संपादने
Marathi

दुचाकी दुरुस्तीच्या ऑनलाईन सेवेत ४ कोटींची गुंतवणूक, ओला आणि मायक्रोसॉफ्टच्या माजी कर्मचाऱ्यांचं स्टार्टअप

Team YS Marathi
5th Apr 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on


इंडियन एंजल नेटवर्क (आयएएन) ने दुचाकीची दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग करणाऱ्या ड्राइव्हओजॉय (DrivoJoy) या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. टेस्सेलेट व्हेंचर्स, इक्विटी क्रेस्ट आणि ट्रॅक्सन लॅब यांनी ही गुंतवणूक फेरी आयोजित केली होती. ऑगस्ट २०१५ मध्ये ड्राइव्हओजॉयने बेंगळुरूत आपल्या सेवेला सुरूवात केली. सध्या महिन्याला सरासरी ४०० बाईक्स दुरुस्त करत असल्याचा ते दावा करतात.

आपली सेवा सुरू करण्याकरता त्यांनी छोट्या एंजल फंडद्वारे भांडवल उभारलं. जीबी थॉमस (माजी सह-संस्थापक, क्वीकर), मितेश शाह (माजी संचालक, ओलाकॅब्स) आणि अमेरिकास्थित एंजल गुंतवणूकदार डॉ अमरनाथ कोम्मुरी एंजलच्या या राउंडमध्ये सहभागी झाले होते.

संस्थापक सदस्य

संस्थापक सदस्य


अमन सिंघल, विश्वनाथ कोल्लापुडी आणि रवींद्र अकेला यांनी ड्राइव्हओजॉयची सुरुवात केली. सध्या ड्राइव्हओजॉयमध्ये १० सदस्य आहेत. आतापर्यंत दोन हजार बाईक्सची सर्व्हिस त्यांनी केली आहे. मासिक ३० टक्क्यांनी त्यांचा व्यवसाय वाढत आहे.

आयआयटी मुंबईचा माजी विद्यार्थी अमन सिंघल आणि विश्वनाथ ओला कॅब्समध्ये एकत्र काम करायचे. विश्वनाथ ओलामध्ये सीएफए पदावर काम करायचा. तर रवींद्र रायपूर एनआयटीचा माजी विद्यार्थी असून मायक्रोसॉफ्टमध्ये काम करायचा. ड्राइव्हओजॉयची तांत्रिक बाजू तोच सांभाळतो.

बेंगळुरूतल्या कोरामंगला भागात ड्राइव्हओजॉयने आपल्या सेवेला सुरूवात केली. सध्या बेंगळुरूतल्या एचएसआर लेआऊट, बेळंदूर, बीटीएम लेआऊट आणि जयानगर भागांमध्ये ते सेवा देत आहे. व्हाईटफिल्ड आणि बेंगळुरूच्या इतर भागांमध्येही लवकरच ड्राइव्हओजॉयची सेवा उपलब्ध होणार आहे.

या स्टार्टअपने नुकतचं आपलं सर्व्हिस प्रोवाइडर अॅप आणलयं. याद्वारे मेकॅनिक्स आधी केलेल्या कामांची नोंद ठेवून, त्यांची दिवसभराची कामं आखू शकतात. नकाशे, ग्राहकांसोबत चॅट आणि बदलता येणाऱ्या सुट्या भागांचे (replaceable parts) फोटोही अपलोड करता येतात. ड्राइव्हओजॉय सध्या ग्राहकांनाही आवश्यक सुविधा या अॅपवर देण्याकरता प्रयत्न करत आहे. नोंदणी, विशेषतः रस्त्यात अचानक गाडी बंद पडल्यास तातडीने मेकॅनिक बोलवणे किंवा बाईक नेण्याची व्यवस्था करणे या सुविधेचा अंतर्भाव या अॅपमध्ये करण्यात येणार आहे. सर्व्हिस प्रोवाइडर अॅपप्रमाणेच ग्राहक संबंधी अॅपमध्येही फोटो अपलोड करणे, नोंदणी आणि टीममधील तज्ज्ञांशी चॅट करता येणार आहे.

कार्यप्रणाली

तुम्हाला तुमची नादुरुस्त गाडी आता ढकलत गॅरेजला न्यायची किंवा लवकर दुरुस्ती करता मेकॅनिकची मनधरणी करण्याची काही आवश्यकता नाही. या अॅपमुळे मागणीप्रमाणे दुचाकी चालकांना त्यांच्या गाडीची सर्व्हिसिंग किंवा दुरुस्ती त्यांच्या दाराशी करता येते. ड्राइव्हओजॉयच्या म्हणण्यानुसार याकरता तुम्हाला इतर ठिकाणांपेक्षा ३०-४० टक्के खर्च कमी येतो. ९० मिनिटांत दुरुस्तीची हमीही ते देतात.

ग्राहकांना याकरता सर्वात आधी ड्राइव्हओजॉयला तुमच्याकडे कोणती बाईक आहे आणि तिला काय त्रास होतोय हे सांगाव लागतं. यानंतर ड्राइव्हओजॉय त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या नेटवर्कमधला कोणता मेकॅनिक ही अडचण सोडवू शकतो हे सिस्टीमच्या आधारे शोधतात. त्यानंतर ग्राहकाने दुरुस्तीकरता त्याला कोणती वेळ सोयीची आहे हे सांगून बुकिंग करावं. मग ठरल्या वेळी आणि ठरल्या जागी मेकॅनिक हजर. सर्व्हिसिंग झाल्यावर बिलाची रक्कम ग्राहक रोख किंवा ऑनलाइन पेमेंट करू शकतात.

ग्राहक नेहमीची सर्व्हिस जेव्हा गरज असेल तेव्हा नोंदवू शकतात. ग्राहकांना आपल्या गाडीची नियमित तपासणी आणि सर्व्हिसिंग हवी असल्यास ड्राइव्हओजॉय कमी दरात आगाउ वार्षिक देखभाल करार (एएमसी) ही पुरवते.

ड्राइव्हओजॉय मेकॅनिक्स नेटवर्कमध्ये केवळ प्रशिक्षित आणि कुशल मेकॅनिक्सच आहेत. तक्रारीच्या ठिकाणी ये-जा करण्याकरता प्रत्येक मेकॅनिककडे त्याचं स्वतःच वाहन असणं आवश्यक आहे. मेकॅनिक्सना स्वतःच वाहन घेता यावं याकरता ड्राइव्हओजॉयने कर्जाकरता काही बँकांशीही संधान साधलयं.

एकंदर हे क्षेत्र आहे तरी कसं?

जागतिक पातळीवर दुचाकी गाड्यांच्या निर्मितीमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. विकसित देशांमध्ये दुचाकी दुरुस्तीचा बाजार थंड आहे. विक्री क्षमता जास्त असल्याने तिथला ग्राहक बऱ्याचदा नवीन गाडी विकत घेणंच पसंत करतो. तर भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये लोक पैसे जपून वापरतात. त्यामुळे काही बिघाड झाल्यास गाडी दुरुस्त करून परत वापरण्यालाच प्राधान्य देतात. आपल्याकडे गाडीही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतर होण्याची उदाहरणे आहेत. त्यामुळेच गाडी दुरुस्ती आणि सर्व्हिसिंगचं क्षेत्रात बस्तान बसावायला मोठा वाव आहे. हा नक्कीच फायद्याचा व्यवसाय आहे.

गेल्या काही वर्षात उबेर फॉर एक्स सारख्या स्टार्टअप्सनी वाहन दुरुस्तीच्या क्षेत्रात चांगलच यश मिळवयलयं. युवर मेकॅनिक या अमेरिकेतल्या स्टार्टअपने १अब्ज ५८ कोटी ५८ लक्ष रुपयांची गुंतवणूक सिरीज बी राउंडमधून मिळवली. भारतात राजन आनंदन यांची मेरीकारडॉटकॉम, माय फर्स्ट चेक आणि गुडगावमधील कारपथी या काही वाहन दुरुस्ती सेवा पुरवणाऱ्या साईट्स चांगल्याच लोकप्रिय होत आहेत. पण अजूनही दुचाकी वाहन दुरुस्ती सेवा पुरवण्याच्या क्षेत्रात फारसे खेळाडू उतरलेले नाही आहेत. त्यामुळे ड्राइव्हओजॉयच्या प्रगतीला चांगलीच संधी आहे.

ड्राइव्हओजॉय टीम

ड्राइव्हओजॉय टीम


भविष्यातल्या योजना-

युअरस्टोरीशी बोलताना अमनने त्यांच्या व्यवसायवाढीच्या योजना सांगितल्या. ड्राइव्हओजॉय त्यांना सध्या मिळालेल्या भांडवलाचा वापर नवीन मेकॅनिक्सची नियुक्ती, जाहिराती, तंत्रज्ञान आणि कामकाजात आणखी सुधारणा आणण्याकरता करणार आहे.

अमन सांगतो की, “ग्राहक आणि मेकॅनिक्सचा थेट संपर्क करून दिल्यामुळे आम्ही मधली साखळी तोडली आहे. यामुळे त्यांना गॅरेजमध्ये काम केल्यावर मिळणाऱ्या मोबादल्यापेक्षा 2-3 पटीने अधिक पैसे मिळत आहेत. ऑटोमोटिव्ह शोरुम्ससोबत हातमिळवणी करून एकाच छताखाली विक्रीनंतर सर्व सेवा उपलब्ध करून देण्याच्या विचारात आम्ही आहोत”.

बेंगळुरूतला दुचाकी गाड्यांच्या दुरुस्तीचा बाजार आपल्या हातात घेण्याच्या प्रयत्नात सध्या ड्राइव्हओजॉय आहे. त्यासोबतच चार चाकी गाड्यांची दुरुस्तीही आपल्याकडे वळण्याचं त्यांचं लक्ष्य आहे.

इंडियन एंजल नेटवर्कच्या (आयएएन) वतीने अंबरिश रघुवंशी (नोकरी डॉट कॉमचे माजी सीएफओ) आणि टेस्सेलेट वेंचर्स यांनी या राउंडमध्ये प्रतिनिधित्व केलं. तर शैलेश राव (व्हीपी, ट्विटर आणि माजी संचालक, गुगल इंडिया), कुणाल शाह (संस्थापक, फ्रिचार्ज), भवानी राणा (भागीदार, अमॅड्युस कॅपिटल) आणि दीपक गुप्ता (सहसंस्थापक, इक्विटी क्रेस्ट) हे सर्वही या राउंडमध्ये सहभागी झाले होते. ड्राइव्हओजॉयचे आर्थिक सल्लागाराची भूमिका इक्विटी क्रेस्टनी पार पाडली.

आयएएनचे गुंतवणुकदार अंबरिश म्हणाले की, “आपली कंपनी सुरू करण्याच्या दरम्यान अमन माझ्याकडे अतिशय शांतपणे आला. मला त्याच्यातली चुणूक लगेचच दिसून आली आणि मी त्यांच्या व्यवसायात रस दाखवला”.

ड्राइव्हओजॉयकडे बेंगळुरूमध्ये लहानसं गोदाम आहे. जास्त प्रमाणात लागणाऱ्या सुट्या भागांचा साठा ते इथे करतात. ग्राहकांच्या समस्यांचं ९० टक्के निराकरण ते त्यांच्या दाराशीच करतात. फार क्वचितच गाडी तिथून हलवून दुसरीकडे नेऊन दुरूस्त करावी लागलीय. हाच तर त्यांचा युएसपी आहे. ब्रेकडाऊन किंवा अपघातानंतरही ते विशिष्ट सेवा पुरवतात. ‘गाडीच्या मालकीचं हस्तांतरण’ या नवीन सेवेवरही सध्या ते काम करत आहेत. आतापर्यंत शंभर गाड्यांच्या मालकीच्या हस्तांतरणात मदत केल्याचा ड्राइव्हओजॉय दावा करतं.

इक्विटी क्रेस्टचे सहसंस्थापक दीपक गुप्ता यांच्या मते, सुरुवातीला बाजाराकडून केलेल्या अपेक्षेपेक्षाही ड्राइव्हओजॉयला चांगलचं यश मिळत आहे.

वेबसाईट- DriveoJoy

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

उत्पादनास सुरुवात होण्यापूर्वीच गोव्यातील होम ऑटोमेशन स्टार्टअपला प्री ऑर्डर्स मिळविण्यात आले घवघवीत यश 

शॉपयार्डः ऍमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या तगड्या खेळाडूंच्या स्पर्धेत स्वतःचे स्थान निर्माण करणारी ई-कॉमर्स स्टार्टअप...

शाळेच्या बसवर निगरणी ठेवणारे 'लोकॅटेरा'लेखक – हर्षित मल्ल्या

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags