संपादने
Marathi

दानात दान, ‘ई-दान’

दान ही भारतीय संस्कृतीमध्ये पुण्य अर्जित करण्याच्या रूपात रूजलेली एक संकल्पना आहे. या संकल्पनेला धर्म, पुण्य आणि दात्याला होणारा लाभ या विचार परिघातून बाहेर काढून तिला समाजिक जबाबदारीचं रूप देण्याचा प्रयत्न दीक्षा कोतवालवाला आणि कोसल मल्लादी यांनी केला आणि तो यशस्वीही करून दाखवला. आपली ही संकल्पना कार्यान्वित करण्य़ासाठी ‘ई-दान’ नावाची संस्था स्थापन करून त्यांनी दान या संकल्पनेला व्यावसायिक पातळीवर नेऊन व्यापक स्वरूप प्राप्त करून दिलं. आपल्याला उपयोगाच्या नाहीत असं मानून किंवा तीच तीच वस्तू वापरून कंटाळा आला म्हणून किव्हा वाढीव असल्यामुळं आपण एखादी वस्तू न वापरता घराच्या कोनाड्यात पडिक म्हणून राहू देतो. या स्थितीवर कल्पकतेनं विचार करून ‘ई-दान’ नं या वस्तू गरजू लोकांना दान स्वरूपातच देण्याची योजना आखली, कार्यान्वित केली आणि यशही मिळवलं. आपल्याला चाकोरीबाहेर बघण्याची दृष्टी देणारी ‘ईं-दान’ची ही आगळीवेगळी कथा.

sunil tambe
2nd Sep 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

‘ई-दान’ या स्वयंसेवी संस्थेच्या कार्याचं मॉडेल हे सहजसोप्या अशा दोन कल्पनांवर आधारित आहे: पहिली कल्पना म्हणजे, आपल्या घरात इकडे तिकडे पडलेल्या वापरण्याजोग्या, पण पडिक वस्तू; आणि दुसरी म्हणजे, वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी ज्यांना देणग्यांची सतत गरज आहे अशा कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था या दोघांना जोडणे होय. आपल्या घरामध्ये अशा अनेक वस्तू असतात ज्या केवळ जुन्या झाल्या या सबबीवर पडून असतात, पण त्या निकामी झालेल्या नसतात. अशा वस्तूंना समाजातल्या गरजू लोकांना देण्यासाठी स्वयंसेवी संस्थाकडून मागणीही आहे आणि त्या वस्तूंचा गरजू लोकांना पुरवठा देखील केला जाऊ शकतो. आणि हे घडतंय, पण अतिशय़ कमी प्रमाणात. अशा वस्तुंना मागणी आणि त्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात का बरं होत नाही, हा प्रश्न आहे. लोक खूप लोभी आहेत आणि आपल्या घरात जास्त वस्तू असल्या तरी त्या मुळीच विकायच्या नाहीत असा विचार करणारे आहेत म्हणून अशी स्थिती आहे का ? तर मुळीच नाही. किंवा आपल्या घरात असलेल्या या पडिक वस्तूंची इतर कुणालाच गरज नाही आणि म्हणून ते या वस्तू देण्याची पर्वा करत नाहीत हे सुद्धा याचं कारण नाही. उलटपक्षी, आपल्या घरात इकडे तिकडे पडलेल्या वस्तुंचा गरजेनुसार योग्य वापर करून घेता यावा यासाठी लोक खरच उत्सुक असतात. पण हे केव्हा शक्य होईल ? हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा लोकांना याची जाणीव होईल, की या वस्तूंचा नेमका वापर अमूक एका गोष्टीसाठी होऊ शकतो, आणि त्यांच्याकडं तेवढा पुरेसा वेळ उपलब्ध असणंही गरजेचं आहे.

नेमकी हीच गरज भागवण्य़ासाठी, हेच अंतर मिटवण्यासाठी दान देणारी व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था यांच्यामध्ये समन्वय साधला जावा म्हणून ‘ई-दान’ ही संस्था पुढं येते.

मयंक जैन, सहसंस्थापक, ई-दान

मयंक जैन, सहसंस्थापक, ई-दान


दीक्षा कोतवालवाला आणि कोसल मल्लादी यांनी ई-दानची स्थापना केली. कोतवालवाला आणि कोसल या अहमदाबादच्या MICA च्या MBA पदवीधर आहेत, तर मयंक जैन हे मुंबईच्या NMIMS मधून MBA झालेले आहेत. या तिघांनी लतिका पथेला आणि सिद्धार्थ फडकर यांचा समावेश असलेल्या आपल्या सोशल मिडिया टीमद्वारे ई-दानच्या माध्यमातून व्यक्ती आणि त्यांनी दिलेल्या वस्तुंचं दान आणि स्वयंसेवी संस्था यांचा समन्वय साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.


मयंक जैन याबाबत माहिती देताना सांगतात, “आमचं काम वेगवेगळ्या १३ राज्यांमध्ये चालतं. आत्तापर्यंत आम्ही टीव्ही, फ्रीज, धान्य, कपडे अशा स्वरूपात १००० वस्तू मिळवल्या आहेत.”

कुणाही व्यक्तीसाठी ई-दान करणं अगदी सहजसोपी अशी गोष्ट आहे. तुम्ही ई-दानच्या वेबसाईटवर गेलात आणि फक्त एक बटन क्लिक केलंत की झालं तुमचं दान करण्याचं काम फत्ते. एकदा का तुम्ही मुलभूत माहिती आणि कोणती वस्तू देणगी स्वरूपात द्यायची आहे याबाबत माहिती देणारा फॉर्म भरलात की मग ई-दान योग्य त्या स्वयंसेवी संस्थेला विनंती करते. एकदा का ही विनंती त्या स्वयंसेवी संस्थेपर्यंत पोहचली की मग ती स्वयंसेवी संस्था त्या दात्याशी संपर्क साधते आणि मग वस्तू दान स्वरूपात देण्या-घेण्याची प्रक्रिया पार पडते.

स्वयंसेवी संस्थांच्या पाहणीत असं आढळून आलंय की जवळजवळ ३३ लाख लोकांना या कार्याचा लाभ मिळालेला आहे, किंवा वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर एका स्वयंसेवी संस्थेने तब्बल ४०० लोकांच्या गरजा भागवण्याचं काम केलेलं आहे.

दीक्षा कोतवालवाला, सहसंस्थापक, ई-दान

दीक्षा कोतवालवाला, सहसंस्थापक, ई-दान


कोणालाही अगदी सहज वाटू शकतं की कुठल्याही व्यक्तीनं दान केलेली विशिष्ट वस्तूं नेमकेपणानं त्याच वस्तूंची गरज असलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या हाती सोपवणं अगदी सोपं काम आहे. पण खरच हे सोप आहे का? मुळीच नाही. ही भासते तितकी सोपी गोष्ट नाहीच. दान दाते आणि योग्य स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय साधण्याचं काम यशस्वी करण्यासाठी या क्षेत्रामध्ये किती स्वयंसेवी संस्था काम करतात याची संख्यात्मक माहिती असणं पुरेसं नाही. मयंक म्हणतात, “ स्वयंसेवी संस्थांचं हे क्षेत्र असंघटित असणं हे सर्वात मोठे आव्हान आहे. या असंघटित क्षेत्राला संघटित करणं हेच आमच्या समोरचं मोठं आव्हान आहे. आमचं सामाजिक सेवा व्यावसाय मॉडेल केवळ ई-दान या संकल्पनेच्या कार्यक्षमतेवरच काम करत नसून ते सर्वच स्वयंसेवी संस्थांच्या कार्यक्षमतेवर काम करतंय. यासाठी आम्हाला योग्य स्वयंसेवी संस्थांची निवड करावी लागली.”

अर्थात, जेव्हा ‘ई-दान’ ही संस्था दान देण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचा प्रयत्न करत असते अशा वेळेस हे प्रयत्न खरेच किती उपयोगाचे आहेत, किती प्रभावी आहेत यावर चर्चा झडतच राहतील यात शंका नाही. शिवाय अशा परोपकारासाठी दान देण्यानं कोणत्या पुण्याचा लाभ होणार आहे अशीही चर्चा काही लोक करतील. आमच्या या प्रयत्नांना नावं ठेवत लोकांना देणगी स्वरूपात मदत देण्याऐवजी गरीब लोकांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी काही प्रयत्न करायला हवेत असं ही काही लोकं म्हणतील. गरीब लोकांना जर आपण काही उत्पन्नाची साधनं पुरवली तर देणग्या आणि दानावर अवलंबून राहण्यापेक्षा ते लोक स्वत:चे कपडे स्वत: विकत घेऊ शकतील असं ही काहींचं म्हणणं असेल. मात्र अशा दानामुळे गरजूंच्या जीवनात जो काही बदल घडतो, त्या दान देण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळं टीममध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे.

मयंक याबाबत अधिक स्पष्ट करताना सांगतात, “ दानाचा योग्य स्त्रोत मिळणं, योग्य वेळी योग्य व्यक्तीला ते दाण मिळणं अशा अर्थपूर्ण दानाचं महत्त्व काय आहे याची जाणीव आम्हाला ई-दान मुळं झाली आहे. दानासाठी उचललेलं छोटं पाऊलसुद्धा फार मोठा परिणाम घडवू शकतं. समाजासाठी काही करायचं असेल तर फील्डमध्येच काम केलं पाहिजे असं नाही, किंवा मग स्वत: लोकांमध्ये जाऊनच काही काम करावं लागेल अशातलाही भाग नाही. तंत्रज्ञानानं आता समाजसेवेचं काम खूपच सोपं करुन ठेवलय. आता मोबाईल फोनद्वारे देखील गरजू लोकांसाठी काही करता येऊ शकतं. समाजसेवेचं हे काम सर्वस्वी आपली मानसिक ताकद, साधेपणा आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य अंमलबजावणी या गोष्टींवर अवलबून असतं. ”

कोसल मल्लादी, सहसंस्थापक, ई-दान

कोसल मल्लादी, सहसंस्थापक, ई-दान


मयंक यांचा हा मुद्दा उल्लेखनीय असाच आहे. गरजूंना विकासाची थेट फळं देण्याऐवजी, विकासासाठी साधनं पुरवून त्यांचा विकास घडवण्याची प्रक्रिया जेव्हा जटील होते, त्या वेळी दानासारख्या मूलभूत कृत्याला विकासाच्या प्रक्रियेत नक्कीच मोठं स्थान असेल. विशेषत: ई-दान सारख्या संस्थांनी संधी उपलब्ध करून दिल्यानंतर आपल्याकडं वेळ आहे किंवा नाही अशा अडचणींची पर्वा न करता, वा कशाचा फायदा तोटा न बघता वस्तुंच्या स्वरूपात दान देऊन या कार्यात कोणीही व्यक्ती सहभागी होऊ शकते.


अशा प्रकारच्या या दान प्रक्रियेमुळं सर्व समस्यांचा शेवट होईल असं नाही आणि दान हाच सर्व समस्यांवरचा उपाय आहे अशातलाही भाग नाही, परंतु या कार्यांमुळं गरीबांच्या जीवनात काहीतरी नक्कीच फरक पडतो.

अद्यापही आपल्याकडे कदाचित काही वाढीव शर्ट्स असतील, किंवा अजूनही फोडलेली नाहीत अशी अन्नाची पाकिटं असतील, तर अशा गोष्टींचा गरजू लोकांना मोठा उपयोग होऊ शकतो. अशा प्रकारे, अशा गरजूं लोकांच्या मुलभूत गरजा भागल्या तर कदाचित आता पुढच्या जेवणाचं काय करायचं अशी चिंता करत बसण्याऐवजी, आपल्या मुलाला शाळेत पाठवण्यासाठी काय करता येईल असा विचार करण्याच्या स्थितीत ते पोहचू शकतील. तुटपुंज्या पगाराची कुठे नोकरी मिळते का याचा विचार करण्यापेक्षा ते स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याबाबत विचार सुरू करू शकतील.

मयंक आणि त्यांच्या टीमला अशा पद्धतीनं गोळा केलेल्या मदती गरजूंपर्यंत पोहचवण्यातून समाधान मिळतं. विशिष्ट ध्येय ठेऊन काम करण्याचं समाधान मिळतं. या गोष्टीमुळं त्यांचं ई-दान मध्ये काम करणं अर्थपूर्ण बनवतं.

मयंक म्हणतात, “ जेव्हा तुम्ही तुमच्या मनाचं ऐकता तेव्हा तुमच्या अंतिम लक्षाच्या दिशेनं उचललेलं प्रत्येक छोटं पाऊल ( आमच्या बाबतित ‘ई-दानला’ ‘वस्तूचं दान करा’ या संकल्पनेत रूपांतरीत करणं) हे काहीतरी छान, जबरदस्त करण्याचा एक उत्सवच असतो, आणि ही भावनाच आम्हाला सतत कार्यरत ठेवते.”

अन्नदानाच्या माध्यमातून हॉटेल्सना स्वयंसेवी संस्थासोबत जोडण्याच्या उद्देशानं ई-दाननं नुकतीच ऑनलाईन फुड ऑर्डरिंगचं व्यासपीठ समजलं जाणा-या Megamenu.in, सोबत या लोकोपयोगी कार्यासाठी भागीदारी केली आहे. अशा या सर्जनशील भागीदारीमध्येच ई-दानचं हे परोपकारी मॉडेल या क्षेत्राच्या सीमा ओलांडून दान दाते आणि स्वयंसेवी संस्थांमधलं अंतर सांधण्याचं काम करेल आणि यातच ई-दानच्या यशाचं भविष्य दडलेलं आहे. ई-दानच्या वेबसाईटला भेट देऊन आपण कसे दान करू शकतो याबाबत जाणून घ्या, किंवा YS Pages ला भेट द्या.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा