संपादने
Marathi

दलित बालवधू ते अब्जोपती सीईओ: पद्मश्री कल्पना सरोज यांचा थक्क करणारा प्रवास

कल्पना  सरोज याचं वर्णन 'खरीखुरी स्लमडॉग मिलिनेयर' असं केलं जातं. हे वर्णन जितकं सरधोपट तितकच ते मानहानीकारक आहे. ज्या मुलीचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला, ज्या मुलीचे बालपण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत गेलं, ज्या मुलीला आपलं शिक्षण पूर्ण करता आलं नाही, ज्या मुलीचा अमानुष असा शारीरिक आणि मानसिक छळ झाला, अशी मुलगी पुढे देशातली एक यशस्वी उद्योजिका म्हणून प्रसिद्ध होईल असं कुणालाही वाटलं नसेल. झपाट्यानं वाढणा-या ११२ दशलक्ष अमेरिकन ड़ॉलरच्या साम्राज्याची तीच मुलगी आज कर्तीधर्ती आहे. कल्पना सरोजना इतकं मोठं यश कसं काय मिळवता आलं, हे सांगणारी ही कथा जितकी काळजाचा ठोका चुकवणारी आहे, तितकीच ती खरीखुरीही आहे. खुद्द कल्पना सरोज यांच्याच शब्दात सांगायचं म्हणजे, “ आयवी लिग पदवी आणि भपकेदार एमबीए पदव्या उद्योजक निर्माण करत नाहीत. हिंमत, चिकाटी, आत्मविश्वास आणि तो निर्माण करणारी असामान्य क्षमता उद्योजक निर्माण करत असतात.” त्यांच्या या थक्क करणा-या यशस्वी प्रवासापासून जर कोणता धडा घेण्यासारखा असेल तर तो हाच. त्यांचा हा रोमरहर्षक यशाचा प्रवास त्यांच्याच शब्दात ऐकणं म्हणूनच महत्त्वाचंही आहे आणि प्रेरणादायी सुद्धा.

sunil tambe
13th Aug 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
कल्पना सरोज, सीईओ, कमानी टयूब्ज.

कल्पना सरोज, सीईओ, कमानी टयूब्ज.


सुरूवातीचा रखडलेला जीवन प्रवास


माझा जन्म विदर्भात एका दलित कुटुंबात झाला. माझे वडील पोलीस हवालदार होते. वडलांना मिळालेल्या शासकीय निवासस्थानात आम्ही रहायचो. मला तीन बहीणी आणि दोन भाऊ होते. मी अभ्यासात हुशार होते. मला शाळेत जायला खूप आवडायचे. मी दलित असल्याने आम्ही जिथं रहायचो त्या वसाहतीत मला इतर मुलांसोबत खेळायला मिळायचे नाही. आपल्या मुलांनी कल्पनासोबत खेळावं असं वसाहतीतल्या मुलांच्या पालकांना अजिबात आवडायचं नाही. जर त्यांची मुलं माझ्यासोबत खेळली तर त्यांना ओरडा मिळायचा. माझ्या घरी जाऊ नये अशी ताकीदच त्यांनी आपल्या मुलांना दिलेली असायची. माझ्याकडून कोणतेही खाण्याचे पदार्थ घ्यायचे नाहीत अशी सख्त ताकीद त्यांना दिलेली असायची.

ही परिस्थिती मन दुखावणारी असली तरी मला याचं कधी आश्चर्य वाटलं नाही. त्याला कारणही तसंच आहे. ते म्हणजे, आदर्शांचा धडा शिकवणारे शाळेतले शिक्षकही माझ्याशी असेच वागत होते. मग वसाहतीतल्या रहिवाश्याचे उदाहरण काय द्यावे ? मी इतर विद्यार्थ्यांपासून दूर बसावं यासाठी शिक्षक प्रयत्न करायचे. अभ्यासक्रमाबाहेरच्या इतर कोणत्याही उपक्रमामध्ये ते शिक्षक मला भाग घेऊ द्यायचे नाहीत. यामुळे कला किंवा खेळ अशा गोष्टींमध्ये मी मनाशी बाळगलेली स्वप्ने, माझ्या इच्छा, आकांक्षा धुळीला मिळत असत. पण समजा शाळेमध्ये अशी परिस्थिती नसती तरीही माझी स्वप्नं पूर्ण होणार नव्हतीच. कारण माझ्या घरच्या मंडळींनी मला इयत्ता सातवीतून शाळा सोडायला लावली आणि माझं लग्न लावूनही मोकळे झाले. होय, माझा बालविवाहच लावण्यात आला होता.


बालविवाह


माझ्या वडलांनी जुजबी शिक्षण घेतलं असलं तरी ते कायदा अंमलबजावणी विभागात नोकरी करत होते. यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहीत होतं. मी शिक्षण पूर्ण करावं असं त्यांना वाटत होतं. पण ज्या दलित समाजात मी वाढले त्या समाजात बालविवाहाची प्रथा होती. तसा बालविवाहाला माझ्या वडिलांचा विरोध होता. पण आमच्या मोठ्या एकत्रित कुटुंबात नात्याने मोठ्या असलेल्या लोकांसमोर त्यांचं काहीही चाललं नाही. एका बाजूला बालविवाहाच्या बाजूने कुटुंबियांची मजबूत आघाडी आणि दुस-या बाजूला माझे हतबल वडील. माझ्या वडलांची ही अशी अवस्था, तर माझे काय ? मी तर त्यांच्यासमोर खूपच दुबळी.


वैवाहिक जीवन


ज्या समाजव्यवस्थेत माझा जन्म झाला, त्या समाजात विवाहानंतरचे सासूरवाशीण म्हणून मुलीचे जीवन सोपे, छान आणि सुखी असू शकत नाही हे ओघाने आलेच. मला याची कल्पना होती म्हणूनच सासरच्या घरी एखाद्या गुलामासारखे बटीक होऊन राबण्याची माझ्या मनाची तयारी झालेली होती.

उद्योजिका कार्यकर्ती आणि  पिडित महिलांची प्रेरणा - कल्पना सरोज

उद्योजिका कार्यकर्ती आणि पिडित महिलांची प्रेरणा - कल्पना सरोज


असं असलं तरी पुढे नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या नरकयातनांना सामोरं जावं लागेल याची मला काहीही कल्पना नव्हती. माझं लग्न झालं तेव्हा मी जेमतेम १२ वर्षांची, सडपातळ अंगकाठीची शाळकरी मुलगी होते. दहा लोकांचे कुटुंब असलेल्या माझ्या सासरच्या घरात मला जेवण बनवणं, कपडे धुणं, साफसफाई करणं अशा प्रकारची कामं करावी लागायची. परंतु सासरच्या मंडळींसाठी इतकंच पुरेसं नव्हतं. सासरच्या कुटुंबातील सर्वजण अत्यंत क्रूर प्रवृत्तीचे होते. माझी अवस्था त्यांच्या तावडीत आयतीच सापडलेल्या बळीच्या बकऱ्यासारखी झाली होती. लहानातली लहान चूक ही ते सतत शोधत रहायचे. जेवणात मीठच जास्त झाले, घराची सफाईच ठीक झालेली नाही असे म्हणत ते मला जाब विचारत रहायचे. हे कमी होते की काय म्हणून ते मला मारहाण सुद्धा करायचे, निर्दयतेने लाथेनेही मारायचे, गुद्देही मारायचे आणि मला रागाने ढकलायचेही. त्यांचे हे अमानुष अत्याचार एवढ्यावरच थांबलेले नव्हते. ते मला शिक्षा म्हणून उपाशीही ठेवायचे, सतत माझा मानसिक छळसुद्धा करायचे. लग्नानंतर सहा महिन्यांनी माझे वडील मला पहायला आले. जेव्हा त्यांनी माझी अवस्था पाहिली, तेव्हा त्यांना भयंकर धक्क बसला. मला अशा अवस्थेत बघून ते गलबलून गेले. म्हणाले, " मी माझ्या मुलीला पहातोय असे मला वाटतच नाही. मी एखादं चालतं फिरतं प्रेत बघतोय असं वाटतय!"


लाजिरवाणी गोष्ट


माझ्या समाजासाठी, खरंतर आपल्या देशातल्या गरीबीने गांजलेल्या सर्वच कुटुंबांसाठी मुलगी म्हटली म्हणजे तो एक बोजा असतो. आणि हा बोजा उतरवण्याचा सोपा उपाय म्हणजे मुलीचं लग्न करून देणं आणि तिला विसरून जाणं. याच परिस्थितीचा प्रत्यय मला सतत येत होता. जेव्हा माझ्या वडलांनी मला परत घरी आणलं, तेव्हा मला सासरी काय यातना सहन कराव्या लागल्या हे ऐकून कुणाच्या चेह-यावरची साधी रेषाही हलली नाही. उलट लग्न झालेली मुलगी सासरी न नांदता माहेरी परत येते ही गोष्ट माझ्या घरातल्यांसाठी एक लाजिरवाणी गोष्ट वाटत होती. आमच्या समाजालाही माझ्यामुळे कमीपणाच वाटत होता.

या अपमानजनक परिस्थितीची मला जाणीव होती. मला माझ्या वडलांवर एक बोजा बनून जगायचंच नव्हते. म्हणून मग मी नोकरीसाठी प्रयत्न करायला सुरू केलं. पुढे मी स्थानिक महिला पोलीस हवालदार भरती शिबीरात, नर्सिंग स्कूल , इतकंच नाही तर सैन्य दलात भरती व्हावे म्हणून प्रयत्न करायला सुरूवात केली. पण कधी माझं वय जास्त म्हणून, तर कधी माझं शिक्षण कमी म्हणून माझा पत्ता कट व्हायचा. असे निराशाजनक अनुभव आल्यानंतर शेवटी मी शिलाईचं काम शिकले आणि ब्लाऊज शिवण्याचं काम मी सुरू केलं. प्रत्येक ब्लाऊज मागे मला दहा रूपये मिळायचे.

मी थोडीबहुत कमाई करायला लागले. पण म्हणून माझं जीवन अगदी सुरळीत सुरू झालं असं मात्र मुळीच नाही. मी स्वत:च्या पायावर उभी राहण्यासाठी धडपडत असतानाही इथल्या समाजव्यवस्थेनं मला सोडलं नाही. लोक मला सतत टोमणे मारायचे, माझा तिरस्कार करायचे. हे कमी न होता दिवसेंदिवस यात वाढच होत होती. माझ्या भविष्याची चिंता वाहणा-या माझ्या वडलांनी मला सूचवलं की मी पुन्हा शाळा शिकावी, पण परिस्थिती अशी होती की मी घराबारहेर पडले रे पडले की मला सतत अपमान आणि टोमणे खावे लागलेच म्हणून समजा. मग अशा वातावरणात मी शाळेत कशी जाणार आणि अभ्यास कसा करणार ? लोक तर याही पुढे गेले होते. मी नवरा सोडून माहेरी आल्यामुळे माझ्या कुटुंबाला मी बट्टा लावला आहे आणि तो बट्टा मी मेल्याशिवाय जाणार नाही असे लोक कुजुबूज करत रहायचे.


जगण्याची दुसरी संधी


परिस्थितीनं असे रंग दाखवल्यानं मरणं सोपं, पण जगणं मात्र कठीण आहे अशी माझी खात्री पटली. मागचा पुढचा कशाचाही विचार न करता मी सरळ विषाची बाटली घशाखाली उतरवली. पण विष पित असताना माझ्या आत्यानं मला पाहिलं आणि तिनं मला ताबडतोब रुग्णालयात नेलं. मी अत्यवस्थ होते. पुढील २० तासात जर मी शुद्धीवर आले नाही तर सगळे संपून जाईल असे माझ्या कुटुंबियांना डॉक्टरांनी सांगूनच ठेवलं होतं.

डोळ्यातील आदर्श स्वप्ने सत्यात उतरतात तेव्हा !

डोळ्यातील आदर्श स्वप्ने सत्यात उतरतात तेव्हा !


पण मी जगले. मेले नाही. जितके विष मी प्यायले होते त्यातून मी कशी जगले याचं मला आश्चर्य वाटतं. उपचारानंतर जेव्हा मी रुग्णालयात डोळे उघडले तेव्हा मला निराळी जाणीव होत होती. मी पूर्णपणे बदलून गेले होते. मी आता एक वेगळीच व्यक्ती झाले होते. आता मी एक दुबळी आणि लोकांच्या नजरेत बिनकामाची, बोजा असलेली व्यक्ती राहिलेले नव्हते. मला असं वाटत होतं की मी एक हिम्मतवान, ताकदवर आणि धाडसी मुलगी आहे. मला जीवन जगण्याची दुसरी संधीच मिळाली होती आणि पुढे एका सेकंदासाठीसुद्धा मला ती वाया घालवायची नव्हती.


नवी पहाट


गावाकडं राहून काहीही होणारं नव्हतं. मला मुंबईला जायचं होतं. त्यासाठी मी माझ्या कुटुंबियांचं मन वळवलं होतं. मुंबईत मी माझ्या काकांच्या घरी आले आणि तिथे पूर्णपणे टेलरिंगच्या कामात स्वत:ला वाहून घेतलं. पुढे काही प्रशासकीय कारणांमुळं माझ्या वडलांची नोकरी गेली. वडिलही गावी बसून काय करणार ? आता आमच्या घरात मी सर्वात मोठी आणि एकमेव कमावती मुलगी. मुंबईत आपण भाड्याने एक घर घ्यावं असे विचार माझ्या मनाला शिवले. असं केलं तर एकत्रित राहता येईल आणि काहीतरी करता येईल असं मला वाटत होतं. मग आत्तापर्यंत बँकेत जमा केलेले पैसे मला कामाला आले. त्यातून मी डिपॉझिट भरून एक खोली भाड्यानं घेतली. त्या खोलीचे भाडे दर महिन्याला चाळीस रुपये द्यावे लागत होते. मी खोली घेतल्यानंतर माझे आईवडील आणि भावंडे असे सगळे माझ्यासोबत मुंबईत रहायला आले. खोली खूपच छोटी होती. त्या मानानं भाडं जास्तच होतं. पण आम्हा सर्वांना एकत्र राहण्याची सोय झाली ही माझ्यासाठी मोठीच गोष्ट होती.


गरिबीच्या चटक्यानं मला उद्योजक बनवलं


कमाई तुटपुंजी असल्यामुळं मला सतत पैशांची चणचण भासायची. अशा परिस्थितीत माझी लहान बहीण अचानक आजारी पडली. पुरेसे पैसे नसल्यानं आम्ही तिचा इलाज करू शकलो नाही. आम्ही सगळीकडे पैशांसाठी धावाधाव केली, पण काही फायदा झाला नाही. या आजारपणातून आपण वाचणार नाही अशी तिला सतत भिती वाटत रहायची. ती रडायची. म्हणायची, “ दिदी, मला वाचव... मला मरायचं नाही.” पण मी काहीच करू शकले नाही. मला खूप वाईट वाटले. मी या परिस्थिती समोर हतबल होते. तिचे शब्द मला खात होते. तेव्हा मला पहिली जाणीव झाली की पैशाशिवाय जीवन व्यर्थ आहे. मला पैसा कमवावाच लागेल. मी दिवसातून सोळा तास काम करायला सुरूवात केली. आजही मी दिवसाचे सोळा तास काम करत असते.


असा सापडला मार्ग


शिलाईमशीनवर कपडे शिवून काय होणार होतं ? काही तरी व्यवसाय केला तरच काही होऊ शकेल अशी माझी खात्री झाली होती. आणि कर्जाशिवाय व्यवसाय शक्यच नव्हता. मग पुढे मी सगळ्या शासकीय योजना तपासण्याचा सपाटा लावला आणि महात्मा फुले महामंडळाकडे कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करून टाकला.

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री  सन्मान स्वीकारताना कल्पना सरोज.

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री सन्मान स्वीकारताना कल्पना सरोज.


त्या छोट्याशा कर्जाच्या रकमेवर मी फर्निचरचा व्यवसाय़ सुरू केला. मी उल्हासनगरहून स्वस्तातले स्वस्त फर्निचर विकत घ्यायचे आणि विकायचे. त्याच दर्जाचे फर्निचर बाजारात तुलनेने महाग मिळायचे. मी माझा टेलरिंगचा व्यवसाय ही सोबत सुरूच ठेवला होता. यानंतर हळू हळू आमची परिस्थिती बदलायला सुरूवात झाली. या फर्निचरच्या व्यवसायामुळे मला या धंद्यातल्या खाचाखोचा लक्षात यायला सुरूवात झाली. कच्चा माल कुठून आणावा, बार्गेनिंग कसं करावं, बाजाराचा कल काय आहे अशा बारकाव्यांचा मी अभ्यास करू लागले. हे करत असताना मी मग एक छोटी स्वयंसेवी संस्थाही सुरू केली. या संस्थेमार्फत आम्ही माझ्यासारख्या गरजू लोकांना शासकीय कर्जं कोणती आहेत आणि ती कशी मिळवायची असतात याबाबत माहिती द्यायला सुरूवात केली. मला सारखं वाटत होतं की जे मला भोगावं लागलं, तसं जीवन एकाही मुलाच्या, मुलीच्या किंवा तरूण तरूणीच्या वाट्याला येऊ नये. प्रत्येकानं आपलं आयुष्य सुधारण्याचे, प्रगती साधण्याचे मार्ग शोधले तर ते त्यांचे आयुष्य सुंदर बनवू शकतात. ही जाणीव माझ्यासारख्या तरूण तरूणींना करून द्यायची असे मी मनाशी पक्के ठरवले होते.


संधीनेही घेतली कठोर परीक्षा


मला माझं कर्ज फेडण्यासाठी बरोबर दोन वर्षं लागली. दरम्यानच्या काळात मी इतर काही उद्योगधंदा करण्याबाबत विचार करत होते. शिवाय काही चांगले उद्योगाचे प्रस्ताव येतात का त्याकडंही माझं कायम लक्ष असायचं. विवादात अडकलेल्या एका जमिनीच्या मालकाला पैशांची गरज होती. तशी ती जमीन त्यांच्यासाठी काही उपयोगाची नव्हतीच. त्यामुळे त्यांनी ती जमीन मी विकत घ्यावी म्हणून माझ्याशी संपर्क साधला. मी वाट्टेल ते करून जो जो मार्ग मिळेल तिथून पैसा उभा केला आणि जमीन ताब्यात घेतली. मी जमिनीचा व्यवहार केला खरा, पण ती विवादात अकडलेली जमीन असल्यामुळे एक प्रकारे मी माझ्या डोक्याला कोर्ट - कचे-यांचा भलताच ताप करून घेतला होता. पुढची दोन वर्षं ही मालमत्ता सोडवण्यासाठी मला कोर्टाच्या पाय-या झिजवाव्या लागल्या. माझे ते काम झाले, आणि मी, ती जमीन विकसित करण्याचा विचार सुरू केला. पण मार्ग काही मिळत नव्हता. त्यानंतर मी भागीदाराचा शोध घ्यायचे ठरवले. पासष्ट टक्के भागीदारीच्या अटीवर एक भागीदार मला मिळाला. लवकरच त्या जागेवर एक इमारत उभी राहिली. माझ्या फर्निचरचा व्यवसाय आणि रिअल इस्टेटच्या उद्योगामुळे मी जीवनात काहीतरी मिळवून दाखवलं असं मला वाटू लागलं. परंतु, मी एवढ्यावरच समाधानी होणारी मुलगी नव्हते. सोन्याचे दिवस येणं अजून बाकीच होतं.


...आणि संधी सोन्याची झाली.


महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंचे एक शिष्य होते. त्यांचं नाव रामजीभाई कमानी. स्वतंत्र भारतात उद्योगाचा पाया रचणाऱ्या उद्योजकांपैकी एक उद्योजक म्हणून ते प्रसिद्ध होते. स्वातंत्र्यानंतर ते मुंबईतल्या कुर्ल्यात आले आणि त्यांनी तीन कंपन्या सुरू केल्या - कमानी ट्यूब्ज, कमानी इंजिनियरींग आणि कमानी मेटल. ते नेहमी कामगारांचे हक्क आणि कल्याणाबाबत जागरूक असत. देशाच्या आर्थिक प्रगतीबाबत त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. भारतातल्या औद्योगिक प्रगतीला हातभार लावणारे एक महत्त्वाचे उद्योजक म्हणून त्यांना नावही कमवायचं होते. उदयोगात त्यांची चांगली प्रगती सुरू होती. पण १९८७ मध्ये, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांमध्ये वाद सुरू झाला. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या भल्यासाठी कामगारांनी अथक मेहनत घेतल्याचे कारण देत कंपनीची मालकी कामगारांकडे यावी अशी मागणी करत कामगार संघटनाही न्यायालयात गेल्या. त्यावेळी फ्रान्स, जर्मनी आणि जपानसारख्या देशातल्या उद्योग क्षेत्रात मालकीबाबत असेच बदल घडत होते. सर्वोच्च न्यायालयाने कंपनीची मालकी कामगारांकडे राहील असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. भारतात असा निर्णय लागू होणारी कमानी ही पहिली कंपनी ठरली. पण आता कंपनीचे तीन हजार मालक होणार होते. पण मग प्रत्यक्ष काम कोण करणार होते ? हा प्रश्न होता. काही दिवसांमध्येच ताणतणाव आणि वादविवादाला सुरूवात झाली. कामगार संघटनेच्या नेत्यांचे कंपनीत हितसंबंध गुतले होते अशातला भाग नव्हता. परंतु त्यांना त्यांचा अहंकार जपायचा होता. स्वत:चे वर्चस्व प्रस्तापित करायचे होते. तर दुसरीकडे कामगारांचे मालकीचे हक्क मिळणे ही उद्योग जगतातली पहिलीच घटना असल्याने लोकांना वाटले की कमानी इंडस्ट्री आता क्रांतीच्या उंबरठ्यावर उभी आहे. बँका आणि शासनानेही हा बदल सकारात्मक अर्थानेच घेतला. कमानी उद्योगावर बँकांनी तर कर्ज, मुदतवाढी आणि क्रेडिटचा अक्षरश वर्षावच केला. शासनाने देखील या उद्योगाला वेगवेगऴे फंड आणि सवलती द्यायला सुरूवात केली. आता तर कमानी उद्योगाकडे मोठे भांडवल होते, पण ते कल्पकतेने कसे वापरावे हे सांगणा-या तज्ञांचा मात्र अभाव होता. यामुळे कंपनीला स्पर्धेत टिकणं कठीण होऊ लागलं. १९८७ ते १९९७ या दहा वर्षांच्या काळात कंपनीला अक्षरश: रडत रखडत चालावं लागलं. जिथं कामगारच मालक झाले तिथं कंपनी कोण बंद करणार. कंपनीची नेमकी स्थिती जेव्हा गुंतवणूकदारांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरूवात केली. वीज आणि पाणी बंद करण्यात आले. या परिस्थितीचा मग आयडीबीआयनं सर्व्हे केला. त्यात कामगार कामचुकारपणा करत असल्याचं आढळून आलं. यामुळं न्यायालयानं कंपनीसाठी प्रवर्तक नेमण्याची सक्ती केली. अशा परिस्थितीत एक दोन नव्हे, तर चक्क १४० दावे आणि प्रकरणं कंपनीच्या विरोधात न्यायालात दाखल करण्यात आली. तब्बल ११६ कोटींचे कर्ज खर्च करण्यात आले होते. तशात कंपनी ताब्यात घेण्यासाठी दोन कामगार संघटनांमध्ये भाडणही सुरू होते. कमानीच्या तीन कंपन्यापैकी एक कंपनी लिक्विडेशनमध्ये गेली. दुसरीही त्याच वाटेवर होती. अशा परिस्थितीत या कंपनीचे कामगार माझ्याकडे आले. मी त्यांची कंपनी आणि त्यांचा रोजगार वाचवावा अशी कामगारांनी मला विनंती केली. माझी चांगली चाललेली स्वयंसेवी संस्था आणि माझी उद्योगदृष्टी यामुळे लोकांमध्ये त्यावेळी माझे चांगले नाव झाले होते. मला उद्योगाबाबत काहीही ज्ञान नव्हते. पण उपासमारीला सामोरं जावं लागणा-या 566 कामगारांच्या कुटुंबांनी मला हे आव्हान स्वीकारायला भाग पाडलं. तसंही माझ्याकडं गमावण्यासारखं होतंच काय म्हणा!


सदैव सैनिका पुढेच जायचे !


मी माझ्या पहिल्यावहिल्या उद्योग प्रक्रियेत दहा लोकांची कोअर टीम तयार केली. या दहांपैकी प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात तज्ञ होता. त्यानंतर आम्ही काही कन्सल्टन्ट नेमले. कंपनीचं झालेलं नुकसान भरून कसं काढावं यासाठी आम्ही एक प्रस्ताव तयार केला. जेव्हा मी माझा हा प्रस्ताव बोर्डासमोर ( या बोर्डात काही आयडीबीआय आणि इतर बँकांचे प्रतिनिधी होते ) ठेवला, तेव्हा त्यांनी मला अशी अट घातली, की मी स्वत: जर बोर्डावर आले तरच ते मला या प्रस्तावाबाबत काही मदत करू शकतील. मी त्यांचा प्रस्ताव मान्य केला. त्यांनी माझी थेट बोर्डाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती केली. ते २००० साल होतं.

२००० ते २००६ अशी सहा वर्षंतर आम्ही केवळ न्यायालयाच्या वा-या करत होतो. दंड स्वरूपात असलेला कर आणि व्याज हाच ११६ कोटी रुपयांच्या रक्कमेचा मोठा हिस्सा होता असं माझ्या लक्षात आलं. मग मी थेट अर्थमंत्र्याचीच भेट घेऊन दंड आणि व्याज माफ करण्याची विनंती केली. “ कंपनी जर लिक्विडेशनमध्ये गेली, तर सर्वाचंच नुकसान होणार आहे.” मी अर्थमंत्र्यांना म्हणाले. “माझी मागणी जर मान्य केलीत तर निदान गुंतवणूकदारांचे पैसे तरी परत करता येतील.” सर्व परिस्थिती लक्षात घेत अर्थमंत्र्यांनी बँकांसोबत व्यापक बोलणी केली. त्यानंतर पुढे जे काही घडलं ते सर्व कल्पनेच्या पलिकडलंच होतं. आणि ते सांगणं माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे असे मला वाटते. याचं कारण म्हणजे अर्थमंत्र्यांनी केवळ दंड आणि व्याजाची रक्कमच माफ केली नाही, तर कर्जाच्या मूळ रकमेतून २५ टक्के रक्कमही कमी करून टाकली. यामुळे आमची मूळ कर्जाची रक्कम अर्ध्याहून कमी झाली. परिणामी पुढे खूप गोष्टी सोप्या झाल्या. २००६ मध्ये माझी कंपनीच्या चेअरमनपदावर नियुक्ती झाली. न्यायालयाने कमानी ट्यूब कंपनीची मालकी माझ्याकडं सोपवली. आम्ही सात दिवसात बँकेचे कर्ज फेडून टाकावं असं न्यायालयानं बजावलं. पण आम्ही हे एका दिवसात केलं. पुढच्या तीन वर्षांमध्ये कामगारांचा थकलेला पगारही आम्हाला देऊन मोकळं व्हायचं होतं. पण तुम्हाला सांगते, आम्ही हे काम केवळ तीन महिन्यात करुन दाखवलं. थकित पगाराच्या रूपात आम्ही आवश्यक असलेल्या पाच कोटी या रकमेहून थोडी जास्तच म्हणचे पाच कोटी नव्वद लाख रूपयांचं कामगारांमध्ये वाटप केलं.

बरं, कर्जाच्या रकमा आणि कामगारांची देणी देत असताना कंपनीचे उत्पादन वाढवून कंपनीला पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करणंही अत्यावश्यक होतं. कंपनीची काही यंत्रं निकामी झाली होती, काही चोरीला गेली होती. ती बदलून नवी यंत्रं बसवण्याचं काम सुरू केलं. मी बोर्डावर येण्याआधी फार पूर्वी ज्या ठिकाणी कारखाना होता ती कुर्ल्याची जागाही कामगार संघटनेने विकून टाकली होती. म्हणून मग आम्ही आमचा कारखाना ठाणे जिल्ह्यातील वाड्याला हलवला. वाड्याला पुन्हा मी सात एकरचा भूकंड विकत घेतला. 


भविष्याची सोनेरी पहाट


स्वतंत्र भारत सक्षमतेने जगासमोर उभा राहील ही विकासात्मक दृष्टी ठेवूनच रामजीभाई कमानी यांनी कमानी उद्योगाची स्थापना केली होती. आपल्या कंपनीने देशाच्या विकासात मोठा वाटा उचलावा हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांच्या याच महान स्वप्नांना मी आपलसं केलं आहे.

निराश झालेल्यांची उमेद - कल्पना सरोज.

निराश झालेल्यांची उमेद - कल्पना सरोज.


आता याच दृष्टीने त्यांनी आखून दिलेल्या न्यायाचे तत्व, औद्योगिक नितिमत्ता आणि समतेचे तत्व अंगीकारूनच मी कंपनीला प्रगतीच्या मार्गाने नेणार आहे. आता पुढे लिक्विडेशनमध्ये काढलेल्या कमानी उद्योगाच्या आणखी दोन कंपन्या ताब्यात घेण्याचं माझं स्वप्न आहे. ती प्रक्रिया मी सुरूही केली आहे. लवकरच मी कंपनीचे गतवैभव होतं तसं पुन्हा मिळवून देणार आहे. आणि हे स्वप्न पूर्ण होईलच यात काडीमात्र शंका नाही.


अनुभव हाच खरा शिक्षक


नव्या उद्योजकांना सल्ला देताना कल्पना सरोज म्हणतात, “कठोर परिश्रमांना वाजवीपेक्षा अधीक किंमत नसते. ही कसोटी कुचकामी आहे. जर तुम्ही अगदी मनापासून प्रयत्न केलेत आणि निश्चित असं लक्ष ठेवून त्या कामात स्वत:ला झोकून दिले तर जे काही तुम्हाला हवं असतं ते तुम्ही मिळवू शकता, मग ते काहीही असो.”

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा