अंतर्मनाची साद ऐका आणि अद्भूत अनुभूतीचा आनंद मिळवा – शेखर विजयन

अंतर्मनाची साद ऐका आणि अद्भूत अनुभूतीचा आनंद मिळवा – शेखर विजयन

Wednesday February 17, 2016,

4 min Read

आपलं नियमित काम सोडून वेगळं काहीतरी करावं असं आपल्या सगळ्यांनाच कधीनाकधी वाटत असतं. बऱ्याचदा आपल्याला रोजच्या कामातून एक ब्रेक हवा असते. तर काही जण त्यांचा हा ब्रेकच उपजिविकेचं साधन बनवतात. शेखर विजयन यांनीही हेच केलं. सूत्रसंचालक, नाटककार आणि व्हॉईस आर्टिस्ट शेखर यांचा जन्म केरळचा, पण बालपण दिल्लीमध्ये गेलं.

बेंगरुळुतल्या बहुतांश लोकांप्रमाणे शेखर यांचं आयुष्यही एका सरळ रेषेत सुरू होतं. सॉफ्टवेअर आणि सेल्स क्षेत्रातली नोकरी होती. जगभर प्रवास हे त्यांच्याकरता अप्रूप राहिलं नव्हतं. आयुष्य एका लयीत सुरू असताना त्यांना कशाची तरी कमतरता जाणवू लागली. सगळं काही अळणी आहे असं वाटू लागलं. काही तरी वेगळं करावसं वाटत होतं. पण नेमकं काय करावं हे मात्र उमजत नव्हतं. या सगळ्या विचारांच्या भाऊगर्दीत मग एका क्षणी त्यांनी सरळ नोकरीलाच राम राम ठोकला.

अंर्तमनाचा आवाज

शेखर सांगतात, “माझ्या वरिष्ठांनी मला चांगल्या ठिकाणांची नियुक्ती देऊ केली. पण यामुळे फारसा काही बदल होईल असं मला वाटलं नाही. तेच काम दुसऱ्या ठिकाणी जाऊन करायचं एवढाच काय तो बदल”. आणि मग त्यांनी रेडिओ जॉकी होण्याकरता प्रयत्न करण्याचं ठरवलं.

स्वतःला शोधण्याच्या प्रयत्नात शेखरनी अनेक वाटा धुंडाळल्या. त्यांनी इवममध्ये ४५ दिवसांचं नाट्यप्रशिक्षण घेतलं. त्यांनी काही नाटकांमध्ये भूमिकाही केल्या. शेखर सांगतात, “माझ्या विचारांचं तळ्यात मळ्यात सुरू असतानाच मला युरो किडस् च्या एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची संधी चालून आली. हा कार्यक्रम करताना मला खूप मजा आली आणि मला माझा मार्गही सापडला”.

शेखर विजयन

शेखर विजयन


जरा हटके

शेखरनी आपल्या आवडीलाच कमावण्याचं साधनं बनवण्याचा निर्णय घेतला. ते सांगतात, “मी आत्मशोध घेत होतो. मला ज्यातून समाधान आणि आनंद मिळेल असंच काम करायचं मी ठरवलं. या सगळ्या विचारांच्या जाळ्यामुळे माझं वजनही २० किलो घटलं”.

प्रचंड वाढलेलं वजन हे त्यांना खूप अडसर ठरत होतं. विमानाची सीट त्यांना अपुरी पडायची, सीट बेल्ट तर लावताच यायचे नाहीत. सर्वसाधारण पँटस् घालणं त्यांना कठीण झालं होतं त्यामुळे ते ट्रॅक पँटस् वापरू लागले. आपल्या कुत्र्यासोबत त्यांनी नियमित चालायला सुरूवात केली. हळूहळू त्यांची चालण्याची क्षमता वाढू लागली. १५ किलोमीटरचं अंतर ते चालत आरामात पार करू लागले. चालण्यासोबत त्यांनी धावण्याचाही सराव सुरू केला. आरोग्याकडे गंभीरपणे लक्ष देण्याचं त्यांनी ठरवलं. नियंत्रित आहार घेऊ लागले. एकंदरीत कामासोबत त्यांनी स्वतःलाही अंर्तबाह्य बदलण्याकरता प्रयत्न सुरू केले.

आज देशातल्या प्रत्येक मॅरेथॉनमध्ये शेखर भाग घेतात. मॅरेथॉनचं सूत्रसंचालनही करतात. शेखर त्यांच्या जीवनपद्धतीबद्दल सांगतात, “आयटी क्षेत्रात काम करताना तुम्ही एक साचेबद्ध आयुष्य जगत असतात. खरतर हा चौकोनचं तुमच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरतो. मला याची जाणीव झाल्यावर मी या चौकोनातून बाहेर पडण्याचं ठरवलं. पण यातून बाहेर पडण सोपं नव्हतं. मी मनाशी पक्क ठरवलं आता नाही तर परत कधीचं नाही जमणार”.

सूत्रसंचालन करताना प्रेक्षकांकडूनच आपल्याला खूप स्फूर्ती मिळत असल्याचं शेखर सांगतात. आयोजकांकडून कार्यक्रमाची सर्वसाधारण रुपरेषा घेऊन ते प्रसंगानुरूप उत्स्फूर्तपणे कार्यक्रम सादर करतात. त्यांच्या मते प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी अनेक बदल होत असतात. उदाहरणार्थ प्रायोजकामध्ये बदल किंवा आयत्या वेळी एखाद्याचं आगमन, नवीन काहीतरी समावेश करणं असं बरचं काही घडत असतं. शेखर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर, “प्रेक्षकांची नस ओळखणं हे खरं कसब असतं. मी कार्यक्रम सुरू होण्याआधी लोकांमध्ये चक्कर टाकतो. त्यांचा अंदाज घेतो. स्टेज चढायच्या आधी पोटात थोडा खड्डा पडणं स्वाभाविक असतं. पण लोकांचा उत्साह बघितल्यावर कार्यक्रम सादर करायला जोश चढतो”.

कधी कधी कार्यक्रम सादर करताना चूकाही होतात. पण त्या लक्षात आल्यावर सावरून घेऊन कार्यक्रम पुढे न्यायचा असतो. कॉर्पोरेटमध्ये बरीच वर्ष काम केल्याने त्यांना सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्यायला आणि प्रसंग हाताळायला सोपं जातं. आपल्या कॉर्पोरेटमधल्या अनुभवाच्या उपयोगाबाबत ते सांगतात, “सेल्स क्षेत्रात काम करताना वेगवेगळ्या लोकांच्या आपण संपर्कात येतो. एखाद्या गोष्टीला चांगलंं कसं सादर करता येईल याची तुम्हाला जाण आलेली असते. मी आता एस्किमोलाही बर्फ विकू शकतो”.

ताण हलका करण्याकरता शेखर बऱ्याच गोष्टी करतात. त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचन. स्वतःला घडवण्याकरता त्यांना वाचनाचा खूप उपयोग होत असल्याचं ते सांगतात. एका उत्कट क्षणाला त्यांनी आपलं आयुष्य बदलण्याचं ठरवलं आणि प्रयत्नांनी ते त्यात यशस्वी झाले. शेखर समीपाकडे येताना म्हणाले, “तुम्ही तुमच्या अंर्तमनाचा आवाज ऐकला आणि त्याप्रमाणे वागलात तर तुम्हाला एक आगळंवेगळं समाधान, तृप्ती मिळते. मी हा आवाज ऐकला आणि या अनुभूतीचा आनंद घेतोय”.

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

केवळ प्रसिद्धीच्या मागे न लागता, कलेला केंद्रस्थानी ठेवा - शिबानी कश्यप

यशाच्या वाटचालीसाठी रॉनी स्क्रूवाला यांचा मोलाचा सल्ला

डॉक्टर लेखनातून चक्क व्यवसायाकडे : जेरोनिमो हेल्थकेयर

लेखिका – सिंधू कश्यप

अनुवाद – साधना तिप्पनाकजे