संपादने
Marathi

एका संगणक अभियंत्याने स्व:बळावर पर्यटनासाठी विकसित केले 'ईको टूरीझम'

Team YS Marathi
4th Mar 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

कणखर मनुष्य हा कोणत्याही परिस्थितीचा गुलाम नसतो, तो न डगमगता स्वतःला विपरीत परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. जरा विचार करा, ज्या वेळेस तुम्हाला नोकरीची नितांत गरज असते व त्याच क्षणाला तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले तर कसे वाटेल? पण त्याही परिस्थितीत तुम्ही जर सयंम बाळगून परिस्थितीवर मात केली तर परिणाम निश्चितच चांगले येतील. ही गोष्ट अशा व्यक्तीची आहे ज्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे आपल्या चांगल्या नोकरीचा राजीनामा देण्यासाठी कंपनीकडून त्यांच्यावर दबाव टाकला गेला. शरीराला आजारपण लागणे व त्याच वेळेस तुमची नोकरी जाणे ही कुणासाठीही धक्कादायक बातमी असू शकते. पण हिमांशु कालिया हे वेगळ्याच मातीचे बनले होते म्हणून या विपरीत परिस्थितीला धैर्याने तोंड देत त्यांनी असे काम सुरु केले की आज ते दुसऱ्यांसाठी एक उदाहरण बनले आहे. आज त्यांनी आदिवासींसाठी रोजगाराचे साधन उपलब्ध केले आहे. हा त्यांच्याच प्रयत्नांचा परिणाम आहे की उत्तर प्रदेशच्या बहराइचच्या कतर्निया घाटाला उत्तर प्रदेश सरकारने पर्यटनासाठी विकसित करण्याच्या दृष्टीने हिमांशू कालिया यांच्या बनवलेल्या रोड मॅपला मंजुरी दिली.

image


उत्तर प्रदेशच्या बहराइच मध्ये रहाणारे हिमांशू कालिया मूळतः संगणक अभियंता असून त्यांनी आपली बीटेक ची पदवी २००७ मध्ये भोपाळमधून घेतली. त्यानंतर सुमारे चार वर्ष त्यांनी नोएडाच्या एका खाजगी संस्थेमध्ये नोकरी केली. याच दरम्यान त्यांच्या पायाला दुखापत झाली असल्यामुळे त्यांना सर्जरी करावी लागली. सर्जरीच्या सहा महिन्यांनंतर सुद्धा त्यांना अंथरुणात पडून रहावे लागले अशा परिस्थितीत कंपनीने त्यांना राजीनामा देण्यासाठी प्रवृत्त केले. म्हणतात की मार्ग बंद होत नाही त्या मार्गातून नवीन दिशा सापडते म्हणून पायाचा त्रास कमी होईपर्यंत त्यांनी गुडगावच्या एका कंपनी मध्ये काम केले. त्यानंतर २०११ मध्ये आंत्रप्रेन्योरशिप मॅनेजमेंट मध्ये एमबीएचा अभ्यासक्रम करण्यासाठी एक्सएलआरआई [XLRI] जमशेदपूर गाठले.

image


हिमांशू यांनी युवर स्टोरीला सांगितले, “अचानक माझ्या वडिलांच्या निधनामुळे मी माझ्या घरी बहराइचला परत गेलो. इथे मी आमच्या कौटुंबीक व्यवसाय परिवहनाच्या कामाला हातभार लावला. पण वेगळे काही करण्याची जिद्द मला स्वस्थ बसू देत नव्हती. माझ्या डोक्यात नेहमी मेंटोर व एक्सएलआरआई जमशेदपूर मध्ये आंत्रप्रेन्योरशिप डेवलपमेंट सेल्सच्या चेअरपर्सन प्रबळ सर यांची एक गोष्ट लक्षात यायची की, स्वतःचे असे काहीतरी केले पाहिजे, पण नेमके काय केले पाहिजे हे समजत नव्हते. एक दिवस मी बहराइचच्या कतर्निया घाटात नदी किनारी फिरत असतांना येथील नैसर्गिक सौंदर्याने माझ्या मनाचा ताबा घेतला. मी बघितले नदी किनारा, जंगलाच्या मधोमध माती व बांबूच्या बनवलेल्या झोपड्या आहे तेव्हाच मी या जागेला ईको टूरिजमच्या कल्पनेने साकारू लागलो’’.

image


सन २०१२ मध्ये या कामाच्या प्रारंभी त्यांना जागेसाठी जमिनीचा मोठा प्रश्न भेडसावत होता. हा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकार, वन विभाग व नाबार्ड यांच्या समोर मांडला. पण व्यर्थ, त्यांना जमीन व आर्थिक सहाय्य कुणाचेही मिळाले नाही. वर्षभर भवानीपूर गावात राहिल्यानंतर त्यांना स्थानिक लोकांकडून जमीन मिळाली जिथे त्यांनी एक झोपडी बांधून आपल्या कामाचा शुभारंभ केला. सुरवातीला पर्यटक कमीच येत होते पण हळूहळू कामाची व्याप्ती वाढली व आज देशातच नाहीतर परदेशातून सुद्धा पर्यटक इथे फिरायला येतात.

image


हिमांशू सांगतात की,’’ बहराइचमध्ये थारू जातीचे लोक रहातात. या लोकांना आजपण पर्यावरणाच्या सानिध्यात राहायला आवडते. तसेच हे आपल्या घरांना पारंपारिक पद्धतीने सजवण्याबरोबरच बांबूपासून अनेक सुंदर वस्तू बनवतात. ज्यांना हे परदेशी पर्यटक जास्त पसंत करतात’’.

हिमांशू आपल्या पर्यटकांना ग्रामीण व नैसर्गिक वातावरणात फिरवून थारू समाजातील लोकांचे जनजीवन त्यांचे नृत्य, कला-कौशल्याने अवगत करवतात. त्यांची मुलं पर्यटकांचे आदर सत्कार करून त्यांना आपले पारंपारिक भोजन करवतात ज्यात प्रामुख्याने तुरीची डाळ, चुलीवरची भाकरी,दाल बाटी व चुरमा यांचा समावेश असतो तसेच पर्यटक यांच्या बांबू पासून बनवलेल्या पारंपारिक वस्तू विकत घेतात.

image


हिमांशू यांच्या ईको टूरिझममुळे भवानीपूर व्यतिरिक्त आम्बा, बरदिया,बिशनापूर व फकीरपूर अशा गावामध्ये रहाणा-या लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रुपात रोजगार मिळाला आहे. हिमांशू सांगतात की इथे रहाणारे काही लोक गाईडचे काम करतात व काही पर्यटकांना आपल्या गाडीतून फिरवण्याचे काम करतात. हिमांशू यांच्या मड हट च्या जवळ काही दुकाने उघडली आहे. हिमांशू यांच्या सात जणांच्या स्टाफ मध्ये १० कुटुंब या कामासाठी त्यांना मदत करतात.

हिमांशू या कामाच्या अडचणीबद्दल बोलतांना सांगतात की, दरवर्षी इथे नदीला पूर येतो ज्यात या मातीने बनवलेल्या झोपड्या व इतर सामान वाहून जाते त्यामुळे त्यांना दरवर्षी नवीन झोपड्या बनवाव्या लागतात. हा हिमांशु यांच्याच प्रयत्नांचा परिणाम आहे की वन विभागाने या भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी त्यांच्या सल्ल्यानुसार एक मसुदा राज्य सरकारकडे पाठवला, ज्याला आता मंजुरी मिळाली आहे. भविष्यातील आपल्या योजनेचा विस्तार लवकरच हिमांशू हे खजुराहो मध्ये देखील करणार आहे.  

वेबसाइट : www.katerniaecowildlife.com

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

बदलत्या काळानुसार घरोघरी लाकडी खेळणी पुन्हा वापरली जातील ? गोदावरी सिंह यांची संघर्ष गाथा

एक असे प्राध्यापक, जे ३३ वर्षापासून सर्व सुखसुविधा सोडून जंगलात राहतात, आदिवासींसाठी...!

सकारात्मक बदलांचे दूत घडविणारा 'प्रखर भारतीय'

लेखक : हरीश

अनुवाद : किरण ठाकरे           

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags