संपादने
Marathi

'मूत्रपिंड' विषयक जनजागृती करणारी अपेक्स किडनी फाउंडेशन

Nandini Wankhade Patil
25th Apr 2017
Add to
Shares
9
Comments
Share This
Add to
Shares
9
Comments
Share

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहे. परिणामी दीर्घकालीन आजारांच्या प्रमाणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातही सर्वात लक्षणीय वाढ आहे ती मूत्रपिंड विकाराने पिडीत असलेल्या रुग्णांची. विशेष म्हणजे मूत्रपिंड विकाराने त्रस्त असलेल्या बहुतांश रुग्णांसमोर फक्त दोनच पर्याय उपलब्ध असतात, डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण. अशा परिस्थितीत गरजु रुग्णांना सहाय्य करण्यासोबतच शिक्षणाद्वारे मूत्रपिंडविकाराबद्दल जनजागृतीचे काम करणारी संस्था म्हणजे 'अपेक्स किडनी फाउंडेशन'. 


image


अपेक्स किडनी फाउंडेशन (एकेएफ) ही एक स्वयंसेवी आणि ना नफा तत्वावर चालणारी आरोग्यविषयक संस्था आहे. २००८ साली समाजसेवक आणि पाच मूत्रपिंड विकार तज्ज्ञांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली. मुत्रपिंड विकाराचा धोका असलेल्या किंवा मुत्रपिंड विकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यास तसेच त्यांना मदत करण्याचा हेतू या संस्थेच्या स्थापनेमागे होता. गरजू रुग्णांना वैद्यकिय आणि आर्थिक सहाय्य पुरवण्यासोबतच शिक्षणाद्वारे मूत्रपिंड विकाराबद्दल जनजागृती करणे, मूत्रपिंड विकाराचे योग्य वेळी निदान करुन ते रोखण्यासाठी प्रयत्न करणे, मूत्रपिंड विकारासंबंधीच्या संशोधनाला प्रोत्साहन देणे, कायदेशीररित्या अवयवदानाकरिता जनजागृती करणे, यांसारखे अनेक उपक्रम अपेक्स किडनी फाऊंडेशनद्वारे राबवण्यात येतात. एकेएफच्या कार्यकारिणीत समाजकार्याकरिता समर्पित असलेले कार्यकारी मंडळ, वैद्यकिय सल्लागार, तज्ञ्ज, प्रशिक्षित कर्मचारी आणि स्वयंसेवक यांचा समावेश करण्यात आला आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना वैयक्तिक स्वरुपात सहाय्य करण्यासाठी ही संस्था कार्यरत असते.


image


मूत्रपिंड विषयक शिक्षण देणारी एकेएफ ही देशातील एक अव्वल संस्था आहे. अपेक्स अकेडेमिआ, विविध कार्यशाळांचे आयोजन करणे, सीएमई (Continue Medical Education), रुग्ण सहाय्य गटांची सभा, वैद्यकिय शिबिर आणि जनजागृकतेसंबंधीचे कार्यक्रम अपेक्स किडनी फाउंडेशनद्वारे वर्षभर राबवण्यात येतात. याशिवाय एकेएफ मूत्रपिंड विषयाबद्दल अनेक शैक्षणिक उपक्रमदेखील राबवते. डायलिसिस प्रक्रिया करणाऱ्या तंत्रज्ञांकरिता एकेएफ 'डायलिसिस सिम्पलिफाईड' नामक एक शैक्षणिक उपक्रम राबवते. या एकदिवसीय उपक्रमात हिमोडायलिसिस या विषयावरील अद्ययावत माहिती उपस्थितांना देण्यात येते.


image


अपेक्स किडनी फाउंडेशनद्वारे रावबिण्यात येणारा एक महत्वाचा शैक्षणिक उपक्रम म्हणजे 'अपेक्स मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटल बोर्ड रिव्ह्यु कोर्स'. या अभ्यासक्रमात जगभरातील प्रख्यात मूत्रपिंडविकारतज्ज्ञ सहभागी होतात. गेल्या सात वर्षांपासून एकेएफ हा अभ्यासक्रम राबवत असून, या उपक्रमात भारतातील तसेच नेपाळ, बांग्लादेश, बर्मा, सिंगापूर, चीन, मध्यपूर्व आशिया, केनिया, टांझानिया, कंबोडीया, मॉरिशस आणि इतर देशातील मूत्रपिंडविकारतज्ज्ञ सहभागी होतात. अपेक्स किडनी फाउंडेशनचा हा अभ्यासक्रम मॅसेच्युसेट्स जनरल हॉस्पिटलशी (हॉवर्ड विद्यापीठ) संलग्न आहे. अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत तब्बल ४० ते ४४ तास संपुर्णपणे अभ्यासाकरिता राबविण्यात येणाऱ्या या अभ्यासक्रमाने आशिया खंडात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या अभ्यासक्रमात जगभरातील प्रख्यात मूत्रपिंडविकार शिक्षकांद्वारे चर्चासत्र / व्याख्यान / केस डिस्कशन / कार्यशाळा राबविण्यात येते. जगभरातील मूत्रपिंडविकारतज्ज्ञांना मूत्रपिंडविषयातील अद्ययावत माहिती या उपक्रमादरम्यान मिळते. मूत्रपिंड या विषयावरील वादविवाद आणि चर्चेकरिता हे एक उत्कृष्ट व्यासपीठ समजले जाते.


image


मूत्रपिंडविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांकरितादेखील अपेक्स किडनी फाउंडेशन 'पेशंट एज्युकेशन' नावाचा उपक्रम राबवते. या अंतर्गत ते दीर्घकालीन मूत्रपिंडविकाराने (क्रोनिक किडनी डिसीज स्तर ५) त्रस्त असलेल्या रुग्णांना संपूर्णपणे मार्गदर्शन करतात. या कार्य़क्रमांतर्गत ते रुग्णांना मूत्रपिंडाचे कार्य़, आजार, त्यावरील उपचार, आहारविषयक सल्ला तसेच इतर काळजी यांबाबत मार्गदर्शन करतात.

अपेक्स फेलोशीप कार्य़क्रम - अपेक्स किडनी फाउंडेशनद्वारे हा अभिनव उपक्रम राबविण्यात येतो. प्रशिक्षित डॉक्टरांकरिता हा एक वर्षाचा उपक्रम राबवण्यात येत असून, मूत्रपिंडविकारतज्ज्ञांना मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालये (बॉम्बे हॉस्पिटल आणि हिंदुजा हॉस्पिटल) येथे प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर त्यांना वेस्टमेड विद्यापीठ (सिडनी, ऑस्ट्रेलिया) येथील जगप्रसिद्ध मूत्रपिंडविकारतज्ज्ञ प्रोफेसर डॉ. जेरेमी चॅपमन यांच्या मार्गदर्शनाखाली सहा आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येते.

याव्यतिरिक्त अपेक्स किडनी फाउंडेशन गरजू रुग्णांकरिता वैद्यकिय सहाय्य देखील पुरविते. गरजु रुग्णांकरिता आठवड्यातून एकदा मूत्रपिंडविकारतज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शन, सुलभ दरात औषधे तसेच एव्ही फिस्टुला शस्त्रक्रियेकरिता आर्थिक मदत यांसारखे अनेक उपक्रम फाउंडेशनद्वारे राबविण्यात येतात. अपेक्स किडनी फाउंडेशनबाबत अधिक जाणून घेण्याकरिता http://www.apexkidneyfoundation.org/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन फाउंडेशनमार्फत करण्यात आले आहे. 

Add to
Shares
9
Comments
Share This
Add to
Shares
9
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags