संपादने
Marathi

कृषी क्षेत्रात क्रांतीची सुरवात करणारे सुभाष मनोहर लोढे यांनी कधीकाळी रस्त्यावर विकली होती घड्याळं

गरिबी आणि गावातील दुष्काळग्रस्त परिस्थिती यातच लहानपण गेले... लहानपणीच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.... बीटेकची डिग्री घेऊनही नोकरी मिळाली नाही... नोकरी मिळाली नाही म्हणून रस्यावर  घड्याळं विकली... नोकरी नसल्यामुळे कितीतरी दिवस फक्त दोन समोसे खाऊनच भूक भागवली.... कंप्यूटरशिक्षण कामात आले... सॉफ्टवेयर कंपनीमध्ये मिळाली चांगली नोकरी.... मात्र एके दिवशी गावात गेले असता नवा मार्ग मिळाला .... लाखो रुपयाची नोकरी सोडून नवीन मार्ग स्वीकारला आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करायचे ठरवले ....

ARVIND YADAV
9th Jun 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

सुभाष मनोहर लोढे हे शहरात नोकरी करत असताना नेहमी आपल्या गावी ये-जा करायचे. असेच एकदा गावी गेले असताना त्यांनी एक अशी गोष्ट पहिली जी त्यांना खूप विचित्र वाटली. एक मेंढपाळ स्मार्ट फोन वापरत होता. त्यांना एक गोष्ट समजली नाही की, एक कमी शिकलेला गरीब मुलगा स्मार्ट फोन कसं काय खरेदी करून शकतो आणि खरेदी जरी केला तरी त्याचा वापर त्याला कसं काय जमू शकतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी आपल्या भावाला विचारपूस केली. सुभाष यांना भावाकडून जी माहिती मिळाली ती तर आणखीनच आश्चर्यचकित करणारी होती. त्यांना कळले की तो मेंढपाळ स्मार्ट फोनचा वापर मटका, जुगार खेळण्यासाठी करतो. स्मार्ट फोन खरेदी करण्यापूर्वी या मेंढपाळाला जुगाराचा डाव लावण्यासाठी खूप दूर जावे लागायचे. त्यासाठी तो मोटरसायकलने जायचा आणि जुगाराचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यवस्थापकाकडे डाव लावायचा, मात्र स्मार्ट फोन खरेदी केल्यानंतर त्याला दूर जाण्याची गरज भासत नव्हती. तो व्हाट्सएप्पच्या माध्यमातून आपला डाव लावायचा आणि त्याचे परिणामही त्याला व्हाट्सएप्पवरच मिळायचे. सुभाष यांच्या लक्षात आले की गावातही टेक्नॉलॉजीचा वापर होऊ लागला आहे, मात्र त्यांना दुखः झाले की मेंढपाळ या टेक्नॉलॉजीचा वापर चुकीच्या आणि बेकायदा गोष्टींसाठी करत आहे. 

image


हे काम करत असतानांच त्यांना आणखी एका वेगळ्याच गोष्टीचा शोध लागला. जेव्हापासून मेंढपाळ जुगार खेळायला लागला होता आणि मोटरसायकलवर दूरवर जाऊन डाव लावत होता, तेव्हा गावातल्या शेतकऱ्यांचे खूप नुकसान व्हायचे. मात्र जेव्हापासून मेंढपाळाने स्मार्ट फोन चा वापर करायला सुरवात केली आणि मोटरसायकलवरून जाणे बंद केले तेव्हापासून गाववाल्यांचे कमी नुकसान होऊ लागले. ही गोष्ट आश्चर्यचकित करणारी होती, मात्र खरी होती. व्हायचे काय की गावातील लोकं आपली जनावरं मेंढपाळाच्या स्वाधीन करायचे. जेणेकरून तो जनावरांना चांगल्या ठिकाणी घेऊन जाऊन चारा खाऊ घालेल. जनावरांना मेंढपाळाच्या ताब्यात देऊन शेतकरी शेती करायला निघून जायचे. शेतीकाम पूर्ण झाल्यानंतर शेतकरी आपली जनावरं पुन्हा घेऊन जायचे. एकप्रकारे मेंढपाळाची शेतकऱ्यांना खूप मदत व्हायची. मात्र जेव्हापासून मेंढपाळाला जुगार खेळण्याचा वाईट नाद लागला तेव्हापासून शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली.

मटका खेळण्यासाठी मेंढपाळाला इतकी घाई व्हायची की तो शेतकऱ्यांच्या जनावरांना वेळेच्या आधीच आणून सोडायचा. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे शेतातील काम अर्धवट सोडून यावे लागायचे. मेंढपाळाचा जुगाराचा शौक त्यांना खूप महागात पडत होता. त्यामुळे सर्वच शेतकरी चिंतेत होते मात्र जेव्हापासून मेंढपाळाने स्मार्ट फोन खरेदी केला तेव्हापासून शेतकऱ्यांची ही अडचण दूर झाली. मेंढपाळाला आता जुगार खेळण्यासाठी अड्डयावर जावे लागत नव्हते, त्यामुळे तो जनावरांना सांभाळू शकत होता. सुभाष यांना मेंढपाळाबद्दल माहिती मिळाली, त्यांच्या मनात वेगवेगळे नवीन विचार येऊ लागले. त्यांनी असा विचार केला की जर गावात मेंढपाळ जर स्मार्टफोनचा वापर करू शकतो तर इतर लोकं का नाही करू शकणार?

image


मेंढपाळ तर स्मार्ट फोनचा वापर चुकीच्या कामासाठी करत आहे, मात्र इतर शेतकरी त्याचा वापर चागल्या कामासाठी का नाही करू शकत? स्मार्टफोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती पोहोचवली जाऊ शकते ज्याचा त्यांना फायदा होईल. आणि याच प्रश्नांचे उत्तरं शोधता शोधता सुभाष यांच्या मनात क्रांतिकारी विचार आले. त्यांनी स्मार्ट फोन सारख्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत शेतीविषयक उपयुक्त माहिती पोहोचवण्याचा निर्धार केला. ज्यामुळे त्यांना शेती करताना फायदा होईल. तिथून काही दिवसातच त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरवात केली.

सुभाष यांनी हवामानविषयी माहिती, मातीची गुणवत्ता, बि-बियाने, खते, रसायने, बाजारात सुरु असलेले विविध उत्पादनाचे भाव याविषयीची संपूर्ण माहिती स्मार्ट फोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवण्याच्या दिशेने काम सुरु केले. शेतकऱ्यांना मदत करण्याचा त्यांचा निर्धार पक्का होता, त्यासाठी त्यांनी आपल्या लाखो रुपयांच्या नोकरीवर पाणी सोडले. मार्च २०१५ मध्ये नोकरी सोडल्यानंतर सुभाष यांनी देशातल्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी अॅग्रोबुक नावाचे स्टार्टअप सुरु केले. Agrowbook.com च्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा देशात आयटी टेक्नोलॉजी आणि स्मार्ट फोनच्या माध्यमातून शेतीसंबंधी, पशुपालन आणि मत्स्य व्यवसायासंबंधी शेतकऱ्यांना लाभदायक अशी माहिती द्यायला सुरवात केली. . Agrowbook.com च्या माध्यमातून सुभाष शेतकऱ्यांना शेतामध्ये भरघोस उत्पन्न कसे घ्यायचे याविषयीही माहिती देत आहे. देशात आणि परदेशात शेतीविषयी नवनवीन संशोधनाबद्दलही आता शेतकऱ्यांना माहिती मिळत आहे. agrowbook.com ला राष्ट्रीय ग्रामीण अनुसंधान प्रबंधन अकादमी तर्फेही मदत मिळत आहे. या मदतीमुळेच त्यांना देशात कृषी क्षेत्रात ठिकठिकाणी लावण्यात येणाऱ्या शेतीसाठी उपयुक्त अशा सशोधनाबद्दल माहिती मिळत आहे. या स्टार्टअपचा राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थान बरोबरही करार झालेला आहे. या करारमार्फत agrowbook.com रूरल टेक्नोलॉजी पार्क ची माहिती देशभरात प्रसारित करत आहे.

image


सुभाष यांचा प्रयत्न आहे की, आयटी टेक्नोलॉजी आणि आधुनिक अशा सहजरीत्या उपलब्ध इलेक्ट्रॉनिक वस्तुच्या माध्यमातून देशभरातले शेतकरी जोडले जावे, जेणेकरून ते आपापसात ज्ञान-विज्ञान, स्वानुभव, यशस्वी प्रयोगाची माहिती एकमेकांना सांगतील आणि त्याद्वारे स्वतःची प्रगती साधतील. Agrowbook.com हे एक असे माध्यम आहे, ज्याद्वारे वीज, पाणी, धान्य याविषयीची योग्य वेळेस योग्य माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्याचे उपायही सुभाष आपल्या या स्टार्टअपच्या या माध्यमातून सांगत आहे. Agrowbook.com वर त्यांनी अनेक उपयुक्तता दर्शवणारे व्हिडीओ सुद्धा टाकले आहे, जे पाहून शेतकरी बरेच काही शिकू शकतात, माहिती घेऊ शकतात. Agrowbook चे अॅपही उपलब्ध करण्यात आले आहे.

सुभाष सांगतात की, “ही तर केवळ सुरवात आहे, अजून बरेच काम करावयाचे आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आणखी बरीच माहिती गोळा करायची आहे.” महत्वाची गोष्ट म्हणजे सुभाष यांनी Agrowbook.com चा विस्तार करत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विकासाचे नवीन मार्ग दाखवण्यासाठी मोठी योजनाही तयार केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारी आणि गैर-सरकारी संस्था, संशोधन केंद्र, शेतकरी संघटनांशी जोडले गेले आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी झटणारे सुभाष हेही शेतकरी कुटुंबातलेच आहे. लहानपणापासूनच ते शेतीशी जोडले गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या ते योग्य पद्धतीने जाणतात आणि समजून घेतात. सुभाष यांनीही त्यांच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला आहे. गरिबी आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीचा त्यांनी अनेकवेळा सामना केला आहे.

image


जीवनात पदोपदी संघर्ष करत विकास साधणाऱ्या सुभाष यांची कहाणी निश्चितच प्रेरणादायी आहे. यवतमाळ जिल्यात वणी या गावात सुभाष यांचा ७ डिसेंबर १९७९ मध्ये जन्म झाला. वडिलांचा शेती व्यवसाय होता आणि आपल्या सात एकर जमिनीवर शेती करून ते आपले कुटुंब चालवायचे. पण ज्या भागात त्यांची शेती होती त्या भागात पावसाचं प्रमाण फारच कमी होतं. नेहमी दुष्काळसदृश परिस्थिती असायची. यवतमाळ जिल्हा संपूर्ण देशभरात शेतकरी आत्महत्येमुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या जिल्यात पावसाचा नेहमीच अभाव असल्यामुळे इथला शेतकरी कायम चिंतेत असतो. अशा दुष्काळग्रस्त भागात राहणाऱ्या सुभाष यांच्या वडिलांना नेहमीच वाटायाचे की आपल्या मुलाने खूप शिकावे आणि चांगली नोकरी करावी. सुभाष यांच्या वडिलांनी त्यांच्या शाळेचा दाखला जिल्हा परिषदेच्या शाळेत केला. या ठिकाणी त्यांनी पाचवी पर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे संपूर्ण शिक्षण मराठी मिडीयममधून झाले. त्यानंतर सुभाष यांनी सहावी ते आठवी पर्यंतच शिक्षण यवतमाळच्या नवोदय विद्यालयमधून घेतले. त्यानंतर शाळेमार्फत आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जम्मू-कश्मीर मध्ये जाऊन शिकण्याची संधी मिळाली. सुभाष यांनी दोन वर्ष जम्मू-कश्मीरच्या नवोदय विद्यालय मधून शिक्षण घेतले. जम्मू-कश्मीरमध्ये दहावीची परीक्षा पास केल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावी वणीला आले. वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयातून त्यांनी बारावीची परीक्षा पास केली.

शाळेचा अभ्यास सुरु असताना सुभाष यांना जेव्हा केव्हा वेळ मिळायचा ते आपल्या वडिलांना शेती कामात मदत करायचे. लहानपणापासूनच त्यांनी शेतीचे काम करायला सुरवात केली होती. तरुण वयात त्यांना शेतीची संपूर्ण कामं करायला जमायची. म्हशीचे दुध काढण्यापासून त्याची विक्री करणे तसेच जनावरांना चारा खाऊ घालायचे कामही सुभाष करायचे. बारावीच्या परीक्षेनंतर सुभाष यांना गुणवतेवर आणि प्रवेश परीक्षेच्या गुणांवर शेगाँव इंजीनियरिंग कॉलेज मध्ये सीट मिळाली. १९९८ ते २००२ पर्यंत सुभाष यांनी याच कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बीटेक (इलेक्ट्रिकल्स - पॉवर) ची डिग्री मिळवली.

बीटेकची डिग्री मिळाल्यावर सुभाष आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला की आता त्यांना चांगल्या ठिकाणी, चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. नोकरीमुळे आर्थिक अडचणी दूर होतील. मात्र तसे झाले नाही, सुभाष यांना लगेचच नोकरी मिळाली नाही. नोकरी मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी पायपीट करावी लागली. शिक्षण असूनही त्यांना नोकरी मिळत नव्हती. घरातून जरी त्यांच्यावर कुठलाही दबाव नसला तरी सुभाष यांना माहित होते की, आपल्या घरातले आपल्याला चांगली नोकरी मिळेल अशी आशा बाळगत आहे. आणि त्यांची ही अपेक्षा स्वाभाविकच होती. कारण सुभाष यांच्या आई-वडिलांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करायला बरेच पैसे खर्च केलेले होते. नोकरी न मिळाल्यामुळे सुभाष यांची मनस्थिती फार वाईट होती. ते बेचैन होते. नोकरी मिळावी म्हणून ते नागपूरला गेले. जेव्हा तिथेही नोकरी नाही मिळाली तेव्हा त्यांनी निराश होऊन रस्त्यांवर घड्याळ विक्रीचे काम सुरु केले.

संघर्षाच्या त्या दिवसांच्या आठवणी सांगताना सुभाष म्हणाले की, “ मी नोकरी मिळावी म्हणून नागपूरला गेलो होतो. तिथे मी भावाच्या एका मित्राकडे रहायचो. नोकरीसाठी खूप भटकंती केली मात्र नोकरी मिळाली नाही. मला कळत नव्हते की मी काय करू. खाली मनात अनेक विचार यायला लागले. त्या परिस्थितीत मी काही दिवस रस्त्यावर गॅजेटही विकले. मात्र लवकरच मला लक्षात आले की, माझा जन्म या कामासाठी नाही झाला.”

बिना नोकरीचे ते दिवस किती वेदनादायी होते याचे उदाहरण म्हणून सुभाष यांनी आम्हाला सांगितले की, “फक्त दोन समोसे खाऊन मी रहात होतो, अशा परिस्थितीत मी सात-आठ महिने नागपूरमध्ये घालवले होते, जे मी कधीही विसरू शकणार नाही.”

image


२००३ मध्ये सुभाष यांना नोकरी मिळाली. मुंबईच्या ऐरोली भागात श्रीराम पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये त्यांना लेक्चररचे काम मिळाले. या ठिकाणी वर्षभर शिकवल्यानंतर त्यांना ठाण्याच्या केसी कॉलेज ऑफ़ इंजीनियरिंगमध्ये प्लेसमेंट ऑफिसरची नोकरी मिळाली. इथे काम करत असताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना नोकरी लावून देण्याचे काम केले. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इनफ़ोसिस, टीसीएस सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी लावून दिली होती. विद्यार्थ्यांना नोकरी देतानाचे काम करत असतानाच सुभाष यांच्या लक्षात आले की, ज्या विद्यार्थ्यांना ते नोकरी मिळवून देत होते त्यांना सुभाष यांच्यापेक्षा जास्त पगार होता. त्यांना हेही जाणवले की साॅफ्टवेअर कंपन्या जास्त पगार देतात आणि तिथे रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळे सुभाष यांनी सॉफ्टवेयर प्रोग्रामिंग शिकायला सुरवात केली. सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी संबंधीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांना यूनिसिस नावाच्या कंपनीत नोकरी मिळाली. सॉफ्टवेयर प्रोग्रामिंग शिकण्याचा त्यांचा निर्णय फायद्याचा ठरला. पुढे त्यांनी याच क्षेत्रात खूप प्रगती केली. जवळजवळ चार वर्ष यूनिसिस मध्ये काम केल्यानंतर त्यांनी कंपनी बदलली. नऊ महिने त्यांनी हेक्सावेर टेक्नोलॉजीज मध्ये काम केले. फेब्रुवारी २०११ मध्ये ते हारस्को कॉर्पोरेशन मध्ये रुजू झाले.

नोकरी करतानाच सुभाष यांनी त्यांच्या ग्रामीण भागातील शिकलेल्या तरुणांना मदत करण्याच्या हेतूने ग्रामीण बिज़नेस प्रोसेस आउटसोर्सिंग कंपनी अर्थात ग्रामीण बीपीओ सुरु केले. मुंबईच्या एका रिसोर्टचा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने हे बीपीओ सुरु करण्यात आले होते. नोकरी करत असतानाच अधूनमधून सुभाष आपल्या गावी यायचे. असेच एकदा गावी आले असताना त्यांना मेंढपाळ आपल्या स्मार्ट फोन च्या माध्यमातून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. आणि मग एक नवीन विचार घेऊन ते शहरात आले. लाखो रुपयांची नोकरी सोडून दिली आणि Agrowbook.com सुरु केले. Agrowbook.com मुळे कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रात एका नव्या सकारात्मक क्रांतीची सुरवात झाली.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

लहानपणी थेंब थेंब पाण्यासाठी संघर्ष करणारे करुणाकर रेड्डी आज ७५ लाख लोकांना उपलब्ध करून देत आहे शुद्ध पिण्याचे पाणी

अमेरिकेतून शिक्षण घेऊनही देशातल्या शेतक-यांना शेतीमधल्या आधुनिक प्रयोगांचे धडे देणारे, “चंद्रशेखर भडसावळे” !

एका संगणक अभियंत्याने स्व:बळावर पर्यटनासाठी विकसित केले 'ईको टूरीझम'

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

    Latest Stories

    आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा