संपादने
Marathi

ʻअन्नपूर्णाʼ सुरेखा वाळके यांचा ʻचैतन्यʼमयी प्रवास

Ranjita Parab
29th Nov 2015
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

एखाद्या गृहिणीने मनात आणले तर ती काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुरेखा वाळके. आजवरच्या आयुष्यात त्यांनी ब्युटीशियन, नगरसेविका ते एक यशस्वी हॉटेल उद्योजिका, असा प्रवास सहज पार पाडला आहे. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत आवर्जुन उल्लेख करावा लागेल अशा कोकण पट्ट्यातील मालवणी खाद्यसंस्कृतीला सुरेखा वाळके यांच्यामुळे एक वेगळी ओळख मिळाली. सुरेखा यांच्या हॉटेलमधील स्वादिष्ट्य आणि रुचकर अशा मालवणी जेवणाला खवय्यांची तसेच अनेक कलाकारांची देखील दाद मिळाली. सध्या सुरेखा यांच्या ʻचैतन्यʼ हॉटेलच्या शाखा दादर, ठाणे, सावंतवाडी आणि मालवण या ठिकाणी आहेत. माटुंगा येथे लवकरच त्यांची शाखा सुरू होईल. सुरेखा यांच्या जीवनातील एक गृहिणी ते यशस्वी हॉटेल उद्योजिका, अशा प्रेरणादायी प्रवासाबद्दल आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतले.

image


आपल्या आजवरच्या प्रवासाबद्दल बोलताना सुरेखा सांगतात की, ʻ३० वर्षांपुर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने मी सासर आणि माहेर दोन्ही ठिकाणी परकी झाले होते. पतीला वारसाहक्कातून मिळालेले घर आणि पंतप्रधान योजनेअंतर्गत २५ हजार रुपये घेऊन सुरू केलेला किराणा मालाचा व्यवसाय, एवढीच पुंजी आमच्याजवळ होती. लग्नानंतर किराणा मालाचा व्यवसाय तर सुरू होता. मात्र अर्थार्जनाची गरज म्हणून स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करण्याची आस माझ्या मनात निर्माण झाली. माझ्या वडिलांचा बेकरी आणि मिठाईचा व्यवसाय होता. लहानपणी मी माझ्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करत होते. त्यामुळे व्यवसायासाठीचे बाळकडू मला लहानपणापासूनच मिळाले होते. मला नटण्या मुरडण्याची आवड असल्याने पहिल्यांदा माझ्या मनात ʻब्युटीपार्लरʼचा व्यवसाय करण्याची कल्पना आली. त्यानंतर मी महाराष्ट्र बॅंकेतून त्याकाळी पाच हजार रुपयांचे कर्ज काढले आणि माया परांजपे यांच्या ब्युटीकमध्ये ब्युटीशियनचे प्रशिक्षण घेण्यासाठी अवघ्या तीन महिन्याच्या माझ्या मुलीसह मुंबई गाठली. ब्युटीशियनचे व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मी १९८७ साली सिंधुदूर्ग जिल्ह्यात माझ्या राहत्या घरी पहिले ब्युटीपार्लर सुरू केले. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. व्यावसायिक आयुष्यातील माझ्या पहिल्याच ग्राहकाला म्हणजेच एका नववधुच्या मेकअपसाठी जाताना माझा अपघात झाला. त्यात माझ्या कोपराला गंभीर दुखापत झाली आणि त्यावर उपचार करण्यासाठी मला पुन्हा मुंबई गाठावी लागली. या दुःखात सुख एवढंच की, या अपघातामुळे दुरावलेली दोन्ही घरं म्हणजे माझं सासर आणि माहेर जवळ आले. वर्षभर उपचार घेतल्यानंतर मी पुन्हा पार्लरच्या व्यवसायात काम करू लागले. त्यानंतर मी नगरपरिषदेची निवडणूकदेखील लढवली आणि नगरसेविका म्हणून समाजसेवेची कामे करू लागले. दरम्यानच्या काळात मालवण पर्यटनाच्या दृष्टीने नावारुपास येऊ लागले होते. मात्र तेथे नाश्त्यासाठी वडे आणि मिसळ यापलीकडे काही मिळत नव्हते. माझ्या पार्लरच्या शेजारी असलेला एक गाळा रिकामाच होता. वडिलांच्या व्यवसायात त्यांना हातभार लावल्याने हॉटेल व्यवसायातील अनुभवदेखील माझ्या गाठीशी होता. अखेरीस मी शेजारच्या एका मुलाला हाताशी धरुन चौपाटी स्नॅक्सचा व्यवसाय सुरू केला. त्याला प्रतिसाददेखील चांगला मिळत होता. त्यानंतर मी आमच्या भल्यामोठ्या घरात सात-आठ विद्यार्थी पेईंग गेस्ट म्हणून ठेवले. त्या विद्यार्थ्यांनी मी बनविलेल्या जेवणाची मोठ्या प्रमाणावर मौखिक प्रसिद्धी केली. परिणामी महाविद्यालयातील काही प्रशिक्षकांनी माझ्याकडे मासिक मेंबरशीपवर जेवण देण्याचा आग्रह केला. त्यामुळे मला दररोज १०-१५ जणांच्या जेवणाचा खटाटोप करावा लागायचा. अखेरीस माझ्या अर्धवेळ चालणाऱ्या स्नॅक्स कॉर्नरचे रुपांतर पूर्णकालीन हॉटेलमध्ये झाले. त्या हॉटेलमध्ये आम्ही घरातील भांडी-कुंडी, स्टोव्ह, शेगडी आणि बाकडे-खुर्च्या वापरत होतो. अशाप्रकारे ʻचैतन्य अस्सल मालवणी भोजनगृहाʼची सुरुवात झाली.ʼ एका मोकळ्या गाळ्यातून सुरू केलेल्या ʻचैतन्यʼ हॉटेलच्या आता अनेक ठिकाणी शाखा सुरू झाल्या आहेत. स्वादिष्ट, सकस आणि घरगुती मालवणी जेवणाची मौखिक प्रसिद्धी पर्यटकांनीच महाराष्ट्रभर केल्याने जाहिरातीसाठी विशेष खर्च करावा लागला नसल्याचे सुरेखा सांगतात. ʻदारात आलेल्या ग्राहकाला उपाशीपोटी परत पाठवायचे नाहीʼ, हे धोरण निश्चित केल्याने ʻचैतन्यʼकडे खवय्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढत गेला, असे सुरेखा अभिमानाने सांगतात. दरम्यानच्या काळात दोन्ही व्यवसायात लक्ष द्यावे लागणार असल्याने सुरेखा यांनी राजकीय क्षेत्रातून निवृत्ती घेतली.

image


ʻचैतन्यʼबद्दल अधिक बोलताना सुरेखा सांगतात की, ʻया व्यवसायातील उत्पन्न पुन्हा त्यातच गुंतवत गेल्याने प्रगती झपाट्याने होत गेली. सर्वात पहिल्यांदा आम्ही मिळालेल्या उत्पन्नाने हॉटेलचे नुतनीकरण केले आणि सारस्वत बॅंकेकडून तीन लाख रुपये कर्ज घेऊन वातानुकुलित उपहारगृह सुरू केले. त्यानंतरच्या चार वर्षात ही बैठकव्यवस्था अपुरी पडू लागल्याने आम्ही ८० जण बसू शकतील, असे भव्य उपहारगृह सुरू केले. स्वच्छता हा मूलमंत्र जपल्याने, संपूर्ण जिल्ह्यात आदर्श उपहारगृह म्हणून चैतन्यची ओळख होऊ लागली. त्यानंतर अनेक माध्यमांनी याठिकाणी मालवणी पाककलेचे चित्रिकरण करुन संपूर्ण भारतभर चैतन्यच्या नावाला प्रसिद्धी दिली. दरम्यानच्या काळात मुलांच्या शिक्षणाकरिता मुंबईत स्थायिक व्हायचे नक्की झाल्यावर मुंबईत ʻचैतन्यʼची शाखा सुरू करण्याचे विचार माझ्या मनात घोळू लागले. त्यादृष्टीने मी प्रयत्न सुरू केले असता, एका मित्राच्या मदतीने हॉटेल व्यवसायात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या एका व्यक्तीशी व्यक्तिशी माझी ओळख झाली. अखेरीस दक्षिण मुंबईतील शिवाजी पार्क येथे २५० चौरसफुटांच्या छोट्याशा जागेत भाडेतत्वावर आम्ही पार्सल डिलिव्हरी आणि टेकअवे माध्यमातून अस्सल मालवणी जेवण देणारे एक छोटेखानी हॉटेल सुरू केले. जानेवारी २००९ मध्ये सुरू केलेल्या या हॉटेलला ग्राहकांकडून चांगली पसंती मिळाली. आमच्या हॉटेलने पहिल्याच महिन्यात जवळपास दीड लाख रुपयांची उलाढाल केली. मात्र अनेक आव्हाने आमच्या समोर आली. दरम्यान माझ्या व्यावसायिक सहकाऱ्यासोबत झालेल्या मतभेदांमुळे आमची पार्टनरशीपदेखील संपुष्टात आली. अखेरीस ʻचैतन्यʼ मालवणी उपहारगृह माझ्या एकटीच्या मालकीचे झाले. त्यानंतर झोमॅटो (Zomato) या संकेतस्थळाने आमच्या हॉटेलची निवड ʻबेस्ट सेव्हन सी-फूड हॉटेलʼच्या यादीत केली. त्यामुळे ग्राहकांची ओघ आमच्याकडे वाढू लागला आणि आम्हाला जागेची कमतरता भासू लागली. जुलै २०१२ रोजी आम्ही प्रभादेवी परिसरातील आगरबाजार येथे ६०० चौरसफुटांच्या जागेवर धुमधडाक्यात ʻचैतन्यʼची सुरुवात केली.ʼ

image


हा सर्व प्रवास साध्य करताना माझ्या पाठीशी माझ्या आईचा आशिर्वाद होता, असे सुरेखा सांगतात. हॉटेल व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मला माझ्या आईने शिकवण दिली होती की, ग्राहकाला आपण जे काही जेवण वाढू, ते गुणवत्तापूर्ण आणि रुचकर असायला हवे. तसेच दारात येणारा ग्राहक कधीच उपाशीपोटी परत जाऊ नये, ही शिकवणदेखील आईनेच दिल्याचे त्या सांगतात. हॉटेल व्यवसायात कुटुंबियांचे समर्थन मिळाल्याने हे सर्व साध्य झाले, असे सांगत सुरेखा या सर्वाचे श्रेय आपल्या कुटुंबियांना देतात. या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या उद्योजकांना सुरेखा पाठिंबा देतात. सुरेखा यांनी उभारत्या काळात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती नवे उद्योजक करू नयेत, असे त्यांना मनोमन वाटते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने स्वतःचे हॉटेल सुरू करण्याचा मानस सुरेखा यांच्याकडे व्यक्त केला होता. सुरेखा यांनी त्याला ठाणे शाखेची फ्रॅन्चायझी देऊ केली. सध्या ठाण्यातील ʻचैतन्यʼ शाखेचे कामकाज तो पाहतो. या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या उद्योजकांना सुरेखा सांगू इच्छितात की, ʻमी जेव्हा या क्षेत्रात पाऊल टाकायचे ठरविले, तेव्हा माझ्याकडे भांडवलदेखील पुरेसे नव्हते. गाठीशी होता तो आत्मविश्वास आणि त्याच्याच जोरावर मी आजपर्यंत एवढी मजल मारू शकले. आजही मी अठरा तास काम करते. तुम्हालादेखील अशा क्षेत्रात कारकिर्द करायची असेल, तर मेहनतीला पर्याय नाही. अंगावर पडेल ते काम करण्याची तुमची तयारी हवी.ʼ

ʻचैतन्यʼ हॉटेलची कार्यप्रणाली शिस्तबद्ध आहे. येथील आचाऱ्याला सुरेखा यांनी स्वतः प्रशिक्षण दिले असून, प्रत्येक पाककृतीवर त्या स्वतः लक्ष ठेवून असतात. तसेच हॉटेलमधील जेवणात वापरण्यात येणारा मसालादेखील सुरेखा स्वतः तयार करतात. अन्नपूर्णा असलेल्या सुरेखा याशिवाय आईस्क्रिम, मॉकटेल, केक, मालवणी जेवण, विविध सरबत बनविण्याच्या कार्य़शाळा घेतात. सुरेखा यांना आणि ʻचैतन्यʼला आतापर्यंत अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यात झोमॅटो, टाईम्स नाऊ फुडी अवॉर्ड (बेस्ट लोकल क्युसिन कॅटेगरी) यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्रातील विविध खाद्यसंस्कृतींमधील आवर्जुन उल्लेख करावा अशी मालवणी खाद्यसंस्कृती आणि पाककला शब्दबद्ध करण्याचे सुरेखा यांचे स्वप्न आहे. मालवणी पाकसंस्कृतीवर आधारित पुस्तक त्यांना लिहायचे आहे. तसेच संपूर्ण मुंबईशहरात ʻचैतन्यʼ हॉटेलच्या शाखा सुरू करण्याचा तसेच ऑनलाईन हॉटेलिंग व्यवसायात येण्याचा त्यांचा मानस आहे. मालवणी खाद्यसंस्कृतीला साता समुद्रापार परदेशातदेखील ओळख देण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags