संपादने
Marathi

ओसवाल समूहाचा वारस अक्षय! वसा तोच पण ठसा वेगळा!!

7th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

ख्यातनाम ओसवाल उद्योग समूहाचा वारस अक्षय ओसवाल. अक्षय लक्ष्मीपुत्रच. ठरवले असते तर कौटुंबिक उदिमाचा एक घटक होऊन हाच वसा आणि वारसा अक्षय यांना पुढे चालवता आला असता. पण व्यवसायातील आपला स्वतंत्र बाणा त्यांना जोपासायचा होता. ट्रॅव्हलिंगची आवड, पर्यटनाचा नाद, जोखिम पत्करण्याची क्षमता आणि भारतात वाढीला लागलेली ‘स्टार्टअप’ संस्कृती या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून अक्षय यांनी आपली स्वतंत्र वाट चोखाळली. त्यांनी ‘किकस्टार्क’ सुरू केले.

अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीमध्ये उद्योजकतेतील पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच अक्षय यांचा कल आपला स्वतंत्र उद्योग-व्यवसाय सुरू करण्याकडे चांगलाच विकसित झालेला होता. अमेरिकेतील साडेतीन वर्षांच्या वास्तव्यात अक्षय यांनी या देशातील ३० राज्यांतील अनेक भाग आडवे-उभे पालथे घातलेले होते. खुप प्रवास केलेला होता. प्रवासाची आणि पर्यटनाची अर्थात आवड होतीच. ते या काळात केवळ अमेरिकेतच नव्हे तर महिने दोन महिने बऱ्यापैकी युरोपही धुंडाळून आलेले होते. ते म्हणतात, ‘‘या सगळ्या फिरण्यामधून जे काही अनुभव मला आले, त्या अनुभवांनीच खरंतर पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मला दिली.’’

तीन महिन्यांपूर्वीच अक्षय यांचा हा नवा व्यवसाय सुरू झालेला आहे. लुधियाना हे या व्यवसायाचे मुख्यालय आहे. ट्रेंडसेट ट्रॅव्हलरचे मुख्य ध्येय एका छताखाली पर्यटनाशी निगडित सर्व सुविधा उपलब्ध करून देणे हे आहे. ट्रेंडसेट ट्रॅव्हलर ग्राहकांना अनुभवावर आधारित अन आजमावलेले टुर पॅकेज उपलब्ध करून देते. उदाहरणार्थ आफ्रिकन सफारी, अंटार्ट्रिका क्रुइज्, लडाख लक्झरी टेंट स्टे आदी. जेथे भेट द्यावयाची वा जायचे तेथील वातावरणाला अनुकूल असे सगळेच साहित्यही ट्रेंडसेट ट्रॅव्हलरच्या माध्यमातून ग्राहक स्वत:करिता उपलब्ध करून घेऊ शकतात.

image


सुरवातीच्या काळात अक्षय यांना काही अडचणी आल्या. अर्थात अक्षय यांनी स्वत:च वैयक्तिक पातळीवर पर्यटनाचा दीर्घ अनुभव घेतलेला होता. आणि याच बळावर ते पर्यटन उद्योगात शिरलेले होते. सबब सर्व अडचणींवर त्यांनी लिलया मात केली.

भारतामध्ये त्या-त्या ठिकाणचा अनुभव घेण्यासाठीचे पर्यटन तितकेसे प्रचलित झालेले नाही. मैलोन्मैल देशोदेश पर्यटनापेक्षा एका विशिष्ट अनुभवासाठी पर्यटन ग्राहकांच्या गळी उतरवणे तसे जिकिरीचेच. लोकांमध्ये त्यासाठी जागरूकता आणण्याची आवश्यकता आहे. अक्षय ओसवाल हेच कार्य करीत आहेत. पॅरिसहून निघाले, की लंडन मग तिथून बर्लिन असे करण्यापेक्षा समजा आफ्रिकन सफारी हा एक टुर पॅकेज निवडला तर आफ्रिकेत जरा निवांत राहायचे. तेथील जंगलांचा वाघ-सिंहांचा अनुभव घ्यायचा. लोकजीवन अनुभवायचे.

अशा प्रकारच्या एकात्मिक पर्यटनासंबंधी, युनिक ट्रॅव्हलिंगसंबंधी लोकांमध्ये आपण आपल्या पातळीवर जागरूकता आणतो आहोतच, पण इतर माध्यमांनीही यासाठी पुढे यायला हवे, अशी अक्षय यांची अपेक्षा आहे. अक्षय यांची ट्रेंडसेट ट्रॅव्हलर अशा प्रकारचा अनुभव आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देते. त्या-त्या ठिकाणचा मृदगंध अनुभवल्याशिवाय पर्यटनाला अर्थ तरी काय, असा अक्षय यांचा सवाल आहे. लक्झरी ग्रुप ट्रॅव्हल क्षेत्रालाही वाव आहे, फक्त लोकांमध्ये अशा प्रकारच्या पर्यटनाची अभिरूची रुजवण्याची गरज आहे. ट्रेंडसेट ट्रॅव्हलर नावाप्रमाणेच पर्यटनाचा नवा ट्रेंड सेट करू पाहात आहे. इतर ट्रॅव्हल एजंसीज्सारखे ट्रेंडसेटचे पर्यटनस्वरूप रुटिन नाही. सामान्य तर नाहीच नाही. ते खचितच विशेष आहे!

‘‘आम्ही स्वत:ला पर्यटनातील असा अनुभव उपलब्ध करून देणारी कंपनी समजतो, जसा अनुभव अन्य कुणीही उपलब्ध करून देऊ शकत नाही. आमच्याप्रमाणेच आपापल्या क्षेत्रात विशेष असलेल्या कंपन्यांशी आमची व्यावसायिक भागीदारी आहे, त्यामुळेच हे आम्हाला सहज शक्य होते. जे लोक अशा आगळ्या आणि खऱ्याखुऱ्या पर्यटनाचा आनंद घेऊ इच्छितात त्यांच्या सोयी-सुविधांसाठी आमच्या सर्व सेवा समर्पित आहेत. अशा पर्यटकांचे अनुभव आम्ही शेअर करतो. त्यातून असल्या-नसल्या उणिवाही दूर करतो.’’

‘ताज,’ ‘ओबेराय’, ‘आयटीसी’सारख्या पंचतारांकित हॉटेल समूहांसोबतही ‘ट्रेंडसेट ट्रॅव्हलर्स’चे व्यवहार होतात. परदेशांतील अशा प्रकारच्या समूहांशीही ‘ट्रेंडसेट ट्रॅव्हलर्स’चे व्यावसायिक संबंध आहेत. इथे मुक्कामी असलेले ग्राहक ‘ट्रेंडसेट’च्या माध्यमातून आगळ्या पर्यटनाचा अनुभव घेतात. घेऊ शकतात. आफ्रिकेतील साहसी सफर असो वा मोरोक्कोतील खास खवय्येगिरी किंवा मग जगभरातील बेटांवरला मधुचंद्र असो सगळी सेटिंग ‘ट्रेंडसेट’ लावून देते. तुम्हाला फक्त आनंद घ्यायचा असतो.

अक्षय म्हणतात, ‘‘आम्ही पर्यटकांना आवश्यक ते साहित्य देतो. पॅकेजेस देतो. त्यांना हवे-नको ते बघतो. पर्यटनाचा आनंद देतो. एका वाक्यात सांगायचे तर आनंददायक पर्यटनासाठी आम्ही परफेक्ट प्लेटफॉर्म आहोत.’’

ट्रॅव्हल पॅकेज बुकिंगच्या माध्यमातून तसेच पर्यटन साहित्याच्या विक्रीतून कंपनीला महसूल मिळतो. आपल्या वेबसाइटवर बॅनर स्पेस उपलब्ध करून देत आणखी महसूल मिळवण्यावर कंपनीचा भर असणार आहे.

व्यवसाय सुरू झाल्यापासून ते आतापावेतो म्हणजे एकुणात ३ महिन्यांमध्ये १४ ग्राहकांनी ‘ट्रेंडसेट’च्या सेवेचा लाभ घेतलेला आहे. एक लाख ते ३५ लाख रुपर्यांपर्यंत शुल्क या ग्राहकांनी अदा केलेले आहे. अक्षय म्हणतात, ‘‘इतर ट्रॅव्हल एजंसीज्पेक्षा आम्ही अत्यंत वेगळे आहोत. इकॉनॉमी क्लास फ्लाइट बुकिंग्ज् आणि दोन अगर तिन रात्रींचा वाट्टेल त्या हॉटेलांतील मुक्काम असं आमच्या ऑफरमध्ये काहीही नसतं. आम्ही आमच्या ग्राहकांना आमच्या देश-विदेशातील भागीदारांच्या माध्यमातून मुख्यत्वे पर्यटनाचा खराखुरा अनुभव देतो.

दिल्लीतून ट्रेंडसेटला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. दिल्लीत ट्रेंडसेटचे कार्यालयही सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीकडून मोबाईल ॲअॅप विकसित करण्याचेही चाललेले आहे. या ॲअॅपवर लोक आपल्या पर्यटनाचा अनुभव शेअर करू शकतील. त्यावर फोटोही टाकता येतील.

ट्रॅव्हल इव्हेंट आयोजिण्यावरही कंपनीचा भर आहे. प्रायोजकांच्या सहकार्याने पर्यटनाला चालना देतील असे कार्यक्रम मोठ्या शहरांतून घेण्याचा कंपनीचा बेत आहे.

अक्षय म्हणतात, ‘‘आमच्यासमवेत पर्यटन करणाऱ्यांना आम्ही आमंत्रित करीत आहोत. त्यांनी पर्यटनादरम्यानचे त्यांचे अनुभव, पर्यटनाशी निगडित कथा आमच्या व्यासपीठावर शेअर कराव्यात. एक ऑनलाइन नियतकालिक आम्ही लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. आगळे पर्यटन अनुभव त्यात वाचायला मिळतील आणि इतरांना पर्यटनाकडे कसे बघावे, त्याबाबतची दृष्टी मिळेल.’’

भारतातील ट्रॅव्हल आणि टुरिज्म मार्केट जवळपास ४२ बिलियन डॉलरचे आहे. पुढल्या दहा वर्षांत त्यात आणखी वाढ होणार आहे. ‘वल्ड टुरिज्म आर्गनायझेशन’च्या अहवालानुसार २०२० पर्यंत भारत हा दक्षिण आशियातील पर्यटन उद्योगात ८.९ दशलक्ष पर्यटकसंख्येसह सर्वाधिक आघाडीवरला देश असेल.

मेकमायट्रिप, यात्रा आणि क्लिअर ट्रिप या कंपन्यांची ऑनलाइन ट्रॅव्हल उद्योगात आघाडी आहे. अलीकडेच स्टेझिलाडॉटकॉम, मायगोला, ट्रॅव्हल ट्रँगलसारख्या कंपन्याही या क्षेत्रात उतरलेल्या आहेत. या सगळ्याच ट्रॅव्हल्स स्टार्टअपनी आपल्या कामगिरीच्या बळावर बाजारातले आपले स्थान भक्कम केलेले आहे आणि इतरांनाही या कंपन्या जणू ऑनलाइन ट्रॅव्हलिंग क्षेत्रासाठी खुणावत आहेत.

लेखिका- अपराजिता चौधरी

अनुवाद- चंद्रकांत यादव

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags