संपादने
Marathi

सेंद्रिय अन्नपदार्थ आणि उत्पादने मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण ‘फार्म 2 किचन’

Anudnya Nikam
3rd Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

दिवसेंदिवस फळे, भाज्या, धान्य, कडधान्य यांच्या वाढणाऱ्या किंमती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनाशा झालेल्या आहेत. मात्र अन्न ही माणसाची मूलभूत गरज असल्यामुळे यासाठी पैसा खर्च करणे अपरिहार्य असते. या अन्नपदार्थांवर आपण जितके पैसे खर्च करतो त्याचा जीवनसत्वांच्या रुपात परतावा देण्यायोग्य प्रतीचे ते असतात का? असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर ‘अनेकदा नाही’ असेच द्यावे लागेल. शेतीमध्ये केला जाणारा रासायनिक खते आणि किटकनाशकांचा अतिरिक्त वापर, तसेच कमीतकमी वेळात जास्तीत जास्त पिक घेण्याच्या हव्यासापोटी शेतकरी पिकांना देत असलेली ग्रोथ हार्मोनची इंजेक्शन्स यामुळे हे अन्नपदार्थ केवळ जीवनसत्वरहितच नाही तर आरोग्याला धोकादायक असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अशा अन्नपदार्थांपासून आपल्या आरोग्याला निर्माण झालेला धोका टाळता येऊ शकतो. सेंद्रिय अन्नपदार्थांचा वापर करुन आपण हा धोका टाळू शकतो. मात्र १०० टक्के सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेले पदार्थ खात्रीलायक आणि सहजरित्या कुठे मिळतील हेच लोकांना माहिती नसल्याने त्यांना रसायनांचा भडिमार असलेले, आरोग्याला अपायकारक अन्नपदार्थ खाण्यापलिकडे पर्याय नसतो. याच समस्येवर सीमा ढोली यांनी शोधलेले उत्तर म्हणजे ‘फार्म २ किचन’.

सीमा ढोली

सीमा ढोली


आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी कुठल्याही स्त्रीमधील ‘आई’ अगदी गरोदरपणाची चाहूल लागल्यापासूनच जागरुक असते. सीमा ढोली यांनाही त्यांच्या गर्भात वाढत असलेल्या बाळाची काळजी घेताना जाणवलेल्या एका उणीवेतूनच ‘फार्म 2 किचन’ ही संकल्पना साकारली गेली. सीमा सांगतात, “परदेशात सेंद्रिय पदार्थांना खूप मागणी आहे. मात्र भारतात लोक सेंद्रिय पदार्थांसाठी तितके आग्रही नाही. गरोदर स्त्रीने जास्तीत जास्त चांगलं, पौष्टीक अन्न खावं म्हणून मी माझ्या गरोदरपणात सेंद्रिय पदार्थ वापरण्याचं ठरवलं. तेव्हा मला जाणवलं की भारतात असे अन्नपदार्थ सहजासहजी आणि खात्रीलायकरित्या उपलब्ध करुन देणारा पर्याय उपलब्ध नाही आणि त्यातूनच खास सेंद्रिय पदार्थ मिळणारं एक ऑनलाईन स्टोअर सुरु करण्याची संकल्पना सुचली.”

image


‘फार्म 2 किचन’ हे भारतामध्ये ई-कॉमर्स क्षेत्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेले सेंद्रिय अन्नपदार्थ व वस्तू मिळणारे ऑनलाईन स्टोअर आहे. कमीत कमी ५०० रुपयांची खरेदी केल्यास येथे मोफत घरपोच सामान पोहचविण्याची सुविधा उपलब्ध आहे. सुरुवातीला केवळ गुरगावमध्ये सेवा पुरविणारे ‘फार्म 2 किचन’चे कार्यक्षेत्र आता देशभरातील जवळपास २६२ शहरांमध्ये विस्तारले आहे. फेब्रुवारी २०११मध्ये फक्त सेंद्रीय फळे आणि भाज्यांपासून सुरुवात केलेल्या फार्म 2 किचनमध्ये आता सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली फळे, भाज्या, धान्य, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, मसाला, नट्स, खाद्यतेल, लोणची, चटणी, चहा-पावडर, साखर, रेडी टू इट पदार्थ, ज्यूस इत्यादी किराणा सामान व उत्पादने उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली बॉडी केअर उत्पादने, हेल्थ सप्लिमेंट्स आणि गरोदर स्त्रीया व लहान बाळांसाठीचे कपडेही उपलब्ध आहेत.

image


‘फार्म 2 किचन’च्या ऑनलाईन स्टोअरमुळे महिलांना आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रतीचे अन्नपदार्थ खाऊ घालण्याबरोबरच आपला वेळ वाचविणेही शक्य झाले आहे. आता तर ‘फार्म 2 किचन’ने नव्याने लॉन्च केलेल्या भारतातील पहिल्या आणि एकमेव शॉपिंग ऍपमुळे मोबाईलच्या माध्यमातून चालता-बोलता घरातील किराणा भरता येणार आहे. इतकेच नाही तर ‘फार्म 2 किचन’ने फेसबुकवर शॉप सुरु करुन चॅटींग करता करता सोशल शॉपिंगचा पर्यायही ग्राहकांना उपलब्ध करुन दिला आहे. खरेदीच्या या सर्व विकसित पर्यायांमुळे ग्राहकांना सेंद्रिय उत्पादने सहज आणि खात्रीलायकरित्या मिळविणे शक्य झाले आहे. मात्र ज्यांना प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करण्याची इच्छा असेल अशा ग्राहकांसाठी ‘फार्म 2 किचन’ने आपली स्टोअर्स बाजारात आणली आहेत. “सध्या नाशिक आणि उत्तर प्रदेशमध्ये आमची स्टोअर्स सुरु आहेत. ऑनलाईन स्टोअरप्रमाणेच या स्टोअर्सनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे. लवकरच आम्ही मुंबईमध्ये २-३ ठिकाणी स्टोअर सुरु करणार आहोत आणि येत्या काही दिवसात संपूर्ण देशभर ‘फार्म 2 किचन’ची स्टोअर्स आम्हाला सुरु करायची आहेत,” असं सीमा सांगतात.

image


‘फार्म 2 किचन म्हणजेच १०० टक्के सेंद्रिय पदार्थ’ हे कधीही न बदलणारे समीकरण आहे. येथे मिळणारी प्रत्येक वस्तू प्रमाणीकरण केलेली असते. ‘फार्म 2 किचन’ महाराष्ट्रातील दोन हजार आणि देशभरातील १२ हजार प्रमाणीत शेतकऱ्यांशी शेतकरी संघ, स्वयंसेवी संस्था आणि व्यवसायातील भागीदारांच्या माध्यमातून जोडले गेले आहे. ‘फार्म 2 किचन’ आपल्या स्टोअरमध्ये सेंद्रिय उत्पादने ठेवण्याबरोबरच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन देण्याचे कामही करते. “आम्ही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीमुळे होणारे फायदे समजावून सांगतो. अनेक शेतकऱ्यांना इंग्रजी लिहिता-वाचता येत नसल्याने त्यांना प्रमाणीकरण प्रक्रिया पार पाडणं शक्य नसतं. अशा शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक ती मदतही करतो,” असं सीमा सांगतात. भारताला सेंद्रिय भारतामध्ये परिवर्तीत करणे हेच ‘फार्म 2 किचन’चे उद्दिष्ट आहे.

‘फार्म 2 किचन’मध्ये उपलब्ध होणारी सर्व उत्पादने प्रमाणीत सेंद्रिय असल्याची ग्राहकांना खातरजमा करता यावी यासाठी www.foodtraceability.in या वेबसाईटची सुविधाही येथे उपलब्ध आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून ग्राहकांना प्रत्येक उपलब्ध वस्तू कुठल्या शेतकऱ्याने उत्पादित केली, कुठे उत्पादित करण्यात आली अशा प्रकारची सर्व माहिती मिळते. “फार्म 2 किचनमध्ये मिळणारे प्रत्येक उत्पादन प्रमाणीत असल्यामुळे ग्राहकांची कधीच तक्रार येत नाही. त्यातही एखाद्या ग्राहकाला वस्तू परत करायची असल्यास आम्ही त्या वस्तूची संपूर्ण किंमत ग्राहकाला परत करतो. एखादी वस्तू तुटलेली निघाल्यास ती १०० टक्के बदलून मिळते. ग्राहकांना आमच्याबाबत विश्वास निर्माण झाल्याने आमची ग्राहकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे,” असं सीमा सांगतात. ‘फार्म 2 किचन’मध्ये गरोदर महिला आणि कॅन्सरग्रस्तांना किंमतीमध्ये विशेष सवलत दिली जाते.

‘फार्म 2 किचन’ ग्राहकांना उच्च दर्जाचे सेंद्रिय पदार्थ मिळवून देऊन अप्रत्यक्षरित्या सुदृढ आणि निरोगी भारत घडविण्यास मदत करित आहे. तसेच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊन व सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देऊन शेतीला नवसंजीवनी देण्याचे कामही करित आहे, असे म्हटल्यास वावगं ठरु नये.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags