संपादने
Marathi

महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्नशील ‘वाईल्ड विजन’

Anudnya Nikam
15th Jan 2016
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

महाराष्ट्रातील किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष. महाराष्ट्राचे अस्तित्व टिकविण्यात मोलाची साथ दिलेल्या या ऐतिहासिक वास्तूंकडे महाराष्ट्राच्या भूमीपुत्राचे मात्र दिवसेंदिवस दुर्लक्ष होत चालले आहे. मराठ्यांचा इतिहास सांगून मानाने मिरविणारे, मराठ्यांच्या शौर्याचे मेसेज वॉट्सऍपवरुन क्षणार्धात फॉरवर्ड करुन अभिमानाने छाती फुगविणारे आजचे मर्द मराठे प्रत्यक्षात या ऐतिहासिक ठेव्याबाबत मात्र असंवेदनशील असलेलेच अधिक दिसतात. ऐतिहासिक स्थळी बेपर्वाईने कचरा टाकणे असो, किल्ल्यांच्या तटबंदी आणि बुरुजावर प्रेमीयुगुलांनी आपले नाव लिहिणे असो अथवा ऐतिहासिक ठिकाणी दारु पिऊन पिकनिक करणे, दारुच्या बाटल्यांसह फोटो काढणे, बाटल्या तिथेच सोडून जाणे असे प्रकार असो, या सगळ्यावरुन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे ऐतिहासिक ठिकाणांचे महत्त्व आता अनेकांसाठी केवळ एक पिकनिक पॉईण्ट एवढेच राहिलेले आहे. अशातच या ठिकाणांकडे पुरातत्व खात्याचे होणारे दुर्लक्ष हे अशा प्रवृत्तींना खतपाणी घालणारे ठरतेय.

image


किल्ल्यांबाबत जर कुणाला मनापासून कळवळा वाटत असेल आणि यासाठी कोणी काही करत असेल तर त्या असतात ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्यासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था आणि ट्रेकर्स, माऊंटेनर्सचे काही ग्रुप. अशांपैकीच एक म्हणजे सुशांत करंदीकर यांचा ‘वाईल्ड विजन’ हा ग्रुप. ‘वाईल्ड विजन’ हा माऊंटन बायकिंग करणारा म्हणजेच सायकलिंग करुन डोंगर पार करणाऱ्या हौशी सायकलस्वार ट्रेकर्सचा महाराष्ट्रातील एकमेव ग्रुप आहे.

‘वाईल्ड विजन’ने आपले सायकलिंगचे वेड जपत सागरी किल्ल्यांची सद्यस्थिती जगासमोर आणण्याच्या मोहिमेने २०१६ या नववर्षाची सुरुवात केली. त्याकरिता २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१५ या सात दिवसात त्यांनी सायकलिंग करत एकूण ११ सागरी किल्ल्यांना भेट दिली. या मोहिमेदरम्यान त्यांनी या किल्ल्यांवरील सद्यस्थिती कॅमेराबद्ध केली आहे. जी सोशल मीडियाच्या आणि यू ट्युबच्या माध्यमातून जगासमोर आणण्याची त्यांची योजना आहे.

image


बी.कॉम ग्रॅज्युएट असलेल्या सुशांत यांना पहिल्यापासूनच ट्रेकिंगचे वेड. १९९८ सालापासून त्यांनी ट्रेकिंगला सुरुवात केली. पारंपरिक नोकरी करण्यात काहीही रस नसलेल्या सुशांत यांनी आपली आवड असलेल्या ट्रेकिंगमध्येच करिअर करायचे ठरविले आणि १८ वर्ष एका ग्रुपबरोबर काही कंपन्यांसाठी कामही केले. त्यानंतर २०११मध्ये त्यांनी ‘वाईल्ड विजन’ नावाने स्वतःचा ग्रुप तयार केला. या ग्रुपद्वारे वर्षभर सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध प्रकारचे साहसी उपक्रम राबविले जातात. गिर्यारोहण, सायकलस्वारी, जंगल सफारी आणि ट्रेकिंग, रॅपलिंग, रिव्हर राफ्टींगसारख्या साहसी उपक्रमांबरोबरच कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्रॅम आणि चिल्ड्रन कॅम्पही आयोजित केले जातात.

image


सुशांत सांगतात, “सामान्यतः ऍडवेंचर ऍक्टीविटीज या केवळ तरुण मुलांसाठीच असतात असा सर्वसामान्य समज आहे. पण असं काही नाही. पाच वर्षांपूर्वी ५६ वर्षांचे एक गृहस्थ आमच्याबरोबर आले होते. अनेकदा कठीण कठीण ट्रेक सायकलिंग करत पार करण्याच्या आमच्या मोहिमांमध्ये मुलीही सहभागी झाल्या आहेत. अर्थात त्या मुलींच्या कुटुंबियांनी त्यांना परवानगी दिली ही कौतुकाची बाब आहे. आम्ही महिला दिनानिमित्त खास महिलांसाठीही उपक्रम राबविले आहेत. त्यालाही चांगला प्रतिसाद लाभला. लहान मुलांसाठीही खास ऍडवेंचर ऍण्ड फन कॅम्प आम्ही आयोजित करतो. लहान मुलांना त्यांच्या आयुष्यात अशा उपक्रमांचा खूप फायदा होतो. मी पालकांना आवर्जून सांगतो की गिर्यारोहणाचा बेसिक कोर्स २८ दिवसांचा असतो. त्यामुळे २८ दिवसात शिकवली जाणारी गोष्ट कॅम्पमध्ये मुलं एका दिवसात शिकतील असं मुळीच नाही. मात्र आजकाल सिंगल चाइल्डच्या जमान्यात गॅजेटमध्ये रमणाऱ्या मुलांना या कॅम्पमुळे निसर्ग समजेल, आव्हान पेलण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होईल, चार लोकांशी मिळून मिसळून वागणं शिकता येईल, ती दुसऱ्यांशी संवाद साधायला शिकतील, स्वावलंबी होतील. मोठे झाल्यावर प्रॅक्टीकल आयुष्य जगताना त्यांना या गोष्टी कामी येतील. त्याशिवाय असे कॅम्प आयोजित करण्यामागे मुलांचा फिजीकल फिटनेस हा आमचा मुख्य उद्देश्य असतो.”

कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्रॅम

कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्रॅम


सतत कामामध्ये व्यस्त असणाऱ्या कॉर्पोरेट्सना साहसी उपक्रमांच्या माध्यमातून ट्रेनिंग देताना जगण्यासाठी आणि काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळवून देणे असो किंवा लहानमुलांमध्ये कॅम्पच्या माध्यमातून चांगले गुण रुजविणे असो, ‘वाईल्ड विजन’ प्रत्येकवेळी एक चांगले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील दिसते. १५ वर्षांपूर्वी किल्ल्यांच्या सफाईचे काम ‘वाईल्ड विजन’द्वारे केले जायचे. मात्र हळूहळू ग्रुपमधील काही सदस्य कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेले, मुलींनी लग्न झाल्यावर ग्रुप सोडला. यामुळे टीम छोटी झाली. त्यामुळे आता किल्ल्यांच्या देखभालीसाठी प्रत्यक्ष काही करता येत नसले तरी सागरी किल्ल्यांविषयीची मोहिम राबवून या किल्ल्यांच्या सद्यस्थितीकडे लोकांचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘वाईल्ड विजन’ पुढे सरसावली आहे.

सुशांत यांना ट्रेकिंग बरोबरच सायकलिंगचीही आवड आहे. आतापर्यंत त्यांनी जवळपास ७५ हजार किलोमीटरपेक्षा जास्त सायकलिंग केले आहे. “१९९४ साली एकदा सहज माझ्या मनात आलं की सायकलिंग करत हरिश्चंद्रगडावर जायचं आणि एका मित्राला सोबत घेऊन मी हा विचार यशस्वीरित्या प्रत्यक्षात उतरवला. माझ्याकडून याचा थरारक अनुभव ऐकल्यावर माझ्या आणखी दोन मित्रांनी माऊंटन बायकिंग करुन हरिश्चंद्रगडावर जायची इच्छा व्यक्त केली. ३१ डिसेंबर २००१ ला हरिश्चंद्र गडाला भेट देऊन येणारं नववर्ष किल्ल्यावर साजरं करायचं असं आम्ही ठरवलं आणि तेव्हापासून सतत १५ वर्ष आम्ही नवीन वर्षाची सुरुवात माऊंटन बायकिंग करत विविध किल्ल्यांना भेट देऊन केली. दहाव्या वर्षी आम्ही एकूण १० किल्ल्यांना सायकलस्वारी करुन भेट दिली. गेल्या १५ वर्षात आम्ही जवळपास ६७ किल्ले सायकलिंग करुन फिरलो. १४ वर्ष आम्ही ज्या किल्ल्यांना भेट दिली त्यामध्ये अनेक गडकोट, भुईकोट होते. तिथली बरीच माहिती आम्हाला आहे. त्यामुळे आमच्या या वर्षीच्या मोहिमेसाठी आम्ही सागरी किल्ल्यांची निवड केली आणि नववर्षाची सुरुवात २१ सागरी किल्ल्यांना सायकलिंग करत भेट देऊन करायची असं ठरवलं. या मोहिमेदरम्यान आम्ही ४०० किलोमीटर सायकलिंग केलं. मात्र काही अडथळ्यांमुळे आम्ही केवळ ११ किल्ल्यांना भेट देऊन परतलो,” असं सुशांत सांगतात.

image


सागरी किल्ल्यांच्या मोहिमेवर सुशांत यांच्याबरोबर त्यांचे दोन मित्र विकास चव्हाण आणि कृष्णा नाईक होते. या तिघांनी २५ डिसेंबरला कल्याणहून आपल्या मोहिमेला सुरुवात केली आणि ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी ते परतले. द्रोणागिरीपासून सुरुवात करुन, खांदेरी-उंदेरी, अलिबाग किल्ला, कोरलाई, रेवदंडा, मुरुड-जंजिरा, बाणकोट, सुवर्णदुर्ग, कणकदुर्ग, गुहागर जवळचा गोपाळगड आणि जयगड या ११ किल्ल्यांना त्यांनी भेट दिली.

सुशांत सांगतात, “मी १९९८ साली संपूर्ण भारत सायकलिंग करत पालथा घातला आहे. १३,१६५ किमी अंतर त्यावेळी मी सायकलिंग करुन पार केलं होतं. त्याशिवाय संपूर्ण दक्षिण भारत आणि पूर्व महाराष्ट्रही सायकलिंग करत फिरलो आहे. मुंबई-पुणे सायकलिंग स्पर्धेतही भाग घेतला आहे. मात्र स्पर्धेसाठी सायकलिंग करणं आणि मोहिम म्हणून सायकलिंग करणं यात दृष्टीकोनाचा फरक आहे. स्पर्धेमध्ये आपल्याला अमूक एक अंतर पार करायचं हेच लक्ष्य असतं. मात्र मोहिमेमध्ये केवळ लक्ष्य पूर्ण करणं हे उद्दीष्ट नसतं. इथे तुमचे मॅनेजमेंट स्कील पणाला लागतात. आयत्यावेळी समोर येणाऱ्या अनेक गोष्टींना अनुसरुन वेळोवेळी पुढच्या योजनांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात. जे आम्हाला आमच्या या मोहिमेदरम्यानही करावे लागले. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सुरुवातीलाच माझ्या मित्रांपैकी एकाला सुट्टी न मिळाल्यामुळे आम्ही ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा निघालो. त्यानंतर मुरुड-जंजिऱ्यासमोरच्या पद्मदुर्गावरची तोफ चोरीला गेल्यामुळे तिथे जाण्यास सरकारने बंदी घातली आहे असं सांगण्यात आलं. त्यामुळे तो किल्ला आमच्या यादीतून रद्द करावा लागला. मोहिमेदरम्यान अशा अनेक गोष्टी घडल्या. जयगड किल्ल्यावर बोटीने जावं लागतं. या बोटीने पाच मिनिटात आपण किल्ल्यावर पोहचतो. पण त्या दिवशी ही बोटच पाण्यात रुतून बसली. त्यामुळे तिथे आमचे तीन तास वाया गेले. केवळ वेळेच्या अभावामुळे किंवा लक्ष्य पूर्ण करण्यासाठी म्हणून तो किल्ला सोडून पुढे जाणं आम्हाला पटत नव्हतं. त्यामुळे पुढचं वेळापत्रक बिघडलं. जयगड बघून परतायला आम्हाला उशीर झाला. तो आमचा अकरावा किल्ला होता. मित्रांना २ तारखेला कामावर हजर व्हायचं होतं. पुढचे किल्ले केले असते तर ते शक्य झालं नसतं. केवळ १५ वर्षांची परंपरा टिकवण्यासाठी ३१ डिसेंबरची रात्र बाहेर काढायची हे सुद्धा आम्हाला पटलं नाही. त्यामुळे यावर्षी आम्ही नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच फक्त ११ किल्ले पाहून परतलो.”

खांदेरीकडे जाताना दूरुन दिसणारा उंदेरी किल्ला

खांदेरीकडे जाताना दूरुन दिसणारा उंदेरी किल्ला


मोहिमेदरम्यान या सागरी किल्ल्यांविषयी आढळलेली निरिक्षणे नोंदवताना ते सांगतात, “खरं सांगायचं तर आम्ही द्रोणागिरीपासून सुरुवात केली असली तरी आम्ही प्रत्यक्ष किल्ल्यावर पोहचूच शकलो नाही. आमच्याकडच्या नकाशाच्या आधारावर आम्ही तिथे गेलो. मात्र बहुदा पुस्तकातला तो नकाशा जुना असल्यामुळे तिथून गडावर जायला रस्ता सापडला नाही आणि विशेष म्हणजे तिथल्या स्थानिकांनाही नेमका रस्ता सांगता येईना. या पहिल्याच ठिकाणी आम्हाला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुळात तिथल्या स्थानिकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचं लक्षात आलं. तिथून पुढे खांदेरी-उंदेरीला गेलो. खांदेरीला होडीने जाताना त्या होडीच्या मालकाने माहिती दिली की उंदेरीची देखभाल ठेवली नसल्यामुळे पर्यटक केवळ खांदेरीलाच भेट देतात.”

जंजिरा किल्ला

जंजिरा किल्ला


या किल्ल्यांकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा प्रत्यय या तिघांना या मोहिमेदरम्यान वारंवार आला. सुशांत सांगतात, “सागरी किल्ल्यांचं विशेष म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्याजवळ असूनही या किल्ल्यांमध्ये गोड्या पाण्याची टांके असतात. मुरुड-जंजिरामध्येही दोन गोड्या पाण्याची टांकी आहेत. मात्र त्याच्या स्वच्छतेची काळजी घेतली गेलेली नाही. गाईडला आम्ही प्रश्न केला की तुम्ही का याची स्वच्छता करत नाही? तर त्यांनी उत्तर दिलं की आमची इच्छा आहे पण सरकार आम्हाला परवानगी देत नाही. त्याचं हे उत्तर ऐकून मनात विचार आला की सरकारला स्वतःच्या यंत्रणेच्या माध्यमातून सर्व किल्ल्यांची निगा राखणं शक्य नसेल तर त्यांनी किमान स्थानिकांची मदत घेऊन हे काम करायला काय हरकत आहे? जंजिरा किल्ल्याचे दोन मजलेही पडले आहेत. झाडं वाढायला लागली आहेत. मुरुड-जंजिरामध्ये त्यातल्या त्यात पुरातत्व खात्याने केलेलं चांगलं काम म्हणजे इथे उगवलेली, किल्ल्याला नुकसान पोहचवू शकतील अशी झाडं काढायला आता त्यांनी सुरुवात केली आहे.”

ते पुढे सांगतात, “या अकरा किल्ल्यांमध्ये फक्त कोरलाई आणि गोपाळगडाची चांगली निगा राखण्यात आली आहे. कोरलाई किल्ल्याची पुरातत्व खात्याकडून चांगली देखभाल ठेवण्यात आली आहे. तर गोपाळगड खाजगी मालकीचा झाल्याने त्याचीही चांगली देखभाल ठेवली जात आहे. मात्र किल्ल्यांची देखभाल व्हावी म्णून ते खाजगी मालकीचे होणं हा उपाय नाही. कोरलाई किल्ल्यात आम्ही गेलो तेव्हा एक वयस्कर व्यक्ती तिथे विहिरीतून पाणी काढून झाडांना घालत होते. खरं तर त्यांच्यावर लक्ष ठेवणारं तिथे कुणी नव्हतं. मात्र ते प्रामाणिकपणे, पूर्ण समर्पित भावनेने काम करत होते. ते पाहून वाटलं की अशा समर्पित भावनेने राज्यातील सर्व ऐतिहासिक ठिकाणांची निगा राखली गेली तर महाराष्ट्राचं वैभव तर राखलं जाईलच. त्याचबरोबर राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळून राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होऊ शकेल. मात्र प्रत्येकवेळी या ऐतिहासिक ठेव्याच्या दुरवस्थेबाबत सरकारकडे बोट दाखवणंही योग्य नाही. हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पुरातत्त्व खात्याकडून म्हणावे तितके प्रयत्न होताना दिसत नाहीत हे खरं असलं तरी सरकारच्या प्रयत्नांबरोबरच आपल्या भूमीवरील या ऐतिहासिक वास्तू टिकवणं ही आपलीही जबाबदारी आहे हा विचार जनमानसात रुजणंही तितकच गरजेचं आहे. तरच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास सांगणारं हे वैभव चिरकाल टिकेल.”

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags