संपादने
Marathi

झोपडपट्टीतील मुला-मुलींच्या डोळ्यात शिक्षणाचे अंजन भरणारी ‘किंजल!’

Chandrakant Yadav
16th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

पंचविशीबाबत गद्धेपंचविशी असे उपरोधाने म्हटले जात असले तरी बहुतेकांच्या बाबतीत हेच वय खरेतर आयुष्याच्या पहिल्यावहिल्या उड्डाणाचे असते. याच वयात करिअरला सुरवात होते आणि याच वयात आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदललेला असतो. किंजल शहा यांच्याबाबत मात्र हे सगळे गैरलागू होते. कारण किंजल यांनी पंचविशीच्याही खुप आधी इतरांच्याच आयुष्याचा विचार केलेला होता. इतरांना आनंद देण्यासाठीच आपण जगायचे, असे ठरवून टाकलेले होते. करिअर वगैरे गोष्टींची भानगडच नव्हती… आणि ऐन पंचविशीत त्या ‘श्वास’ या सेवाभावी संस्थेच्या विश्वस्त बनल्या. शिक्षणाचे महत्त्व अलीकडच्या काळात इतके वाढलेले आहे, की शिक्षणाला मुकलेला कुणीही असो तो आजच्या घडीला जणू श्वासालाच मुकलेला. ‘श्वास’ ही किंजल यांची संस्था अशा शिक्षणाला मुकलेल्यांना शिक्षणाचा श्वास देण्याचे कार्य करते.

किंजल शहा यांनी अहमदाबाद येथून बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केलेली आहे.

image


किंजलने एका झटक्यात ‘श्वास’चा ध्यास स्वीकारलेला होता असेही नाही. पदवीच्या दुसऱ्या वर्षापासूनच तिने झोपडपट्टीतील मुलांना शिकवायला सुरवात केलेली होती. दर आठवड्याच्या अखेरीस मित्र-मैत्रिणींसह ती झोपडपट्टीत जात असे. मुलांना शिकवत असे. पदवी घेऊन झाली. स्वत:चे शिक्षण एकदाचे आटोपल्यावर किंजल आता झोपडट्टीतील मुला-मुलींसाठी मोकळ्या होत्या. लगतच्या पालिका शाळेत या मुला-मुलींनी प्रवेश घ्यावा म्हणून आता त्या प्रोत्साहन देऊ लागल्या. शाळेत येऊन त्या स्वत: पाठ घेऊ लागल्या. शाळा सुटल्यावरही त्यांचे अध्यापन आटोपत नसते. गृहपाठही त्या घेत.

त्या सांगतात, ‘‘मला शिक्षणाच्या क्षेत्रात विशेषत: तळागाळासाठी काम करायचे होतेच. शिक्षणाच्या वर्तुळात झोपडपट्टी येत नाही. गरिब वर्ग येत नाही, तोवर शिक्षणाचा मूळ उद्देशच सफल होणार नाही.’’

अभ्यासासोबतच मुलांना त्या स्वच्छतेचे धडे देत. आरोग्याबाबत सजग करत. इतर मुलांपेक्षा झोपडपट्टीतील मुले वेगळी नसतात. या मुलांमध्येही गुणवत्ता असते. केवळ योग्य संधी आणि वातावरणाचा अभाव इथं असतो, हे किंजल यांच्या लक्षात आले.

अगदी सुरवातीला मुलांचे आई-वडील किंजल यांच्याकडे संशयाने बघत. चांगल्या घरची पोर दिसते, हिला काय आमच्या पोरांची इतकी पडलेली, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असे. पुढे संशयाचे हे सगळे ढग विरले.

मुलांतील अध्ययनाचा दर्जा सुधारावा म्हणून एकदा सुरवात झाल्यानंतर आगामी तीन वर्षांपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच सलग शिकवत असत. वर्षागणिक मुले चुणचुणित होताहेत, हे त्यांच्या लक्षात आले. आता या मुलांना आपण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणूनच सोडायचे, असे आव्हान किंजल यांनी स्वत:च स्वत:ला दिले.

पैशाचं कसं करणार, हा प्रश्न होताच. कुटुंबीयांकडून, नातेवाईकांकडून, मित्रांकडून पैसे गोळा करायला किंजलनी सुरवात केली. थोडे बऱ्यापैकी पैसे जमल्यावर त्यांनी चार मुलांना चांगल्या शाळेत घालून उपक्रमाचा श्रीगणेशा केला. नवीन शाळेत ही चारही मुले रमली. मन लावून अभ्यासालाही लागली.

image


किंजल यांच्या लक्षात यादरम्यान आलेले होते, की नगरपालिकेच्या शाळांतून शिकणारी मुले आठवीनंतर पुढे शिक्षण सुरू ठेवत नाहीत. शाळा लांब असते म्हणून आई-वडीलही पुढे मुलांना आणखी नव्याने शाळेत घालायला तयार नसतात. पालकांच्या या मानसिकेतचा मुलींना अधिक फटका बसतो. आठवीनंतर शाळेत प्रवेश न घेतलेल्या मुला-मुलींच्या आई-वडिलांच्या भेटी घ्यायला मग किंजलनी सुरवात केली. मुलांचे भविष्य घडवायचे तर त्यांचे शिक्षण पुढेही सुरू ठेवले पाहिजे म्हणून पालकांचे समुपदेशन केले. पालकांकडून प्रतिसाद मिळायला लागला. आता किंजल यांची जबाबदारी वाढलेली होती.

… आणि यातूनच ‘श्वास’ची सुरवात झाली. जी मुले-मुली आठवीनंतर पुढेही शिकू इच्छितात, त्या मुला-मुलींना मुख्य प्रवाहातील शाळांतून प्रवेश मिळवून देण्याचे उद्दिष्ट ‘श्वास’ने डोळ्यासमोर ठेवले. २००८ पासून ही सेवाभावी संस्था अशा विद्यार्थ्यांच्या वह्या-पुस्तकांचा, गणवेशाचा खर्च उचलते आहे. सोमवार ते शुक्रवार श्वासच्या विश्वस्त किंजल मुलांना स्वत: धडे देतात. स्वयंसेवकही विविध विषयांचा अभ्यास मुलांकडून करवून घेतात. शनिवारी आणि रविवारी इतर ठिकाणच्या झोपडपट्ट्यांतून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाचा प्रचार केला जातो.

‘श्वास’कडून दरमहा या मुलांसाठी सहल आयोजिली जाते. मनोरंजन पार्क, कारखाने आणि जिथे भेटी देऊन मुले झोपडपट्टीबाह्य जगातील आव्हानांसाठी स्वत:ला तयार करू शकतील, अशाच ठिकाणांवर सहल नेली जाते. किंजल म्हणतात, ‘‘सहलींतून मुले नवनव्या गोष्टी शिकतात. त्यांच्या माहितीचे आणि ज्ञानाचे वर्तुळ विस्तारते.’’

‘‘खुप साऱ्या शक्यतांनी भरलेला पेटारा म्हणजे मुले. पेटारा जर नेमकेपणाने उघडला. हवा, प्रकाश असे आतवर जाऊ दिले तर असल्या गोष्टी या पेटाऱ्यांतून तुम्हाला सापडू शकतील, की तुम्ही थक्क व्हाल.’’

किंजल शहा हे नमूद करतात, तेव्हा जाणवते, की ‘मुले ही देवाघरची फुले’ या उक्तीवर त्यांचा केवळ विश्वास नाही तर श्रद्धा आहे… तीही अगदी मनापासून…

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags