संपादने
Marathi

एरिनमः लक्ष्य प्रदूषणाशी लढण्याचे...

17th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

आज जगभरात प्रदूषण ही किती मोठी समस्या आहे, हे नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही. आपल्यापैकी कोणीही असा नाही, जो या समस्येने ग्रासला नसेल. ज्या हवेत आपण श्वास घेतो, ती हवाच आपल्याला हळूहळू गुदमरवून टाकत आहे. डब्ल्यूएचओच्या दिल्लीबाबतच्या आकडेवारीतून तर हीच गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता पीएम २.५ पार्टीकल्स (आरोग्यासाठी अतिशय घातक) असून डब्ल्यूएचओने या शहराचे नाव सोळाशे शहरांमधील सर्वाधिक वाईट शहर म्हणून नोंदविले आहे. त्यामुळेच पॅरीसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या हवामान बदलांच्या परिषदेत सर्वाधिक चर्चिला गेलेला विषय होता तो जागतिक स्तरावरील हवेचे प्रदूषण हाच आणि यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.

श्वसनासाठी शुद्ध हवा हा जगातील सर्व लोकांचा मुलभूत अधिकार आहे, या विश्वासातूनच स्टॉकहॉम स्थित एरिनम (Airinum) ची स्थापना करण्यात आली आहे.

स्टॉकहोम बिझिनेस स्कूलमध्ये भेटलेले चार मित्र - अलेक्झांडर जेरस्ट्रॉम, फ्रेड्रीक केंप, जोहानेस हर्रमन आणि मेहदी रेजराजी - यांनी हा आधुनिक श्वसन मास्क विकसित केला आहे. हवेचे प्रदूषण, जीवाणू आणि रोगजंतू त्याचबरोबर प्रदूषण घडवून आणणाऱ्या इतर विविध गोष्टींपासून सुरक्षा देण्याचे काम हे मास्क करतात. उच्च दर्जाचे संरक्षण देण्याबरोबरच हे मास्क खास डिजाईनचे आणि अधिक आरामदायक असे असून, या सगळ्या गुणांचा संगम झाल्याने, आज बाजारात उपलब्ध असलेल्या इतर मास्कपेक्षा हे मास्क वेगळे असल्याचा एरिनमचा दावा आहे.

image


मात्र या सगळ्याची सुरुवात झाली ती २०१४ च्या शेवटीशेवटी... जेंव्हा अलेक्झांडर स्वीडनहून भारतात आले होते. इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) मध्ये शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सहा महिन्यांसाठी त्यांना अहमदाबादला यावे लागले. येथे आल्यापासून पहिल्या महिन्याच्या आतच त्यांच्या लक्षात आले, की हवेतील प्रदूषणामुळे त्यांच्या पूर्वी बऱ्या झालेल्या दम्याची लक्षणे पुन्हा एकदा दिसू लागली.

त्यावेळी यापासून सुरक्षा मिळविण्यासाठी एखादा सुरक्षा मास्क शोधण्यासाठी त्यांनी खूप खटपट केली. एक असा मास्क ज्यामुळे त्यांना संरक्षण तर मिळेलच पण त्याचबरोबर तो रोज वापरण्यासही अगदी व्यवहार्य असा असेल. “ रस्त्यावरुन जाणारे-येणारे लोक प्रदूषणापासून स्वतःला वाचविण्यासाठी साध्या स्कार्फचा वापर करताना मी त्यावेळी पाहिले. पण हवेतील प्रदूषण घडवून आणणाऱ्या गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी याचा काहीच उपयोग नसल्याचे मला चांगलेच कळत होते आणि प्रदूषण करणारे हे घटक तुमच्या फुफ्फुसांमध्ये आणि रक्तामध्ये अडकून राहिल्याने, गंभीर आजारही उद्भवू शकतात, याचीही मला पुरेपुर माहिती होती. त्यामुळे त्याच क्षणी आणि तिथेच मी याबाबत काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि जेंव्हा मी स्वीडनला परत आलो, तेंव्हा आम्ही एरिनमवर काम करण्यास सुरुवात केली,” अलेक्झांडर सांगतात.

त्यादृष्टीने अलेक्झांडरने अशा लोकांशी संपर्क केला, जे त्यांच्या मते त्यांना पूरक ठरु शकणार होते आणि त्याचबरोबर जुन्या मित्रांशीही संपर्क केला. त्यांना तत्क्षणी ती कल्पना आवडली आणि ते देखील त्यामध्ये सहभागी झाले. अलेक्झांडर यांच्या मते हा उपक्रम एका खास हेतूने सुरु करण्यात आला आहे आणि तो जगामध्ये काही बदल घडवून आणू शकतो.

रोजच्या आयुष्यात श्वसनासाठी सर्वोत्तम संरक्षण पुरवणे हे तर एरिनमचे मिशन आहेच पण त्याचबरोबर हवेच्या प्रदूषणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी मदत करण्याचीही त्यांची इच्छा आहे, जेणेकरुन लोक त्यांचे आयुष्य धोक्यात न घालता श्वासोच्छवास करु शकतात. त्याचबरोबर स्टाईलबाबत जागरुक असलेले शहरी ग्राहक हे त्यांच्या फर्मच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने, मास्कच्या रुपाकडेही अलेक्झांडर यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

“ याप्रकारे आम्ही शहरी नागरिकांना असे काही देऊ करत आहोत, जे वापरण्याने त्यांना लाजिरवाणे तर वाटणार नाहीच तर त्याउलट ते वापरण्याची त्यांची खरोखर इच्छा असेल. पण भविष्यात मात्र अशा प्रकारच्या उत्पादनाची गरजच भासू नये, अशीही आम्हाला आशा आहे,” अलेक्झांडर सांगतात.

image


अलेक्झांडर यांच्या मते यामध्ये सर्वात मोठे आव्हान होते ते एक असे उत्पादन विकसित करण्याचे, जे वेगेवेगळ्या प्रकारच्या लोकांना संरक्षण देण्याचे काम करु शकेल, कारण प्रत्येक चेहरा हा वेगळा असतो, त्यामुळे योग्य प्रकारे बसू शकेल आणि हवेची गळती रोखेल असा मास्क बनविणे हेच सर्वात मोठे आव्हान होते. वापरणाऱ्याच्या चेहऱ्याला योग्य पद्धतीने सहजपणे बसेल, यासाठी त्यांनी स्ट्रेचेबल (ताणता येईल) साहित्याचा वापर केला. त्यामुळे हा मास्क अधिक सुरक्षा देऊ शकतो, कारण केवळ चांगले फिल्टर्सच पुरेसे नसतात.

“ सुरुवातीच्या टप्प्यात बऱ्याच पुनरावृत्ती कराव्या लागल्या. तसेच हा मास्क आणखी आरामदायक करणे हे आणखी एक आव्हानही आम्ही पार करु शकलो. आज आम्ही मास्क बनविताना अशा प्रकारचे साहित्य वापरतो, ज्यामुळे हा मास्क श्वासोच्छवास करण्यायोग्य होतो आणि हे अतिशय महत्वाचे आहे, कारण अनेक वापरकर्त्यांचे असे म्हणणे असते, की बऱ्याच काळासाठी मास्क वापरल्यास त्यांना गुदमरल्यासारखे होते,” अलेक्झांडर सांगतात.

हा मास्क पाॅलिस्टरसारख्या कापडापासून बनविला जातो, जे हलके असते आणि श्वसनासाठी खूपच योग्य असते. तर फिल्टर हे अतिशय प्रगत अशा मल्टीलेयर तंत्रज्ञानाचा वापर करुन बनविले आहेत, जे वापरकर्त्याचे वास, धूळ, जीवाणू, रोगजंतू, परागकण, पीएम २.५ या सर्वांपासून संरक्षण करु शकतात.

एका स्थिर वेगाने वाढण्याच्या दृष्टीने त्यांनी आता योग्य ते भागीदार मिळविले आहेत. त्यांचे प्रमुख धोरण आहे ते ऑनलाईन विक्रीचे, जेणेकरुन वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये ते वेगाने प्रगती करु शकतील. त्यांच्या टीमचे सदस्य हे वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे असून (स्वीडन, जर्मनी आणि फ्रान्स), व्यवसाय आणि अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत.

२३ नोव्हेंबर २०१५ ला ते किकस्टार्टरवर आले आहेत. तेथे त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असुन अवघ्या चोवीस तासांच्या आतच त्यांना अतिरिक्त निधी उभारता आला आहे. तीसहून अधिक देशांमधील लोक त्यांचे पाठीराखे आहेत, ज्यामध्ये युरोप, अमेरिका आणि आशियाई देशांचा समावेश आहे. त्यांची ही मोहिम सत्तावीस डिसेंबर, २०१५ पर्यंत सुरु रहाणार आहे.

अलेक्झांडर यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या या कल्पनेतील नाविन्य त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्येही अंमलात आणण्यात आले आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मास्कचे आयुष्य हे मर्यादीत आहे आणि या मास्कमध्ये कणांचा गाळ अडकल्याने श्वास घेणे कठीण होते. त्यामुळे त्यांची कामगिरी चांगली आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी, ग्राहकांनी नियमितपणे फिल्टर्स बदलावेत, असा सल्ला ते देतात.

भविष्याच्या दृष्टीने त्यांची टीम ही वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत आहे, खास करुन वेगवगेळ्या गरजांनुसार मास्क तयार करण्याचा... त्याचबरोबर हवेच्या खालावत चाललेल्या गुणवत्तेबाबत जागरुकता निर्माण करणे, या आणखी एका गोष्टीवरही ते काम करत आहेत.

वातावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचा त्यांचा हेतू आहे. भविष्यात थेट प्रदूषण कमी करतील, अशी उत्पादने विकसित करण्याची त्यांना आशा आहे. “ पण तुर्तास तरी, सर्वात महत्वपूर्ण काम आहे, ते लोकांना हवेच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांपासून सुरक्षित करणारी अधिक चांगली साधने पुरविण्याचे,” अलेक्झांडर सांगतात.

लेखक – सिंधू कश्यप

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags