संपादने
Marathi

वॉरटन स्कूलच्या माजी विद्यार्थ्याची भव्यदिव्य लग्नसोहळे एका मांडवाखाली आणण्याची मनिषा

23rd Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

गेल्या उन्हाळ्यात, समीर लोढा त्यांच्या चुलत भावाच्या लग्नाला ओरिसाला गेले होते. यावेळी सगळी लगीनघाई बघून त्यांना वाटलं, त्यांच्या लग्नाच्या तयारीत १५ वर्षापूर्वी जी गडबड, गोंधळ होता त्या परिस्थितीत अजूनही फार काही फरक पडला नाहीये.

संदीप लोढा, संस्थापक, वेडिंग्जडॉटइन

संदीप लोढा, संस्थापक, वेडिंग्जडॉटइन


कोणत्या कंत्राटदाराकडे जायचं आणि लग्नासाठी कुठली जागा नक्की करायची याबाबत चिंता आणि उडालेल्या गोंधळाची परिस्थिती आजही तशीच आहे. मदतीला लोक आणि अवधीही कमी, त्यात कुटुंबातले सदस्य कंत्राटदाराच्या मागे धावून सगळ्या गोष्टी वेळेवर होण्यासाठी जीवाचा आटापीटा करत असतात. पण संदीपना यातच संधी दिसली.

१९९७ ला आयआयटी पदवी मिळवल्यावर त्यांनी २००६ मध्ये वॉरटन स्कूलमधून आपलं एम.बी.ए.चं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचं बेन अँड कंपनीमध्ये चांगलं बस्तान बसलं. पण तीन वर्षानंतर ते उद्योजक बनण्याच्या स्वप्नाने भारतात परत आले. ४० वर्षीय संदीप सांगतात, “खूपशा गोष्टी आपल्याला भारताकडे अगदी नैसर्गिकपणे ओढतात. एकतर तो आपला देश आहे. तुम्ही इथे जम बसवायला इथली बाजारपेठही तुम्हाला माहित असते. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला भारतीय ग्राहकाची नस कळते, जी तुमच्या यशाची गुरूकिल्ली ठरु शकते”.

पण काही कारणामुळे ती वेळ योग्य नाही ठरली. आणखी काही वर्ष बेन अँड कंपनी सोबत काम करुन संदीप २०१३ मध्ये डिस्ने इंडियामध्ये ग्राहक उत्पादन विभागात रुजू झाले.

अखेरीस २०१४ मध्ये चुलत भावाच्या लग्नाला गेले असताना त्यांच्यातल्या उद्योजकाचा किडा पुन्हा वळवळू लागला. २०१५ मध्ये संदीपनी वेडिंग्जडॉटइन (Weddingz.in) ची मुहूर्तमेढ रोवली.

वेडिंग्ज – प्रेरणा ते व्यवसाय

२०१५ मध्ये वेडिंग्जच्या कामाला सुरुवात झाली. याद्वारे तुम्ही विवाहासंबंधी सर्व उत्पादन आणि सेवा शोधणे, नोंदणी आणि खरेदी या सर्व गोष्टी एकाच छत्राखाली करू शकता. त्यांनी आखणी आणि तयारी केलेल्या विवाहांच्या फोटोंचा मोठा संग्रह पाहून वधू-वर खूप प्रभावित होतात.

पण यात उडी मारताना जरा वेळ घेतल्याचं संदीप सांगतात, “जेव्हा तुमच्यावर तुमचं कुटूंब अवलंबून असतं त्यावेळी हे सुरू करताना तुम्हाला खूप विचार करावा लागतो. पण मला भक्कम साथ देणारे अनेक जण पाठीशी उभे राहिल्याने मी नशिबवान ठरलो”.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान, वेडिंग्जने दिल्ली, पुणे, गोवा, बेंगळुरू, जयपूर, जोधपूर आणि जैसलमेर या शहरांबरोबरच एकूण ११ शहरांमध्ये काम करायला सुरूवात केली आहे. तसेच प्रत्येक शहरात मिळून २ हजार स्थळ आणि कंत्राटदारही जोडले आहेत. त्यांच्या टीममध्ये आता धडाडीचे ८० जण आहेत. यातले २० जण ‘ग्राहक सेवा’ विभागात काम करतात. संदीप यांच्या मते ग्राहक हाच राजा असल्याने त्याला खूश ठेवलंच पाहिजे.


वेडिंग्जडॉटइन चे सदस्य

वेडिंग्जडॉटइन चे सदस्य


पल्ला

संदीप म्हणतात, महिन्यागणिक आमचा व्यवसाय पन्नास टक्क्यांनी वाढतोय. या साईटला ५० हजार जणांनी भेट दिली. ऑक्टोबरमधल्या साडेचारशे ग्राहकांवरुन नोव्हेंबर महिन्यात आम्ही आठशे ग्राहकांचा पल्ला गाठला. ऑक्टोबरमध्ये ७० स्थळांची नोंदणी केली तर नोव्हेंबरमध्ये १०० स्थळांची नोंदणी केली. स्थळ नोंदणीचा दर सरासरी तीन लाखांचा होता. स्थळ नोंदणीतून त्यांना सर्वाधिक उत्पन्न मिळतं. पुढील वर्षात देशभरात नोंदणी आणि साईटला भेट देणाऱ्यांचं प्रमाण १०० पटीने वाढवण्याचं संदीप यांचं लक्ष्य आहे. पण ते सध्याच्या आणि भविष्यातल्या उत्पन्नाच्या आकड्यांवर भाष्य करणं टाळतात. संदीप म्हणतात, “आम्ही खूप मजबूत वाढती मागणी पाहतोय पण जी आम्ही पूर्ण करू शकत नाहीये. या क्षेत्रात एकही मंदीचा किंवा मरगळ आणणारा क्षण नसतो. विवाह हा एक अविस्मरणीय, उत्साहवर्धक सोहळा आहे. नवीन गोष्टी आणि सेवा धुंडाळायला इथे तुम्हाला खूप वाव आहे”.

संदीप सांगतात, मुंबईत कामाला सुरूवात केल्यावर दोनच महिन्यात व्यवसायाने आकाशात झेप घेतली. सध्या हा उद्योग कुटुंबीय, मित्र आणि पतपुरवठादार (एचएनआय) यांच्या वित्तीय सहाय्यावर सुरू आहे.


भविष्यातल्या योजना

वाढत्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देता यावा याकरिता ते सध्या स्थळ नोंदणीसाठी ‘स्वयंचलित स्थळ नोंदणी’ (automating venue bookings) करण्यावर लक्ष्य केंद्रित करत आहेत. प्रत्येक स्थळांची इत्यंभूत माहिती देण्यावरही ते भर देणार आहेत. ज्यामुळे ग्राहकाला तुलना करून निर्णय घेणं सोप जाईल. संदीप सांगतात, बरेचसे ग्राहक प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केल्यावरच विवाहस्थळ नक्की करतात.

पुढील ३ महिन्यात कंपनी त्यांचं मोबाईल एप आणण्याच्या विचारात आहेत. विवाहवेदीवर चढणाऱ्यांना मधुचंद्राला कुठे जाता येईल किंवा अहेराची नोंदणी या गोष्टींचाही यात अंतर्भाव करण्यात येणार आहे.


युअर स्टोरीचं मत

कोंडे नास्ट इंडियानुसार, २०१४ मध्ये वेडिंग प्लानिंग इंडस्ट्रीने ६,६०० कोटींचा गल्ला कमावला आणि २५ -३० टक्क्यांनी हे प्रमाण वाढतयं. भारतात हे क्षेत्र असंघटीत आणि खूप विस्कळीत आहे. ऑफलाईन वेडिंग प्लानर आणि कंत्राटदार जागोजागी आहेत. ऑनलाईन व्यापारातही आता 7वचन, मायशादी, वेडिंग्ज9, अरबनरेस्टो आणि गेटयुअरव्हेन्यू या साईटस आहेत. ह्या साईटस् संपूर्ण विवाहाचं नियोजन करतात किंवा काही फक्त स्थळ नोंदणीसारखी एकमेव सेवा पुरवतात.

भारतातल्या शहरांमध्ये सध्या खरेदी असो की प्लंबर शोधायचा असो सर्वाकरिता ऑनलाईनचा पर्याय लोकप्रिय होत आहे. हीच गोष्ट आता विवाहाबाबतही लागू होत आहे. लग्नाची खरेदी आणि निर्णयांमध्ये शहरातल्या वधू निर्णय घेताना दिसतात. गुगल आणि फॉररेस्टर कन्सलटींग यांच्यानुसार भारतात पुढील वर्षात भारतातल्या शंभर कोटी ऑनलाईन शॉपींग ग्राहकांमध्ये ४० टक्के वाटा हा महिलांचा असणार आहे. ऑनलाईन वेडिंग प्लानर्सकरता ही आनंदाची गोष्ट आहे. लग्नातल्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात पण लवकरचं भारतातले भव्यदिव्य लग्नसोहळे ऑनलाईन साकारले जाणार आहेत.


लेखक – तरुश भल्ला

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags