'रियल लाईफ ते रील लाईफ' पर्यंत शिवविलाश चौरसियाँ यांच्या संघर्षाची कहाणी

'रियल लाईफ ते रील लाईफ' पर्यंत शिवविलाश चौरसियाँ यांच्या संघर्षाची कहाणी

Thursday May 12, 2016,

6 min Read


शिवविलाश चौरसियाँ यांची पहिलीच निर्मिती असलेला स्पृहा जोशी आणि सचित पाटील अभिनीत ‘ पैसा पैसा’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. सिनेमाची कथा आणि आपले वास्तविक आयुष्य यात बरेच साधर्म्य असल्याचं ते सांगतात. लहानपणी घरात आर्थिक सुबत्ता होती...त्याकाळात त्यांनी भरपूर पैसा पाहिला आणि उडवलाही, पण लवकरच नशिबाची चक्र फिरली आणि पैशा पैशासाठी आसवं गाळण्याची वेळ त्यांच्यावर आली.

विलाश यांचा जन्म पिढीजात पानाचा व्यवसाय असलेल्या एकत्र कुटुंबात झाला. वाडवडिलांचा व्यवसाय नीट चालत असल्यामुळे घरात सुबत्ता होती. पैशांच्या बाबतीत काळजी करण्याचं काही कारण नव्हतं पण शिक्षणाच्या बाबतीत मात्र उदासीनता होती. संपूर्ण कुटुंबात केवळ त्यांचे वडिलच उच्चशिक्षित होते त्यांचे एल.एल बी.पर्यंतचे शिक्षण झालेले होते परंतु घरगुती कारणांमुळे त्यांना वकिली करता आली नाही आणि पानाच्या गादीवर बसावे लागले. त्याचा परिणाम त्यांच्या मुलांवर झाला. विलाश जेव्हा घरातील इतर भावंडांसोबत शाळेत जात तेव्हा वरचेवर त्यांना त्यांच्या काकांकडून ‘तुझ्या वडिलांनी काय मोठे दिवे लावलेत शिकून जे तू लावणार आहेस’ असे टोमणे ऐकायला मिळायचे. विलाश यांना काकांच्या या बोलण्याचे फार वाईट वाटायचे न मनोमन प्रचंड रागही यायचा त्यामुळेच त्यांनी मनोमन ठरवून टाकलं की आपण न शिकताच खूप मोठ व्हायचं, खूप पैसा कमवून दाखवायचा त्यामुळे ते शाळेत जाऊनही अभ्यास करत नसत. पुढे लवकरच काकांनी संपत्तीचे हिस्से करायची मागणी केली स्वतःच्या वडिलांना दिलेल्या वचनानुसार विलाश यांचे वडिल भावांशी कोणताही वाद न घालता वेगळे झाले. त्यांच्या वाटयाला गावाकडे थोडीफार जमीन आली त्याशिवाय मुंबईत त्यांना काहीही मिळाले नाही.

विलाश यांचे वडिल शिकलेले असल्याने हुशार होते त्यामुळे हताश न होता त्यांनी विलेपार्लेत पारले कंपनीसमोर भाडयाने पानाची गादी चालवायला घेतली आणि व्याजाने पैसे दयायला सुरवात केली त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा पैसै खेळू लागले. विलाश आणि त्यांचा मोठा भाऊ श्रवणकुमार यांच्या खोडया सूरू झाल्या. दोघं वडिलांच्या अनुपस्थित गल्ल्यातून पैसै काढू लागले पण इतक्या पैशांसोबत पकडले गेलो तर काय उत्तर द्यायचं या भितीने ती दोघं कधी उरलेले पैसे रस्त्यावर फेकून देत तर कधी साधा डोसा खाऊनही १०० रुपयाची नोट विक्रेत्याकडेच सोडून निघून येत.

image


याचदरम्यान त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला आणि काळाची चक्र फिरली. होत-नव्हत ते सगळं गेलं. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांना टाटामध्ये भरती करण्यात आले, तिथे गरिबांना मिळणाऱ्या कन्सेशन फॉर्ममध्ये वडिलांनी खरी माहिती भरली. ती पाहून त्यांना सवलत नाकारण्यात आली. वडिलांवर उपचार होणं अत्यावश्यक होतं म्हणून विलाश आर्थिक मदत मागायला काकांकडे गेले तर काकांनी, ‘पैसै हवे असतील तर तुमचं घर आणि जमीन आम्हाला विका तरच पैसे देतो’, असं उत्तर दिलं. १५ वर्षाचे विलाश हे उत्तर ऐकून कळवळले, रडवेले झाले मात्र धीर ढळू न देता ‘आम्ही काहीही विकणार नाही, काम करू आणि वडिलांना बरं करू’ असा निर्धार करून ते टाटा हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालकांसमोर जाऊन उभे राहिले, त्यांना सत्यपरिस्थिती सांगितली, हात जोडून त्यांना म्हंटले की, ‘नातेवाईक आणि दुकान असलं तरी आमचं म्हणता येईल असं आता आमच्याकडे काहीही नाही, जे आहे मीच आहे त्यामुळे आमच्यावर दया करुन आम्हाला सवलत द्या. व्यवस्थापकीय संचालकांनी त्यांचं बोलणं ऐकून त्यांना सवलत देऊ केली.

इथून या दोन भावांच्या संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली, परिस्थितीशी खंबीरपणे दोन हात करून तिच्यावर धैर्याने मात करण्यासाठी या मुलांच्या वागण्यात अमुलाग्र बदल झाला... दोन्ही भावांनी वाण्याकडे नोकरी करायला सुरवात केली. दोघांना मिळून जो ३००० पगार यायचा तो वडिलांच्या उपचारातच खर्च व्हायचा. अशावेळी पाण्यासोबत ब्रेड खाऊन त्यांनी दिवस काढले. या दिवसात त्यांनी रस्त्यावर भाजी, कोथिंबीर विकायचीही कामं केली.

विलाश आणि श्रवणच्या प्रयत्नांना २ वर्षांनी यश आले. बरे झाल्यावर वडिलांनी अंधेरीत भाडयाने पानाची गादी चालवायला सुरवात केली. एक दिवस विलाश गादीवर बसलेले असताना जवळच्याच टी हाऊसचे मालक दुबेंनी येऊन आपण गावाला जात असल्याने ५००० डिपॉझिट देऊन दुकान विलाश यांनी चालवावे असे म्हंटले. परंतु इतक्या पैशांची व्यवस्था न झाल्याने शेवटी एका ओळखीच्या रिक्षावाल्याकडून ५०० रुपये उसने घेऊन आणि बाकीचे पैसै आणि भाडे दुबे परत आल्यावर देण्याच्या बोलीवर सौदा पक्का झाला. सुदैवाने दुकान चांगले चालायला लागले. चांगला नफा होऊ लागला, ते पाहून दुबेंनी भाडे दुप्पट करून मागितले ते त्यांना मिळाले पण तिसऱ्या वर्षी तिप्पट भाडयाची मागणी पूर्ण करता येणं अशक्य असल्याने डिपॉझिटचे पैसै पूर्ण झाल्यावर रातोरात ते दुकान रिकामी करण्यात आले.

 

image


पुढे काय असा प्रश्न उभा राहिला. विलाश स्टुडियोत चहा नाश्ता द्यायला जायचे त्यावेळी तिथल्या मेकअपदादांनी दिलेल्या कार्डाची आठवण झाली. बरेच दिवस मागोवा घेतल्यावर कंटाळून एक दिवस जेव्हा त्यांनी फोन नाही केला तेव्हा दिलिपदादांनी समोरुन फोन केला आणि “आज का फोन केला नाहीस” विचारले त्यावर “विसरलो” असे उत्तर विलाशजींनी दिले. तेव्हा विलाश यांना दादांनी एके ठिकाणी कामाला लावले. सेटवर शॉटदरम्यान कलाकारांना मलमल दयायचे काम त्यांना मिळाले. मेकअप करायला ते इतरांचं पाहून स्वतःच शिकले. काही महिन्यांनी त्यांना मेकअपची कामं मिळू लागली पण पैसै फार कमी मिळायचे किंवा मिळायचेही नाहित. बिनभरवशाच्या ५० रुपयांसाठी आयुष्य फुकट घालवण्यापेक्षा माझ्या मक्याच्या दुकानात बस तुला दिवसाचे १५० रुपये देतो हे मोठया भावाचं बोलणं ऐकून विलाश सहा महिने भावाच्या दुकानात बसू लागले अन ६ महिने मेकअपचं काम करु लागले. त्यातच विलाश यांच्याबद्दल घरी कोणीतरी खोटं सांगितलं की याने आम्हाला पैसे घेऊन फसवलं. या सगळ्यामुळे त्यांचं इंडस्ट्रितलं काम घरच्यांनी बंद केलं.

तब्बल दीड वर्षांनी त्यांना सोनीवरच्या ‘जस्सी जैसी कोई नही’ साठी विचारण्यात आलं तेव्हा महिन्याचा पगार नीट मिळणार असल्याची खात्री करुनच त्यांनी काम करायला सुरवात केली. सोनीवरिल ‘इंडियन आयडल २’ च्या वेळी विलाश यांची ओळख विशाल दादलानींसोबत झाली. प्रत्येक सिझनला एकत्र काम करताना त्यांचे वैयक्तिक संबंध घट्ट होऊन त्यांच्यात जिव्हाळयाचे नाते निर्माण झाले. विशाल यांना त्यांचा संघर्ष ठाऊक झाल्याने त्यांच्या मनात विलाश यांच्या विषयी प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली. एक दिवस विलाश यांनी घाबरत ‘आपल्या मनात पिक्चर बनवायचे असून विशाल यांनी त्यात एक गाणे गावे’ अशी इच्छा असल्याचे सांगितले. मोठया मनाच्या विशालजींनी दिलखुलासपणे विलाश यांना शुभेच्छा देत एकही पैसा न घेता गाणं गायच्या अटीवर आपला होकार कळवला. एवढयावरच न थांबता मैत्रीला जागत स्वतः यशराज स्टुडियोत जागा घेऊन मोठया संगीतकारांना घेऊन सगळा खर्च स्वतः करुन गाणे स्वरबद्ध करून रेकॉर्डही केले. निधी मोहननेही पैसे न घेताच हे गाणे गायले.

एकेकाळी पैशापैशासाठी दिवसरात्र एक केलेल्या विलाशजींचं खूप पैसे कमवून खूप मोठं व्हयायचं स्वप्न ‘पैसा पैसा’ सिनेमाच्या रुपाने पूर्ण होऊ घातलंं आहे. हा सिनेमा निर्माण करण्यासाठी त्यांनी वडिलांची पूर्वीची जागा विकून निधी उभारला. विलाशजी आणि त्यांच्या कुटुंबाचं राहणीमान आज पूर्णतः बदललेलं आहे. आज त्यांच्याकडे मोठया गाडया, मोठं घर सगळं आहे. त्यांच्याकडे मेकअपची कामं करायला माणसं आहेत. आयुष्याची घडी व्यवस्थित बसलीये. एकेकाळी त्यांच्याशी वाईट वागलेले काका आज हयात नसले तरी त्यांची मुलं विलाशजींची प्रगती पाहून खूश आहेत. विलाशजी म्हणतात, “आज माझ्याकडे सगळं आहे, आयुष्यात जो काही संघर्ष करावा लागला त्याविषयी किंवा जे काही टोमणे ऐकावे लागले त्याविषयी मनात कुठलीच तक्रार वा कटूपणा नाही. जे घडलं त्यातूनच मी घडलो. परिस्थिती कितीही वाईट आली तरी डगमगू नका, तुमचा काळ वाईट असताना लोकांच्या टोमण्यांनी निराश न होता प्रामाणिकपणे हार न मानता कष्ट करा, स्वप्न पहा. एक दिवस नक्की तुम्हाला यश मिळेल.”

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

बाल कलाकार ते यशस्वी बिजनेसमन.. अभिनव बॅनर्जी यांचा प्रेरणादायी प्रवास

अन्नदाते आणि रूग्णांचे ‘मसिहॉं’ हरखचंद सावला!

१००९ वेळेस नकार पचवल्यानंतर त्यांनी जगाला दिलं 'केएफसी' चिकन