संपादने
Marathi

SRVC : ITसह विविध क्षेत्रांतील अंधांचा प्रकाश!

Chandrakant Yadav
10th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

कोच्चीतील सुप्रसिद्ध इन्फोपार्क परिसरात आजकाल एक दृश्य लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडते आहे. टाटा कॉग्निजेंट आणि विप्रोसारख्या बड्या कंपन्यांच्या मधोमध विस्मया बिल्डिंगच्या तळमजल्यावरील रोटरी क्लब कोचिन संचलित Society for Rehabilitation of the Visually Challenged (एसआरव्हीसी) केंद्र म्हणजे सेवेचा मुकुटमणीच. अर्थात परिसरातील इतर आस्थापनांप्रमाणे उत्तुंग आणि चकाचक इमारत एसआरव्हीसी कडे नाही, पण इरादा मात्र त्याहून कितीतरी पटीने उत्तुंग, ‘बुलंद’ असा आहे. १५ ते ४५ वयोगटातील अंध बांधवांसाठी इथे विविध प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. कवी सुरदास अंध होते, पण कमालीचे प्रतिभावंत. प्रतिभा हाच त्यांच्यासाठी प्रकाश होता. प्रशिक्षणाच्या माध्यमातून इथं अनेक अंध बांधवांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रतिभेची, कौशल्याची रुजवण केली जाते. आणि त्या प्रतिभेच्या, कौशल्याच्या बळावर हे आधुनिक सुरदास पुढे आयुष्यभर स्वावलंबनाचा कित्ता गिरवतात.

एसआरव्हीसीत दाखल होणारे सगळेच विद्यार्थी एकतर जन्मांध आहेत किवा मग एखाद्या अपघातात अगर आजारात त्यांनी आपली दृष्टी गमावलेली आहे. खास त्यांच्या सोयीने साकारण्यात आलेल्या वसतिगृहात हे विद्यार्थी इथे राहातात. पेईंग गेस्ट म्हणून राहाण्याचीही सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिली जाते. एसआरव्हीसीमध्ये अंधांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात कमालीचे वैविध्य असते. डेटा एंट्री, टेलीमार्केटिंग, संगीत, मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन, स्वाद विशेषज्ञ प्रशिक्षण (चहा चाखून पाहणे, वाइन चाखून पाहणे आणि उत्पादकांना आवश्यक त्या बदलासाठी मार्गदर्शन करणे), पारख विशेषज्ञ (सुगंध, सुगंधित तेल, अर्क, उटणे, साबण आदींचा सुगंध घेऊन त्याच्या दर्जाबद्दल अंतिम निर्णयात उत्पादकांची मदत करणे), फिजिओथेरेपी प्रशिक्षण अशा विविधांगी प्रशिक्षणांतून अंधांना त्यांच्या आयुष्यात स्वावलंबी बनवण्याचे कार्य एसआरव्हीसीकडून केले जाते.

एसआरव्हीसीची स्थापना २००० वर्षाच्या प्रारंभात करण्यात आली. पुढे २००२ मध्ये सुनील जे मॅथ्यू आणि एम. सी. रॉय यांच्या पुढाकाराने अशासकीय संस्था (एनजीओ) म्हणून या उपक्रमाची नोंदणी करण्यात आली.

image


सुनील याबद्दल माहिती देताना सांगतात, ‘‘जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात अंधांची संख्या जवळपास ३७ दशलक्ष आहे. अंधांची सर्वाधिक संख्या भारतातच आहे. इतर सगळेच देश या खालोखाल आहेत. अंधांच्या एवढ्या मोठ्या संख्येला स्वत:च्या पायावर उभे करायचे तर काय काय करता येऊ शकते, त्याचा विचार करत असतानाच मला एक कल्पना सुचली. माझे करिअर घडवणारी आयटी क्रांतीच या कल्पनेची खरी जननी. अंधांसाठी एक प्रशिक्षण केंद्र आणि पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचे मी ठरवले. ‘स्क्रिन ॲक्सेस रिडर’च्या ‘टेक्स्ट-कू-ऑडियो सॉफ्टवेअर’च्या सहाय्याने अंधांना बँकांतून, कॉल सेंटरमधून रोजगार मिळण्याच्या संधी अलीकडे वाढलेल्या आहेतच.’’

image


डिझाईन आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील ‘सिस्टिका सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे सुनील हे संस्थापक आहेत. कंपनीच्या टिममध्ये एका अंध प्रोग्रॅमरसमवेत एकुण आठ लोक आहेत. या सगळ्यांनी मिळून माहिती तंत्रज्ञानातील आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर करून एसआरव्हीसीसाठी वेगवेगळे प्रयोग करायला सुरवात केली. उपक्रम राबवायला सुरवात केली. ‘‘सुरवातीच्या काळात फक्त उन्हाळी शिबिरांचे आयोजन केले जात असे. आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना आणि या विषयातील तज्ज्ञांना आम्ही मार्गदर्शनासाठी बोलवत असू. पुढे २००८ मध्ये आम्हाला एक चांगले कार्यालय उपलब्ध झाले. जागा मनमोकळी होतीच, शिवाय उपकरणांनी ती आणखी सुसज्ज करता आली. पुढे आम्ही थेट ६ ते ८ महिन्यांच्या बॅच सुरू केल्या.

आणखी काही वर्षांनी या जोडगोळीने आपल्या अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढवली. आयटीवगळता इतर विषयही त्यात समाविष्ट केले. ‘‘आता प्रत्येकाला कॉम्प्युटरमध्ये रस असेलच हे काही गरजेचे नाही. पुढे एम. सी. रॉय यांची संगीतातील मातब्बरी समोर आली. एसआरव्हीसीच्या ऑर्केस्ट्राची यातूनच मुहूर्तमेढ झाली. ‘‘प्रेक्षकांना अखेरपर्यंत आम्ही हे कळू दिले नाही, की स्टेजवर सगळे कलाकार अंध आहेत आणि असे कितीतरी प्रयोग आम्ही सादर केले. प्रयोगानंतर जेव्हा याची माहिती दिली जाई, तेव्हा अवघे प्रेक्षागार क्षणभर गप्पगार होई आणि टाळ्यांचा असा कडकडाट होई, जशा काही विजाच…’’

image


एसआरव्हीसीचे अंध विद्यार्थी आता डाटा एंट्री, टेलिमार्केटिंग, कॉलसेंटर आदी क्षेत्रांतूनही रोजगार मिळवताना आता दिसताहेत. एसआरव्हीसीची फुटबॉल टिमही आहे. २०१३ मध्ये थायलंडमध्ये झालेल्या अंधांच्या फुटबॉल स्पर्धेत एसआरव्हीसीचा संघ भारताचा संघ म्हणून सहभागी झाला होता. सात संघ स्पर्धेत होते आणि उपांत्यफेरीपर्यंत एसआरव्हीसीच्या या संघाने धडक मारली होती. या फेरीत इराणशी संघाचा मुकाबला झाला. इराणचा हा संघ जगात पाचव्या क्रमाचा मानला जातो.


image


‘रिफ्लेक्सॉलॉजी’सारखे कार्यकलापही इथे होतात. सुनील सांगतात, ‘‘आमचा एक विद्यार्थी मालिशच्या कामात पारंगत आहे. त्याने मसाजसेंटरही सुरू केलेले आहे. लोकांना त्याचे काम पसंत पडले. सेंटर जोरात चालू लागले. आता त्याच्याकडे चार अन्य अंध बांधव कामावर आहेत.’’

एसआरव्हीसीतून शिकून आयुष्यात स्वावलंबनाचे धडे गिरवताहेत अशा विद्यार्थ्यांचे एकूण प्रमाण ६५ टक्के आहे. एसआरव्हीसीचे यश सांगण्यासाठी आणखी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही. विविध कॉर्पोरेट घराण्यांनी आपापल्या कॉलसेंटरसाठी, प्रशासन विभागासाठी म्हणून भरतीकरिता एसआरव्हीसीशी हातमिळवणी केलेली आहे.

‘‘आमच्याकडल्या काही विद्यार्थ्यांना टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी आयडियामध्ये पाठवले गेले. आणि आयडियाला आमची ही मुले इतकी पसंत पडली, की पुढल्या वर्षी आमची बॅचच्या बॅच त्यांच्याकडे नोकरीवर ठेवायला ते तयार होते.’’

इथे प्रशिक्षण घेऊन अनेकांनी लाँड्री, खाद्य-पेय उद्योग, टेस्टिंग अशा व्यवसाय-धंद्यांतून आपापली कारकीर्द सुरू केलेली आहे. कोचिनमधल्या एका फाइव्हस्टार हॉटेलमध्ये काहीजण कायमस्वरूपी ऑर्केस्ट्रा कलावंत म्हणून कामाला लागलेले आहेत. उर्वरित ३५ टक्के विद्यार्थी जे रोजगार प्राप्त करण्यात अपयशी ठरतात, ते मुख्यत्वेकरून पुन्हा शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊ लागतात.

image


एसआरव्हीसी कसे तग धरून आहे?

एसआरव्हीसी स्वत:चे पाठबळ मिळतेच. शिवाय ‘सीएसआर’ उपक्रमांच्या माध्यमातून मिळणाऱ्या देणग्या आणि काही प्रायोजकांची मदत असा एसआरव्हीसीचा गाडा चालतो. सुनील अभिमानाने सांगतात, ‘‘आठ वर्षांत आम्ही दहा बॅच यशस्वी केल्या आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये आम्हाला आणखी एक केंद्र सुरू करावे लागले. चार महिन्यांचे लहान अभ्यासक्रम आम्ही राबवतो. इंग्रजी आणि संगणकशास्त्रावर आमचा मुख्य भर असतो.’’

अर्थात हा प्रवास लांबलचक आणि खडतर असाच आहे. सुनील सांगतात, की सुरवातीला त्यांच्यासमोर खुप अडचणी आल्या. आर्थिक अडचण ही मुख्य अडचण होती. अंध व्यक्ती नियमित कामकाज करायला सक्षम नसते, ही सामान्य भारतीय मानसिकता घालवण्यासाठी खुप कष्ट उपसावे लागले. एकीकडे कुटुंबीय आपल्या अंध पाल्याला घराबाहेर पडू देण्यास उत्सुक नसतात तर दुसरीकडे कंपन्या त्यांना कामावर घेत नाहीत. इकडे आड तिकडे विहिर अशा दुविधेत अडकलेल्या अंधांना पैलतिरी लावणे म्हणजे काही सोपे काम नव्हते.

image


सुनील सांगतात, ‘‘गेल्या बारा वर्षांत आम्ही कमालीच्या गुणी अंधांचा एक मजबूत पुल तयार केलेला आहे. रोजगार देणाऱ्या कंपन्यांच्या ते पुरेपूर उपयोगात पडतील. मिळणाऱ्या मोबदल्याचा पुरेपूर मोबदला आपल्या कामाच्या माध्यमातून देतील, अशा क्षमतेचे हे सगळेच विद्यार्थी आहेत. असे अंधही आमच्याकडे येतात, ज्यांना घरात अगदी नकोसे झालेले असते. आई-वडिलांनाही बरेचदा कळत नाही, की आपल्या अंध मुलाला नेमके काय हवे आहे. पण इथे सीआरव्हीसीत ते सगळ्यांना कळते.’’

सलग आणि न थकता काम करण्याची उर्जा कोठून प्राप्त होते, या संदर्भात सुनील सांगतात, ‘‘कितीतरी लोक विचारतात हा प्रश्न की तुम्हाला एवढा वेळ मिळतो कसा. मला वाटते आम्हा सगळ्यांकडेच यासाठी पुरेसा वेळ आहे. आम्हीच त्याकडे लक्ष देत नाही. ज्यांना कुणासाठी तरी काही तरी करायचे असेल तर त्यांना काहीही अडथळे येत नाही. अगदी आवाज न करता ते कुणासाठी काहीतरी करू शकतात.’’ कधी तरी नैराश्य येते का किंवा हे काम बंद करण्याचा विचार तरळून जातो का, या प्रश्नावर सुनील सांगतात, ‘‘खरंतर मी अनेकदा एकदाची नोकरी सोडेन म्हणून म्हणतो आणि या अंधसेवेच्या पवित्र कार्याला पूर्णवेळ वाहून घेईन म्हणतो, पण तेही तूर्त जमलेले नाही. हे काम बंद करण्याचा विचार मी जागेपणी काय स्वप्नातही करू शकत नाही.’’

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags