संपादने
Marathi

खाऱ्या पाण्यातील शेवाळ शेती फायदेशीर : दीनबंधू साहू

Suyog Surve
22nd Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

'दीनबंधू' चा शब्दशः अर्थ होतो पीडितांचा भाऊ, त्यांचा मदत कर्ता आणि या अर्थाला सार्थ करणारे आयुष्य दीनबंधू साहू जगत आहेत. हे एक असे नाव आहे ज्याने विज्ञानाच्या पुस्तकी ज्ञानाला वास्तवाच्या भूमीवर उतरवले आणि या जोरावर हजारोंना रोजगाराचा एक नवा पर्याय खुला केला. एक असा पर्याय ज्याने केवळ ग्रामीण माणसांचेच आयुष्य सुधारले नाही तर पर्यावरणाचाही फायदा झाला. साहुंनी 'प्रोजेक्ट चिल्का' च्या अंतर्गत उडीसाच्या शेतकर्यांना समुद्री शेती करायचे तंत्र शिकवले. ज्याद्वारे ते वर्षभर उत्पन्न कमवू शकतात. हे एक असे काम होते ज्याचा विचारही कोणी केला नव्हता, मात्र साहुंनी आपल्या अथक प्रयत्नांनी ते करून दाखवले.

दीनबंधू साहू हे एक समुद्र जीव संशोधक आहेत.समुद्रातील शेती आणि समुद्राच्या पाण्याने अजून कोणकोणती कामे केली जाऊ शकतात ज्याने धनार्जन करता येऊ शकेल यावर साहू काम करतात.

image


साहू मुळचे उडीसाचे रहिवासी. साहुंच्या कुटुंबात कोणी फारसे शिकलेले नव्हते. शिकवण्या घेऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण करत महाविद्यालयात प्रथम क्रमाक पटकावला. त्यानंतर केवळ ८०० रुपये सोबत घेऊन ते दिल्लीला आले आणि दिल्ली विश्वविद्यालयातून वनस्पती शास्त्रात एमएससी केले. त्या नंतर याच विषयात त्यांनी संशोधन करायचे ठरवले, मात्र त्याच वेळी अंटार्टिकाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांची निवड झाली आणि ते एका संशोधकांच्या गटा सोबत अंटार्टिकाला रवाना झाले. हा प्रवास त्यांच्या साठी एक मैलाचा दगड ठरला. पहिल्यांदा साहू प्रयोगशाळेच्या बाहेर येऊन प्रत्यक्ष जगातील अविस्मरणीय गोष्टींचा अनुभव घेत होते. या नंतर साहूंनी अनेक विदेश यात्रा केल्या आणि बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकून आत्मसात केल्या.

सन १९८९ मध्ये साहूंनी दिल्ली विश्वविद्यालयातून वनस्पती शास्त्रात पीएचडी पूर्ण केली आणि अमेरिकेला निघून गेले, मात्र त्यांच्या मनात भारतात काहीतरी करण्याची इच्छा होती, त्यांना वाटत होते की देशाच्या प्रगतीत त्यांनी हातभार लावावा. आणि मातृभूमीच्या ओढीने ते सगळं काही सोडून दिल्लीला आले. लहानपणा पासूनच साहूंनी चिल्का सरोवराला जवळून पहिले होते आणि एक संशोधक म्हणून त्यांची समुद्री शेवाळ्या मध्ये रुची होती. मात्र भारतात या वनस्पती बद्दल खूपच कमी जणांना माहिती होते. तर बाहेरील देशांमध्ये या शेवाळ्याची मोठ्या प्रमाणावर शेती केली जात होती आणि लोक त्या पासून भरघोस उत्पन्न कमावत होते. तेव्हा साहूंनी ठरवले की प्रथम ते लोकांना या शेवाळ्या बद्दलची माहिती देतील आणि त्याचा उपयोग टूथपेस्ट, टॉमेटोकेचप आणि औषधांमध्ये होऊ शकतो हे समजावतील. लाल शेवाळे व्यापारिक दृष्टीने महत्वपूर्ण होते. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांनी 'फार्मिंग द ओशियन' नावाचे पुस्तकही लिहिले.

भारतात मत्स्य पालनावर नेहमीच अधिक लक्ष दिले गेले आहे, मात्र अशा शेवाळ्याची शेती फारच कमी होते. साहुंना वाटत होते की जास्तीत जास्त प्रमाणात शेवाळ्याची शेती केली जावी ज्याने शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळेल. जर हा व्यवसाय चांगली प्रगती करत राहिला तर भविष्यात त्याचे रुपांतर एका उद्योगात देखील करता येईल.

या योजनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी साहूंनी अनेक मंत्र्यांच्या भेटी घेतल्या मात्र त्यांना फारसे यश मिळाले नाही. अखेरीस डीएसटीच्या (Department of Science & Technology) सायंस एंड सोसाइटी विभागाने या प्रकल्पाला ३ वर्षांसाठी २० लाख रुपयांची तरतूद केली. आणि मग तर काय साहूंनी भारतातील वेगवेगळ्या किनारपट्टी भागांचा दौरा आरंभला आणि ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यासाठी चिल्का मॉडेल बनवले. यानंतर लोकांना शेवाळ्याच्या उपयुक्तते विषयी सांगितले सोबतच शेवाळ्याच्या शेती मुळे भविष्यात होणाऱ्या फायद्यांची ही कल्पना ते लोकांना देउ लागले. त्यांनी शेतकर्यांना समजावले की कशाप्रकारे अगदी माफक दरात नफा कमावला जाऊ शकतो. शेवाळ्याच्या शेतीचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य असे आहे की याला नांगरणी, सिंचन आणि खतांच्या उपयोगाची आवश्यकता नसते. बस केवळ बियाणे टाका आणि सोडून द्या आणि नंतर ४५ दिवसांनी त्याची कापणी करा. या मध्ये अगदी अल्प गुंतवणुकीत चांगले उत्पन्न कमावता येते.

या नंतर साहूंनी ४ वेगवेगळ्या प्रकारच्या शेवाळांची ओळख करून दिली ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी होती. त्यानंतर तिथे उगवणाऱ्या वनस्पतींची ओळख पटवण्यात आली आणि पाण्यातील ऑक्सिजन च्या प्रमाणावरून वनस्पती उगवण्यात आल्या. पहिला प्रयोग २००९ मध्ये चिल्का सरोवराच्या सातपाडा या ठिकाणी करण्यात आला. साहू तिथे स्वतः निरीक्षक म्हणून हजर होते. परिणाम खूपच चांगले आले. या नंतर दुसर्या शेतकर्यांनी सुद्धा शेवाळ्याची शेती करणे चालू केले. शेवाळ्याची शेती अगदीच सोपी असते. आता शेतकर्यांना बारमाही उत्पन्नाचे साधन मिळाले होते. शेतकरी एकीकडे पेरणी करत तर दुसरी कडे ४५ दिवस जुन्या शेवाळ्याची कापणी चालू असे. याने ते चांगल्या पैकी पैसे कमवू लागले.

चिल्का हे केवळ एक सरोवर नाही ते उडीसाच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतिक आहे. हजारो लोकांची जीवन रेखा आहे. अपेक्षा आहे की हे चिल्का प्रोजेक्ट उडीसातच नाही तर भारताच्या अन्य किनारी भागात आणि विदेशातही आपला प्रभाव पाडेल. आता साहू वेगवेगळ्या मंचावरून या प्रोजेक्ट विषयी माहिती सांगतात ज्याने शेवाळ्याच्या शेतीला प्रोत्साहन मिळून किनारी प्रदेशातील गरीब शेतकर्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल. साहूंचा हेतू पैसा कमावणे नाही. ते फारच साधेपणाने आयुष्य जगतात. गरिबांना हे तंत्र अवगत करण्याचे ते काहीच पैसे घेत नाहीत. हरित आणि श्वेत क्रांती नंतर साहुंचे स्वप्न आहे निळ्या क्रांतीचे. समुद्रामध्ये अपार शक्यता लपल्या आहेत. उडीसा एक गरीब राज्य आहे इथे कुपोषणाची समस्या भीषण आहे. अशा ठिकाणी शेवाळ्याची शेती फारच मदतीची ठरू शकते कारण केवळ १०० ग्राम शेवाळ्यात एक किलो भाजी इतके पोषणमूल्य असते.

दीनबंधू साहू एक प्रेरणा स्रोत आहेत. विदेशात राहून ते भरपूर पैसे कमवू शकत होते मात्र आपल्या मातृभूमीची सेवा करणे त्यांनी आपले पहिले कर्तव्य मानले आणि देशातील शेतकर्यांसमोर समुद्री शेतीचा एक नवीन पर्याय उपलब्ध करून दिला.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags