतो.

आलेख

३४ वर्षीय दीपक विप्रोमध्ये काम करत असताना सुट्टीच्या दिवशी काही उद्योजक मित्रांना भेटत असत. हे मित्र त्यांच्याशी उद्योगातल्या यशापयशाच्या गोष्टी सांगत.

२०१० मध्ये अचानक त्यांनी त्यांचं पहिलं स्टार्टअप टॅन्जिबल एक्सपिरिअन्स (Tangible Experience) सुरू करत उद्योगात उडी घेतली. यामध्ये भारत, युरोप, अमेरिका आणि मध्य पूर्व देशांतील इमर्सिव्ह डोम प्रोजेक्ट, नॅचरल युजर इंटरफेसेस, प्रक्षेपण आधारित तंत्रज्ञान, टेक म्युझियम यावर काम केलं जातं.

त्यांच्यातल्या उद्योजकाने पुन्हा एकदा उचल घेत, गेल्या वर्षीच्या सुरूवातीला लॉजिस्टिक तंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्टअप सुरू केलं.

दीपक यांनी कर्नाटकच्या व्हीटीयुमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग केलं. तर पुण्याच्या सिंबॉयसिसमधून एमबीए केलं. उद्योजक होण्याआधी त्यांनी विप्रो टेक्नॉलॉजीजमध्ये रिटेल अँड कन्झ्युमर गुडस विभागात मार्केटींग ग्लोबल हेड म्हणून काम केलं.

दीपकचे मेव्हणे ३० वर्षीय ऋषभ यांचं क्रॉसफिट – एल1 प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय ग्लोबट्रोटर खेळाडूंसोबत प्रशिक्षण झालं आहे. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ते विप्रो टेक्नॉलॉजीज आणि एफएमसीजीमध्ये कार्यरत होते. ऋषभ यांनी पुण्याच्या बीआयएमएम मधून एमबीए केलं.

सुरूवातीच्या अडचणी

व्यायामाची कोणतीही साधनं नसणाऱ्या व्यायामशाळेचं महत्त्व लोकांना पटवणे हे या दोघांकरिता सर्वात मोठं आव्हान होतं. त्यातचं, त्यांची व्यायामशाळा बेंगळूरुच्या सर्जापूररोडवर आणि कल्ट ही वेगळ्या पद्धतीची व्यायामशाळा असल्यानं पारंपरीक उपकरणांची गरज भासत नाही.

ग्राहकांचा प्रतिसाद

७५ लाखांच्या मूळ भांडवलावर कल्टची सुरूवात झाली. जवळच्या तलावाजवळ उपक्रम राबवायला सुरू केल्यावर त्यातून त्यांना पहिला ग्राहक मिळाला. दीपकच्या मते, त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवत लोक त्यांच्याकडे यायला लागले.

सहा महिन्याच्या अवधीत ९ प्रशिक्षकांची टीम आणि २०० जणांची सदस्यसंख्या झाली (केवळ वार्षिक आणि सहामाही सदस्यत्व). कंपनीच्या फेसबुक पेजला २० हजार लाईक्स मिळालेत.

काही जण आपलं व्यक्तीमत्व सुदृढ करण्याच्या हेतूने तर काही एथलिट म्हणून करिअर करण्याकरता सरावासाठी, प्रशिक्षणासाठी येतात.

शुल्क

कल्ट सभासदत्वासाठी सहामाहीसाठी ३० हजार रुपये तर वार्षिक ४८ हजार शुल्क आकारतं. सभासद कितीही आणि कोणत्याही वर्गांमध्ये सहभागी होऊ शकतात. वर्गसंख्येची मर्यादा नाही. ‘क्षमता आणि लवचिकता’ वाढवणाऱ्या म्यु थाई, बॉक्सिंग, ब्राझिलिअन जीऊ-जित्सू, योगा, स्ट्रेचिंग आणि आऊटडोअर वर्कआऊट्स या अनेक प्रकारातून सदस्य वेळापत्रकानुसार कोणताही प्रकार निवडू शकतात.

कल्टचे प्रशिक्षक

कल्टचे प्रशिक्षक


या स्टार्टअपमध्ये बीट डाऊन नावाचं एक मुक्केबाजीचं सत्रही आहे. ज्या सभासदांना चँपियनशीपमध्ये सहभागी व्हायचं असतं त्यांना या सत्रात सराव करता येतो.

ऋषभ म्हणतात,

आम्ही जाहिरातींवर खर्च करत नसल्यामुळे आम्हाला चांगलं उत्पन्न मिळतं. पारंपरीक व्यायामशाळेप्रमाणे मोठमोठी उपकरणं आणि त्यांच्या देखभालीवर होणारा आमचा खर्च वाचतो, पण आमच्या उत्पन्नातली मोठी रक्कम प्रशिक्षकांच्या मोबदल्यावर खर्च होते.


कॉर्पोरेट कार्यशाळा आणि शिबीर

कल्ट कॉर्पोरेटस् करता फंक्षनल फिटनेस, स्व संरक्षण, लढवय्ये (कॉम्बॅट) खेळ आणि शरीर लवचिक बनवणारे खेळ असणाऱ्या कार्यशाळा आयोजित करते. ग्राहकांची गरज आणि रस याच्यानुसार बुटकँपस् कार्यशाळाही आखल्या जातात. डिकॅथलॉनच्या जोडीने कल्ट मॅरेथॉनच्या आधी आणि नंतरही विशेष कार्यक्रम घेतात.

या कार्यशाळांबद्दल दीपक सांगतात, “ग्राहकांच्या (कॉर्पोरेटस्) गरजेनुसार या कार्यशाळांचं वेगळं आयोजन केलं जात असल्यामुळे त्याचं शुल्क त्यानुसार आकारलं जातं. या वर्कआउटमुळे ग्राहकांना कसा फायदा होतो हेही ते सांगतात. रोजच्या आयुष्यातले प्रसंग नाटकाच्या रुपात दाखवून, उदाहरण देऊन स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जातं”. वरिष्ठ डॉक्टर्स, हृदयरोगतज्ज्ञांना सोबतीस घेऊन कल्टचे फिटनेस तज्ज्ञ ६० वर्षावरील वयोगटासाठी एका फिटनेस कार्यक्रमाचं आयोजन करण्याच्या विचारात आहे.

फ्रंचाईजीव्दारे विस्तार

फ्रंचाईजीद्वारे विस्तार या धोरणाला अनुसरून फेब्रुवारीपर्यंत बेंगळुरूमध्ये आणखी दोन शाखा उघडणार आहे. कठोर नियंत्रण आणि केंद्रीय व्यवस्थापन या प्रणालीनुसार फ्रंचाईजींना काटेकोरपणे वागवणार असल्याचा स्टार्टअप दावा करत आहे. मालकांनादेखील फ्रंचाईजी सुरू करण्याआधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कल्ट, नोव्हेंबर २०१५ मध्ये कल्ट फिटनेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून अस्तित्वात आली. बेंगळुरूनंतर भारताच्या इतर शहरांमध्ये विशेषतः पुणे, म्हैसूर सारख्या टीअर-2 शहरांमध्ये विस्तार करण्याचा त्यांचा विचार आहे. उत्पन्नाच्यादृष्टीने विचार करता या वर्षाखेर अडीच कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न वाढवण्याचा त्यांचा मानस आहे.

युअरस्टोरी मत

लोकांच्या उत्पन्नवाढ आणि राहणीमानातल्या सुधारणेमुळे भारतातल्या फिटनेस क्षेत्राला सुगीचे दिवस आले आहेत. वर्षागणिक यात २०-३० टक्क्याची वाढ अपेक्षित आहे.

सध्या, वजन कमी करणाऱ्या आणि सौंदर्य उपचार पद्धतींचा बाजार ४९० अब्ज रुपयांचा आहे. डेलोइट-आयएचआरएसएच्या अहवालानुसार मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये साधारण ४.८ कोटी लोक फिटनेसचे दिवाने आहेत.

बेंगळुरूतलं ट्रुवेट ही संस्था वजन कमी करण्याकरता आवश्यक उपाययोजना आणि योग्य आहाराकरता सल्ला देते. ते पौष्टीकआहाराचा एक संचही देतात. बेंगळुरूमधलीच गीमपीक स्टार्टअप फिटनेस आणि आरोग्याकरता ऑनलाईन सेवा देते. पुढील आर्थिक वर्षात एक कोटींवर उत्पन्न वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुंबईतल्या फिटीकेटने साडेचारशे जिम्स आणि फिटनेस स्टुडिओसोबत टायअप केलंय. यामुळे महिन्याला पाचशे नवीन नोंदणी होत आहेत.

पण, कल्ट या स्टार्टअप्ससोबत थेट जोडून घेत नाहीये. ‘आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांद्वारे उपकरणाशिवाय व्यायाम’ हा त्यांचा मूळ उद्देश आहे. अतिशय गर्दी असणाऱ्या बाजारात स्वतःसाठी सोयीची जागा बनवण्याच्या प्रयत्नात हे स्टार्टअप आहे.

लेखिका - अपराजिता चौधरी

अनुवादक – साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags