संपादने
Marathi

विरुद्ध दिशेने यशोमार्ग गाठणारे, हेल्मेट स्वच्छतेसाठी उपयुक्त ‘फिंगी’

Anudnya Nikam
4th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

सामान्यतः कुठलेही उत्पादन आधी दुकानामध्ये उपलब्ध केले जाते आणि त्यानंतर ते ग्राहकांच्या परिचयाचे होते. ‘फिंगी’चा प्रवास मात्र याच्या अगदी विरुद्ध दिशेने झाला. “फिंगी ग्राहकांच्या एवढे पसंतीस पडले की ग्राहकांनी स्वतः दुकानदारांकडे याबद्दल विचारणा केली आणि त्यानंतर दुकानदारांनी ऑर्डर बुक करण्यासाठी संपर्क केला,” असं सागर अभिमानाने सांगतो. विशेष म्हणजे ‘फिंगी’च्या लोकप्रियतेनंतर सागरशी संपर्क साधणाऱ्या दुकानदारांनी सुरुवातीला ‘फिंगी’ला नाकारले होते.

image


डिप्लोमा इन ऑटोमोबईल इन्जिनिअरिंग आणि बी.इ इन मेकॅनिकल इन्जिनिअरिंग केलेल्या सागर जागे याला सुरुवातीपासूनच प्रोडक्ट आणि ट्रान्सपोर्टेशन डिझाईन याची आवड होती. या आवडीमुळे त्याला आसपासच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय म्हणून काही नवीन तयार करता येऊ शकते का याचा शोध घेण्याची सवय जडली. बाईक रायडिंगचीही आवड असलेला सागर एकदा पावसाळ्यात बदलापूरहून ठाण्याला बाईकने येत असताना त्याच्या हेल्मेटवर चिखल उडाला आणि डाव्या हाताने हेल्मेटची काच पुसत पुसत बाईक चालवणाऱ्या सागरला या समस्येवर उपाय म्हणून ‘फिंगी’ची संकल्पना सुचली.

image


‘फिंगी’ हे खास दुचाकीस्वारांसाठी तयार करण्यात आलेले ‘फिंगर वायपर’ आहे. पावसाळ्यात दुचाकीस्वारांच्या हेल्मेटवर पावसाचे पाणी किंवा अनेकदा चिखलही उडतो. हे पाणी आणि चिखल हाताने किंवा कपड्यानेही व्यवस्थित साफ होत नाही. उलटपक्षी चिखल पसरल्यामुळे समोरचे स्पष्ट दिसेनासे होते. “बदलापूर ते ठाणे प्रवासादरम्यान हा त्रास लक्षात आल्यावर मी माझ्या सवयीनुसार यावर काय करता येईल याबाबत विचार सुरु केला आणि ‘ग्लोव्हज विथ वायपिंग एज’ हा यावर उपाय होऊ शकतो असं वाटलं,” असं सागर सांगतो. “मात्र ग्लोव्हज बनविणं महाग पडेल आणि जिथे हेल्मेटसुद्धा लोक पोलिसांना दाखविण्यापुरतं स्वस्तातलं घेतात तिथे प्रोफेशनल रायडर्स सोडले तर सर्वसामान्य दुचाकीस्वार या ग्लोव्हजवर खर्च करतील का आणि ब्रॅण्डेड ग्लोव्हज वापरणारे प्रोफेशनल रायडर्स तरी हे ग्लोव्हज वापरणं पसंत करतील का असा प्रश्न पडला. त्याचबरोबर वाटलं की अनेकांना बाईक चालवताना ग्लोव्हज वापरणं आवडत नाही. मला स्वतःलाही ते आवडत नाही आणि मला हे प्रोडक्ट सर्वांसाठी तयार करायचं होतं. त्यामुळे ते पोर्टेबल असण्याबरोबरच त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी असणं जेणेकरुन लोकांना ते स्वस्तात विकता येईल हे पहायचं होतं आणि म्हणूनच अखेर मी ‘फिंगर वायपर’ तयार करायचं ठरवलं आणि त्यासाठी स्वतःचं वेगळं डिझाईन बनवायचं निश्चित केलं,” सागर सांगतो.

image


सागरने फिंगर वायपरची एकूण १० डिझाईन तयार केली. बोटाच्या वेगवेगळ्या आकारानुसार याचा आकार निश्चित करुन स्केचिंग आणि 3डी मॉडेल तयार केले आणि त्यापैकी एक डिझाईन निश्चित केले. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर कारचे वायपर कापून ते इलॅस्टीकवर लावून त्याने दोन फिंगर वायपर तयार केले. एक स्वतः ठेवले आणि एक मित्राला वापरायला दिले. स्वतःचा अनुभव आणि मित्राचा प्रतिसाद पाहून हे डिझाईन सर्वांपर्यंत पोहचवायचं त्याने निश्चित केलं. मात्र हेल्मेटची काच साफ करणं सहज शक्य होत असलं तरी इलॅस्टीक घट्ट बसत असल्यामुळे जास्त वेळ वापरल्यास बोटाला होणारा रक्त पुरवठा थांबतो हे लक्षात आल्यावर त्याने त्यावर उपाय म्हणून वेल्क्रोसह इलॅस्टीक वापरायला सुरुवात केली. त्यामुळे इलॅस्टीक पाहिजे तेवढे घट्ट-सैल करणे आणि वेगवेगळ्या आकाराच्या बोटांमध्ये हे वायपर घालणे सहज शक्य झाले. “वेल्क्रोच्या वापराने वायपर बोटात घालणे सोपे झाले असले तरी मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन घेताना रबरसाठी कार वायपरचा वापर करणं परवडणारं नव्हतं आणि कार वायपर कापून वापरल्यामुळे त्याचं फिनिशिंगही तितकसं चांगलं वाटत नव्हतं. म्हणून आम्ही आमच्या गरजेनुसार रबर वायपरची नवी डिझाईन बनवून एका विक्रेत्याकडून ते खास तयार करुन घ्यायला सुरुवात केली,” असं सागर सांगतो.

सुरुवातीला सागर नोकरी सांभाळून हे काम करत होता. २०१३ सालच्या पावसाळ्यात त्याने दोन मित्रांच्या मदतीने ‘फिंगी’चे उत्पादन घेऊन विक्री करायला सुरुवात केली. मात्र हे तयार करण्यामध्येच अर्धा पावसाळा निघून गेल्यामुळे त्यांना याच्या पॅकेजिंगवर विशेष लक्ष देता आले नाही. त्यांनी एका पॉलिथीन बॅगमध्ये आपल्या कंपनीची माहिती आणि सूचना असलेला कागद टाकून ‘फिंगी’ बाजारात आणले. “सुरुवातीला एकूण ५०० वायपर आम्ही तयार केले होते. तेव्हा मला रिटेलर, होलसेलरचं वेगवेगळं मार्जिन असतं याबद्दल काही माहिती नव्हतं. मी विक्रेत्यांसाठी पाच रुपये मार्जिन ठेऊन ३५ रुपयाने फिंगी विक्रीसाठी बाजारात उतरवले होते. त्यामुळे मार्जिन नाही, व्यवस्थित पॅकेजिंग नाही, जाहिराती अभावी अशा पद्धतीचे उत्पादन उपलब्ध असल्याचे लोकांना माहितीच नसल्याने याला ग्राहक मिळणार नाही अशी विविध कारणं देत ‘फिंगी’ विक्रीसाठी दुकानात ठेवायला दुकानदारांनी नकार दिला. पेट्रोल पंपावर, लोकल ट्रेनमधून छोट्या-छोट्या वस्तू विकणारे फेरीवालेही ‘फिंगी’ची विक्री करायला तयार होईना. अखेर मी थेट ग्राहकांना हे ‘फिंगर वायपर’ विकायचं ठरविलं आणि माझ्या एका मित्राच्या सोबतीने स्वतः पेट्रोलपंपांवर उभं राहून फिंगीची विक्री करायला सुरुवात केली. आम्ही कामावरुन आल्यावर संध्याकाळी साडेसहापासून पेट्रोलपंपांवर जाऊन हे वायपर विकायचो. याच्या मार्केटींगसाठी मी फेसबुकचा आधार घेतला. अशा प्रकारे पहिल्याच वर्षी आम्ही जवळपास २५० वायपर्स ठाणे आणि आसपासच्या परिसरात विकले आणि काही वायपर्स पुण्यालाही पाठविले,” असं सागर सांगतो.

दरम्यान सोमय्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘मेकर्स मेला’मध्ये स्टॉल लावण्यासाठी निवडलेल्या टॉप १०० शोधकर्त्यांमध्ये सागरची व त्याच्या फिंगीची निवड झाली. त्यानंतर फिंगी संदर्भात विविध माध्यमातून लेखही प्रसारीत झाले आणि हे फिंगर वायपर अल्पावधीत देशभरात पोहचले. यामुळे२०१४ मध्ये फिंगीला आणखी चांगला प्रतिसाद लाभला आणि फिंगीची किंमत ३५ वरुन ५० करुनही ३००० वायपर्स विकले गेले. सागर सांगतो, “बंगळुरुमधून सर्वात चांगला प्रतिसाद लाभला. तसेच जम्मू-काश्मिर, दिल्ली, नोएडा, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, केरळ आणि लेह-लडाखच्या रायडर्सकडूनही ऑर्डर मिळाल्या. यावर्षी ऍक्सेसरीज विक्रेत्यांकडून डिस्ट्रीब्युटरशीपसाठी फोन आले. सध्या आमच्याकडे दक्षिण भारतासाठी एक आणि मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याकरिता एक डिस्ट्रीब्युटर आहे. विशेष म्हणजे २०१३ साली ज्या दुकानदारांनी फिंगीची विक्री करण्यास नकार दिला होता ते आता स्वतःहून फिंगीची विचारणा करण्यासाठी फोन करु लागले आहेत.”

image


‘फिंगी’ डाव्या हाताच्या तर्जनीवर वायपर जमिनीस समांतर ठेऊन घालावे लागते. बोट थोडेसे वाकवून या वायपरच्या सहाय्याने बाईक चालवत असतानाच हेल्मेटची काच साफ करणे सहज शक्य होते. हे पोर्टेबल फिंगर वायपर कोणत्याही आकाराच्या बोटात घालता येते. तसेच कितीही वेळ घातले तरी रक्तप्रवाहास कोणतीही बाधा होत नाही. फ्लेक्सिबल आणि वजनाने हलके असल्यामुळे बाईक चालवताना याचा कोणताही त्रास होत नाही. किंबहुना यामुळे हाताला ग्रीप चांगली मिळते. कोणत्याही प्रकारच्या हेल्मेटच्या काचेवरचे पाणीच नाही तर चिखलही यामुळे चांगल्या प्रकारे आणि सहज साफ करणे शक्य होत असल्याने दुचाकीस्वारांसाठी हे फिंगर वायपर खरोखरच उपयुक्त ठरले आहे. कमी किंमतीत मिळणाऱ्या, टिकाऊ ‘फिंगी’ला दिवसेंदिवस मागणी वाढते आहे.

फिंगीला मिळालेला प्रतिसाद पाहून मार्च 2014 मध्ये सागरने नोकरी सोडली आणि ‘मोटोट्रेन्डझ कस्टमायझेशन’ नावाने फर्म रजिस्टर करुन स्वतःचा व्यवसाय सुरु केला. २०१४ पर्यंत ‘पायोनीअर्स कन्सल्टन्सी’च्या ब्रॅण्डखाली मिळणारे ‘फिंगी’ आता नव्या ब्रॅण्ड नेमखाली तयार होऊ लागले आहे. सागर ‘मोटोट्रेन्डझ कस्टमायझेशन’ अंतर्गत मोटरसायकल मॉडिफिकेशन आणि फिंगर वायपर निर्मिती अशा दोन्ही गोष्टी करतो. “मोटरसायकल मॉडिफिकेशनमुळे या क्षेत्रात खूप ओळखी झाल्या आहेत. ज्या फिंगीसाठी ग्राहक मिळविण्यात कामी येतील,” असं सागर सांगतो.

सध्या ऑनलाईन शॉपिंगकडे ग्राहकांचा असलेला कल पाहता भविष्यात ऑनलाईन मार्केटींगमध्ये उतरण्याचा सागरचा विचार आहे. त्यामुळे आता केवळ सागरशी संपर्क साधून मिळवावे लागणारे ‘फिंगी दि फिंगर वायपर’ लवकरच ऑनलाईनही खरेदी करता येऊ शकेल. मात्र तत्पूर्वी तुम्हाला ‘फिंगी’ खरेदी करायचे असल्यास तुम्ही 9890523152 या सागरच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा 3creativepioneers@gmail.com या ई-मेल आयडीवर ई-मेल पाठवून आपली ऑर्डर नोंदवू शकता.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags