संपादने
Marathi

भारतीय महिला उद्योगिनींची बे एरियापर्यंत भरारी

Team YS Marathi
18th Feb 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

महिला उद्योजकांच्या अनेक यशोगाथा आज भारतात उदयाला येताना दिसत आहेत. त्याचबरोबर अशाही अनेक जणी आहेत, ज्यांना स्वतःची कंपनी सुरु करण्याची इच्छा आहे. त्या सगळ्यांना या तिघींकडून निश्चितच प्रेरणा मिळेल – या आहेत त्रिशा रॉय, रितुपर्णा पांडा आणि योशा गुप्ता... आपल्या स्वप्नांच्या शोधात त्या थेट अमेरिकेपर्यंत जाऊन पोहचलेल्या. विशेष म्हणजे, अमेरीकेत आणि जगभरात स्वतःची बाजारपेठ निर्माण करण्यात त्यांना आलेल्या यशाने, 500-स्टार्टअप्स (500-Startups), या कॅलिफोर्निया स्थित स्टार्टअप ऍक्सलरेटरला त्यांची दखल घेण्यास भाग पाडले. खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर जाऊ शकतील असे व्यवसाय म्हणून डेव मॅकक्लुर आणि त्यांच्या टीमनी या तिन्ही स्टार्टअप्सची अतिशय काळजीपूर्वक निवड केली आहे.

image


द बार्न ऍन्ड विलो स्टोरी

दोन वर्षांपूर्वी त्रिशा अमेरिकेतील त्यांच्या घरात अंतर्गत सजावटीचे काम करत होत्या, तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की पडदे आणि खास तयार केलेले विंडो ट्रीटमेंटस् (एक प्रकारचा सजावटीचा घटक) हे खूपच महाग होते. त्यापैकी काही खास तयार केलेल्या पडद्यांची किंमत तर १०,००० डॉलर्स एवढी प्रचंड होती. अमेरिकेमध्ये या वस्तूंच्या किंमती एवढ्या जास्त असण्याचे कारण जाणून घेण्यासाठी म्हणून त्यांनी कोलकत्ता आणि दिल्लीमध्ये टेक्सटाईल युनिटस् चालविणाऱ्या आपल्या काही नातेवाईकांना फोन केला. त्यानंतर उच्च दर्जाच्या कॉटन आणि लिननची सप्लाय चेन अर्थाच पुरवठा साखळी कशी काम करते, याचा त्यांनी शोध घेतला. या माहितीचा आधार घेत त्यांनी कामाला सुरुवात केली आणि बार्न ऍन्ड विलो (Barn& Willow) चा जन्म झाला.

image


“ या पुरवठा साखळीत अनेक व्यापारी असतात, जे कारखान्यांमधून माल खरेदी करतात आणि जोपर्यंत या वस्तू अमेरिकेतील रीटेलर्सना विकण्याची वेळ येते, तोपर्यंत त्यांच्या उत्पादनाच्या किंमतीपेक्षा विक्रीची किंमत ही कितीतरी जास्त असते,”त्रिशा सांगतात. रिटेलच्या जगात तर ग्राहकांना विक्री होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनाची किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीतील किंमत यामध्ये असलेला फरक हा २५० टक्क्यांपेक्षाही जास्त असू शकतो.

यावरुन त्यांना एक गोष्ट जाणवली की, जर का त्या मध्यस्थ किंवा अडत्यांच्या मधल्या तीन किंवा चार फळ्या कमी करु शकल्या, तर त्या अमेरिकेतील व्यावसायिक समस्या सोडवू शकतील. मात्र, त्यांनी निर्णय घेतला की त्या केवळ पडदे, थ्रो पिलोज (विशिष्ट प्रकारच्या उशा) आणि पॅनेल्सची केवळ विक्रीच करणार नाहीत, तर त्यांच्या व्यवसायाला वेगळेपण देण्यासाठी म्हणून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास कस्टमाईस्ड डिजाईन्स आणि सेवाही देऊ करतील. त्यासाठी लवकरात लवकर पुरवठा साखळी उभारणे गरजेचे होते. व्यापारी मेळ्यात त्या एका उत्पादकाला भेटल्या आणि त्यांनी तामिळनाडूमधील कारखान्यातून कॉटनचे नमुने मिळविण्यास सुरुवात केली. तर सर्वोत्तम दर्जाचे लिनन त्यांनी बेल्जियममधील कारखान्यातून मिळविले आणि हा सर्व कच्चा माल देऊन मागणीनुसार दिल्लीतील एका कारखान्यातून शिवणकाम करुन घेण्यास सुरुवात केली. भारतातून हे उत्पादन कॅलिफोर्नियातील गोदामात पाठविले जाते आणि तेथून ते अमेरिकेत सगळीकडे वितरीत केले जाते. आता यामुळे वस्तूच्या उत्पादनाची किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीतील किंमत यामध्ये असलेला फरक हा ६० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, हे विशेष....

त्रिशा यांच्या मते एक कर्मचारी म्हणून पेपाल(PayPal) आणि इबे (eBay) मध्ये त्यांनी केलेले काम आणि अनुभव ही कंपनी उभारताना त्यांच्या नक्कीच उपयोगी पडले. बार्न ऍन्ड विलोची पहिली मागणी त्यांनी डिसेंबर, २०१४ मध्ये पूर्ण केली. आता त्यांच्या कंपनीचा प्रती महिना महसूल ५०,००० डॉलर्स आहे आणि व्यवसाय ४५ टक्क्यांनी वाढत आहे. कंपनीची ही वाढ लक्षात घेऊनच 500स्टार्टअप्स ने या कल्पनेला १२५,००० डॉलर्सची गुंतवणूक करुन पाठबळ दिले आहे.

लघु आणि मध्यम व्यवसायांसाठी फुलफील.आयओ (Fulfil.IO)

त्रिशाप्रमाणेच अमेरिकेतील अनुभवांबाबत रीतुपर्णा यांचीही कथा मोठी रंजक आहे. लहान व्यवसायांना क्लाऊड आणि मोबाईल तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्यास किंवा त्या दिशेने जाण्यास मदत करण्याच्या हेतूनेच फुलफील.आयओचा जन्म झाला. २०१२ मध्ये रितुपर्णा यांनी आपले अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केले आणि एका बुटीक कन्सल्टींग फर्ममध्ये कामाला सुरुवात केली. २०१४ मध्ये त्यांना जाणविले की जगभरातील लघु आणि मध्यम किरकोळ विक्रेत्यांकडे विविध मार्गांद्वारे विक्री करताना त्यांच्या इन्वेंटरीचे अर्थात मालाचे व्यवस्थापन करण्यासाठीची चांगली सोयच उपलब्ध नाही. त्यानंतर त्यांनी एक अशी प्रणाली उभारण्यास सुरुवात केली, जी जुन्या ईआरपी प्रणालीची जागा घेईल आणि क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर करुन इन्वेंटरीची नोंद तर ठेवता येईलच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या तंत्र प्रणाली/माध्यमांच्या सहाय्याने नोंदविण्यात आलेल्या मागण्या सहजपणे हाताळणे शक्य होईल (ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मार्गांनी). फुलफील.आयओच्या सहसंस्थापिका रितुपर्णा सांगतात, “ ही एक संधी होती आणि ते काही सोपे नव्हते. जर आम्ही लघु आणि मध्यम व्यावसायिकांना हे पटवून देऊ शकलो की ही टॅबवर आधारित अशी एक प्रणाली आहे, जी विविध तंत्र प्रणालींचा वापर करुन केल्या गेलेल्या मागण्या आणि त्यांचा पुरवठा कार्यक्षम पद्धतीने हाताळू शकेल, तरच ही कल्पना येथे टिकून राहणार होती.”

image


त्यामुळे रीतुपर्णा यांनी २०१५ च्या सुरुवातीला नोकरीला रामराम म्हटले आणि आणखी तीन सहसंस्थापकांसह या उत्पादनाच्या उभारणीला सुरुवात केली. हे उत्पादन यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अमेरिकेतच या उत्पादनाची चाचणी करणे, हा हे उत्पादन यशस्वी होण्यासाठीचा एकमेव मार्ग असल्याचे अगदी सुरुवातीलाच त्यांना जाणविले होते. कन्सल्टींग आणि रिसर्च फर्म आयडीसीच्या अहवालानुसार, २०१५ मध्ये अमेरिका स्थित लघु आणि मध्यम व्यावसायिकांनी त्यांच्या आयटीच्या पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन आणण्यासाठी सुमारे १६१ बिलियन डॉलर्स खर्च केले होते. त्यामुळे पहिली बाजारपेठ म्हणून त्यांनी अमेरिकेची केलेली निवड ही योग्यच होती.

फुलफील.आयओ केवळ दोनेक महिन्यांचीच असतानाच, २०१५ च्या मध्यावर रितुपर्णाने अमेरिकेला भेट दिली. त्यांना आणि त्यांच्या सहसंस्थापकांना एका टुल उत्पादकाविषयी माहिती मिळाली होती. किरकोळ विक्रेत्यांना आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्मस् ना या उत्पादकाकडून मालाचा पुरवठा केला जात असे. त्यावेळी त्याच्याकडील उत्पादनाचा पुरवठा कार्यक्षमपणे आणि फायदेशीररीत्या करु शकण्यासाठी आवश्यक ती माहिती पुरविणारी तंत्र प्रणाली त्याच्याकडे उपलब्ध नव्हती. “ आमच्या उत्पादनामुळे केवळ एकाच डॅशबोर्डवर त्या उत्पादकाला त्याच्या संपूर्ण व्यवसायाची माहिती मिळणे शक्य झाले. फक्त यापूर्वी विविध आयटी प्रणालींवर असलेला डाटा आमच्या प्रणालीवर घेणे गरजेचे असल्याने, या इंटीग्रेशनसाठी एक-दोन दिवस तेवढे गेले,” त्या सांगतात.

दर महा १००० डॉलर्सचे सदस्यता मॉडेल आठ महिन्यांतच चांगलेच लोकप्रिय ठरले आणि सध्या कंपनीकडे २० ग्राहक आहेत. 500स्टार्टअप्सने त्यांना निवडले यात काहीच आश्चर्य नाही. त्यांच्याकडून या स्टार्टअपला १२५,००० डॉलर्सचे भांडवल मिळाले.

लाफालाफाची कथा

योशा यांनी २०१४ मध्ये हॉंगकॉंग येथून लाफालाफा या कुपनिंग कंपनीला सुरुवात केली. या स्टार्टअपमागे एक सोपी कल्पना होती, जर त्यांनी एखाद्या ई-कॉमर्स कंपनीबरोबर संलग्नता मिळविली, तर आपल्या कमिशनमधील बहुतांश हिस्सा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचवून, लाफालाफा साईटकडून कुपन्स घेणाऱ्या ग्राहकांचा अधिक फायदा करुन देता येईल. ऍपचे ग्राहक वाढविणे हा यामागचा उद्देश होता. भारतातील ई-कॉमर्सची बाजारपेठ ही आगामी चार वर्षांच्या काळात शंभर बिलियन डॉलर्सच्या पुढे जाईल असा अंदाज आहे आणि ऍफीलिएट मार्केंटींग उद्योगाचे जीएमव्हीमधील योगदान १५-२० टक्के एवढे असेल. “ या विभागातील स्पर्धेचा विचार केल्यानंतरही ही एक मोठी संधी आहे,” योशा सांगतात. मायस्मार्टप्राईस, कुपनदुनिया, ग्रॅबन, कॅशकरो, पेनिफुल, या त्यांच्या स्पर्धक कंपन्या आहेत.

image


हा व्यवसाय मोबाईलकेंद्रीत असल्याने आणि तो वेगाने वाढत असल्या कारणानेच 500स्टार्टअप्सने या कंपनीची निवड केली. लाफालाफाचे ७० टक्के ट्रॅफीक हे ऍन्ड्रॉईड ऍपकडून येत होते. “ वैयक्तिकरण आणि लक्ष्यावर आम्ही आमचे लक्ष केंद्रीत केले होते, जेणेकरुन वापरकर्त्यांना आणखी संबंधित पर्याय देणे आम्हाला शक्य होईल,” योशा सांगतात. आता कंपनीची वाटचाल ऑफलाईन मॉडेलच्या दिशेनेही सुरु झाली आहे. कंपनीने ५०० हून अधिक ब्रॅंडस् बरोबर भागीदारी केलेली आहे, ज्यामध्ये फ्लिपकार्ट, पेटीएम, स्नॅपडील आणि शॉपक्लूज, यांसारख्या आघाडीच्या ब्रॅंडस् चा समावेश आहे. 500स्टार्टअप्सने या कंपनीमध्ये १२५,००० डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

500स्टार्टअप्सकडून मिळणारे मार्गदर्शन

भारतातून निवडल्या गेलेल्या महिलांनी चालविलेल्या या केवळ तीन कंपन्या असताना, त्यांना व्हॅलीमधील सर्वोत्तमांबरोबर काम करायला मिळाल्याने खूप काही शिकता आले. डेव मॅकक्लुर त्यांना आठवड्यातून कमीतकमी एकदा भेटतात आणि त्यांची टीम त्यांना पुढील प्रकारे मार्गदर्शन करते.

• निधी उभारणी कौशल्य आणि टर्म शीटस् बाबतच्या वाटाघाटी

• तज्ज्ञांबरोबर चर्चा करुन वाढीचे व्यवस्थापन करणे

• अनुभवी मार्गदर्शकांपर्यंत पोहचण्याची संधी

• इतर स्टार्टअप्सबरोबर काम करण्याची संधी

• एडब्ल्यूएस, मायक्रोसॉफ्ट, रॅकस्पेस, सॉफ्टलेयर, सेंडग्रिड यांच्याकडील तंत्रज्ञान वापरताना त्यांना फायदा मिळतो.

भारतीय महिलांना जागतिक पातळीवर चमकण्याची सुवर्णसंधी

पाश्चिमात्य बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळविणे हे विकसनशील जगातील महिलांसाठी कधीच सहजसोपे नसते. त्यांची स्थानिक बाजारपेठसुद्धा अजुनही त्यांच्या कल्पनांसाठी तयार नसणे, ही तर याहूनही वाईट गोष्ट... पण काही महिला स्वप्न बघण्याची हिंमत करतात. उदाहरणच द्यायचे झाले तर अनुशेह अन्सारीच बघा... त्या ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला जेंव्हा इराणमधून अमेरिकेत आल्या, तेंव्हा त्यांना इंग्रजीचे एक अक्षरही येत नव्हते. इंग्रजी भाषेचे अज्ञान असल्यामुळे शाळेत प्रवेश घेताना, तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना अकरावीमधून खाली आणून नववीमध्ये बसविण्याची सूचना केली. पण आपल्या या तात्पुरत्या अक्षमतेपायी दोन वर्षे वाया घालविण्याची अनुशेह यांची तयारी नव्हती. अकरावीपासूनच शिक्षणाला सुरुवात करायला मिळावी, म्हणून त्यांनी त्यांच्या उन्हाळी सुट्टीत १२ तासांचे इंग्रजीचे वर्ग घेतले आणि त्यांच्या याच चिकाटीने त्यांना भविष्यात यशस्वी बनविले.

एका दशकभरापेक्षा कमी काळातच अनुशेह यांनी १९९७ मध्ये आपली टेलिकम्युनिकेशन स्टार्टअप ७५० मिलियन डॉलर्सला विकली आणि त्याहीपुढे धाडस दाखवित, त्या अकरा दिवसांसाठी अतंरीक्षाच्या सफरीवर गेल्या. भारतीय महिलांनीही अशीच महत्वाकांक्षा ठेवली पाहिजे. आपल्याकडे महिलांनी चालविलेल्या उद्योगांची अनेक उदाहरणे आतापर्यंत आहेत तसेच कंपन्यांमध्ये व्यवस्थापनात सर्वोच्च पदावर काम करणाऱ्या स्त्रियाही आहेत. आयसीआयसीआयच्या चंदा कोचर, एक्सिस बॅंकेच्या शिखा शर्मा, आयबीएमच्या विनिती नारायणन आणि ओमडीयार नेटवर्कच्या रुपा कुडवा ही यापैकी काही सर्वोत्तम उदाहरणे आहेत. नक्कीच आजचा जमाना हा तरुण भारतीय स्त्रियांचा आहे, ज्या स्वतःच्या स्टार्टअप्स चालवतील आणि त्यांना जागतिक कंपनीही बनवतील.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

अभेद्य क्षेत्राचा ठाव घेणारी एक क्षलाका लिसा स्राव, मद्य व्यवसायाचे नियम नव्याने लिहित आहेत…

लहानपणीचं स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं, ‘कनाबीज’ फूटवेअर निर्मितीची रंजक कहाणी

कोटीचा पॉकेटमनी ‘कॅलोस’च्या कल्पनेतून, प्रियांका अग्रवाल… एक कॉलेजियन बिझनेस टायकून!

लेखक – विशाल क्रिष्णा

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags