संपादने
Marathi

निल्मा दिलीपन यांच्या दोन व्यवसायांच्या यशाचं गमक ‘प्रेमाचा प्याला’ आणि ‘पिवळी छत्री’

Team YS Marathi
31st Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

“लाईट्स, कॅमेरा एक्शन” हे तीन शब्द निल्मा दिलीपनना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. त्यांनी आतापर्यंत ख्रिस गेल, एबी दे विलिअर्स आणि तामिळ अभिनेते सुरिया यांसारख्या अनेक सेलिब्रिटीजसोबत काम केलं आहे. तुफानी अनु आंटी या व्हिडीओची संकल्पनाही त्यांचीच.

२७ वर्षीय निल्मांचा जन्म केरळमधल्या त्रिशूर इथला, पण त्या बेंगळूरुमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी बेंगळूरुमधल्या माउंट कारमेल कॉलेजमधून कम्युनिकेशन्समध्ये पदवी संपादन केली आहे. निल्मा ‘यलो अम्ब्रेला प्रोडक्शन्स’ (Yellow Umbrella Productions) च्या मालक आणि प्रोड्युसर आहेत. त्याचसोबत त्यांनी ‘विथ लव’ (With Love) ही इव्हेंट स्टाईलिंग कंपनीही सुरू केलीय.

image


पिढीजात व्यावसायिक

निल्माचे पालक गेल्या ३० वर्षांपासून एडव्हर्टायझिंग कंपनीचं काम पाहत आहेत. त्यांची आई आता कूर्गमध्ये ‘इको-फ्रेंडली होम स्टे’ सुरू करत आहेत. तर निल्मा यांची २१ वर्षांची बहिण कोडाईकानलला स्वतःच कॅफे सुरू करत आहे. निल्मा हसत म्हणतात, “हे आमच्या रक्तातच आहे. आम्ही पिढीजात व्यावसायिक आहोत”.

निल्मांचा प्रवास

जून २००९ मध्ये एका फिल्म प्रोडक्शन हाऊसमध्ये प्रोड्युसर म्हणून त्यांनी कामाला सुरूवात केली. पण त्यांना नेमून दिलेलं काम न दिल्याने त्यांनी सहा महिन्यातच तिथे राम राम ठोकला. त्या इतक्या सहज हार मानणाऱ्यातल्या नव्हत्या. २०१० मध्ये त्यांनी बेंगळूरुच्या एमव्ही प्रोडक्शन्समध्ये कामाला सुरूवात केली. तिथल्या ४ वर्षाच्या कालावधीत कामानिमित्त त्यांना जगभर फिरता आलं. त्या आपल्या आठवणींना उजाळा देत सांगतात, “मला खूप अविस्मरणीय अनुभव आले. एखाद्या ठिकाणी पोहचल्यावर जेट लॅग चा विचार न करता लगेचच काम सुरू करायला लागायचं. त्यामुळे मला क्वचितच झोप मिळायची.”

image


देशोदेशीच्या लोकांसोबत काम करताना त्या दुसऱ्यांच्या वेळेचा आदर करायला शिकल्या. त्यांच्या शूटस् वर त्या सर्वांशी समानतेने वागतात आणि त्यांच्या टीममधले लोकही सर्वांशी तसंच वागतील याकरता प्रयत्न करतात. त्या सांगतात, “परदेशात सर्वचजण वेळेवर येतात. मी ज्या ज्या देशांमध्ये गेले तिथे सर्वांना समान वागणूक देतात. दिग्दर्शक आणि लाईटबॉय सगळ्यांना एक समान मान दिला जातो”.

त्या अद्भूत चार वर्षांनंतरही निल्मा संतुष्ट नव्हत्या. त्यांना नेतृत्व करायला, पुढे येऊन एखादी गोष्ट करायला आणि काहीतरी नवीन करायला नेहमीच आवडायचं. निल्मांचं व्यवस्थापन, समन्वयकता आणि नेतृत्व गुण कोवळ्या वयात त्यांच्यात रुजलं गेलं. त्यांना जे काही करायचयं ते त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर केलं.

निल्मांनी त्यांचं पहिलं स्टार्ट अप ‘विथ लव’ ऑगस्ट २०१४ मध्ये सुरू केलं. त्या सांगतात, “माझ्या बऱ्याचशा मित्रमैत्रीणींची लग्न होत होती, तर काही जण आई बाबा होण्याच्या मार्गावर होते. मी स्वतःहून त्यांच्या लग्नाची तयारी आणि डोहाळजेवणाची तयारी करून द्यायला जायचे. लोक माझं काम पाहू लागले, त्यांना ते आवडू लागलं. आणि या गोष्टीने मला माझी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा आत्मविश्वास दिला”.

निल्मा विथ लवच्या माध्यमातून बेंगळूरु आणि बेंगळूरु बाहेरही लहान मुलांच्या बर्थडे पार्टीज, विवाह, बॅचलर्स पार्टी, डिनर पार्टीज आयोजित करतात. त्या सांगतात, “विथ लव म्हणजे यात मी तुमच्या घरातला कार्यक्रम हा माझ्याच घरचा असल्याचं मानते आणि अगदी मनापासून प्रेमाने सर्व करते”.

जगभरातले लोक सजावटीबद्दल, कार्यक्रमाबद्दल आपली मत सांगतात ते ऐकून निल्मा अजून उल्हासित होतात आणि त्यांना अनोख्या कल्पना सुचतात. आवश्यक ती मर्यादीत सजावट करून एखादी कल्पना केंद्रीत ठेवून त्या उपलब्ध जागेचा व्यवस्थित वापर करतात. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात रस निर्माण करण्याची ही गुरूकिल्लीच त्यांना सापडलीय.

त्यांच्या मते ‘इको-फ्रेंडली’ विवाह सोहळे हा आजचा ट्रेण्ड बनत आहेत. निल्मा स्पष्ट करतात, “खूपसे ग्राहक आज विवाहांमध्ये उरलेलं अन्न सामाजिक संस्थांना देण्याच्या प्रस्तावाचा स्वीकार करत आहेत. त्याबरोबरच प्लास्टिक आणि पुर्नप्रक्रिया करता न येणाऱ्या वस्तूंचा वापर टाळत आहेत”.

आत्मविश्वासाने हाताळतायत आपले दोन व्यवसाय

निल्मा सांगतात, “मला नेहमीच माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. ज्याला मी माझ्या बाळाप्रमाणे वाढवेन”. त्यांच्या पालकांनी याकरता त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिलं. त्या खळखळून हसून सांगतात, “त्यामुळे एका बाळापेक्षा मी जुळी बाळं वाढवायचं ठरवलं”.

image


आपल्या पहिल्या कंपनीची मुहूर्तमेढ रोवल्यावर आपण आणखीही काही करू शकतो असा विश्वास त्यांना वाटला. मग त्या आपलं पहिलं प्रेम निर्मितीकडे (प्रोडक्शन) वळल्या. पहिल्या कंपनीचं काम सुरू असताना बऱ्याच जणांनी त्यांच्याकडे शूटींगकरता विचारणा केली. त्यामुळे त्यांना जेव्हा दोन इव्हेंटस् दरम्यान वेळ मिळायचा तेव्हा त्या शूटींगच काम घ्यायच्या. हळूहळू कामाचा आवाका वाढला. मग त्यांना वाटलं बऱ्यापैकी काम मिळतयं तर औपचारीकपणे उद्योगाला सुरुवात करूयात. अशाप्रकारे डिसेंबर२०१४ मध्ये त्यांनी यलो अम्ब्रेला प्रोडक्शनस् (Yellow Umbrella Productions) ची सुरूवात केली. ही अॅड फिल्म स्टार्टअप जाहिराती आणि प्रमोशन फिल्मस् बनवतात.

सध्या निल्मा प्रोड्युसर म्हणून योग्य स्थळं, कलाकार आणि तंत्रज्ञांची जमवाजमव करण्याची कसरत करत आहेत. हिशोब, मार्केटिंग आणि बिलिंग याबद्दल तर विचारायलाच नको.

निल्मा सांगतात, “माझे सहकारी जीना, नागराज, अभिनीत आणि माझ्या पालकांचा मला खंबीर पाठींबा आणि सहकार्य आहे. शूटींग किंवा इव्हेंटस् दरम्यान जर काही मदत हवी असेल, एखादा कर्मचारी नसेल तर लगेच माझे पालक तिथे मदतीसाठी हजर होतात. त्यांच्याशिवाय मी हे सर्व कसं निभावेन, किती पुढे जाईन हे मला माहीत नाही. माझी आई माझी ‘मॉमेजर’ आहे. माझी आई माझे सगळे अकाउंटस् सांभाळते. टीडिएस, सर्व्हिस टॅक्स यासारख्या गोष्टी समजावते. मी कला क्षेत्रातली आहे आणि या सगळ्यातलं मला काडीचही कळत नाही. नशिबानं आम्हांला आता एक अकाउटंट मिळाले आहेत. त्यांच्यावर ही सगळी समीकरण सोडून मी निश्चिंत राहू शकते”.

निल्मा एकाच वेळी पेंटर, सुतार, लाईट बॉय, टेम्पो ड्रायव्हरपासून क्रिकेटर्स, अभिनेते, लेखक आणि संगीतकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांसोबत काम करतात. त्यांच्या टीमने विराट कोहली, अनिल कुंबळे, राहुल द्रवीड या क्रिकेट स्टार्ससोबत आयपीएल टीममधील आंतरराष्ट्रीय खेळाडू, केरळ ब्लास्टर्स फूटबॉल टीम आणि मनोज लोबो या पुरस्कारप्राप्त सिनेमाटोग्राफरसोबतही काम केलं आहे.

त्यांनी बॉलिवूड बिईंग वनद्वारे बऱ्याचशा मूकाभिनय कार्यक्रमांचीही निर्मिती केली आहे.

मुन्नाभाईच्या पद्धतीने आव्हानांचा सामना

दोन स्टार्टअप्सना एकटीने सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे कामांकरता योग्य व्यक्तीची निवड हेही एक आव्हान होतं.

image


त्या हसतमुखपणे सांगतात, “कधी कधी तुमची काम वेळेत पूर्ण व्हायला तुम्हाला आक्रमक व्हावं लागत किंवा रागवावं लागतं. पण ही माझी पद्धत नाही. गेल्या वर्षभरात मी थोडीशी अधिकाराने वागायला, कंत्राटदारांकडून सामान किंवा सेवा व्यवस्थित मिळवायला थोडीशी आक्रमक झालीय. त्यांच्या कुठल्याही युक्त्यांना बळी पडत नाही. आमचा मोबादला वेळेत मिळवण्याकरता ग्राहकांच्या मागे तगादाही लावते. त्याकरता मी मुन्नाभाईच्या स्टाईलचा आधार घेतलाय. मोबादला वेळेत दिला नाही तर मी ग्राहकांशी धमकी, अर्वाच्च भाषा किंवा रागात न बोलता त्यांना सभ्यपणे आठवण करून देते”.

वित्तसहाय्य या आणखी एका बाबतीत त्यांना झगडाव लागतं. त्या सांगतात, “मी ज्या अॅड एजन्सीसोबत करार करते त्यांच्याकडून निर्मात्यांना मोबादला वेळेत मिळायला आटोकाट प्रयत्न करते”. पण हे नेहमीच नाही होत. कधी कधी ग्राहक महिनोंमहिने पैसेच देत नाही अशावेळी त्यांना त्यांच्या खिशातून सर्वांचे मोबदले चुकते करावे लागतात.

आयुष्य हे एक मॅरेथॉन आहे

दोन दोन व्यवसायांबद्दल विचारल्यावर त्या म्हणतात, “हे सर्व अचानक घडून गेलं. हे पूर्वनियोजित नव्हतं. मी मला आवडणाऱ्या गोष्टी करत गेले आणि हळूहळू तेच माझं काम बनलं. वेगवेगळ्या लोकांकडून माझ्याकडे कामाचा ओघ येत गेला. वाढता वाढता या गोष्टींचं व्यवसायात रुपांतर झालं”.

तेव्हापासून त्या रोलरकोस्टरची राईड घेत आहेत. बऱ्याचदा सकाळी चार वाजताच सजावटीचं सामान ट्रकमध्ये चढवण्याच्या कामाने त्यांच्या दिवसाची सुरूवात होते. दिवस कधी संपेल हे मात्र त्यांना कधीच माहीत नसतं. कामाच्या या ताणामुळे एकाच वेळी दमायलाही होतं आणि उल्हासित व्हायलाही होतं. त्या सांगतात, “सुरूवातीला माझ्या वाटेत जे येत गेलं ते मी स्वीकारत गेले. पण आता मला ज्यात खरच रस आहे, ज्यातून मला आनंद मिळेल अशाच गोष्टी मी करते. शिवाय ज्यातून कंपनीची वाढ होऊन, भविष्यातही आम्ही टिकून राहून याकडेही लक्ष देते. आश्वासक संधी मी नेहमीच टिपते. मला आशा आहे, लवकरच मला माझं काम आणि आयुष्य यांची सांगड घालणारी लय सापडेल”.

भविष्यातल्या योजना

निल्माचे दोन्ही स्टार्टअप्स सध्या कंबर कसत आहेत. त्या त्यांचं सजावटीचं सामान ठेवायला आणि वाढणाऱ्या टीमकरता मोठी जागा असणाऱ्या ऑफिसच्या शोधात आहेत. हे दोन्ही व्यवसाय स्थिरस्थावर झाल्यावर त्यांचा तिसरा व्यवसाय सुरु करण्याचा विचार आहे.


लेखिका – डायना हुबर्ट

अनुवादक – साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags