संपादने
Marathi

दिल्ली आयआयटी स्कॉलर्सचा… सायकलिंग, रनिंगद्वारे फिटनेस मंत्र

7th Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

धावणे आणि सायकलिंग हे दोन खेळ असे आहेत, ज्यात खेळाडूंना आर्थिक गुंतवणूक फारशी करावी लागत नाही. धावण्याची एक चांगल्या बुटांची जोडी आणि सायकलिंगसाठी सुरक्षित गिअर असलेली एक सायकल एवढाच काय तो खर्च असतो. इतर मैदानी खेळांचा विचार करता हा खर्च तुलनेत खरोखरच फार कमी असतो. मग तरीही या खेळांचा फारसा प्रचार आणि प्रसार का म्हणून नाही. खेळाडू प्रशिक्षण सत्राकडे पाठ का फिरवतात? तर त्यांना प्रोत्साहन मिळत नाही, हेच त्याचे उत्तर! तुमचे समविचारी, तुमच्यासारख्याच ध्येयाने प्रेरित असलेली मंडळी असे सगळे तुमच्या अवतीभवती असेल तर त्याचा फार परिणाम होतो. हीच बाब लक्षात घेऊन (FITSO) ‘एफआयटीएसओ’ची स्थापना करण्यात आली. सरावाचा अनुभव सामाजिकदृष्ट्या अधिक सुकर करण्यासाठी, योग्य तो सल्ला देण्यासाठी आणि तज्ज्ञांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यासाठी…

हे काय आहे?

FITSO म्हणजे काय तर ‘फिटनेस सोशल’ ‘Fitness Social’ या संकल्पनेचे लघुरूप. आपण त्याला फिटसो म्हणूयात. फिटसो हा एक ऑनलाइन उपक्रम आहे. रनिंग आणि सायकलिंगसाठी पार्टनर, सहकारी मिळवणे; दोन्ही क्रीडाप्रकारांतील कार्यकलाप, प्रशिक्षक आणि या क्षेत्रातील सेवा व्यावसायिक या सगळ्यांचा वेध घेण्यासाठी हा उपक्रम आपल्या युजर्सना मदत करतो. सामुहिक कार्यकलापाच्या माध्यमातून आरोग्यमय जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ॲअॅपच्या माध्यमातून युजर्स कार्यकलाप, कार्यक्रम जाणून घेऊ शकतो आणि ‘जॉइन’वर टॅप करून आपला सहभागही त्यात नोंदवू शकतो.

इतर फिटनेसप्रेमींबाबत माहिती जाणून घेण्यासह युजर्स प्रशिक्षकांचे शिक्षण, अनुभव आणि त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीबाबत तसेच ते आकारत असलेल्या प्रशिक्षण शुल्काबाबतही जाणून घेऊ शकतो. योगप्रशिक्षक, फिजिओथिरेपिस्ट, आहारतज्ज्ञ, फिटनेस प्रशिक्षक, मसाज तज्ज्ञ युजर्ससाठी उपलब्ध होऊ शकतात. सर्वांसह युजर्स आपल्यासाठी स्वतंत्र सत्र आयोजू शकतो. ‘फिटसो’ सध्या दिल्लीत कार्यरत आहे आणि लवकरच भारतातील इतर शहरांमध्येही आपला कार्यविस्तार करण्याच्या बेतात आहे.

image


वैशिष्ट्ये

कार्यकलाप : युजर्सना सायकलिंग आणि रनिंगची आयोजने कुठे, कशी आहेत, ते कळते. वेळ, स्थळ अशी माहिती पुरवली जाते. इतर समस्यांचेही समाधान केले जाते. युजरची इच्छा असल्यास तो ॲक्टिव्हिटीत सहभागी होऊ शकतो. रनिंग आणि सायकलिंग सहकाऱ्यांशी कनेक्ट होऊ शकतो आणि आवश्यक ते अपडेट्स मिळवू शकतो.

कार्यक्रम : शहरात होऊ घातलेल्या कार्यक्रमांबद्दल युजर्सला माहिती मिळवता येऊ शकते. स्थळ, शुल्क, कार्यक्रमाचा प्रकार हे सगळे कळू शकते. कार्यक्रमाशी संबंधित लोकांशी युजर्स कनेक्ट होऊ शकतो आणि आपला सहभाग नोंदवू शकतो.

प्रशिक्षक : युजर्सना आपल्या पसंतीचे प्रशिक्षक मिळू शकतात. प्रशिक्षकांसमवेत युजर्स वन-ऑन-वन प्रशिक्षण सत्राचा लाभ घेऊ शकतो. मॅरॉथॉन्स, अल्ट्रा-मॅरेथॉन्स, आयर्नमॅन आणि इतर सायकलिंग, रनिंग तसेच जलतरणासाठी म्हणूनही या माध्यमातून प्रशिक्षक उपलब्ध होऊ शकतात.

इतर सेवा : प्रशिक्षकांव्यतिरिक्त युजर्स तज्ज्ञ व्यावसायिकांशीही संपर्क साधू शकतात. योगा प्रशिक्षक, फिजिओथिरेपिस्ट, आहारतज्ज्ञ, फिटनेस प्रशिक्षक, मसाज तज्ज्ञ युजर्ससाठी उपलब्ध होऊ शकतात. युजर्स आपल्यासाठी या तज्ज्ञांचे स्वतंत्र सत्र त्यांना (तज्ज्ञांना) उपलब्ध असणाऱ्या वेळेबरहुकूम आयोजू शकतो.

ॲअॅपमधील आशय : आहार, फिटनेस आणि रनिंग यासंदर्भात या उद्योगातील तज्ज्ञांनी लिहिलेले मार्गदर्शक लेख ॲअॅपच्या माध्यमातून युजर्सना उपलब्ध होतात. युजर्सला वाचक म्हणून लेखकाला उद्देशून काही सांगायचे असेल किंवा विचारायचे असेल तर त्यासाठीही यावर पर्याय उपलब्ध आहे.

फिस्टोची कथा

सौरभ अग्रवाल, नमन शर्मा आणि राहुल सुरेका हे सारे ‘फिस्टो’चे संस्थापक आहेत. तिघेही दिल्ली आयआयटीचे पदवीधर. नमन या स्टार्टअपपूर्वी ‘झोमँटो’मध्ये चार वर्षे होते. ते ‘फिस्टो’त टेक्नॉलॉजी अँड प्रॉडक्ट प्रमुख आहेत. राहुल यांनी ‘येप्मे’ आणि ‘अर्बन क्लॅप’समवेत याआधी काम केलेले आहे. राहुल ‘फिस्टो’चे ‘मार्केटिंग स्ट्रॅटेजी’ प्रमुख आहेत. सौरभ यांनी याआधी ‘फ्लिपकार्ट’मध्ये व्यवसाय विकासातील महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडलेली आहे. क्रीडाविषयक आवडीमुळे ते या नव्या उपक्रमात सहभागी झाले.

सौरभ यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये आयर्नमॅन इव्हेंट पूर्ण केलेली आहे. (Watch video here) एप्रिल २०१५ मध्ये माउंट एव्हरेस्टवर चढाईचा प्रयत्न केलेला आहे. दुर्दैवाने नेपाळमध्ये ओढवलेल्या भूकंपाच्या संकटाने त्यांची ही चढाई अपूर्ण राहिली. ‘ला अल्ट्र’ या १११ किलोमीटरची अल्ट्रामॅरेथॉनमध्येही सौरभ यांनी आपले कसब, क्षमता आजमावली आहे. जगातली सगळ्यात अवघड अल्ट्रामॅरेथॉन म्हणून ही धावण्याची शर्यत ओळखली जाते.

गाठीला असलेला हा साहसी क्रीडानुभव आणि क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश या बळावर सौरभ यांनी हे नवे पाऊल उचलले. ज्यांना कुणाला तंदुरुस्त जगायचे आहे, मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचाय, ती धावून पूर्ण करायची आहे, अशा सगळ्यांसोबत आपले अनुभव वेचावेत आणि त्यांना मदत व्हावी या उद्देशाने हे नवे स्टार्टअप त्यांनी लोकार्पित केले. ‘फिटसो’ची व्यवसाय विकास आणि वित्त ही धुराही तेच सांभाळतात. सुरवातीला याच मित्रांसह त्यांनी ‘जोगो’ हा ऑनलाइन उपक्रम सुरू केला होता. सामुहिक तंदुरुस्ती अभियान असेच त्या उपक्रमाचेही स्वरूप होते. पण पुढे काही आठवड्यातच ‘जोगो’चे नामकरण ‘फिटसो’ करण्यात आले.

सौरभ सांगतात, ‘‘जोगो’ हा पोर्तुगिज शब्द आहे. जोगो म्हणजे खेळ. जोगो शब्द वापरण्याचा परिणाम असा झाला की गुगल प्ले स्टोअर या शब्दाबरहुकूम सगळे मोबाईल गेम डिस्प्ले करू लागले. यातून मग आमचे ॲअॅप शोधणे एक आव्हानच ठरू लागले. याच एका तांत्रिक कारणाने आम्ही नवे नामकरण केले.’’

तिघा संस्थापकांव्यतिरिक्त ‘फिटसो’च्या टिममध्ये अजितेश अभिषेक आणि कौशल मिश्रा यांच्याही मोलाच्या भूमिका आहेत. अजितेश याआधी केपीएमजीमध्ये सहयोगी सल्लागार होते. फिटसोमध्ये ते पृथ:करणाची जबाबदारी पाहतात. कौशल हे आधी ॲलीझोन सॉफ्टेकमध्ये होते. फिटसोमध्ये ते डिझाईन हेड आहेत.

गुणात्मक पद्धतींचा वापर करत फिटसोला आपला महसूल मिळवायचा आणि वाढवायचा आहे. प्रशिक्षक आणि इतर क्रीडानिगडित व्यावसायिकांना ते एक एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. जेणेकरून त्यांना ग्राहक उपलब्ध व्हावेत. सध्या ही सेवा निशुल्क आहे, पण लवकरच प्रशिक्षक तसेच इतर व्यावसायिकांना मिळणाऱ्या प्रत्येक बुकिंगनुसार ठराविक शुल्क ‘फिटसो’कडून आकारले जाणार आहे. स्थानिक जाहिराती तसेच प्रायोजित लेख आदींच्या माध्यमातूनही महसुलाची तजवीज केली जाईल.

image


क्षेत्रावर एक नजर आणि आगामी योजना

आरोग्य आणि तंदुरुस्ती ही क्षेत्रे भारतात गतीने विकसित होत आहेत. मुख्य प्रवाहातील मंडळींमध्ये याबाबत कमालीची जागरूकता आलेली आहे. फिटनेस ट्रॅकर्स, कॅलरी काउंटर्ससारखे तांत्रिक पुढाकार यशस्वी ठरत आहेत आणि लोक या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या फिटनेस पातळीवर देखरेख ठेवत आहेत. नजर ठेवत आहेत. फिटनेसमधील सुक्ष्मात सुक्ष्म बदलांबाबतही चौकस झालेले दिसत आहेत. ‘माय फिटनेस पल’ आणि Micromax backed Healthifyme हे कॅलरी काउंटर्स बाजारात लोकप्रिय ठरत आहेत. पुन्हा रनिंगकडे वळूयात. गौरव जायस्वाल आणि गुल पनाग यांनी launched ‘First Run’ सुरू केलाय. हा रनिंग प्रशिक्षक ॲअॅप आहे. चालू वर्षाच्या अलीकडच्या काळात तो सुरू झालेला आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा एक खास उपक्रम आहे.

‘फिटसो’ने आताच कुठे पाउल टाकलेले आहे. नजीकच्या भविष्यातच बाहेरून उपलब्ध होणारे फंडिंग कसे वाढेल ते बघायचे आहे आणि त्याआधारावर व्यवसाय विस्ताराच्या योजना आखायच्या आहेत. सेवेबद्दलचा मोबदला देण्या आणि उपलब्ध होण्यासाठीची प्रक्रिया सहज-सुलभ करण्यावर फिटसोचा भर आहे. प्रशिक्षक आणि युजर्सना ती कमालीची सोपी ठरेल, असे पाहिले जात आहे. सौरभ सांगतात, ‘‘आम्हाला लांबचा पल्ला गाठायचा आहे. दीर्घकालिन यश मिळवायचे आहे. त्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. सध्या आम्ही सायकलिंग आणि रनिंगवर भर दिलेला आहे, पण पुढे अन्य फिटनेससाठीच्या अन्य सामुहिक क्रीडाप्रकार आणि व्यायामप्रकारांतही लक्ष घातले जाईल.’’

युअर स्टोरीचे मत

फिटसो अत्यंत विचारांती बाजारात आलेले प्रॉडक्ट आहे. मांडणी आणि रचनेच्या पातळीवर तर ते अत्यंत दर्जेदार आहे. त्याच्या उपयुक्ततेला तोड नाही. ते विषय आणि आशय या दोन्हीबाबतीत समृद्ध आहे. अंतर्ज्ञानी आहे. हाताळायला सोपे आहे. फिटनेसबाबत जागरूक असलेल्यांसाठी, प्रशिक्षकांसाठी एक सशक्त व्यासपीठ म्हणून परिपूर्ण आहे. ‘लिडर बोर्ड’ हे इन-अॅप म्हणजे या उपक्रमाची खासियत आहे. युजर्समध्ये सकारात्मक स्पर्धेची वृत्ती रुजवण्यात ते कमालीचे उपयुक्त ठरेल, असे आहे. एकूणच याॲअॅपला लोक आपलेसे करतील, इतकी क्षमता ‘लिडर बोर्ड’मध्ये आहे.

कार्यकलाप आधारित ॲअॅप असणे हीच मुळात एक आगळी बाब आहे. ॲअॅप नवोदित आहे. माध्यम म्हणून ते काम करणार आहे. प्रगतीची क्षमता त्यात आहे. उच्च श्रेणीचे हे कार्य आहे. समाजशिक्षकाची भूमिका त्यात सामावलेली आहे. अशा विविध पातळ्यांवर, पैलूंवर नजर टाकली असता हा एक अत्यंत उत्तम असा उपक्रम आहे. एक असे ॲअॅप ज्यावर साइन अप करताना युजर्सना खात्री असते, की ते सर्व हाताळू शकतील. शिक्षण देणारी, पाठबळ देणारी एक चांगली चमू आपल्याला गवसलेली आहे, हे समाधान युजर्सना देण्यात ‘फिटसो’ यशस्वी ठरते. ‘ॲक्टिव्हिटी’ टॅबखाली ‘फिल्टर’ ऑप्शन जोडून ॲअॅपने उत्तम केले आहे. युजर्सच्या शंकांचे समाधान यातून होते. ‘रिकमेंडेशन’ सेक्शन अपिलिंग आहे आणि ते महसुलाचा चांगला स्त्रोत ठरेल, असे आहे. बुट, पूरक आहार यांच्याबाबतही ‘फिटसो’ युजर्सना सूचना करू शकते, जेणेकरून ही उत्पादने युजर्सना ऑनलाइन खरेदी करता यावीत. नजीकच्या भविष्यात तशी आमची योजना आहे, असे खुद्द सौरभच सांगतात.

फिटसोचा चमू अनुभवी आहे. तंत्रज्ञानात पारंगत आहे. क्रीडा क्षेत्रातील अनुभवही या चमूतील सदस्यांना आहे. फिटनेस कसा राखावा, हे त्यांना माहिती आहे. फिटसो आपल्या तंदुरुस्तीचे सोशल नेटवर्क कसे वाढवते आणि इतर शहरांतूनही कसे फोफावते, ते पाहणे रंजक ठरेल.

लेखक- हर्षित मल्ल्या

अनुवाद- चंद्रकांत यादव

Website:FITSO, App

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags