संपादने
Marathi

‘फ्लिपकार्ट’चे सचिन बंसल म्हणतात, ‘उद्यमशिलता तुम्हाला तुमच्या मर्यादांपल्याड नेते!’

26th Feb 2016
Add to
Shares
8
Comments
Share This
Add to
Shares
8
Comments
Share

भारतामध्ये ‘ई-कॉमर्स इकोसिस्टिम’ आणि ‘नवोदित स्टार्टअप’ संस्कृतीने बाळसं धरायला जर कुठली ‘जन्मघुटी’ (बाळासाठीचं शक्तिवर्धक औषध) कारणीभूत ठरली असेल तर ती म्हणजे ‘फ्लिपकार्ट!’ सचिन बंसल आणि बिन्नी बंसल यांच्या डोक्यातून प्रसवलेलं हे अपत्य! सचिन आणि बिन्नी दोघे आयआयटी-दिल्लीचे विद्यार्थी, चंदिगडचे सवंगडी. ‘फ्लिपकार्ट’ आता आठ वर्षांची झालेली आहे. आता नवसदस्यिय ‘इंडियन युनिकॉर्न क्लब’चा एक घटक असलेल्या ‘फ्लिपकार्ट’चा डोलारा आता १५.५ अब्ज डॉलरपर्यंत विस्तारलाय.

बुधवारी SURGE परिषदेचे सूप वाजले. अखेरचे सत्र खरोखर ‘भैरवी’सारखे भव्यदिव्य ठरले. ‘स्टार्टअप्स’च्या संस्थापकांनी आणि ‘स्टार्टअप’चे स्वप्न रंगवणाऱ्यांनी सभागृह तुडुंब भरलेले होते. भारलेलेही होते. दस्तुरखुद्द ‘युवर स्टोरी’च्या संस्थापिका श्रद्धा शर्मा या दस्तुरखुद्द सचिन बंसल यांची प्रकट मुलाखत घेणार होत्या. सचिन हे फ्लिपकार्टचे नुसतेच सहसंस्थापक नाहीत, तर कार्यकारी अध्यक्षही आहेत. श्रद्धा प्रश्नांचे चेंडू कशा फेकतात आणि स्टार्टअप-विश्वातील सचिन हे चेंडू कसे टोलवतात, याबद्दल उत्सुकता ताणलेली होती. इतकी, की श्रोते मुलाखतीच्या ठरल्या वेळेपूर्वी तासाभराआधीच येऊन बसलेले होते. एकही खुर्ची रिकामी नव्हती. अनेकांनी उभ्यानेच या मुलाखतीचा आस्वाद घेतला. मुलाखतीतून कंपनीची उभारणी, आत्मबोध, सहवेदनेचे महत्त्व, स्टार्टअप संस्थापकाच्या भूमिकेतील टोकाचे एकाकीपण या गंभीर विषयांवर चिंतन झाले, तसेच अडचणी, अडथळे अशा इतर विषयांवर खुसखुशित विनोदांची पेरणीही…

<h3> सचिन बन्सल, फ्लिपकार्ट सहसंस्थापक व श्रद्धा शर्मा,संस्थापक युवरस्टोरी</h3>

सचिन बन्सल, फ्लिपकार्ट सहसंस्थापक व श्रद्धा शर्मा,संस्थापक युवरस्टोरी


तीन खऱ्या गोष्टी 

मुलाखतीदरम्यान सचिन अशा तीन गोष्टींसंदर्भात भरभरून बोलले, ज्यांनी ‘फ्लिपकार्ट’च्या यशाचा पाया रचला.

सचिन म्हणाले, "आम्हाला कुणासोबत काम करायचे आहे, आमच्या कामात कुणा-कुणाला सोबत घ्यायचे आहे, याबाबत आम्ही सुस्पष्ट होतो. आम्ही सर्वांनीच आमच्यातील प्रत्येकाच्या मर्यादा ठरवून घेतलेल्या होत्या. स्टार्टअप म्हणून आधीच असे काही ठरवणे जरा अवघडच, पण आम्ही ठरवले.’’

फ्लिपकार्ट २००७/२००८ मध्ये सुरू झाले. अर्थातच तेव्हा ते आजच्या इतकं आलबेल नव्हतं. सचिननी सांगितले, ‘‘आमच्याकडे अनेकविध कारणांनी येणाऱ्या अनेक लोकांना आम्ही सहज होकार द्यायचो. पण निराकरण राखून ठेवायचो. नाही कुणाला म्हणायचं नाही आणि जे करायचं तेच करायचं, हे आमचं सुरवातीचं धोरण होतं.’’ खळखळून हसत सचिन लगेच म्हणाले, ‘‘… आणि तेच कारणी लागलं बघा.’’ एवढ्यावर सचिन थांबले नाहीत, तर प्रारंभकाळातील उपरोक्त धोरण हे फ्लिपकार्टच्या यशाचं ‘सिंगल लार्जेस्ट रिझन’ (एकटं सर्वांत मोठं कारण) असं म्हणण्यापर्यंत त्यांनी आपलं हे ठामपण श्रोत्यांसमोर उलगडलं.

image


चोखंदळपणे हेच धोरण गुंतवणूकदारांबाबतही लागू होतं. ‘हो’ अनेकांना म्हटलं. जे ठरवले होते, तेच निवडले. ‘‘आम्ही गुंतवणूकदार निवडण्याच्या संदर्भात सक्षम होतो. ज्यांच्यासमवेत आम्हाला भागीदारी नोंदवायचीय, त्यांच्याबाबतीतही असेच. गुंतवणूकदारांसमवेत रास्त अपेक्षाही आम्ही ठरवून घेतलेल्या होत्या,’’ सचिन यांनी आपल्या प्रॉडक्टच्या यशाचे हे रहस्यही उलगडले.

सचिन यांनी सहवेदनेवर सखोल भर दिला. त्यांचे चिंतन सुरेख होते. ते म्हणाले, ‘‘तुमचे कान आणि डोळे जमिनीवर असणे फार महत्त्वाचे असते. म्हणजे वास्तवच दिसले पाहिजे आणि वास्तवच ऐकूही आले पाहिजे. जेव्हा हे अवयव आपण फार मोठे आहोत, असे म्हणू लागतात. अहंकारासारखे आणि इतर भ्रम पाहू वा ऐकू लागतात. तेव्हा या अवयवांची ही साद आपल्या डोक्यात तर पोहोचत नाहीये ना, याबद्दल आपण खात्री करून घेतली पाहिजे. स्वत:ला कुठल्याही बाबतीत गर्विष्ठ होऊ न देणे हाच आमच्यासाठी (स्टार्टअपसाठी) कळीचा मुद्दा असतो". ‘सकारात्मक जनसंपर्क’ हा विषय आपण वाचायला घेतच नाही, त्याबद्दलची समिक्षा मात्र आवर्जून वाचतो. त्यातून काय टाळायला हवे, ते कळते, हे नमूद करायला ते विसरले नाहीत.

सहसंस्थापकाची योग्य भूमिका

एक बडी कंपनी उभारली. विजयाचा बुलंद झेंडा रोवला. काय होतं या झेंड्याच्या तळाशी? सचिन म्हणाले, "मी आवश्यक त्या बदलासाठी आणि शिकायला म्हणून नेहमी तयार असतो. अर्थात म्हणायला हे सोपं आहे, पण याचं भान बऱ्याचदा हरपतं आणि म्हणूनच मी या तत्वाला थेट माझ्या आयुष्याचा आणि कृतीचा दृष्टिकोनच बनवून टाकलं.’’

सचिन म्हणाले, ‘‘तुम्ही जर एखाद्या कंपनीचे संस्थापक असाल तर कंपनीशी निगडित प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यवहार एकाच वेळी तुमची वैयक्तिक बाब असते आणि व्यावसायिक, सांघिक बाबही असते. आणि या दोन्हींमध्ये फरक तसा उरत नाही. म्हणून तुम्ही एखादी कळ दाबून चला आता हे वैयक्तिक आहे आणि हे सांघिक अगर व्यावसायिक आहे, असे फेरबदल करू शकत नाही. तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनातही जे काही करता त्याचा मोठा परिणाम तुमच्या व्यवसायावर होतच असतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक अशी तुम्ही स्वत:ची फारकत कधीही करू शकत नाही… आणि करायला नको.’’

image


उद्यमी-व्यावसायिकांना कानमंत्र देताना सचिन म्हणाले, "कान आणि डोळे उघडे ठेवा. जीवन हे ‘कृष्ण’ किंवा ‘धवल’ नाही. एखाद्याच्या बाबतीत माझ्याजवळ कुणी जेव्हा खूप सकारात्मक बोलतो किंवा खूप नकारात्मक बोलतो तेव्हा माझी आधीच ही खात्री असते, की अरे हे जे चित्र रंगवलं जातंय हे काही तितकंस खरं नाही. कारण मला हे वास्तव ठाऊक आहे, की जीवन हे ‘काळे’ किंवा ‘पांढरे’ नाही. खूप रंग त्यात भरलेले आहेत. एका माणसामध्ये काही चांगले तर काही वाइट गुण असतात. चांगल्या गुणांचा आपण कसा वापर करून घेऊ आणि वाईट गुणांचा आपल्यावर कसा वाईट परिणाम होऊ देणार नाही, हे बघायला हवे".

अनेक जण जरा मोठे झाले, की जणू अलिबाबाच्या गुहेत जाऊन बसतात. कुणाचं कितीही महत्त्वाचं काम असलं तरी कुणाला भेटत नाहीत, पण सचिन यांचे तसे नाही. ते उपलब्ध होतात. हा विषय इथंही आलाच. सचिन म्हणाले, ‘‘तुमच्यात जर हा खुलेपणा नसेल तर तुम्हाला लोकांकडून काय फिडबॅक मिळतोय, ते कळणारच नाही. तुम्ही जर लोकांपासून स्वत:ला कोंडून घेतलं तर तुमच्याच प्रगतीचा श्वास गुदमरेल.’’

शिखरावर एकटाच

स्टार्टअप जेव्हा एका मोठ्या आस्थापनेत, मोठ्या व्यावसायिक संस्थेत रूपांतरित होतं, तेव्हा सुक्ष्म व्यवस्थापनात आपला सहभाग आता उरलेला नाही, याबद्दल संस्थापकामध्ये एक अनाहुत अस्वस्थता येते. बारिकसारिक कामातून अंग काढून घेताना ती आता कशी होतील, याची चिंता लागून राहते. बहुतांश स्टार्टअपच्या संदर्भात ती मोठी होताना असे घडते, पण फ्लिपकार्टने हे आव्हानही सहज पेललेले आहे. संस्था संचालनासाठी आणि प्रगतीच्या वाटेवर पुढेच नेत राहण्यासाठी त्या-त्या विषयात असामान्य कौशल्य असलेले सहकारी ‘फ्लिपकार्ट’ने आधीच आपल्या भात्यात तयार ठेवलेले होते.

हलके हसतच सचिन म्हणाले, ‘‘मोठ्या प्रमाणावर वितरण यंत्रणा विकसित करायचीय, याबाबत बिन्नी आणि मी अगदी प्रारंभबिंदूपासून सुस्पष्ट होतो. वितरकाकडून एक लेखी पत्र आम्हाला पुरेसे.’’

‘‘आम्हाला लोकांनी आमच्या दिशेने पुढे यायला हवे होते. जेणेकरून आमच्या व्यवसायाला त्यांची मदत होईल. आणि मग आम्ही त्यांना काय दिले, तर अगदी पहिल्या दिवसापासून एखाददुसरा अपवादवगळता संपूर्ण स्वातंत्र्य. संपूर्ण स्वायत्तता. अनेकदा दिवसातून दहा-दहावेळा अनेक लोकांनी कंपनीसाठी डिलिव्हरीचे कार्य केले. प्रतिभेला आम्ही खुला वाव दिला. शिक्षण आणि प्रोत्साहन ही दोन अवजारे त्यासाठी पारजलेली होतीच. प्रत्येक सहकाऱ्याने आमच्या व्यवसायाला आपापल्या संपूर्ण क्षमतेने आकार दिला. पूर्णत्व दिले. कारण आमच्याकडून त्यांना खुले आवाहन होते, ‘पुढे या आणि चांगले बदल घडवा.’’

काळाच्या ओघात ईकार्ट ही डिलिव्हरी सर्व्हिसची नवी कल्पना समोर आली. देशातील लहान-मोठ्या शहरांतून डिलिव्हरी सुरू करण्याबाबत ती होती. सचिन म्हणाले, आम्ही जेव्हा एखाद्यावर विश्वास टाकतो. तेव्हा त्याला हवे ते करण्याची पूर्ण मोकळीक देतो. आम्ही या कल्पनेच्या सर्जकाला वाव दिला. प्रयत्न करून बघ म्हणून सांगितले. कोरामंगलासाठी मग त्याने ४-५ डिलिव्हरी बॉय हायर केले. ग्राहक खुश होते. आणि मग आम्ही ही नवी सेवा आणखी २० अन्य शहरांतून क्रियान्वित केली.’’

सचिन म्हणाले, की आम्ही कंपनी अशी इतकी मोठ्ठी होईल आणि इतक्या लवकर हे सगळे घडेल, अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती. कंपनीची सुरवात केली तेव्हा तर नाहीच नाही. ‘‘एक्सेल पार्टनर्ससमोर आम्ही जेव्हा सादरीकरण केले तेव्हा येत्या पाच-दहा वर्षांत आपण १०० दशलक्ष डॉलरपर्यंत मजल गाठू, अशी शक्यता आम्ही गृहित धरलेली होती. जसे आम्ही काम सुरू केले. आम्ही खणत गेलो आणि कुदळीच्या घावागणिक जणू सोनंच सोनं हाती लागत गेलं. आम्ही मोठेच मोठे होत गेलो. आम्हाला या मोठेपणाचं भान आणून देण्यात आमच्या गुंतवणूकदारांचा सिंहाचा वाटा होता,’’ अशा शब्दांत सचिन यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ‘फ्लिपकार्ट’साठी प्रगती ही जणू एक अन्वेषण प्रक्रिया होती, काळाच्या ओघात स्वत:च आपला (प्रगती) साक्षात्कार घडवणारी!

image


आपल्या सहकाऱ्यांसाठी (कर्मचारी) ‘हॅकॅथॉन’ (मॅरॅथॉन या धावण्याच्या स्पर्धेच्या धर्तीवर हॅकिंगची स्पर्धा) आयोजित करणाऱ्या सुरवातीच्या कंपन्यांपैकी ‘फ्लिपकार्ट’ ही एक. सचिन म्हणाले, ‘‘आम्ही तंत्रज्ञानाच्या बाबतीत आणि संगणक विज्ञानाच्या बाबतीत कमालीचे संवेदनशिल आहोत. शिवाय व्यवसाय आणि व्यवसायाची पातळी याच्याशी हे दोन्ही विषय थेट संबंधित आहेत. आमच्यासारखी वैशिष्ट्ये असलेल्या व्यवसायासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म अनिवार्यच. इथं माणसांचं काम शक्य तितकं हलकं करण्याला प्राधान्य असतं. प्लॅटफॉर्मशिवाय असा व्यवसाय चालूच शकत नाही." तंत्रज्ञानातील आपल्या गुंतवणुकीविषयी सचिन असे भरभरून बोलले.

शिखराचा शेंडा या सगळ्यांतून एकट्याने गाठता येतो? हा प्रश्न पुढ्यात आल्यानंतर सेकंदाच्या काही भागात सचिन उत्तरले, ‘हो अर्थातच! संस्थापक ज्या प्रसवयातनांतून जातो, त्या अन्य कुणीही समजून घेऊ शकत नाही. या यातनांची अनुभूती तर केवळ अशक्य आहे. व्यवसायाच्या चढउतारात काळजाचे ठोके, कसे चुकतात, हे या वंशात आल्यावरच कळते. पण हे असे व्हायलाच हवे. कारण हेच तुम्हाला तुमच्या मर्यादांपलिकडे नेऊन ठेवते. तुमच्या प्रगतीला हातभार लावते.’’

‘‘तुमची क्षणागणिक वाटचाल योग्य दिशेने चाललेली आहे, की नाही, या हिशेबाने तुम्ही सातत्याने स्वत:ला मिनिटाबरहुकूम तपासले पाहिजे. जर तसे नसेल तर वाटचालीची दिशा बदलली पाहिजे. चुकांतून बोध घेत वाट सुकर केली पाहिजे’’, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

ध्येय

नांगर रोवून स्थिर राहणे, यशाच्या आरशातील हेच तुमचे सर्वांत महत्त्वाचे प्रतिबिंब. सचिन म्हणाले, ‘‘संपूर्ण देशातील वाणिज्य व्यवहार बदलण्याची मोठी संधी आम्हाला आहे. व्यवहारात अधिकाधिक सुधारणा अपेक्षित आहेत आणि या कसोटीवर आम्हाला खरे उतरायचे आहे. आम्ही इथे वाढलो. इथे जगतोय. आणि आम्हाला या आमच्या जीवनमार्गात मोठे परिवर्तन घडवून आणायचे आहे.’’

सचिन यांची प्रकट मुलाखत अवघ्या परिषेदच्या दृष्टीने बहुप्रतिक्षित होती. श्रोत्यांना या मुलाखतीने खूप काही दिले. श्रद्धा यांच्या रॅपिड फायर राउंडमध्येही सचिननी उत्तम खेळ केला. एका वाक्यातील सचिनचा प्रतिसाद उत्तुंग, वेगवान चौकारा- षटकारांसारखाच होता.

स्टार्टअप : रूपांतरण आणि ऊर्जा

अपयश : पश्चाताप नव्हे, शिक्षण

फंडिंग : अत:पर्यंतचे एक माध्यम

मिडिया : दुर्लक्ष करा (आउच!)

‘नकोरे’छाप : तुम्हाला तुमच्याच गुडघ्यावर ठेवतात म्हणून महत्त्वाचे

टिम : तुमचे कुटुंब

गुंतवणूकदार : तुम्ही रास्त अपेक्षा ठरवल्या, तर गुंतवणूकदार ठरतात फळाचा गुणाकार!

आनंद : ही कुठली समस्या तुम्ही सोडवता आहात आणि तुम्ही त्यात कुठवर पोहोचला आहात?

आणि शेवटचा प्रश्न ‘फ्लिपकार्ट’ला तुम्ही काय समजता? त्यावर सचिनचे साधेसरळ उत्तर, ‘‘माझे बाळ!’’


लेखक : अथिरा ए. नायर

अनुवाद : चंद्रकांत यादव

Add to
Shares
8
Comments
Share This
Add to
Shares
8
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags