जैविक खत निर्मितीतून शेत-मातीला ‘निर्मळ’ करणाऱ्या निर्मला कंडलगावकर! गांडुळ पिकल्या कचऱ्याखाली ढोल ‘विवाम’चा वाजं जी…

जैविक खत निर्मितीतून शेत-मातीला 
‘निर्मळ’ करणाऱ्या निर्मला कंडलगावकर!
गांडुळ पिकल्या कचऱ्याखाली                                    ढोल ‘विवाम’चा वाजं जी…

Tuesday October 06, 2015,

6 min Read

निर्मला कंडलगावकर… वय वर्षे ६३… दिसायला अगदी एखादी सर्वसामान्य भारतीय गृहिणी असते… तशा. लाल रंगाची सिंथेटिक साडी, डोक्यावर मोठा कुंकू आणि केस विंचरलेले असले तरी बऱ्यापैकी विस्कटलेले. अगदी अस्सल मध्यमवर्गीय रूपडे. वरकरणी अगदीच सर्वसामान्य भासत असलेल्या निर्मला कंडलगावकरांचे कतृत्व मात्र केवळ असमान्य म्हणावे असेच! कंडलगावकरांच्या कतृत्वाची कथा कानावर पडली, की कुणालाही कौतुक करावेसे वाटतेच. वाटणार का नाही? ‘शी डिझर्व्ह!’

सायंकाळी उगवते सकाळ जेव्हा…

ज्याला लोक आयुष्याची सायंकाळ म्हणतात, अशा निवृत्तीच्या वाटेवर त्यांनी स्वत:च्या करिअरची सकाळ उगवली… फुलवली… वाटेवर अनेक अडसर होते. ते दूर करत, नाना आव्हाने पेलत त्यांनी एका आगळ्या व्यवसायात पाऊल टाकले. ‘वर्मीकम्पोस्टिंग’च्या भानगडीत तर महिला सहसा पडतच नाहीत, एखाद्या महिलेने हा व्यवसाय करू धजणेच मुळात एक आव्हान. ‘वर्मीकम्पोस्टिंग’ म्हणजेच गांडुळांच्या सहाय्याने जैविक खताची निर्मिती आणि पुढे बरोबरीला बायोगॅस प्लँटही निर्मला यांनी सुरू केला. प्रवास चालू झाला. आज त्यांनी या प्रवासात मानाचा टप्पा गाठलेला आहे. अवघा देश त्यांना ‘कचऱ्यापासून वीज बनविणारी’, ‘बिजलीवाली बाई’ म्हणून ओळखतो.

image


निर्मला कंडलगावकर…

अवकाश… आकाश… अन् उड्डाण

महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील एका शिक्षक कुटुंबात निर्मला यांचा जन्म झाला. जीवशास्त्रात बीएस्सी केल्यानंतर त्यांनी स्वत:ला समाजसेवेत झोकून दिले. पुढे १९७८ मध्ये गिरीश यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. मुले मोठी झाली. मार्गी लागली. आता हाती मोकळा वेळ होता. काहीतरी करून दाखवण्याची धमक होतीच. कौटुंबिक जबाबदाऱ्यांची परीक्षाही यशस्वीपणे पार पडलेली होती. अवकाश मिळालेलाच आहे तर आता आपले आकाश आपणच बनवावे आणि घेऊनच पहावे एक उड्डाण, असा चंग त्यांनी मनाशी बांधला.

निर्मळ प्रीती शेत-मातीसंगे

निर्मला म्हणतात, ‘‘सामाजिक कार्याचा अनुभव गाठीला होताच. गावाची ओढ होती. शेती-मातीबद्दल प्रीती होती. तेव्हा यातच काही करावे, असे मी ठरवले. गावासाठी आणि शेतकऱ्यांसाठी काही करता येईल, थोडे का होईना मातीचे पांगही फिटतील म्हणून मग जैविक खतनिर्मितीचा मार्ग मी चोखाळला. व्यवसायापेक्षा सामाजिक जबाबदारी म्हणूनच ही वाट मी धरली.’’

निर्मळ कळवळा… बळीराजाविषयी

‘‘मी अगदी बालपणापासून बघत आलेले होते, की बहुतांश शेतकरी शेतीतून नफा कमवण्यापेक्षा व्याजच भरत आलेले आहेत, येताहेत. चांगले पीक यावे या आशेवर महागड्या रासायनिक खतांवरच बहुतांश शेतकरी जास्तीचा खर्च करतात, हेही मी बघत-अनुभवत आलेले होते.’’ हे सांगताना निर्मला हळव्या होतात.

निर्मळ गांडुळ घेतले हाती…

‘‘मी जीवशास्त्रात पदवी घेतली. म्हणून मला माहित होते, की पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेतकरी स्वत:च खत तयार करत असत. गांडुळांचा वापरही करत असत. पुढे रासायनिक खतांच्या अतिरेकात शेतकऱ्यांनी जैविक खताचा वापरच बंद केला.’’

निर्मळ संकल्प सोडियेला…

‘‘मी विचार केला. आपण असे करू या का… जेणेकरून पुन्हा नैसर्गिक खताचा वापर सुरू होईल. शेतकरी गांडुळखताकडे वळतील, शेणखताकडे वळतील. जैविक खत तयार करण्याच्या नेमक्या पद्धती कशा, कोणकोणत्या ते जाणून घेण्यासाठी तत्पूर्वी मी कितीतरी पिढ्या मागे गेलेले होते. हाती लागेल तो स्त्रोत वापरलेला होता. तंत्र जाणून घेतलेले होते. पारंपरिक तंत्र उपयुक्त होते, पण त्याला आधुनिकतेची जोड लागणार होती.’’

निर्मळ ताळमेळ परंपरेशी

‘‘मग मी स्वत:च वेगवेगळे प्रयोग सुरू केले. वर्षभर कष्ट उपसले. अखेर ‘परंपरा’ आणि ‘आजचे तंत्र’ यांचा ताळमेळ बसला. उदाहरणार्थ पारंपरिक पद्धतीप्रमाणे खतासाठी खड्डा खणायचा नाही तर नव्या तंत्रानुसार मोठा डब्बा वापरायचा.’’

कचऱ्यावरील गांडुळांची उत्सर्जन प्रक्रियाही निर्मला यांनी समजून घेतली. ऑर्गेनिक खतांच्या दर्जेदार उत्पादनासाठी त्यांनी रितसर आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंगही घेतली. नेमके तापमान, उपयुक्त ठरेल असे मातीचे प्रमाण व प्रकार हे सारे जाणून घेतले.

निर्मळ प्रारंभ, नफा नाही

‘‘आमच्याकडे गावातच एक बऱ्यापैकी मोकळा प्लॉट होता. इथे आम्ही सुरवातीला खतनिर्मितीला प्रारंभ केला. आम्ही बनवलेल्या खतावर जवळपासचे शेतकरी विश्वास दाखवू लागले. २०-२५ हजार रुपये लावून खत बनवण्यासाठीचे काही डब्बे आम्ही तयार केले आणि ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर त्यांची विक्री केली.’’

निर्मळ मुहूर्तमेढ ‘विवाम’ची

शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत गेला. जवळपास सगळेच आता आपापल्या अंगणात, परसदारी, खळ्यात वा मळ्यात या खतासाठी काही जागा ठरवायला आणि स्वत:च खत बनवायला उत्सुक होते. निर्मला यांचा फोन सतत खणखणू लागला. शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद पाहून या कामाला व्यावसायिक स्वरूप देण्याचे निर्मला यांनी ठरवून टाकले. ‘विवाम एग्रोटेक’ची मुहूर्तमेढ झाली.

शेतीला हे खत कसे उपयुक्त आहे, हे शेतकऱ्यांमध्ये रुजावे म्हणून अगदी सुरवातीला तर स्वत: निर्मला यांनी या खताची पाकिटे नमुना म्हणून मोठ्या प्रमाणावर वाटली होती. कुंडीत पिकाचे रोप लावून त्यात हे पाकिट टाकून स्वत: आजमावून पहा, असे आवाहन केले होते. पुढला प्रतिसाद या पाकिटांचीच परिणती! पुढे निर्मला यांनी आपणच विकसित केलेल्या तंत्रातून खतनिर्मितीसाठी तयार केलेले यंत्रही शेतकऱ्यांसाठी जणू यशाचा मंत्र बनले. यंत्राला उठाव आला.

२० हजार रुपये किमतीत या संचातील २०० क्युबिक फुट्याच्या डब्याशिवाय गांडुळांची किंमत व संच बसविणेही समाविष्ट होते. निर्मला आणि त्यांचा चमू शेतकऱ्याकडे थेट जाऊन त्याला खत बनवण्याच्या साऱ्या प्रक्रियेचे प्रशिक्षणही देई. सुरवातीच्या वर्षात तीन संचांचीच विक्री झाली, पण पुढल्याच वर्षी २५ संच विकले गेले.

निर्मळ भेटीला वंदना ऐसी…

दरम्यानच्या काळात निर्मला यांचे पतीसमवेत दिल्लीला कुठल्याशा कामाने येणे झाले. आणि योगायोगानेच त्यांची भेट कृषी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी वंदना द्विवेदी यांच्याशी झाली. निर्मला यांच्यासाठी ही भेट म्हणजे मैलाचा दगड ठरली. केवळ या भेटीमुळेच निर्मला आणि त्यांचा प्रोजेक्ट देशातच नव्हे तर जगभरातील अनेक देशांत प्रसिद्ध झाला. लोकप्रियही झाला.

निर्मला कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात, ‘‘मला वंदनाजी भेटल्या काय आणि मी त्यांना माझ्या उपक्रमाबद्दल सांगून पाहिले काय. त्यांनी मला थेट दिल्लीतील प्रगती मैदानात नेऊन बसवले. जागतिक व्यापार मेळा तिथे लागलेला होता. कृषी पॅव्हेलियनमध्ये मला एक स्टॉल विनामूल्य मिळवून दिला. संधी मिळालीच आहे तर करू या सोने म्हणून मीही देशभरातल्या विशेषज्ञांना सामोरे गेले. जैविक खताचे हे पारंपरिक तंत्र कसे उपयुक्त आहे, ते पटवून दिले.’’

निर्मळ यशाला आकाश ठेंगणे

‘‘ रासायनिक खतांच्या अतिरेकी वापराने जमिनीचा घटता पोत एव्हाना सरकारच्याही लक्षात आलेला होता. सरकार ऑर्गेनिक खतांच्या प्रचाराला लागलेलेही होते. ‘विवाम ॲएग्रोटेक’चे उत्पादन ऑर्गेनिक असल्याने सरकारच्या ‘गुड बुक’मध्ये हे प्रतिष्ठान एव्हाना आलेलेच होते. ‘विवाम’द्वारे विकसित गांडुळ खत निर्मिती संचाच्या खरेदीवर सरकारने अनुदान जाहीर केले. जैविक खतांत मिळालेल्या यशाने निर्मला उत्साहात होत्याच. सरकारच्या अनुदानाबाबतच्या निर्णयाने त्यांना आकाश ठेंगणे झाले. लगेच लक्षातही आले अरे आता जबाबदारी वाढलेली आहे. आपले काम आता याच क्षेत्रातील नव्या टप्प्यावर नेण्याची हीच वेळ आहे, हेही लक्षात आले. मग त्यांनी बायोगॅसच्या क्षेत्रात असेच आगळे काही करायचे ठरवून टाकले.

निर्मला यांचे ठरवणे म्हणजे कामाला लगेच झालेली सुरवातच! तातडीने त्यांनी एक ‘मिनी बायोगॅस प्लँट’ बनवला. पाण्याच्या टाकीसारखा घराच्या छतावर बसवला जाऊ शकेल, असा हा प्लँट होता. स्वत:च्या सोसायटीतच पहिला प्रयोग केला. लगतच्या कचऱ्यातून एका कुटुंबाला पुरेल इतक्या गॅसची निर्मिती सुरू झाली.

‘‘आमचा हा बायोगॅस प्लँटही लोकप्रिय व्हायला उशीर लागला नाही.’’ हे सांगताना निर्मला यांचा उत्साहाला आत्मविश्वासाचे उधाण आलेले असते. त्या सांगतात, ‘‘मग चंद्रपूरला आम्ही मोठा प्रोजेक्ट सुरू केला. प्रकल्पावर बारा लाख रुपये खर्च झाला. सरकारने हे पैसे दिले. चंद्रपूरचा प्रकल्प यशस्वी ठरला आणि अन्य १५ महामंडळांनी आमच्याशी संपर्क केला. बायोगॅस प्लँट आमच्याकडून लावून घेतले.’’

निर्मला पुढे नमूद करतात, ‘‘युरोपियन देशांतूनही आता रासायनिक खतांचा वापर टाळण्याकडे कल आहे. अनेक शेतकरी तर तेथे रासायनिक खतांचा वापर सपशेल करत नाहीत. इथल्या अनेक देशांत ‘विवाम ग्रोटेक’चे गांडुळखत संच निर्यात केले जात आहेत. काश्मिर ते कन्याकुमारी अशी ‘विवाम’ची घडी आजघडीला आसेतुहिमाचल पर्यंत बसलेली आहे. सर्वच प्रांतांतून ‘विवाम’ने आपले नेटवर्क विकसित केलेले आहे.

निर्मळ संकल्प भविष्याचा…

‘‘भविष्यात जैविक खताच्या उत्पादनासाठी अगडबंब असे युनिट विकसित करण्यावर ‘विवाम’चा भर असेल, जेणेकरून शेकडो टन कचऱ्याची विल्हेवाटही लागू शकेल आणि रासायनिक खतांच्या वापराने पोळलेल्या शेतकऱ्यांना जैविक खतही उपलब्ध होऊ शकेल.’’