संपादने
Marathi

धावण्यातील आव्हान मला आवडते – कविता कनपार्थी, संस्थापक, ग्लोबरेसर्स

Supriya Patwardhan
19th Oct 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

कविता कनपार्थी... अगदी तरुण वयात एका अपघातात ही उदयोन्मुख धावपटू गंभीर जखमी झाली... शारिरीक इजांबरोबरच मानसिक धक्काही मोठाच होता... या कोवळ्या वयात कोणीही खचून गेले असते... मात्र कविता या प्रसंगाला जिद्दीने सामोरी गेली आणि आज अनेक धावपटूंसाठी ती एक सुयोग्य मार्गदर्शक बनली आहे. ते देखील ट्रेल रनिंगसारख्या हटके क्षेत्रात (ज्याला काही ठिकाणी माउंटन रनिंगही म्हटले जाते..... या खेळामध्ये नेहमीच्या ट्रॅकवर नाही तर ट्रेल्स अर्थात आडवाटांवर किंवा वेगवेगळ्या भूप्रदेशात धावणे आणि हायकिंग केले जाते)... जाणून घेऊ या तिची कहाणी

“ट्रेल्सवर उतरल्यावर मला संपूर्ण स्वातंत्र्याची अनुभूती येते... यावेळी मी अनुभवत असलेली उर्जा, आनंद आणि उल्हास अवर्णनीय आहे. या अवघड वाटांवर धावण्याचे आव्हान स्विकारायला मला आवडते. तालबद्ध वेगात टाकलेले प्रत्येक दृढ पाऊल, डोंगरावरुन खाली येणारा दुष्कर प्रवास आणि वैविध्यपूर्ण भूप्रदेश मला पुढे जाण्याची ताकद देत राहातात,” ग्लोबरेसर्स या संस्थेच्या रेस डिरेक्टर अर्थात शर्यत संचालक असलेल्या कविता कनपार्थी सांगतात. आज ग्लोबरेसर्स देशभरातील अल्ट्रा रनर्सना एक भक्कम आधार ठरत आहे आणि या संस्थेच्या संस्थापक असलेल्या कविता यांना त्याचा रास्त अभिमानही आहे. पण स्वतः कविता यांच्यासाठी मात्र हा प्रवास अनेक आव्हानांनी भरलेला असाच राहिला आहे.

image


तो दिवस कदाचित त्या कधीच विसरु शकणार नाहीत.. सकाळचे पाच वाजले होते आणि कविता नेहमीप्रमाणेच धावण्यासाठी म्हणून आपल्या मित्राच्या घरी जाण्यास निघाली होती. दुर्दैवाने त्या सकाळी नशिबात मात्र काही भलतेच वाढून ठेवले होते. एका बसच्या धडकेत कविता गंभीर जख्मी झाली. सुमारे तीन आठवडे ती कोमामध्येच होती. त्यानंतरही जेंव्हा ती शुद्धीवर आली त्यावेळी तिला मोठ्या प्रमाणात स्मृतीभ्रंष झाला होता ज्यामुळे तिला अनेक घटनांचा पूर्ण विसर पडला होता. अर्थात अनेक गोष्टी पूर्णपणे नव्याने स्विकारण्याचे आणि एकूणच आयुष्याची पुनर्बांधणी करण्याचे खडतर आव्हान तिच्यासमोर अचानक उभे राहिले होते... त्यावेळी तिचे वय होते अवघे पंधरा वर्ष... शालेय जीवनातील सर्वात महत्वाची बोर्डाची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली होती...

मात्र या खडतर परिस्थितीतही कविता मात्र अविचल होती. ती धैर्याने या साऱ्या प्रसंगाला सामोरी गेली. “ जेंव्हा कधी मी गोंधळून जायची किंवा एखादी गोष्ट अवघड वाटायची, मी लगेच माझे बुट चढवून ट्रेल्स गाठायची. त्यामुळेच माझे मानसिक स्वास्थ्य टिकून रहायचे,” कविता आज सांगतात. शालेय शिक्षणानंतर कविताने अमेरीकेत आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. आजवरच्या त्यांच्या प्रवासात अनेक वळणे आली– इलेक्ट्रीकल अभियांत्रिकीचे शिक्षण, संगणक हार्डवेअरमध्ये काही काळ काम, इंटीरिअर डीजाईनिंग आणि शेवटी अल्ट्रा रेसेसचे आयोजन आणि २००९ साली ग्लोबरेसर्सची स्थापना....

“ ग्लोबरेसर्सची स्थापना योगायोगानेच झाली. अल्ट्रा रेस ऑर्गनायझिंग वेबसाईट करण्याचा खरे तर कोणताच मानस नव्हता. देशभरातील माझ्या धावण्याबाबतच्या अनुभवांची माहिती किंवा नोंदी करण्याच्या हेतूने केलेला तो एक ब्लॉग होता,” त्या सांगतात. पण पुन्हा एकदा नशिबात काही वेगळेच लिहीले होते. २००९ साली काही कामानिमित्त त्या अमेरीकेतून भारतात आल्या होत्या. यावेळी त्या रहात असलेल्या सर्विस अपार्टमेंटमध्येच रहाणाऱ्या आणखी एका धावपटूशी त्यांची भेट झाली. यथावकाश त्यांनी एका पर्वतराजीवर धावण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला.

यासाठी संदकफूची त्यांनी निवड केली होती. या संपूर्ण प्रवासाची सर्व तयारी कविता यांनीच केली होती. “ मला या धावण्याचा समग्र अनुभव घ्यायचा होता. त्यामुळे त्याचे सर्व आयोजन स्वतःच करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक साधनसामग्रीची जमवाजमव करणे, स्थानिकांशी चर्चा करणे, धावण्याचा मार्ग आखणे आणि एकूणच संपूर्ण योजना आखण्याचे काम मी केले,” त्या सांगतात.

image


या अनुभवानंतर आपण देशभरात कोठेही अशा प्रकारे धावण्याच्या शर्यतींचे आयोजन करु शकतो, याची त्यांना जाणीव झाली. त्यावेळी त्या अमेरीकेवरुन खरे तर केवळ काही काळासाठीच भारतात आल्या होत्या मात्र त्यांनी आपला येथील मुक्काम वाढविण्याचा आणि अल्ट्रा रेसेसच्या आयोजनावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. या सर्व शर्यतींकडे त्या वेगळ्या नजरेने पहात होत्या. त्यांनी याबाबतचे लोकांचे अनुभव वाचण्यास सुरुवात केली. तसेच अशा शर्यंतींसाठीचे आंतरराष्ट्रीय मापदंड, त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण इत्यादीबाबतही सविस्तर वाचन केले आणि त्यानंतरच आपल्या पहिल्या मोहिमेच्या पाहणीसाठी पाऊल टाकले. ग्लोबरेसर्सची पहिली शर्यत होती जैसलमेर आणि पोखऱण येथे....

आणि लवकरच म्हणजेच २००९ च्या उत्तरार्धात भारतातील त्यांच्या पहिल्या एन्ड्युरन्स शर्यतीला सुरुवात झाली – 'द थर रन', राजस्थानमधील थरच्या वाळवंटात पाच टप्प्यांमधील २१० किलोमीटरची ही शर्यत होती. “ आम्ही स्पर्धकांची नोंदणी ऑफलाईन केली. केवळ लोकांच्याच माध्यमातून अर्थात तोंडीच याची प्रसिद्धी करण्यात आली होती. ती आमची अगदी पहिली शर्यत होती. आमच्याकडे ना नियमपुस्तिका होती ना भविष्यासाठी खास योजना... अनेक गोष्टी तर अगदी शेवटच्या क्षणी पुढे आल्या पण आम्ही ते व्यवस्थितपणे हाताळले. त्याचबरोबर गॅटोरेड, सनटु आणि सॅलोमनसारखे ब्रॅंड पार्टनर्सही आम्हाला मिळविता आले,” कविता तेंव्हाच्या आठवणींना उजाळा देतात.

भारतातील पहिला अल्ट्रा रनर अरुण भारद्वाज हा आणखी दोन जर्मन्स, दोन सिंगापुरीयन्स आणि एका कॅनेडीयन नागरिकाबरोबर 'द थर रन' मध्ये सहभागी झाला होता. “ ती आमची पहिलीच शर्यत होती. त्यावेळी आम्हाला कुठल्याच गोष्टीची फारशी कल्पना नव्हती, ठोस योजना नव्हती आणि त्यामुळे प्रत्येक शर्यत आम्हाला नवे अनुभव देऊन शिकवत गेली आणि आज आम्ही यातील जाणकार झालो आहोत. यासाठीची पाहणी आणि एकूण आयोजनाचे काम एक वर्ष आधीच सुरु होते. आम्ही आमचे चालक, स्वयंसेवक आणि इतर सर्वांनाच अगदी काटेकोरपणे मार्गदर्शन करतो,” कविता सांगतात.

image


एक कंपनी किंवा संस्था म्हणून प्रगती करत असतानाच ग्लोबरेसर्सचे प्राधान्य केवळ एकाच गोष्टीला राहिले आहे – धावपटूंना... “ भूप्रदेश आणि निसर्गानुसार प्रत्येक शर्यत समजून घेतली जाते आणि त्यानुसार त्याची आखणी केली जाते. आम्ही आमचे नियम फार कडकपणे पाळतो आणि जरी ब्रॅंडस् ना जास्तीत जास्त स्पर्धकांचा समावेश हवा असला तरी आमच्या प्रत्येक शर्यतीत स्पर्धकांची संख्या एका मर्यादेतच असते. गुणोत्तराबाबतही आम्ही अतिशय काटेकोर आहोत आणि प्रत्येक भूप्रदेशानुसार स्वयंसेवक आणि धावपटूंचे गुणोत्तर वेगळे असते,”त्या सांगतात.

याबाबत अधिक विस्ताराने सांगताना त्या म्हणतात, “अल्ट्रा रनर्ससाठी आम्ही एक पोषक आधार बनलो आहोत. स्वतःसाठी काही स्वप्ने बघणारे धावपटू ग्लोबरेसर्सच्या शर्यतीत सहभागी होण्यासाठी येतात. प्रत्यक्ष मैदानात आम्ही त्यांना काय करावे आणि करु नये यासाठी मार्गदर्शन करतो. त्यांनी कशा प्रकारे प्रशिक्षण घ्यावे, शर्यतीपूर्वी काय प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे, अत्यावश्यक साधने कोणती, इत्यादीबाबत सर्व मार्गदर्शन केले जाते. एवढेच नाही तर पराभवाचा सामना कसा करावा किंवा तब्येत साथ देत नसताना काय करावे, याविषयीही त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो. मुख्य म्हणजे स्वतःचा बचाव कसा करावा हे शिकवतो कारण मैदानावर कोणत्याही धावपटूला आम्हाला घालवायचे नसते.”

भारतीय अल्ट्रा रनर्सना एक सुसज्ज व्यासपीठ तयार करणे, जेणेकरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची गणना आघाडीच्या धावपटूंमध्ये होईल, यावरच आगामी काळात ग्लोबरेसर्स सर्वाधिक लक्ष असेल.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags