संपादने
Marathi

मोबाईल अॅप स्टिकर्सची अनोखी दुनिया...पेरडिक्स

शब्दांच्याही पलीकडचा संवाद...

Pravin M.
7th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

हा सोशल मीडियाचा जमाना आहे. तुमच्या मोबाईलवर वुई चॅट, निम्बुज आणि लाईनसारखे मेसेजिंग अॅप्लीकेशन नक्कीच असतील. या अॅप्लीकेशन्समधले इमोटिकॉन्स अर्थात स्टिकर्स तुम्ही मेसेजमध्ये अगदी सहज वापरता. पण त्यातले बहुतेक स्टीकर्स पेरडिक्स बिझनेस सोल्युशन्सने तयार केलेत हे तुम्हाला माहिती आहे का? आयआयटी गुवाहाटीमधल्या काही तरुणांनी 2012मध्ये जवळपास 3 लाख रूपयांनी या कंपनीची सुरुवात केली होती. हीच कंपनी यावर्षी कोट्यवधींचा टर्नओव्हर साध्य करण्याच्या तयारीत आहे.

कंपनीचे सहसंस्थापक(को-फाऊंडर) दुष्यंत पालरिवाल म्हणतात, “पेरडिक्स ही एक डिजाईन सोल्युशन्स कंपनी आहे. आमचे क्लाएंट्स, अर्थात अशी अॅप्लीकेशन्स बनवणा-या कंपन्या आणि वेगवेगळ्या वेबसाईट्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आमच्या डिजाईन्सचा वापर करतात.” कंपनीचे दुसरे सहसंस्थापक मनीष सांगतात, “आयआयटी गुवाहाटीमध्ये आम्ही भरपूर डिजाईन्स शिकलो होतो. त्यामुळे तसंच काहीतरी करायची इच्छा होती. मग काय, आम्ही पाच जण एकत्र आलो आणि केली सुरु कंपनी. भारतात अजूनही या प्रकारच्या कामाला भरपूर स्कोप आहे.”

मोबाईल अॅप स्टिकर्सची अनोखी दुनिया !

मोबाईल अॅप स्टिकर्सची अनोखी दुनिया !


“जवळपास 10 वर्षांपूर्वी या डिजाईन्सचं लोकांना फार काही वाटत नव्हतं”, मनीष पुढे सांगतात, “पण आज परिस्थिती बदलली आहे. खरंतर एक छोटीशी डिजाईन, इमोटिकॉन, स्टिकर खूप सा-या गोष्टी एकही शब्द न बोलता सांगून जातात. आम्ही आत्तापर्यंत 50 हून अधिक क्लाएंट्सना त्यांच्या मागणीनुसार डिजाईन बनवून दिल्या आहेत. आणि आता आमचं भविष्य आमच्या हातात आहे.”

सध्या मोबाईल अॅप्लीकेशन, वेबसाईट, डिजिटल ग्राफीक्स, अॅनिमेशन अशा गोष्टी पेरडिक्स बनवते. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पेरडिक्स कंपन्यांना मदतच करते. टीम पेरडिक्सच्या असं लक्षात आलं की अशा प्रकारे मोबाईल मेसेजिंग अॅपसाठी इमोटिकॉन, स्टिकर्स बनवणा-या कंपन्या खूपच कमी आहेत. आणि ज्या आहेत, त्यांचे डिजाईन परदेशी धाटणीचे असतात. त्यांना ‘इंडियन टच’ नसतो. हीच गोष्ट ध्यानात घेत टीम पेरडिक्सनं या डिजाईन्स बनवण्याचा निर्णय घेतला. “आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांपेक्षा स्टिकर्स जास्त प्रभावी ठरतात. एक स्टिकर कदाचित शेकडो शब्दांचं काम करून जातं”, मनीष सांगतात.

युवा टीम...

दुष्यंत पालरिवाल, मनीष सुगंधी, शुभम जैन, रंजू रविंद्रन आणि सृजन मौलिक या पाच जणांनी मिळून पेरडिक्सची स्थापना केली. हे सगळेच जण आयआयटी गुवाहाटीचे ग्रॅज्युएट आहेत. सध्या 25 जणांची टीम पेरडिक्ससाठी बंगळुरु आणि कोलकाता या दोन ठिकाणच्या ऑफिसमध्ये काम करत आहे. मनीष सांगतात, “आम्ही पाच जणांनी जेव्हा हा व्यवसाय सुरु केला, तेव्हा आम्हाला यशाची खात्री वाटत होती. आणि याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आम्ही पाचही जण एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो.” पेरडिक्सच्या टीममध्ये डिजाईन बनवणारे, डेव्हलपर, बिजनेस डेव्हलपमेंट आणि फायनान्सचे लोकही आहेत. दिलीप केजरीवाल आणि साकेत मारोदिया हे दोघेही फायनान्सची कामं करतात. हे दोघेही टीमचे मार्गदर्शकही आहेत.

'पेरडिक्स'चे पाच संस्थापक

'पेरडिक्स'चे पाच संस्थापक


पेरडिक्सच्या यशाचं सूत्र...

मनीष सांगतात, “फ्लिपकार्ट, मिंत्रा, नीम्बूज, लाईन, वायबर अशा कंपन्यांसाठी आम्ही काम केलं आहे. आम्ही ‘शमिताभ’ या चित्रपटासाठी, सब टीवीसाठी आणि मोबाईल रिचार्जची वेबसाईट फ्रीचार्जसाठीही स्टीकर्स बनवलेत. याशिवाय NHAI अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि MRTH अर्थात रस्ते वाहतूक मंत्रालयासाठीही कामं केली आहेत”, बोलताना मनीष सुगंधींच्या चेह-यावर एक वेगळीच चमक होती. सृजन मौलिक म्हणतात, “आम्ही कधीच ‘काहीतरी करु’असा विचार करत नाही. आम्ही नेहमीच ‘काहीतरी चांगलं करु’ असा विचार करतो. समस्यांवर फक्त तोडगा काढून उपयोगी नाही. त्या समस्यांवर सोपा, प्रभावी आणि कार्यक्षम तोडगा हवा. तुम्ही जेव्हा एखादं डिझाईन, एखादं स्टिकर तयार करता, तेव्हा तुम्ही फक्त ग्राहकांची ऑर्डर तयार करत नसता, तर तुम्ही एक संपूर्ण अनुभवच तयार करत असता.”

हे एवढ्यावरच थांबलेलं नाही..

पेरडिक्सने अनेक आंतरराष्ट्रीय क्लाएंट्सचीही कामं केली आहेत. यामध्ये अनेक मोठ्या मेसेजिंग अॅपचाही समावेश आहे. “प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. लाईनला स्टॅटिक स्टीकर्स हवे होते, तर वुई चॅटला अॅनिमेटेड स्टीकर्स. आम्ही क्लाएंट्सच्या गरजा ओळखून त्यानुसार डिजाईन बनवतो”, दुष्यंत सांगतात. याशिवाय कंपनीने ‘कॉल ऑफ कल्चर’ संस्थेसोबत ‘कुरानी’ नावाचं अॅप बनवलं. या अॅपवर कुराण फक्त वाचताच येत नव्हतं तर ऐकताही येत होतं. शिवाय वापरणा-यांना नमाजची वेळही या अॅपद्वारे कळत होती. मनीष सांगतात की, “सध्या मध्य आशियातून सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. येत्या काही काळात अमेरिकेतही व्यवसाय विस्तार करण्याचा आमचा विचार आहे.”

कौतुक कुणालाही चांगलंच वाटतं..

मनीष सांगतात, “जसजसा वेळ गेला, तसतसं आम्ही खूप नवनव्या गोष्टी शिकलो. त्यातूनच खूप काही साध्यही केलं. आम्ही बनवलेल्या डिजाईन्सचं जेव्हा कौतुक होतं, तेव्हा आम्हाला खूप चांगलं वाटतं. आम्ही बनवलेल्या ‘अँग्री आंटी’ला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 25 ते 30 देशांमध्ये ते पाहिलं गेलं. आम्ही त्याचं थ्रीडीही बनवलं आणि आता ते पूर्णपणे नव्या रुपात आम्ही आणतोय.”

अँग्री आंटी...!

अँग्री आंटी...!


“आर्ट ऑफ लिविंगसाठीही आम्ही काम करतोय. त्यांची वेबसाईट, अॅप्लीकेशन, स्टीकर्सवर आम्ही सध्या काम करतोय. त्याचसोबत एक नवं कामही मिळालंय. सुरुवातीच्या दिवसांमध्ये लोकं पॉवर पॉईंट प्रेजेंटेशन द्यायचे. आता लोकं अॅनिमेशन दाखवतात. आम्ही त्याच्यावरच काम करतोय.” मनीष सांगत होते, आणि त्यांची यादी संपत नव्हती. “इरोज एन्टरटेन्मेंटसाठीही आम्ही काम केलंय. मध्य आशियातही काही काम केलंय. खरंतर या सगळ्यात एकच गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्ही काम मनापासून करा, ते चांगलंच होणार. आणि डिजाईन बनवणं हेच तर आमचं पॅशन आहे. आमचं स्वप्न आहे.”

अडचणींचा सामना केला..

मनीष एक गोष्ट मात्र सांगायला विसरले नाहीत. ते म्हणतात, “असं अजिबात नाही की आमच्यासमोर अडचणी नाही आल्या. पण या अडचणी आम्हाला थांबवू शकल्या नाहीत. आमचे वरिष्ठ आणि गुरु या दोघांनी आम्हाला खूप मदत केली. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न करता, तेव्हा अडचणीही तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. कधीकधी काही काळासाठी थोडासा वेग मंदावतो. पण त्या अडचणी तुम्हाला रोखून धरू शकत नाही.” आणि मग मनीष जणू त्यांच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्लीच आपल्यासमोर ठेवतात. “आम्ही फक्त पैसे कमावण्याचा विचार करत नाही. तर ग्राहकांना डिजाईन्सबद्दल अधिकाधिक समाधानी करणंच आमचं ध्येय आहे.”

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags