संपादने
Marathi

लढा आत्मसन्मानाचा...

Team YS Marathi
28th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

‘क्रांती’ च्या मुख्यालयात पिंकी आत आली, त्यावेळी तिने तिचे केस बारीक कापल्याचे माझ्या लक्षात आले.... एखाद्या मुलासारखी दिसणारी छोटी परीच जणू... काही दिवसांपूर्वीची, मला आठवणारी, पिंकी होती ती लांबसडक केसांची, अतिशय सुंदर दिसणारी अशी आणि आता मात्र ते केस तिने अगदी बारीक कापून टाकले होते. केसांच्या त्या बटांना निश्चित आकार नव्हता... त्या बटा अनेकार्थांनी पिकींचे नवे रुप दाखवत होत्या... ही पिंकी होती अतिशय करारी अशी... लांबसडक आणि बारीक अशा दोन्ही प्रकारच्या केशरचनांमध्ये सारख्याच सुंदर दिसणाऱ्या खूपच कमी बायकांना मी आजपर्यंत भेटले आहे आणि पिंकी ही त्यापैकीच एक होती. तिने माझ्याकडे पाहिले आणि मुख्य म्हणजे मी तिला तिच्या हास्यायोग्य वाटले – ते एक असे हास्य होते जे केवळ अतिशय नशीबवान आणि खंबीर व्यक्तींच्याच वाट्याला येऊ शकते.

image


क्रांती आता तिचे घरच झाले आहे. केवळ या एकाच जागेबद्दल मी बोलत नाही, कारण पाच वर्षांपूर्वी ती क्रांतीत आल्यापासून हे त्यांचे चौथे घर आहे. पण आतापर्यंत तिला या कवायतीची सवय झाली आहे. घरमालकाचे डोके फिरल्यानंतर तो त्यांना अतिशय वाईटसाईट बोलतो, अशी भाषा वापरतो, जी कोणताही चांगला माणूस वापरणार नाही. एवढेच का, पण माझ्या माहितीतील कोणताही चांगला माणूस बायकांबाबत अशा प्रकारे विचारही करु शकणार नाही. पण त्यांच्याबाबत मात्र इतिहासाची पुनरावृत्ती होत रहाते आणि त्यांना नेहमीच बायकांबाबत अतिशय कोत्या मनाचे असलेल्या लोकांचेच उपकार घ्यावे लागतात. त्यामुळे अर्थातच सांताक्रुझचे हे घरही काही फार दिवसांसाठी तिचे घर रहाणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, की हे तिच्या घराच्या संकल्पनेच्या सर्वाधिक जवळ जाणारे आहे.

त्या दिवशी संपूर्ण आठवड्यानंतर पिंकी आणि श्रद्धा या रुममेटस् ची भेट झाली. कारण श्रद्धा नुकतीच मनालीवरुन एका ट्रेकवरुन परत आली होती. डिडिएलजेच्या शैलीत त्यांचे हे पुनर्मीलन झाले. पिंकीने प्रेमाने आपले डोके तिच्या मांडीवर ठेवले आणि एकत्रपणे ट्रेकचे फोटो पहायला सुरुवात केली त्या अगदी काटेकोरपणे ट्रीपचे विश्लेषण करत होत्या. त्यांचा हा खेळ दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुरुच राहिला असता, जर मी त्यांचे बोलणे ऐकत असल्याचे त्यांना जाणवले नसते. खरे तर, मी तेथे एका दुःखाची, संघर्षाची आणि हालअपेष्टांची कहाणी जाणून घेण्यासाठी आले होते आणि ही गोष्टच मी पूर्णपणे विसरुन केले होते. कारण तोपर्यंत मी तेथे पाहिलेली परिस्थिती अतिशय सामान्य होती आणि अगदी आनंदीही...

पण खेद या गोष्टीचा वाटतो, की या सगळ्यामागे एक कहाणी होतीच. पण ही काही केवळ आणखी एक दुर्दैवी कथा नव्हती, तर ती एका विजयाचीही कथा होती. तिच्याच शब्दात सांगायचे तर ही तिची अतिशय क्लेशदायक गोष्ट होती, जी तिच्या आधी येते. पण आता मात्र ती आजपर्यंत केलेल्या या प्रवासाबाबत, आतल्याआतही न तुटता, अगदी मोकळेपणाने माझ्याशी बोलू शकत होती. ही आहे तिची कथा...

image


पिंकीचा जन्म जन्म कोलकत्याचा... तिची आई ही शरीरविक्रयाच्या व्यवसायात होती आणि आजही आहे. पण आता मात्र पिंकी कोलकत्याला फारशी जात नाही, कारण तिला तशी इच्छाच होत नाही. तसेच तिला तिच्या कुटुंबियांना भेटावेसे वाटत नाही कारण त्यांच्याबाबत ती खूपच निराश झाली आहे. पण तिचे मामा-मावशी, आजी-आजोबा यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिची आई मात्र वारंवार कोलकत्याला जात असते.

कोलकत्त्यातील दिवसांबाबत बोलताना पिंकी सांगते, “ कोलकत्यात असताना आम्ही पार्क सर्कसजवळच्या झोपडपट्टीत अगदी लहान जागेत रहात असू – घर म्हणावे असे काही ते नव्हते. तिथे पुरेसे खायला कधीच नसे, त्यातच माझ्या वडीलांचेही निधन झाले होते.” अवघी सहा वर्षांची असताना, ती कचऱ्यातून गोष्टी गोळा करत असे आणि जे काही मिळेल ते विकून पैसे मिळवित असे, जेणेकरुन कुटुंबाला खायला काहीतरी मिळेल.

मुंबईत जास्त पैसे मिळतील, असा विचार करुन पिंकीची आई मुंबईला निघून गेली, मात्र जाताना तिने पिंकीला आणि तिच्या भावाला कोलकत्यातच ठेवले.

“ झोपडपट्टीत रहात असताना, आम्ही शौचासाठी जवळच्या रेल्वे ट्रॅकवर जात असू. माझ्या कानात भयंकर दोष होता, ज्यामुळे माझ्या कानांना सतत संसर्ग झालेला असे, ते खाजत असत आणि खूपच दुखत असत. एका रात्री मी नेहमीप्रमाणे शौचासाठी तेथे गेले. त्यावेळी एक रेल्वे वेगाने ट्रॅकवरुन येत होती आणि मला मात्र काहीच ऐकू येत नव्हते. माझा भाऊ नेमका त्यावेळी आसपासच होता आणि त्याने काय होते आहे ते पाहिले आणि मला उठविण्यासाठी आरडाओरडा केला. पण मला तेदेखील ऐकू आले नाही. तो धावत आला आणि त्याने मला एक जोराची थप्पड लगावली - एवढी जोरात की माझ्या कानाचा पडदाच फाटला - आणि वेळेत मला तेथून उचलले,” पिंकी सांगते.

हा तोच काळ होता, जेंव्हा या दोघांची आई बऱ्याच वर्षांपासून त्यांना भेटायला आली नव्हती. त्यामुळे आता वाट पहाणे पुरे झाले, असा निर्णय त्यांनी घेतला आणि स्वतःहून तिला भेटण्यासाठी मुंबईला जाण्याची योजना आखली. “ आम्ही आईच्या पाठोपाठ मुंबईला आलो आणि ग्रांट रोडवरच्या रेडलाईट एरीयात राहू लागलो, मी त्यावेळी बारा वर्षांची होते. मी तेथे खूप काळ राहीले नाही, माझी आई मला तेथे राहू देणे शक्यच नव्हते,” ती सांगते.

घरी जागाच नसल्याने मग तातडीने ती एका स्वयंसेवी संस्थेबरोबर राहू लागली. “ आई रोज रात्री बाहेर जात असे आणि मी रात्रशाळेत जात असे. सुरुवातीला ती काय करते, हे मला समजत नव्हते आणि मला ते फारसे आवडतही नव्हते. दररोज ती जायच्यावेळी मी तिला प्रश्नांनी भंडावून सोडत असे. एक दिवस मात्र तिने मला जोरात थप्पड मारली आणि सांगितले की हे सर्व मी तुमच्यासाठी करत आहे, हे सर्व मी आपल्यासाठी करत आहे. यापुढे तू स्वतःच्या कामाकडे लक्ष दे,” पिंकी सांगते.

पण आज मात्र पिंकीला असे वाटते की तर तो तिच्या आईचा हक्क आहे, तिच्या कामात अडथळा आणण्याचा किंवा तिला त्रास देण्याचा हक्क कोणालाही नसल्याचे पिंकीला वाटते.

image


पिंकी तेंव्हा ज्योती कैलास नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेबरोबर रहात होती. तेथील शिक्षिकीचा तिच्यावर आणि तिच्या भावावर जीव होता. जरी त्या संस्थेची परिस्थिती फारशी चांगली नसली, तरी पिंकी त्याबाबत मुळीच वाईट बोलत नाही, कारण तेथील शिक्षिकेने तिची खूपच काळजी घेतली होती. त्यांचे पिंकी आणि तिच्या भावावर खूप प्रेम होते.

“ पण लवकरच माझ्या आईने मला घरी परत आणले. ती मला कुठेच खूप जास्त काळ राहू देत नसे आणि या गोष्टीचे मला नेहमीच आश्चर्य वाटे,” पिंकी सांगते. त्यावेळी भविष्याकडून पिंकीला खूप आशा होत्या, पण अभ्यासाची आवड नव्हती. “ माझ्या भावाचा मला नेहमीच पाठींबा असे. त्याच्याचकडून मी सर्व इंग्रजी शिकले. मी येथे आले आणि मला काहीतरी बनायचे आहे, असे माझ्या भावाला सांगितले. माझ्या या महत्वाकांक्षेविषयी समजल्यावर एक दिवस येऊन त्याने मला ‘क्रांती’विषयी माहिती दिली. त्यानंतर मी आणि माझी आई रोबिन दी ला भेटलो. त्यावेळी मी पिवळ्या रंगाची कुर्ती घातली होती आणि माझे केस चांगले लांबसडक होते. मला पाहून ती किंचाळलीच, ‘ तू किती क्युट दिसतेस’,” पिंकी सांगते.

अशा रीतीने तिचा क्रांतीमध्ये प्रवेश झाला. “ आणि जेंव्हा मी येथे आले, त्यावेळी मी एक निर्णय घेतला, तो म्हणजे आमचा हा पत्ता माझ्या आईला न देण्याचा... मी स्वतःहूनच सहा महिन्यांतून एकदा आईला भेटायला जाते, कारण माझी आई मला विकून टाकेल, अशी भीती मला वाटते. खरे म्हणजे, मी खूपच भयभीत आहे,” पिंकी सांगते. मुख्य म्हणजे अशा वेळी कसे वाटते, ते तिला चांगलेच माहित आहे. “ चार वर्षांपूर्वी, म्हणजेच मी केवळ चौदा वर्षांची असताना माझ्या वडिलांच्या भावानेच माझ्यावर बलात्कार केला होता. त्यातूनच मला दिवस राहीले आणि हळूहळू माझे पोटही दिसू लागले, ज्यामुळे शेवट ही गोष्ट सर्वांसमोर उघड करण्यावाचून मला पर्यायच राहिला नाही, जेणेकरुन मला हा गर्भ पाडून टाकता आला असता. जेंव्हा ही गोष्ट मी माझ्या वडिलांना सांगितली, तेंव्हा त्यांनी माझ्या काकाला मारहाण तर केलीच पण त्याचबरोबर त्याला याची शिक्षा मिळेल हेदेखील पाहिले. त्या काकाला तुरुंगवास झाला. आता तो जिवंत नाही. यकृताच्या कर्करोगाने त्याला अतिशय वेदनादायी मृत्यू आला,” पिंकी सांगते.

आज जरी तिचा काका जिवंत नसला, तरी यातून बाहेर पडण्यासाठी तिला खूप वेळ लागला. हे सगळे आपल्याबरोबरच का झाले? देव आपल्याला का शिक्षा देत आहे? मी काही चुकीचे केले आहे का? यांसारख्या प्रश्नाने तिला भंडावून सोडले. ती सतत याच गोष्टीचा विचार करत असे. “ वेदना विसरण्यासाठी मी पित राही. मला मानसिक आजारही जडला – पण क्रांतीमध्ये मी एका थेरपिस्ट अर्थात रोगनिवारणतज्ज्ञांना भेटले आणि आता मला खूपच बरे वाटत आहे,” पिंकी सांगते.

पण समाज मात्र आपली ही पार्श्वभूमी विसरु देण्यास तयार नसल्याची खंत पिंकीला वाटते. “ जेंव्हा आम्ही कांदविलीला राहत असू, तेंव्हा आम्हाला लोकांकडून काहीही ऐकावे लागे. अतिशय अश्लील भाषेत लोक आमच्यावर घाणेरडे आरोप करत असत. आम्ही शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या मुली आहोत, हे त्यांना माहीत होते आणि ते आम्हालाही तसेच समजत असत,” पिंकी सांगते. आजही परिस्थिती बदललेली नाही.

क्रांतीबरोबर रहाण्याची संधी मिळाल्याबद्दल ती कृतज्ञ आहे आणि आता तिला ती खूपच शक्तिशाली झाल्यासारखे वाटते. हे येथील आपले पाचवे वर्ष आहे, यावर तिचा विश्वासच बसत नाही. “ मला डिसेलेक्सिया आहे, त्यामुळे मी शाळेत नापास होत रहाते. मी कितीही चांगले केले तरी मला यश मिळत नाही. तरीही मी अजूनही प्रयत्न करत आहे. मला प्राण्यांचे समुपदेशक व्हायचे आहे कारण प्राण्यांवर माझे प्रेम आहे. मला कदाचित गायक आणि नर्तकही व्हायला आवडेल,” पिंकी सांगते.

जेंव्हा ती तिच्या थेरपिस्टकडे जाते, तेंव्हा ती त्यांना अनेक प्रश्न विचारते, जसे त्या काय करतात आणि कसे करतात. ती त्यांच्या हालचालींकडे, बोलण्याकडे बारकाईने पहाते. “ आपल्याकडे आलेल्या रुग्णाविषयी चटकन मत तयार करु नये आणि त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकावे, हे मी त्यांच्याकडूनच शिकले. ज्यामुळे त्यांना सकारात्मक उर्जा देता येईल,” पिंकी सांगते.

तिने यापूर्वीच तिच्यामधील सकारात्मक उर्जा क्रांतीमध्ये पसरवण्यास सुरुवात केली आहे. पिवळ्या कुर्तीमधील या क्युट मुलीने तिच्या गाण्याने, बोलण्याने आणि हसण्याने क्रांतीचे घर सुर्यप्रकाशाने भरुन टाकले आहे. ती नेहमीच एवढ्या मजेत कशी रहाते, हा प्रश्न विचारताच पिंकी सांगते, “ एवढ्या वर्षांनंतर अखेर खरोखरच मला माझा आनंद सापडला आहे, असा विचार मी करते.”

लेखक – बिंजल शाह

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags