ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ठरली जीवनदायिनी ‘जी.व्ही.मेडिटेक’
वाढत्या शहरीकरणासोबत शहरांच्या आसपासच्या ग्रामीण भागातील तरुण रोजगारासाठी शहरांमध्ये येत आहेत. बनारस शहरातही असेच अनेक तरुण आपलं भविष्य घडवण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटत असला तरी त्यांच्या मागे गावात राहिलेल्या महिला, मुलं आणि वृद्धांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. प्रकृतीत अचानक काही बिघाड झाला तर त्यांना रुग्णालयात न्यायलासुद्धा कोणी नसतं.
गाजीपूरजवळ एका गावात राहणाऱ्या मीना शर्मा यांना गर्भावस्थेत जीवघेणा त्रास होऊ लागला होता. पण गाजीपूरसारख्या छोट्याशा गावात टेलीमेडिसिनची सोय असल्यानं त्यांच्या सर्वप्रकारच्या चाचण्या तातडीनं झाल्या तसंच दोन तासांच्या आत तज्ज्ञ डॉक्टरही बनारसहून तिथं पोहोचले आणि त्यांचे तसचे बाळाचे प्राण वाचवता आले. या छोट्याशा गावात टेलिमेडिसिनची सोय करण्याचं श्रेय जातं जी.व्ही. मेडिटेक या संस्थेला. मूळच्या गाजीपूरच्या राहणाऱ्या डॉ. इंदू सिंह यांनी १९९२ मध्ये जी.वी.मेडिटेकची स्थापना केली. स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या डॉ. इंदू सिंह या कामानिमित्त जगभरात फिरल्या आहेत. यातून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्य विषयक तपासण्यांसाठी सोय करण्याचा निर्णय घेतला. डॉ. इंदू सांगतात की त्या आणि त्यांचे पती याच भागातील असल्याने त्यांचं गाजीपूर आणि मिर्झापूर या गावांशी भावनिक नातं आहे. लोकांना उपचारांसाठी लांब यावं लागू नये म्हणून त्यांनी या दोन्ही गावांमध्ये आपापली तपासणी केंद्र सुरू केली आहेत.
या गावांमध्ये महिला, मुलं आणि वृद्ध लोकच असल्यानं त्यांना उपचारांसाठी शहरात नेणारं कोणीच नसल्यानं अडचणी निर्माण व्हायच्या. त्यामुळेच जी.व्ही. मेडिटेकच्या माध्यमातून डॉ. इंदू यांनी संपूर्ण माहिती संगणकीकृत केली आणि टेलिमेडिसन ही अद्ययावत यंत्रणा राबवत आयसीटी फार्म हे केंद्र सुरू केलं. टेलिमेडिसिन म्हणजे काही विशिष्ट उपकरणांच्या सहाय्यानं बनारसमध्ये बसलेले डॉक्टर गाजीपूरमधील रुग्णाची तपासणी करु शकतात. यात रुग्णाचा रक्तदाब, ईजीसी तपासू शकतात. ही टेलिमेडिसन यंत्रणा मोबाईलला जोडलेली असल्यानं गाजीपूरमधला रुग्ण आणीबाणीच्या वेळी बनारसमधील डॉक्टरांना थेट संपर्क करु शकतो.
या केंद्राव्यतिरिक्त जी.व्ही. मेडिटेकतर्फे गेल्या १० वर्षात १५० पेक्षा जास्त शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. अशा शिबिरांमधून लोकांशी संवाद साधला गेल्यानं भविष्यात गरज पडली तर ते लोक आम्हाला निसंकोचपणे संपर्क साधू शकतात, असं डॉ. इंदू सांगतात. गावांनी निमंत्रण दिलं तरी तिथं शिबिर घेतलं जातं. यात तिथल्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक स्वयंसेवक म्हणून काम करतात. गावकरी त्या सगळ्यांना जेवण देतात. या शिबिरांमध्ये तीन ते चार हजार लोकांची तपासणी करुन त्यांना मोफत औषधं दिली जातात. या व्यतिरिक्त जी.व्ही.मेडिटकेद्वारे एक फिरतं रेल्वे रुग्णालयसुद्धा चालवलं जातं. हे रुग्णालय आठवड्यातून तीन दिवस बनारस आणि तीन दिवस गाजीपूरमध्ये येतं. या फिरत्या रुग्णालयातर्फे २८ हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यात ४५० लोकांच्या डोळ्यांवरील शस्त्रक्रिया आणि ५० जणांच्या फाटलेल्या ओठांवरील शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
आजही अनेक जण पैशांच्या कमतरतेमुळे शस्त्रक्रिया करु शकत नाही. डॉ. इंदू यांच्या मते आजही समाजात आरोग्यासाठी दानधर्म करण्याची मानसिकता रुजलेली नाही. म्हणनूच या कामासाठी धाडसी गुंतवणूकदारांची गरज असल्याचं त्या सांगतात. या अडचणी असल्या तरी जी.व्ही.मेडिटेकने गेल्या २० वर्षांपासून आपलं कार्य सुरू ठेवलं आहे. बनारससह आसपासच्या १५ जिल्ह्यांमध्ये, तसंच पूर्व उत्तरप्रदेश, पश्चिम बिहार आणि झारखंड या राज्यांमध्येही ही संस्था काम करते आहे. ६५ डॉक्टरांच्या टीमनं आतापर्यंत २० वर्षात सुमारे ७० लाख रुग्णांवर उपचार केले आहेत. दरवर्षी सुमारे १० लाख रुग्णांच्या तपासणीशिवाय, २५ हजार ५५२ महिलांची प्रसुती, ३२ हजार ४५२ शस्त्रक्रिया केल्या जातात.
गाजीपूर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात लोकसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे तिथे आणखी चार तपासणी केंद्र उभारण्याचा विचार असल्याचं डॉ. इंदू सांगतात. इथं रुग्णांना तपासणीसंबंधी माहिती देण्याबरोबरच रक्त तपासणीची सोय करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसंच हे तपासणी केंद्र एक लघु रुग्णालय म्हणून काम करेल असाही त्यांचा प्रयत्न आहे. यातून स्थानिक तरुणांनाच प्रशिक्षण देऊन रोजगार देण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. तपासणीची सोय नसल्यानं एखाद्या व्यक्तीला प्राण गमवावे लागू नये या हेतुनेच जी.व्ही. मेडिटेक काम करत आहे.
जर तुम्हाला जी. व्ही. मेडिटेकला मदत करायची असेल तर त्यांच्या वेबसाईटला भेट द्या.