कथाकथनाची कला शिकवणारं ‘कथालय’

कथाकथनाची कला शिकवणारं ‘कथालय’

Sunday November 08, 2015,

3 min Read


कथाकथन किंवा कथावाचन हे इतरांशी संवाद साधण्याचं आणि आपले विचार व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. आपण इतरांकडून लिखित किंवा तोंडी स्वरुपात जी माहिती मिळवतो तीच माहिती आपण एखाद्या कथेच्या रुपात व्यक्त करतो. भूतकाळातील घटना आणि विविध माध्यमांमधून मिळालेली माहिती आपण एकत्रित करुन जेव्हा सांगतो तेव्हा त्या वास्तव असल्यासारख्या वाटतात. पण शिक्षणाच्या बाबतीत कथेबद्दल बोलायचं तर तिथं फक्त पाठांतराला महत्त्व दिलं जातं. त्यामुळे कथेतील पात्र आणि त्यांच्या कृती वेगवेगळया गटात विभागल्या गेल्यानं कथेचा आत्माच हरवतो. आपल्या या शिक्षण पद्धतीला गीता रामानुजन यांनी स्थापन केलेल्या ‘कथालय’ने पर्याय उपलब्ध केलाय. गेल्या १८ वर्षांपासून शिक्षक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना कथालयतर्फे कथाकथनाची कला शिकवली जातेय आणि समाजात एक सकारात्मक परिणाम साधण्याचा प्रयत्न केला जातोय.

image


गीता यांच्या ड़ोक्यात कथालयची संकल्पना त्या शिक्षिका म्हणून काम करत असताना आली. ठराविक पद्धतीनुसार शिकवताना विद्यार्थ्यांना त्यात अजिबात उत्साह वाटत नसल्याची जाणीव त्यांना झाली. “लहानपणी वडील ज्या पद्धतीने इतिहास गोष्टीच्या रुपात शिकवायचे त्याप्रमाणेच आपण विद्यार्थ्यांना नवीन पद्धतीने शिकवावं,” असा विचार केल्याचं गीता सांगतात.

सध्या कथालयतर्फे देशाच्या शहरी आणि ग्रामीण भागात दौरे केले जात आहेत. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना कथाकथनची आकर्षक पद्धत शिकवली जाते. त्यासाठी कथावाचन सत्रांचं आयोजन केलं जातं. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावं यासाठी त्यांना साधनसामग्री उपलब्ध करुन देण्याबरोबरच काही विशिष्ट वर्गांबाबत त्यांनी स्वत: तयार केलेल्या कथाही उपलब्ध करुन दिल्या जातात. कथांमधून लोकांपर्यंत योग्य तो संदेश पोहोचवता येतो. या कथांमध्ये लोकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते असं गीता सांगतात.

त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून देशभरातील काही शाळांनी कथावाचन हा विषय म्हणून आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलाय. कथालयने आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजशास्त्रात विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल यावर लक्ष केंद्रित केलंय. त्याशिवाय शब्दसंग्रह, पर्यावरण जागृती आणि भाषा विकास यावरही जोर दिला जातो. देशाच्या सांस्कृतिक वैविध्याचा विचार करुन स्थानिक भाषांमध्येही असे कार्यक्रम संस्थेतर्फे राबवले जातात.

कथा सांगताना कथा सांगणारा आणि श्रोत्यांमध्ये एकप्रकारचं भावनिक नातं निर्माण होतं. यातूनच मग विद्यार्थ्यांना अभ्यासात रस वाटायला लागल्याचं गीता सांगतात.


image


आजच्या डिजिटल युगात कथाकथनसारख्या प्राचीन कलेच्या संरक्षणासाठी अनेक आव्हानं आहेत. यातील मोठं आव्हान म्हणजे विद्यार्थ्यांचं या तंत्रज्ञानावर वाढत असलेलं अवलंबित्व.. आता विद्यार्थी पूर्ण शब्द वापरण्याऐवजी एका अक्षरात उत्तर देतात. त्यांना स्वतःला व्यक्त करता येत नाही. “ मला वाटतं आपण आपलं संवादकौशल्य हरवत चाललो आहोत”, असं मत गीता व्यक्त करतात.

आपल्या कामाचं महत्त्व लक्षात घेऊन कथालयने कथावाचनातील पहिली आणि जागतिक मान्यता लाभलेली “ऍकेडमी ऑफ स्टोरीटेलिंग” ची स्थापना केलीये. या प्रशिक्षण केंद्रात शिक्षक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, मोठ्या कंपन्यांमधले अधिकारी यांना उपयुक्त असे अभ्यासक्रम शिकवले जातात. कथाकथनाच्या अभ्यासक्रमातून ते आपापल्या कार्यक्षेत्रात मूल्यसंवर्धनाचं काम करत असल्याचं गीता सांगतात.

त्यामुळेच ज्यांना आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवायचे आहेत, ज्यांना संवादाचं महत्त्व कळतं त्यांना कथाकथन हा खूप चांगला पर्याय आहे, त्यासाठी त्यांना कथाकथनाची कला शिकणं फायद्याचं ठरु शकतं. आपली कथा ऐकणाऱ्या श्रोत्याला ती आवडली आणि त्यातील काहीतरी तो मनात साठवून नेतो ही भावनाच कथा सांगणाऱ्याला खूप समाधान देऊन जाते, असं गीता सांगतात.

तुम्हीही तुमचं कथाकथन सुधारु इच्छिता?

    Share on
    close